वाचन चळवळ ही लोकचळवळ झाली पाहिजे !

           वाचन चळवळ ही लोकचळवळ झाली पाहिजे !

        " माझी माय मराठी डोक्यावर रत्नजडित मुकुट आणि अंगावर फाटकी वस्त्रे लेवून मंत्रालयाच्या दारात उभी आहे " असे तेजस्वी  उद्गार कुसुमाग्रजांनी काढले होते, तेव्हा कुठे शासनाला वाटले कुठेतरी मराठी भाषेला उच्च दर्जा मिळावा, भाषेचा सर्वांगीण विकास व्हावा आणि मराठी भाषा गौरव दिन सर्वत्र साजरा केला जावा असे वाटायला लागले.  मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करणे ही जशी शासनाची जबाबदारी आहे, हे जरी खरे असले तरी तितकीच जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची सुद्धा आहे.यासाठी  सर्व भाषिक व्यवहार हे मराठी भाषेतूनच झाले पाहिजेत. तेव्हा कुठे मराठी माणसाला लिहिलेल्या भाव भावना आणि विचारांचे चांगले आकलन  होईल.

           उपलब्ध ग्रंथांच्या आधाराने मराठी साहित्याच्या इतिहासाचा आरंभ यादवकालात होतो. सातवाहन ते यादव हा जसा राजवटी मधल्या बदलाचा काळ आहे, तसाच महाराष्ट्री- प्राकृत, महाराष्ट्री- अपभ्रंश व मराठी हा भाषित परिवर्तनाचाही काळ आहे. ज्योतिष रत्नमाला (श्रीपती), विवेकसिंधू (मुकूंदराज), लीळाचरित्र (म्हाइंभट), ज्ञानदेवी हे आरंभीच्या काळात मराठीत लिहिले गेलेले ग्रंथ आहे असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात. नाथपंथ हा यादव साम्राज्यातला एक प्रभावी संप्रदाय होता ज्याने मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन केले आहे.  महाराष्ट्रात भागवत धर्माचा पाया घालून मराठी भाषेला खऱ्या अर्थाने समृद्ध व संपन्न बनवणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि इतर संत तुकाराम, संत एकनाथ,संत नामदेव, संत नरहरी सोनार,संत सावता माळी, संत जनाबाई,संत चोखामेळा आणि इतर संत होत.           ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी चांगले झटून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी  प्रयत्न करावेत.  अनुदानित मराठी माध्यमांच्या शाळांची ही बुडती नाव शिक्षकांनी  सहस्त्र हातांनी तारावी, तेव्हा कुठे मराठी भाषा दीर्घकाळ टिकेल असे मला वाटते. व्यक्तिमत्व विकासात  व्यक्तित्व आणि संपादित गुण हे फार महत्त्वाचे घटक आहेत.व्यक्तिमत्व विकासात मराठी विषयाचे फार मोठे योगदान आहे.परमेश्वराने जी काही शरीरयष्टी आपल्याला बहाल केली आहे,त्यात आपण काहीही बदल करु शकत नाही.अनुवंशिकतेने आणि आई-वडीलांच्या देहधारणेने जे काही शरीरसौष्ठव  आपल्याला प्राप्त होते त्यावर आपण अपरंपार , नितांत प्रेम केले पाहिजे असे मला वाटते.सर्वप्रथम आपल्याला आपण कमी लेखू नये.शिवाय  खूप सोंदर्याचा  वृथाभिमान देखील करू नये असे मला वाटते.

            आपले व्यक्तिमत्त्व कसे प्रभावी होऊ शकेल याकडे प्रत्येक नागरिकाने लक्ष केंद्रित केले पाहिजे.मानसशास्त्र हे मानवी मनाचा आणि मानवी जीवनाचा अभ्यास करणारे एक शास्त्र आहे.' मन करा रे प्रसन्न हेच सिद्धीचे  कारण !" हे जे काही म्हटले आहे, ते उगीच नव्हे!

