आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व
आर.डी.तायडे : एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व
---------------------------------------------------------------
रामेश्वर दगडू तायडे यांचा जन्म ग्रामीण भागात भडगाव मायंबा येथे १४ ऑगस्ट १९६६ रोजी एका गर्भश्रीमंत कुटुंबात झाला. पणजोबा, आजोबा आणि वडिलांपर्यत सरांचा फार मोठा कुटुंब विस्तार होता.त्या परिसरात एकत्र राहणारे ते एकमेव कुटुंब होते असं म्हटलं तर वावगं ठरू नये असे मला वाटते.शिक्षणाने आजोबा, वडील आणि काका हे जरी निरक्षर असले तरी अनुभवाने आणि माहितीने एक प्रकारे कृषीतज्ञ ,अर्थतज्ञ आणि विचारवंत होते. जुनी जाणती वयस्कर मंडळी ही जरी अडाणी असली तरी त्यांचे अनुभव आणि निरिक्षण अफाट असते. सरांचे वडील दगडुजी तायडे हे दानशूर होते. दान करायला एक मोठे मन आणि हिंमत लागते ती यांच्याजवळ होती. १९४८-५० च्या काळात भीषण दुष्काळ पडला होता. गुरांना चारा आणि पाणी मिळेनासे झाले होते. पडल्या भावात सर्रास गुरेढोरे विकली जाऊ लागली. अशावेळी सरांच्या वडिलांनी पाच एकर ऊस जो वाळत चालला तो त्यांनी गुराढोरांना वैरणासाठी दिला. शेतातील पाण्याची विहीर जनावरांना आणि गावातील लोकांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिली होती. याला म्हणतात पुण्याचे काम,माणूसकीचा गौरीशंकर!
"जशी खाण तशी माती" ह्या म्हणीप्रमाणे त्यांची आजी होती. सरांच्या आजीने शिक्षणासाठी स्वतःची ५८ गु़ंठे जमीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बांधकामासाठी दिली होती. खरोखर सरांना देखील दातृत्वाचा वारसा पूर्वंजापासून लाभला आहे. आई सोनाली आणि वडील आजोबा हे कुटुंब मेहनती आणि गर्भश्रीमंत होते.सरांचे वडील दगडुजी हे निरक्षर असून फार मेहनती ,अनुभवसंपन्न आणि कष्टाळू होते.माणूसकी, इमानदारी, आणि अडल्या नाल्यांची नड भागविणे हा त्यांचा स्थायीभाव होता. वडील हयात नसून आई सध्या ८९ वर्षात फिरते आहे.ही मंडळी सकस आणि गावरान आहार खात असल्यामुळे ते आजरोजी आपल्या पेक्षा नक्कीच चांगल्या प्रकृतीचे धष्टपुष्ट आहे असे मला वाटते.
चाळीस - पन्नास वर्षांपूर्वी प्रत्येक गावात कुशाग्र बुद्धीमत्तेची मुलेमुली नव्हती असे नव्हे,तर खूप होती. पण आपल्या मनात एक गोष्ट उच्च वर्णियांनी खोलपर्यंत रूजवली होती.ती म्हणजे "उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी" . या दुष्टचक्रात मोठ्या आसाम्या अडकल्या होत्या. सहाजिकच मोठ्या घरची मुले शिकण्याची ऐपत असून देखील शाळेत शिकत नव्हती. मात्र अशाही परिस्थितीत सरांच्या वडिलांनी शिक्षणाची कास धरली आणि रामेश्वर तायडे सरांचे प्राथमिक शिक्षण भडगाव,म्हसला येथे तर माध्यमिक शिक्षण मासरूळ येथे वसतिगृहात राहून पूर्ण केले. बीकॉम,बीपीएड होऊन ते सर्वप्रथम श्री शिंदे गुरुजी कन्या विद्यालय बुलढाणा येथे १/७/१९९२ रोजी शिक्षक म्हणून कामावर रुजू झाले. तेथे अत्यंत कमी पगार असल्यामुळे त्यांनी एक वर्ष नोकरी करून ती नोकरी सोडली आणि दिनांक २/७/ १९९३ पासून विनाअनुदानित तत्त्वावर असलेल्या शरद पवार हायस्कूल भडगाव येथे ते शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले.
गावातील शाळा असल्याने त्यांना भडगाव येथे नोकरी करण्याचा फार अभिमान वाटला होता. आपलं गाव,आपली माणसं,आपली माती,जेथे शिकलो तिच शाळा मिळाली म्हणून अत्यानंद झाला .जेथे शिक्षक म्हणून आठ - नऊ वर्षे राहिलो तिथेच पुन्हा मुख्याध्यापक पदावर २३ वर्षे काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य होते असे भावोद्गार रामेश्वर तायडे यांनी माझ्याकडे व्यक्त केले. या शरद पवार हायस्कूलसाठी सरांचा फार मोठा त्याग आहे. त्यांनी तेथे जवळपास आठ- नऊ वर्ष बिन पगारी नोकरी करून विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम केले आहे. ती शाळा माळरानावर होती. जिथे कुसळं दिसत होते आज तिथे नंदनवन उभे राहिले आहे. ही शाळा वनराईने नटलेली आहे. या सर्व कामाचे श्रेय रामेश्वर तायडे सरांना विशेष करून जाते.
सरांचे लग्न दिनांक ३/५/१९९० रोजी पवार कुटुंबातील किरण नावाच्या मुलीशी झाले, तेव्हा त्या जेमतेम बारावी झालेल्या होत्या. सरांनी लग्न झाल्यानंतर देखील पत्नीला शिक्षणाची संधी दिली आणि पाहता पाहता किरणताई बीए पदवीधर झाल्या. काही काळ त्यांनी सहायक शिक्षिका म्हणून शरद पवार शाळेवर काम सुध्दा केले. सरांना एक मुलगा आणि एक मुलगी असून हे दोघेही पदवीधर असून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. त्यांच्या सूनबाई देखील एम.एस्सी.बी.एड.असून त्या सर्व कामात तरबेज आहे. एकंदरीत सरांचे सर्व कुटुंब उच्च विद्याविभूषित असून मेहनती, प्रामाणिक आणि काटकसरीने जीवन जगणारे आहे नोकरी करत असताना तायडे सरांनी एमए आणि डीएसएम ह्या पदव्या संपादन केल्या आहेत.
सरांनी कुटुंबासाठी, भावबंधासाठी बरीच मदत केली आहे. रामेश्वर तायडे यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या सहभागातून आणि लोकवर्गणीतून तीन लाख ६४ हजार ७७७ रुपये उपलब्ध करून शाळेच्या विकासासाठी खर्ची घातले आहे .या शाळेची एक "उपक्रमशील शाळा" म्हणून ग्रामीण भागात ख्याती आहे. या शाळेतून अनेक चांगले विद्यार्थी शिक्षण घेऊन शासकीय,निमशासकीय,आयपीएस ,आयएएस सेवेत कर्मचारी अधिकारी म्हणून कार्य करत आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर आयएएस झालेले विशाल नरवाडे हे आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. ते आयपीएस देखील झाले होते. अशी माहिती सरांनी मला दिली.
तायडे सरांना समाजकार्यात रस असल्यामुळे त्यांनी अनेक राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांना सहकार्य केले आहे.त्यांना वाचन, लेखन आणि भाषण करण्याचा विशेष छंद आहे . शिवाय त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात देखील भरीव काम केले आहे.
यशदा पुणे येथे त्यांनी सन २०१० व २०११ मध्ये राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान प्रशिक्षण आणि २०१७ व २०१९ मध्ये आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले आहे.शिवाय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी जिल्हा व तालुका स्तरावर संबंधित विषय शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या विषयांच्या समस्या सोडविण्याचे काम सतत केले आहे. २३ वर्षं मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असल्यामुळे त्यांनी जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे सचिव पद देखील भूषविले आहे.
रामेश्वर तायडे यांनी शिक्षक,मुख्याध्यापक, विषयतज्ज्ञ आणि मुख्याध्यापक संघटनेचे सचिव म्हणून महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना सन २०१८ राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप, सन २०१९ मध्ये लायन्स क्लब खामगाव तर्फे जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार, सन २०२३ मध्ये शिवजयंती उत्सव समिती बुलडाणा तर्फे 'शिवसन्मान पत्र' अशा विविध पुरस्कारांने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
महात्मा फुले शिक्षण मंडळ भडगाव या संस्थेचे सचिव आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव या महत्त्वाच्या पदांवर त्यांनी प्रामाणिकपणे काम करून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.शिवाय आईवडिलांची मुलांनी शेवटपर्यंत सेवा केली पाहिजे असे बोलले जाते. मात्र रामेश्वर तायडे यांनी यात कसर ठेवली नाही.आईची तर ते एवढी सेवा करतात की त्यांनी एक अनुभव सांगितला . मी जेव्हा विमानात बसेन,तेव्हा आई सोबत असेन.आणि हा शब्द यांनी पूर्ण करून दाखविला आहे. आईला चारधाम यात्रा सुध्दा घडवून आणली आहे. या सर्व बाबींचा विचार केला तर रामेश्वर तायडे हे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निश्चित पात्र आहे असे मला वाटते. रामेश्वर दगडू तायडे हे शासनाच्या नियत वयोमानानुसार ५८ वर्षे पूर्ण करून ३१ ऑगस्ट २०२४ रोजी ३२ वर्षे सेवा देऊन सेवानिवृत्त होत आहे तेव्हा सेवानिवृत्तीबद्दल हार्दिक शुभेच्छा!
# प्रा दिगंबर कानडजे
मधुकोष,सागवन-बुलडाणा .