मृतात्म्याची कैफियत

 मृतात्म्याची कैफियत : जिवंतपणी मानहानी अन् समाधीवर फुले..

      विटंबना म्हणजे अप्रतिष्ठा, मानहानी, फजिती किंवा खूप अपमान करणे होय. जेव्हा एखाद्या व्यक्तीची, वस्तूची किंवा तत्त्वाची लोकांसमोर टिंगलटवाळी केली जाते, हेटाळणी केली जाते किंवा वाईट वागणूक दिली जाते, याचाच अर्थ त्या व्यक्तीची 'अवहेलना' होते . सांगायचे तात्पर्य म्हणजे व्यक्तीची जिवंतपणी मानहानी, अपमान केला जातो आणि ती गेल्यावर मात्र त्या व्यक्तीचे भाषणात गोडवे गायिले जातात. मित्रहो हे मानवी जीवनमुल्यांना धरून नाही,असे मला वाटते. एखाद्याची सामाजिक किंवा वैयक्तिक पातळीवर आप्रतिष्ठा होते. अत्यंत बिकट परिस्थितीत त्याची दुर्दशा केली जाते. तेव्हा त्याच्या मनाला खूप यातना होतात.

        आपण अनेक ठिकाणी पाहतो की मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी फुले, पुष्पचक्र वाहिले जातात. विविध आवडते पदार्थ पूजेसाठी ठेवले जातात. जिवंतपणी त्या सामान्य माणसाची पदोपदी विटंबना होत होती आणि मृत्यूनंतर मात्र त्याच्यावर गौरवास्पद श्रध्दांजलीपर भाषणे होतांना दिसतात. हे कितपत योग्य आहे. 

       'विटंबना' ही कविता पांडुरंग श्रावण गोरे यांची असून ती एका मृतात्म्याचे मनोगत आहे. प्रत्येक जीवाच्या तीन अवस्था असतात . त्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थेतून जावे लागते. प्रत्येक माणूस आंतरिक क्षमता आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर जीवन जगत असतो. प्राप्त परिस्थितीनुसार तो जीवन जगण्यासाठी धडपडत असतो. जिवंतपणी माणसाची किंमत होत नाही. त्याला मानसन्मान देत नाही. मात्र त्याचा मृत्यू झाला की घरातील मुलं, सुना,नातवंडे आणि विशेष करून मुली ओक्साबोक्शी रडताना दिसतात, खरोखर यातून त्या व्यक्तीच्या प्रती या लोकांचा जिव्हाळा, आदरभाव आहे का ? हा खरा चिंतनाचा विषय आहे. 

      अशा परिस्थितीत खरोखर मृतात्मा उठून बसला आणि बोलू लागला तर इतरांच्या माना खाली झाल्याशिवाय राहणार नाही, असे मला वाटते. कारण त्यांना वाटेल की आपण जिवंतपणी त्या मय्यत व्यक्तिला खूप त्रास दिला. त्याला प्रेमाने खाऊपिऊ घातले नाही. आता मात्र त्याचे नातेवाईक जिवाचा आकांत करून रडताना दिसतात. हे वास्तवाला धरून आहे का ? यातला नकलीपणा लोकांना दिसणार नाही का? तेव्हा आपणास रडण्याचा मुळीच अधिकार नाही असे वाटते. पण आपण रडलो नाही तर लोकं काय म्हणतील‌. हे सर्व थोतांड आहे असे वाटते.

          पाटपोट एक सोसता उपास,

          घातला न कोणी मुखी उष्टा घास;

          पाणी साखरेचे तोंडात टाकता 

          मेल्यावर मला कारे लाजवता? 

 या काव्यपंक्तीत कवीने मृतात्म्याचे मनोगत व्यक्त केले आहे. कवी म्हणतात की जिवंतपणी त्याला फार भूक लागायची. भुकेने तो व्याकुळ व्हायचा. तेव्हा त्याला जेवायला मिळत नव्हते. त्याला अनेक रात्री उपाशीपोटी काढाव्या लागल्या. अशावेळी त्याला कोणी साधी शिळी भाकर सुद्धा खायला दिली नाही. याचे त्याला दुःख वाटते. आता रडण्यात काय अर्थ आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.

         हिंडता उघडा गेला जन्म सारा,

         फेकला न कोणी अंगाचा उतारा; 

         का हा आता शेला कोरा पांघरता,

         मेल्यावर मला कारे लाजवता?

 मृतात्म्याचे संपूर्ण आयुष्य अपुऱ्या आणि फाटक्या कपड्यात गेले. कोणी जुने,जीर्ण झालेले कपडे सुध्दा पांघरायला- घालायला दिले नाहीत. मात्र आता मृत्यू झाल्यानंतर अनेक पाहुणे स्वतः च्या मोठेपणासाठी सरणावर कोरे कपडे आणून टाकतात. जिवंतपणी थंडीने कुडकुडत असताना मात्र त्याची कुणालाही दया आली नाही, किती विचित्र परिस्थिती होती ही ! उभा जन्म उघड्या नागड्यात गेला. तेव्हा कुणालाही त्याची कीव आली नाही. ही विटंबना कशासाठी, हेच मृतात्म्यास कळत नाही.

      वरती ते आकाश खाली ही धरित्री, 

      उघड्या गात्री काढल्या त्या रात्री,

       घोंगडी ही खाली आता अंथरता 

       मेल्यावर मला कारे लाजवता? ll3ll

 मृतात्मा आपली कैफियत मांडताना असे म्हणतो की,'' माझं संपूर्ण आयुष्य उघड्यावर गेले. आकाश आणि धरित्री हेच अंथरून पांघरून होते. थंडी,ऊन ,वारा पाऊस हे त्याच्या उघड्या शरीराने सहन केले. तेव्हा मात्र त्याची कोणालाही दया आली नाही " ही खंत त्यांनी व्यक्त केली आहे . आजही समाजात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती पाहायला मिळते. खरोखर ही चिंतन करायला लावणारी गोष्ट आहे.

        पडल्या पायात चालताना आढ्या

        थांबल्या वाटेत कुणाच्या न गाड्या;

        खांद्यावर घेता मिरवीत नेता

        मेल्यावर मला कारे लाजवता? ll4ll

गरीब आणि लाचार माणसाचा जीवनप्रवास अनवाणी पायांनी होतो. खूप कष्ट करत त्याला स्वतःचा संसाराचा गाडा हाकलावा लागतो. बाजारहाट व शेतातील कष्टांची कामे करून तो पुरता थकून गेला आहे. परंतु अशा परिस्थितीत त्याला कोणीही साथ देत नाही. मदत करत नाही. त्याच्यासाठी रिकामी गाडी असली तरी त्याला आधार देत नाही. हे वास्तव त्याने जवळून अनुभवलेले होते. भावंडांनी आणि भावबंधानी त्याला कोणत्याही परिस्थितीत सहकार्य केले नाही. परंतु त्याचा मृत्यू झाला की त्याला खांद्यावर घेऊन स्मशानभूमीपर्यंत मिरवत नेणारे भावबंध पाहून वाईट वाटते, अशी कैफियत मृतात्म्याने जनतादरबारात केली आहे. 

        भिजले न हात धुतले न पाय

        भेटले न कोणी प्रेमी बापमाय;

        न्हाणताना आता दूध रे पाजता

         मेल्यावर मला कारे लाजवता? ll5ll

गरीब आणि निराधार व्यक्तीच्या व्यथा अनेक आहेत. जिवंतपणी फजिती आणि मेल्यानंतर महापंगती. जिवंतपणी साधी भाकर देखील त्याला सुना घालत नाही. कुटुंबातील सदस्य त्याच्याशी आदराने बोलत नाही. मात्र त्याचे अंत्यसंस्कार करताना विविध प्रकारचे नैवेद्य आणि खाद्यपदार्थ त्याला दाखविले जातात. ही एक फार मोठी शोकांतिका आहे, असे मला वाटते. जिवंतपणी मानहानी अन् समाधीवर फुले अशी त्याची गत होते. हे सारे थोतांड नव्हे काय? 

          होता या कुडीत जोवर हा जीव

          केली न तोवर कोणी त्याची कीव;

          जित्यापणी गोडी मनात नसता 

          मेल्यावर मला कारे लाजवता? ll6ll

 आईबाबांना, ज्येष्ठ नागरिकाला आणि नातेवाईकांना घरातील कुटुंबाने सन्मानाने वागवले, आपण जे खातो तेच प्रेमाने आदळआपट न करता दिले, चार शब्द प्रेमाचे बोलले तर त्या व्यक्तीला खूप बरं वाटेल. त्यांचं दुःख हलकं होईल.आपल्याला दुःख वाटून घेता येणार नाही, पण ते आपण नक्कीच हलकं करू शकतो. हीच खरी मानसेवा महत्त्वाची आहे. मेल्यानंतरची सेवा ही निरर्थक आहे. केवळ भावबंधाच्या आग्रहाखातर तेरवीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरी केले जातात. आपल्या समाजात हे चित्र बऱ्याच ठिकाणी अनुभवायला येते. 

    अनेक ठिकाणी आईवडिलांची, ज्येष्ठ नागरिकांची सेवा करणारे कुटुंब देखील खूप आहेत,हे नाकारता येणार नाही. त्यांचा देखील आपण आदर्श घेतला पाहिजे. जोपर्यंत या जीवात जीव आहे , तोपर्यंत जे जे शक्य ते करावे, हिच खरी मानवसेवा आहे, अन्यथा जिवंतपणी हेळसांड आणि माणूस गेल्यावर तेरावी, वर्षश्राद्ध. ही मृतात्म्याची विटंबना होणार नाही का ?

# प्रा दिगंबर कानडजे 

 सागवन-बुलढाणा (८२७५२३१८७४)

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य