            आपण इतरांपेक्षा काहीतरी आगळं वेगळं दिसावं असं वाटत असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. अभ्यासाशिवाय पर्याय नाही.सखोल आणि अर्थपूर्ण मराठी वाचनाशिवाय इलाज नाही. प्रामाणिकपणे चांगला अभ्यास करून, मेहनत करून शिकावं आणि विद्याविभूषित  व्हावं असे मला वाटते.चांगलं  वाचन- लेखन करावं.खूप ज्ञान संपादन करावं. परंतु आजकाल बहुतेकांना वाचन करण्याची आवड राहिलेली नाही.आजकालचे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी बनले आहेत.ते ज्ञानार्थी राहिले नाही.

          आता जवळपास शंभर टक्के जनता साक्षर झालेली आहे. प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती आता वाचन लेखन करू शकते. विद्यार्थी,पालक, सामाजिक क्षेत्रात काम करणारे समाजसेवक, कार्यकर्ते, अधिकारी-कर्मचारी, आमदार, खासदार या सर्वांनी दिवसातून किमान  दोन-तीन तास अर्थपूर्ण वाचन केले पाहिजे, ही आजच्या काळाची गरज आहे. कारण वाचनाने विचार आणि मन प्रगल्भ होते. ज्ञानाला शंकराचा तिसरा डोळा म्हटले आहे ते का उगीच ! मात्र ही सर्व मंडळी दूरदर्शन, भ्रमणध्वनी आणि संगणकावर तासंतास वेळ  घालवितात. वास्तविक दररोज किमान दोन - तीन तास वृत्तपत्रे आणि महत्त्वाची पुस्तके नियमित वाचली पाहिजे. वृत्तपत्रातील संपादकीय लेख, विचार मंथन, मतमतांतरे,जनमन , साहित्य जत्रा, जे जे काही उदात्त आणि सकस साहित्य असेल  ते काळजीपूर्वक वाचून त्यावर समीक्षण देखील केले पाहिजे. लोकसत्तेतील  लोकरंग व चतुरंग  ही पुरवणी म्हणजे  वैचारिक व चिंतन करायला लावणारी खमंग अशी साहित्य मेजवानी आहे. असे साहित्य वाचनाने आपल्या मनातील विचार प्रगल्भ होतात. शिवाय  एका महिन्यातून किमान एखादी कादंबरी, नाटक,चरित्रात्मक-आत्मचरित्रात्मक ग्रंथ, कथासंग्रह, काव्यसंग्रह किंवा ललितलेखसंग्रह इत्यादि दर्जेदार पुस्तके मन लावून वाचली पाहिजे.

              वाचनाने अनेक विषयांची माहिती मिळते. अनेक व्यक्तींचा जीवनविषयक दृष्टिकोन कळतो. आपले विचार प्रगल्भ होतात. संस्कृती,परंपरा,चांगले रितीरिवाज कळतात.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना वाचनाची खूप आवड होती. तेव्हा त्यांनी स्वतःचा जन्मदिवस हा संपूर्ण भारतात वाचनप्रेरणा दिन म्हणून साजरा केला जावा असे घोषित केले होते.

              मराठी भाषा आणि मराठी माणूस याची यथार्थ तुलना कवी कुसुमाग्रजांनी केली आहे. ते म्हणतात - मराठी माणसावर अन्याय होत आहे.मराठी माणूस धंद्यात मागे आहे.मराठी नाटक आणि चित्रपटाची प्रेक्षक संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे . शासन भाषाविकास आणि संवर्धन या सबबीखाली मराठीच्या नावावर थोडाफार खर्च करून कार्यक्रम राबवित आहे.मराठी भाषा संवर्धन आणि विकास पंधरवडा सर्व कार्यालयाने साजरा करावा यासंदर्भात परिपत्रक काढून दरवर्षी कळविण्यात येते.पुस्तकांच्या प्रकाशनाची संख्या खूप आहे. मात्र वाचणारे कमी आहे. हा काय मराठी माणसाचा व मराठी भाषेचा विकास म्हणावा का? आज जागतिक मराठी भाषा दिन आहे.त्यानिमित्त मानवी व्यक्तिमत्व विकासात मराठी भाषेचा अभ्यास आणि अर्थपूर्ण वाचन फार महत्त्वाचे आहे.वाचनाने आपले विचार प्रगल्भ होतात.याचा प्रभाव आपल्या आचरणातून जाणवत असतो.

