प्रा.जगदेवराव बाहेकर: एक सर्वस्पर्शी बहुआयामी व्यक्तिमत्त्व

 प्रा.जगदेवराव बाहेकर: एक सर्वस्पर्शी बहुआयामी व्यक्तिमत्त्व 

----------------------------------------------------------------------------

      चिखली तालुक्यातील किन्होळा या गावी जगदेवराव बंडुजी बाहेकर यांचा एका सधन कुटुंबात २५ जून १९४६ रोजी जन्म झाला. त्यांचे वडील बंडुजी रंभाजी पाटील आणि आई राधाबाई हे एक प्रथितयश असे नावाजलेले सधन शेतकरी आणि सामाजिक कुटुंब होते. ग्रामपंचायत कायदा अस्तित्वात आल्यानंतर किन्होळा ग्रामपंचायतीचे १९४९ते १९५७ या काळात सरपंच होण्याचा पहिला मान त्यांच्या वडिलांना मिळाला. त्यांच्या वडिलांना मोडी लिपी चांगली अवगत होती.त्यांच्या वडिलांची किन्होळा, खेर्डी, रूईखेड, कोलारी या गावच्या शिवारात बरीच शेती होती. साहजिकच ते पंचक्रोशित एक प्रसिद्ध असे सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांना चांगली सामाजिक जाणीव आणि सामाजिक भान होते. ते गरीबांचे आणि अडल्या-नडल्यांचे कैवारी होते.सर्व जातीधर्मांचे त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते. गावातील आणि पंचक्रोशीतील कोणत्याही आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक , राजकीय आणि धार्मिक समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असायचे. प्रा.जे.बी.बाहेकर सरांना दोन भाऊ आणि तीन बहिणी असा मोठा परिवार आहे.मोठे भाऊ एकनाथराव आदर्श शेतकरी होते तर मधले भाऊ माधवराव हे जिजामाता महाविद्यालय बुलढाणा येथे प्राध्यापक होते.

    त्याकाळी शिक्षण घेण्याकडे विशेष करून कोणाचाही ओढा नव्हता. खेडयापाड्यात विशेष करून शिक्षणाची सोय नव्हती.सरांनी किन्होळा जिल्हा परिषद शाळेत मन लावून आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले.पुढे सरांनी दहावीपर्यंतचे शिक्षण एडेड हायस्कूल बुलढाणा येथे तर पदवी शिक्षण बी.काॅम.(१९६६) जी.एस.कॉलेज खामगावला पूर्ण केले. सरांची आर्थिक स्थिती मजबूत असल्यामुळे सरांना शिकण्याची संधी मिळत गेली.त्या काळातील सधन शेतकऱ्यांचे मुलेमुली विशेष करून शिकत नव्हते.परंतु या सरांनी संधीचा फायदा घेऊन वेळ न दवडता सलग पुढील उच्चशिक्षण एम.कॉम. जी एस कॉलेज नागपूर येथे (१९६८) पूर्ण केले. महाविद्यालयीन काळात सरांनी एनसीसी सुद्धा घेतली होती. त्यांना यातून संघटन, नेतृत्व, शिस्त, स्वावलंबन आणि स्वसंरक्षण या नैतिक आणि सामाजिक मूल्यांचे शिक्षण मिळाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना कुठलीही नसती उठाठेव त्यांनी केली नाही. कामाशी काम आणि अभ्यास हेच केले. त्याकाळी बीकॉम आणि एमकॉम करणे तितकेसे सोपे नव्हते तरी सरांनी जिद्दीने या पदव्या हस्तगत केल्या आणि या पात्रतेच्या जोरावर जिजामाता महाविद्यालय बुलढाणा येथे १ ऑगस्ट १९६८ रोजी सर प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सहाजिकच त्या काळी सर्व कुटुंबाला झालेला आनंद अवर्णनीय होता.

   श्री जगदेवराव बाहेकर हे एनसीसी बी ग्रेड परीक्षा उत्तीर्ण असल्यामुळे त्यांना 1972 मध्ये एनसीसी अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यांच्या हातून अनेक चांगले विद्यार्थी घडले गेले त्यामुळे मिलिटरी पोलीस संरक्षण या खात्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली अनेक विद्यार्थी पीएसआय देखील झालेत आज सरांना ही जी मंडळी येथे भेटते तेथे तेथे त्यांना आवर्जून शाल्युट मारतात हे सरांच्या चांगल्या कार्याची पावती आहे असे मला वाटते. सुप्रसिद्ध प्राचार्य आर.एन. खर्चे हे एक शिस्तप्रिय आणि कडक प्रशासक म्हणून प्रसिद्ध होते. साहजिकच सगळं कॉलेज एका शिस्तीत चालत होते अशा तालमीत प्रा. जे.बी.बाहेकर सर घडले. त्यांच्यावर प्राचार्य खर्चे यांचे संस्कार  झाले आणि त्यांनी सुद्धा उत्तम परीक्षा केंद्राधिकारी म्हणून अनेक ठिकाणी काम केले आहे.कॉफीमुक्त अभियान सर्वत्र राबविले आणि ते त्यात यशस्वी झाले. यवतमाळला परीक्षा केंद्राधिकारी असताना कॉफीमुक्त अभियान राबवून तेथे एक आदर्श पायंडा पाडला, हे जेव्हा अमरावतीचे तत्कालीन डीआयजी सूर्यकांत जोग यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी केंद्रावर येऊन प्रा जे.बी. बाहेकरांचे तोंड भरून कौतुक केले.चांगल्या कार्याची दखल घेतली. हा अविस्मरणीय क्षण मी आयुष्यातून कधीही विसरू शकणार नाही, असे श्री बाहेकर सांगतात.

       सरांचे एनसीसी अधिकारी म्हणून फार नावलौकिक होता.वक्तशीरपणा, सचोटीने काम करण्याची पद्धत , उत्तम निर्णयक्षमता आणि शिस्तप्रियता ही सरांची उत्तम गुणवैशिष्ट्ये लक्षात घेऊन १९९७ ते २००३ या कालावधीसाठी श्री बाहेकर सरांना जिल्हा होमगार्ड कमांडंट म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली.

   प्राध्यापक म्हणून जिजामाता महाविद्यालयात रूजू झाल्यानंतर डोंगरशेवली येथील फकीरबा पाटील यांच्या कन्येशी सरांचा 1969 साली विवाह झाला.सरांना पद्मनाथ हा एकटाच मुलगा असून तो पदवीधर आहे आणि अतिशय मन लावून शेती करतो आहे तर मुलगी वैशाली ही एम कॉम बीएड असून जावई रवींद्र कानडे हे सध्या पुणे येथे एमएसईबी मध्ये असिस्टंट इंजिनियर आहे. सरांकडे बऱ्यापैकी शेती असून काही शेतीत ते १९९७ पासून फळबाग शेती करतात.आवळा, आंबा, पेरू, सिताफळ आणि जांभूळ ह्या फळबाग शेतीचा सरांनी उत्तम उपक्रम सुरू केला आहे. निसर्गात आणि फळबाग शेतीत परमेश्वराचे दर्शन घडते आणि उत्तम आरोग्य राहते हे त्यांनी जवळून अनुभवलेले आहे. फळबाग शेती ही कमी कष्टात जास्त नगदी उत्पन्न देणारी शेती आहे,हा आदर्श त्यांनी त्या परिसरात घालवूनन दिला आहे. भाऊसाहेब फुंडकर, रावसाहेब दानवे, धृपदराव सावळे, विजयराज शिंदे, गजानन दादा पाटील, ज्ञानेश्वर दादा पाटील, अकोला पीकेव्ही आणि राहुरी कृषी विद्यापीठाचे अधिकारी, कुलगुरू आणि विद्यार्थी यांनी आमच्या फळबाग शेतीला भेटी दिल्या आहेत असे ते सांगतात.

  प्रा.जगदेवराव बाहेकर ३० जून २००६ रोजी ३८ वर्षे प्राध्यापक, एनसीसी ऑफिसर, होमगार्ड कमांड ऑफिसर अशा विविध पदांचा अनुभव घेऊन सेवानिवृत्त झाले आहे. आजरोजी त्यांची प्रकृती ठणठणीत असून ते सतत काही न काही सामाजिक कार्य आवर्जून करीत राहतात. शहरी आणि ग्रामीण भागातील सामाजिक आणि धार्मिक कार्यात, तसेच अंत्यविधी कार्यक्रमासाठी ते आवर्जून उपस्थित राहतात. तोरणदारी ते मरणदारी त्यांची अनुपस्थिती सर्वांना आवर्जून जाणवते. ग्रामीण भागात जाऊन सरांना सोयरीक जुळवण्याचा खूप छंद आहे. अनेकांचे कौटुंबिक कलह समंजस्याने त्यांनी सोडविले आहेत. संपत्ती तर अनेक जण कमवतात पण माणुसकी कमावणे हे फार कठीण असते आणि सरांनी माणुसकीचे गौरीशंकर गाठले आहे असे मला वाटते. सर जरी सेवानिवृत्त झाले असले तरी सामाजिक कार्याचा तरफडा त्यांच्या पाचवीला पुजलेला आहे असे मला वाटते. कारण त्यांच्यात आळस, कंटाळा कोठेही जाणवत नाही. ते म्हणतात ," पैसे तर व्यापारीही कमवितात पण सामाजिक सेवेची श्रीमंती मला कमावता आली आहे, खरोखर मी स्वतःला नशीबवान समजतो."

    सरांना नेतृत्व , प्रशासन आणि संघटन कौशल्य अवगत असल्यामुळे सरांना राजकारणात रस निर्माण झाला. सर १९६८ पासून भारतीय जनता पार्टी मध्ये सक्रिय सहभागी झाले. ते १९७५ साली भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष होते. पक्षीय राजकारणाच्या प्रवासात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, गोपीनाथ मुंढे ,प्रमोद महाजन नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि भाऊसाहेब फुंडकर यांचेशी त्यांचा फार जवळून घनिष्ट संबंध आला. त्यांचे विचार ऐकून घेण्याची संधी मिळाली. त्यांच्या सानिध्यात मी घडत गेलो, असे प्रा.जगदेराव बाहेकर म्हणतात.

 प्राध्यापक, एनसीसी ऑफिसर, होमगार्ड कमांडंट ,भाजपचे शहराध्यक्ष आणि जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा संघटनमंत्री, राज्य कार्यकारिणी सदस्य, खामगाव अर्बन बँक संचालक अशी विविध पदे त्यांनी भूषविले असून ते आजरोजी राजकारणापासून अलिप्त आहे.  आज जरी त्यांनी ऐंशी वर्षात पदार्पण केले असले तरी ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि सुखी समाधानी आहे. खरोखर प्रा जगदेवराव बाहेकर हे एक सर्वस्पर्शी बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे असे मला वाटते.

# प्रा डी एम कानडजे, मधुकोष निवास 

 सागवन-बुलडाणा

Popular posts from this blog

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व