कोरोना इफेक्ट
* कोरोना इफेक्ट *
कोरोनामुळे जीवन कळले.जीवनाचा अर्थ कळला.जीवन हे क्षणभंगुर आहे आणि विशेष म्हणजे कोणीही कोणाचं नसतं. याची जाणीव या निमित्ताने झाली. हे जरी खरे असले तरीही संकट काळी जीव धोक्यात घालून मदत करणारी काही मोजकी माणसं देखील पहायला मिळालीत. खरोखर त्यांना कोरोनायोद्धेवीर म्हणावे लागेल.त्यांच्या त्यागाला मोल नाही.त्यांचे ते कार्य अनमोल आहे.
शिवाय दुसऱ्या बाजूने विचार केला तर अशा प्रसंगी काही माणसं दूर देखील गेली.असं का घडते आहे? याच एकच उत्तर आहे,ते म्हणजे आपणापासून इतरांना त्रास नको.इतर कुटुंब आपणा पासून अडचणीत येऊ नयेत. आपणामुळे जर त्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोना झाला तर त्या कुटुंबाला खूप यातना भोगाव्या लागतील. सर्व कुटुंब संसर्गजन्य होईल.शेजारील कुटुंबे कोरोनाच्या विळख्यात अडकतील.नव्हे सारा गाव कोरोनाग्रस्त होऊ शकतो.या महाभयंकर परिस्थितीला आपणच कारणीभूत ठरू आणि म्हणून जितके आपणाकडून शक्य होईल तेवढे स्वतः करावे,ही देखील या मागची भावना असू शकते.
कोरोनाच्या काळात काही गोष्टींवर चांगला इफेक्ट झाला.सार्वजनिक स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता यावर सर्व जनतेंनी कटाक्षाने जोर दिला.वास्तविक या बाबी आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे.या गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या आहेत.आजपावेतो या कडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही,ही खेदाची बाब आहे.सार्वजनिक स्वच्छता ठेवणे ही जरी सरकारी बाब असली तरी तितकीच जबाबदारी प्रत्येक नागरिकाची देखील आहे.सरकारी दरबारी सार्वजनिक स्वच्छतेची कामे केली जातात ,पण आपले सुज्ञ नागरिक अथवा व्यसनाधीन झालेली तरूण पिढी सार्वजनिक जागेवर थुंकणे हे आपले कर्तव्य समजतात.तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण करतात. आजची ही एक फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. तसेच छोटे मोठे व्यवसाय करणारे, भाजीपाला विक्री करणारे,असे अनेक जण सार्वजनिक स्वच्छता या बाबी कडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात.वास्तविक आपापल्या समोरील परिसरात , आपण जेथे बसतो तेथे स्वच्छता करून घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
कोरोना काळात वैयक्तिक स्वच्छतेला प्रत्येक नागरिकाने फार मोठे लक्ष दिले.बाहेरून खरेदी केलेली प्रत्येक वस्तू स्वच्छ धुवून घेतल्या शिवाय घरात घेतली नाही. एवढे महत्त्व कोरोना संसर्गामुळे प्रत्येक गोष्टीला प्राप्त झाले.तसे पाहिले तर या गोष्टी सतत करत राहणे ही जीवनावश्यक बाब आहे.भाजीपाला , फळफळावळ इत्यादि वस्तू धुवून घेणे हे गरजेचे असते. या वस्तूंवर खूप प्रमाणात कीटक नाशक फवारणी केलेली असते.ने-आण करतांना विशेष काळजी घेतली जात नाही.चांगल्या पाण्यात ती धुतलेली असतातच असे नाही.आणि म्हणून ती घरी स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्यावी असे मला वाटते.यात गैर काही नाही. आपण कोरोना मुक्त झालो तरी आपल्याला आता वैयक्तिक स्वच्छतेविषयी ज्या चांगल्या सवयी लागल्या आहेत, त्या आता जाणे नाही. आता त्या अंगवळणी पडल्या आहेत.हा कोरोना इफेक्टचा परिणाम आहे, असे मला वाटते.
"काटकसर" हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. काटकसरीने जीवन जगण्याची कला कोरोना मुळे प्राप्त झाली.कमीतकमी खर्चात प्रपंच कसा करावा हे कोरोना मुळे सहज शक्य झाले.अनावश्यक खर्चाला कात्री लावली.जीवन जगण्यासाठी फार काही लागत नाही, हे देखील कळले.मोठ मोठे लग्नसमारंभ न करता थोडक्यात कसे आटोपून घ्यायचे,ही कला प्रत्येकाला अवगत झाली.राग- लोभ,रूसवे -फुगवे,मान- पान या सर्व गोष्टींना तिलांजली देण्यात आली.यातून खर्चाची खूप मोठी बचत झाली. ही सर्व बचत केवळ कोरोना इफेक्ट मुळे करता आली.आता भविष्यात हीच सवय कायमची राहणार आहे.
"स्वावलंबन" ची सवय कोरोनामुळे लागली.खूप काही गोष्टी घरी बसल्या बसल्या फावल्या वेळेत करता येणे सहज शक्य आहे, याची जाणीव झाली.कोरोना काळात लाॅकडाऊन केल्यामुळे आभाळ कोसळल्यागत झाले होते.आता आपले कसे होईल, या जाणीवेने जनता भयभीत झाली होती. दाढी कटींग करणे, कपड्यांची इस्त्री करणे, प्रसंगी स्वयंपाक करणे, हाॅटेल सारखी चमचमीत पदार्थ करता येणे इत्यादी कामे घरबसल्या करता येऊ लागली.यातून श्रमप्रतिष्ठा वाढली. विविध कामांमुळे शरीराची हालचाल होत गेली.यातून शरीराची कार्यक्षमता आणि प्रतिकारशक्ती वाढली.त्यामुळे इतर रोग देखील पळून गेल्यागत झाली.अनेकांना घरबसल्या कोरोना विरुद्ध लढता आले.
प्रा. डी. एम. कानडजे, चिखली (बुलढाणा)
भ्रमणध्वनी - 8275231874