           आजकालची तरुणाई वाचत नाही, ही इतर जुनीच व्यथा आहे. पुल देशपांडे, वपु काळे ,चिंवि जोशी, राम नगरकर, यांचे  साहित्य वाचून  येणारं निखळ हास्य, शंकर पाटील, आनंद यादव,दमा मिरासदार यांचे ग्रामीण साहित्य,गोनि दांडेकर,जीए कुळकर्णी, विस खांडेकर,कुसुमाग्रज,बासी मर्ढेकर, अनिल,बी कवी, गोविंदाग्रज, बालकवी,रणजित देसाई, लक्ष्मण माने, शंकरराव खरात, रंगराव पठारे, विश्वास पाटील, व्यंकटेश माडगूळकर,रारं बोराडे , सदानंद देशमुख, रमेश इंगळे उत्रादकर अशा अनेक दिग्गज साहित्यिकांचे साहित्य नव्या पिढीला कधी कळेल,ते कधी वाचतील,हा खरा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. म्हणी,वाक्प्रचार हळूहळू कालबाह्य होत आहे. पण या सगळ्यांपेक्षा चिंतेचा विषय हा आहे की तरुणाईच्या ओठी असणारी इंग्रजी आणि मराठीची भेसळ होऊन बनलेली मिक्स भाषा  ही आता नवी भाषा म्हणून आकार घेऊ पाहते आहे. उदा. तू माझ्या टी मध्ये शुगर पुट करायला फरगेट झालास., स्पेस शटल लॉन्च होऊन लँडरचं लँडिंग होत असतं.,

          दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी मराठी भाषेचा सर्रास खून केला आहे, मराठी भाषेची मोडतोड केली आहे असं म्हटलं तर अवघड होऊ नये असे मला वाटते. कारण असे की केजी वन टू फिफ्थ स्टॅंडर्ड पर्यंत विद्यार्थ्यांना मराठी भाषा प्रामाणिकपणे शिकवल्या जात नाही ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे .  केवळ मराठी भाषा विषय शासनाने मराठी भाषिक लोक आवाज उठवतात म्हणून  सर्व माध्यमांसाठी अनिवार्य केला आहे. केवळ शासनाचा बडगा आहे म्हणून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये कसेतरी करून मराठी शिकवली जाते. इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील मुलांना चांगले वाचता येत नाही, चांगले लिहिता येत नाही आणि चांगले संभाषण देखील करता येत नाही ही खरी शोकांतिका आहे.मुलांना फिफ्टी हा शब्द इंग्रजीत लिहिता येतो, वाचता येतो, पण ही संख्या मराठीत लिहिता येत नाही, ओळखता येत नाही, ही दुर्दैवाची आणि चिंतेची बाब आहे हे  नाकबूल करता येत नाही.या सगळ्या चिंता अगदीच वावग्या आहे असं म्हणता येणार नाही. काॅलेज,रोड, बस, किचन, लाईट, ट्रॅफिक, बाईक, बिल्डींग,टी, ,शुगर,कप, व्हेज ,नॉनव्हेज, ब्लँकेट ,बकेट, बँक , कम्प्युटर, मोबाईल, रेडिओ, बसस्टॅन्ड, असे कितीतरी इंग्रजी शब्द मराठीत आपसूक प्रचलित झाले आहे.

        जोपर्यंत मराठी माणूस जिवंत आहे तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही.मराठी कथा,कविता,कादंबरी,नाटक,चित्रपट,पाहण्यासाठी असलेली तरूणांईची संख्या लक्षणीय आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात नव्या माध्यमातून तरुण मराठी वाचत आहे. लिहीत आहे.ऐकत आहे.   कवितावाचन, अभिवाचन, प्रकटवाचन, निवेदन असे कार्यक्रम सादर करणाऱ्यांची संख्या देखील वाढते आहे. शिवाय मराठी भाषेत शुद्ध बोलणाऱ्या तरुणांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढते आहे.  शहरामध्ये इंग्रजी भाषेचं जरी प्राबल्य असलं तरी उर्वरित महाराष्ट्रातले तरुण उत्स्फूर्तपणे मराठी बोलत असतात.मराठी भाषेचा ते आदर करीत करतात. 


   #  प्रा. दिगंबर कानडजे, मधुकोष निवास

       सागवन - बुलडाणा (८२७५२३१८७४)

 

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत