समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य
* समाजभूषण पंढरीनाथ पाटील: जीवन व कार्य *
विदर्भात अनेक रत्ने जन्माला जन्म आलीत. दलित मित्र समाज भूषण पंढरीनाथ पाटील हे त्यापैकी एक होत. पंढरीनाथ पाटील यांचा जन्म 20 सप्टेंबर 1903 रोजी खामगाव तालुक्यात अंबोडा या गावी झाला. यांच्या वडिलांचे नाव सिताराम पाटील आणि आईचे नाव राधाबाई होते. वारकरी संप्रदायाचा पगडा या कुटुंबावर सुरूवातीपासूनच होता.विसाव्या शतकात सर्वप्रथम समाजसुधारणेची मुहूर्तमेढ रोवणारे ते एक विदर्भातील महामेरू होते. पंढरीनाथ पाटील यांचे आजोबा गंभीरजी पाटील हे फार खर्चिक आणि उदार स्वभावाचे होते. तद्वतच ते एक कट्टर पुरोगामी विचारसरणीचे खंदे पुरस्कर्ते होते. कारण त्याकाळी संपूर्ण जनता अनिष्ट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा इत्यादि चालीरीतींच्या विळख्यात अडकून पडली होती. दिशाहीन होऊन हतबल झाली होती.
ब्रिटिशांच्या राजवटीत अज्ञान, अंधश्रद्धा शिक्षणाचा अभाव, कर्मकांड ,उच्चवर्णीयांची मक्तेदारी आणि अनिष्ट रूढींचे दास यांचे विरुद्ध संघर्ष करणे , बंड करणे हे त्यावेळी सापे नव्हती. सामान्य माणसाच्या तर ती गोष्ट आवाक्याबाहेर होती.
"बुडते हे जन न देखवे डोळा ! त्याहुनी आंधळा बरा मी! "
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे पंढरीनाथ पाटलांच्या संवेदनशील मनाची अवस्था झाली होती. विसाव्या शतकात प्राथमिक स्वरूपात बंड करून समाजसुधारणेची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रथम प्रयत्न त्यांनी केला. ही बाब बुलढाणा जिल्ह्यासाठी फार भूषणावह होती. " कमवा आणि शिका " ही भाऊराव पाटीलांची घोषणा पंढरीनाथ पाटील यांनी सार्थ करून दाखविली. सातपुडा पर्वतात जाऊन पळसांची पाने आणलीत. द्रोण व पत्रावळ्या स्वतः शिवून तयार केल्या आणि शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी गावोगावी जाऊन त्या विकल्यात. एवढेच केले नाही तर स्टेशन मास्तर कडून पेपरची रद्दी विकत घेतली आणि पुन्हा दुकानदारांना ती विकली. आलेल्या कमाईतून काटकसरीने आपल्या शिक्षणाचा खर्च भागविला.त्यांनी पिंपळगाव काळे येथे अशा पद्धतीने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.जर शाळांना वसतीगृह असते तर , गोर -गरीब विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवण्याची मोफत सोय होईल आणि त्यांचे शिक्षण देखील पूर्ण होईल. तेव्हा या सामाजिक जाणीवेतून त्यांना " शाळा तेथे वसतिगृह " या उपक्रमाची कल्पना सुचली.
शालेय शिक्षण घेत असताना मोतीराम तुकाराम वानखेडे लिखित " ब्राह्म आणि बहिष्कार ", दयानंद सरस्वती यांचे " सत्यार्थप्रकाश " आणि कबीरांची "बीजक" हे मौल्यवान ग्रंथ त्यांच्या वाचनात आले. " ग्रंथ हेच गुरु" या म्हणीप्रमाणे वरील ग्रंथांचा पंढरीनाथ पाटलांवर फार मोठा प्रभाव पडला. या ग्रंथ वाचनाने त्यांच्या मनात महात्मा फुले यांची सत्यशोधकी विचारधारा आणि सामाजिक समता या गोष्टी रूजू लागल्या .यातूनच त्यांची सत्यशोधक चळवळ बाळसं धरू लागली. एकदा तर पुराणिक यांनी त्यांना ' तू शूद्र आहेस ? ' असे म्हटले होते. हे बोल त्यांचे जिव्हारी मर्मी घाव घालणारे होते . यातील सत्य शोधल्याशिवाय त्यांना चैन पडले नव्हते.
इ.स.1921 मध्ये त्यांच्या जीवनात एक ऐतिहासिक घटना घडली. महंमद अली आणि शौकत अली हे दोघे बंधू खिलाफतच्या आणि राष्ट्रीय सभेच्या प्रचारासाठी मलकापूर येथे आले होते. त्यांची प्रभावी भाषणे ऐकून पंढरीनाथ पाटील हे महात्मा गांधींच्या विचारधारेला नतमस्तक झाले. ब्रिटिश सरकारच्या न्यायालयावर बहिष्कार ,सरकारने स्थापन केलेल्या शाळा कॉलेजवर बहिष्कार इत्यादि विषय त्यांच्या भाषणांची होती.एकंदरीत ब्रिटिशांना " चले जाव" असे वातावरण तयार झाले होते.राष्ट्रीय चळवळीचे वारे वाहू लागले होते.
स्वदेशी शाळा स्थापन करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व वसतिगृहांची सोय जनतेने करावी असे विचार अली बंधूंनी त्या वेळी मांडले. या भाषणांनी पंढरीनाथ पाटील इतके प्रभावित झाले की त्यांनी शाळा सोडून दिली आणि राष्ट्रीय चळवळीत सहभाग घेतला. या वेळी पंढरीनाथ पाटील केवळ सतरा वर्षांचे होते. त्यांनी परकीय सत्तेविरुद्ध बंड पुकारून एक प्रकारे बंडाची तुतारी फुंकली होती. विद्यार्थी दशेतील वैचारिक ग्रंथांचे वाचन , खेड्यापाड्यातील अनिष्ट रूढी परंपरा पाहून आलेला वाईट अनुभव, वडिलांकडून मिळालेला समाजकार्याचा वारसा, शिक्षण घेत असताना झालेले हाल आणि प्रभावी व्यक्तींच्या भाषणाचा मनावर पडलेला प्रभाव इत्यादि बाबी पंढरीनाथ पाटलांना कृतिशील समाज सुधारक बनण्यासाठी कारणीभूत ठरल्यात.
पंढरीनाथ पाटलांनी समाजसुधारणेची पहिली मुहूर्तमेढ मलकापूर जवळ असलेल्या जांभूळ धाबा या गावी रोविली. ब्रिटिश सरकारला विरोध म्हणून सर्वप्रथम ब्रिटिश न्यायालयावर बहिष्कार घातला. त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून "न्याय पंचायत" स्थापन केली. वाचनाने राष्ट्रीय चळवळ वृध्दिंगत होईल हे गृहीत धरून वाचनासाठी ' गाव तेथे सार्वजनिक वाचनालयाची ' व्यवस्था केली. ब्रिटिश सरकारला हे कार्य सहन झाले नाही. त्यांनी पोलीस पाठवून पंढरीनाथ पाटलांना दम दिला आणि न्यायपंचायत, आणि सार्वजनिक वाचनालय बंद करण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश सरकारच्या या कृतीने उलट ते हतबल न होता खंबीर बनले. शिवाय त्यांचे मनोबलही वाढले. त्यांना जनतेची साथ देखील मिळाली. आता खऱ्या अर्थाने जनतेला पंढरीनाथ पाटील कळू लागले.नव्या जोमाने ते कामाला लागले. ब्रिटिशांची कुटील आणि धूर्त नीति जनतेलाही आता कळू लागली.
पंढरीनाथ पाटलांचे मोठेपण आणि त्यांचे कार्य लोकांना कळल्यामुळे लोकांनी त्यांना सहकार्य आणि हिम्मत देण्याचे मान्य केले. पंढरीनाथ पाटील किती मोठे झालेत याचे प्रत्यंतर त्यांना एक निमंत्रणपत्रिका आल्यावर कळले. पुणे येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची कोनशीला ब्रिटनचे युवराज प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते बसविण्यात येणार होती. असल्या कार्यक्रमाचे निमंत्रण पंढरीनाथ पाटलांना मिळाले होते. त्यांना खूप बरे वाटले. कारण नामवंतांच्या पंक्तीत बसण्याचा हा मान होता. तसेच तिथे कोल्हापूरचे शाहू महाराज कार्यक्रमाचे प्रमुख व्यवस्थापक होते.
आणखी एक अभूतपूर्व घटना त्यांच्या जीवनात घडली. मुंबई येथे "मुंबई इलाखा पाटील परिषद" या संस्थेचे एक अधिवेशन श्रीमंत माधवराव शिंदे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले होते. त्यासाठी विविध गावातील पाटील आणि मुलकी पाटील या समारंभास हजर होते. सत्यशोधक समाजाची जलसेही हजर राहणार होते. यांचे समाज प्रबोधन करणारे कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी पंढरीनाथ पाटील स्वतः हजर होते. या कार्यक्रमाने पंढरीनाथ पाटील फार प्रभावित झाले. "जागरूक" चे संपादक वालचंद कोठारी, "विजयी मराठा" चे संपादक श्रीपतराव शिंदे तसेच बाबुराव जेधे, विठ्ठल रामजी शिंदे, भास्करराव जाधव अशी प्रतिष्ठित मंडळी देखील तेथे आवर्जून उपस्थित होती. यांची भाषणे पंढरीनाथ पाटलांनी काळजीपूर्वक ऐकली. यातून त्यांना समाजप्रबोधनाची प्रेरणा आणि दिशा मिळाली.
विशेष बाब म्हणजे समाजात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात बहुजन समाजाला अधिकार आणि मानाचे स्थान मिळावे अशा प्रकारचे ठराव या सभेत पारीत करण्यात आले होते . तसेच प्रत्येकाने केवळ बोलके सुधारक न बनता कर्ते सुधारक बनावे असेही आवाहन करण्यात आले.
महात्मा फुल्यांचे आद्य चरित्रकार, बहुजनांचे कैवारी ,समाजभूषण, दलितमित्र, माजी खासदार पंढरीनाथ पाटील, हे विशेष करून विदर्भाच्या गळ्यातील ताईत बनले. त्यांनी सत्यशोधक समाज, ब्राह्मणेतर समाज, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शाळा-महाविद्यालय व वसतिगृहे या सर्व कामी स्वतःचे आयुष्य खर्ची घातले. वरील सर्व चळवळीला वाहून घेतले.ते अनेक वर्षे खासदार होते. राज्य कायदेमंडळात सभासद म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले होते.राज्यसभेतील त्यांची भाषणे त्या वेळी फारच गाजली होती.
1952 मध्ये चिखली येथे श्री शिवाजी डी.एड.कॉलेज, श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय आणि श्री शिवाजी अभ्यास शाळा स्थापन करून शिक्षणाची दारे सर्व जाती धर्मियांसाठी खुली करून दिलीत.तसेच मुला-मुलींसाठी राहण्याची व जेवणाची सोय व्हावी म्हणून वसतिगृहाची देखील स्थापना केली.
इ.स. 1956 मध्ये बुलढाणा येथे जिजामाता महाविद्यालय आणि 1967 मध्ये चिखली येथे श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय स्थापन करून उच्च शिक्षणाची सुविधा निर्माण करून दिली. या शिवाय ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर ग्रामीण भागात खास करून शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार व्हावा आणि वंचितांना शिक्षणाची संधी निर्माण व्हावी म्हणून देऊळगाव मही, मेरा बु।।, किन्होळा, मासरूळ, चांडोळ हातेडी व इसोली या गावी ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री शिवाजी हायस्कूल स्थापन करून शिक्षणाची संधी निर्माण करुन दिली. त्यासोबतच गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून वसतिगृहाची देखील स्थापना केली . ही काही सामान्य गोष्ट नव्हती तर या सर्व ग्रामीण जनतेला ती मिळालेली एक अमोल देणगी होती असे म्हणावे लागेल.
पंढरीनाथ पाटील यांनी सहकाऱ्यांना घेऊन स्थापन केलेल्या या शिक्षण संस्थेचे पाहता पाहता वटवृक्षात रूपांतर झाले. संगणकशास्त्र ,परमाणुशास्त्र, विज्ञान, कला वाणिज्य ,कृषीशास्त्र, पीकशास्त्र आणि किमान कौशल्यावर आधारित व्यवसायिक अभ्यासक्रम ,यासारखे विविध अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेत. तत्कालीन काळात शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,कर्मयोगी संत गाडगेबाबा, यशवंतराव चव्हाण, रा.दे. उपाख्य भोंडे सरकार या दिग्गज लोकांशी पंढरीनाथ पाटलांचा प्रत्यक्ष संपर्क आला.या सर्व महान विभूतींचा प्रभाव पंढरीनाथ पाटील यांच्या जीवन कार्यावर पडला.यांचेसोबत शिक्षणाचे कार्य करावे, ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवावी ,या शुद्ध हेतूने प्रेरित होऊन पंढरीनाथ पाटलांनी स्थापन केलेले सर्व शाळा-महाविद्यालये श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती या संस्थेत विलीन केले. त्यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे होते. सहाजिकच लहान लहान ओहळ मोठ्या संस्था रूपी नदीला येऊन मिळाल्यामुळे शिक्षणाचा खूप विस्तार झाला आणि वैद्यकीय, अभियांत्रिकी व कृषी विद्याशाखांच्या पदव्या घेऊन अनेक विद्यार्थी बाहेर पडले. ही उपलब्धी आम जनतेसाठी फार मोलाची होती. या सुविधांचा पाया समाजभूषण दलितमित्र पाटील यांनी घातला तर अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेने त्यावर कळस चढविला. चिखली येथे पंढरीनाथ पाटील यांचा हिरक महोत्सव यशवंतराव चव्हाण यांचे उपस्थितीत १९६८ मध्ये पार पडला.या वेळी कै.रा.दे.उपाख्य भोंडे सरकार यांच्या सहकार्याने जमा केलेला एक लाख रुपयांचा निधी पंढरीनाथ पाटलांना अर्पण करण्यात आला.तोच निधी पंढरीनाथ पाटील यांनी श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयाच्या उभारणीसाठी दिला.याला म्हणतात महान दातृत्व वृत्ती.म्हणूनच पंढरीनाथ पाटीलांच्या प्रत्येक शब्दाला त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात किंमत होती. वक्तृत्व शैली चांगली असल्याने त्यांची अनेक भाषणे राज्यसभेत गाजली.कापूस उत्पादक शेतकऱ्यांची समस्या असो की खामगाव- जालना रेल्वे मार्ग असो या गंभीर विषयांवर त्यांनी राज्यसभेत आवाज उठवला.
महात्मा फुल्यांचे आद्य चरित्रकार, बुलढाणा जिल्ह्यातील सत्यशोधक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, बुद्धीप्रामाण्यवादी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात तळमळीने काम करणारे लोकनेते, दलितमित्र , शिक्षणमहर्षी पंढरीनाथ पाटील या कर्मयोगी कृतिशील समाजसेवकाची जीवनयात्रा 2 ऑक्टोबर 1978 रोजी संपली. या महामानवाला माझे विनम्र अभिवादन !
* प्रा. डी. एम. कानडजे, जुना अजिसपूर रोड, बुलडाणा
( भ्रमणध्वनी - ८२७५२३१८७४ )