डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त
- शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख : जीवन व कार्य -
पापळ गावातील एका गरीब कुटुंबात डॉ पंजाबराव देशमुख यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी झाला.शामराव आणि राधाबाई या प्रेमळ आणि सालस आई-वडीलांनी काबाडकष्ट करून पापळ येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.मुलाने खूप शिकावे, मोठं व्हावं ही त्यांच्या आईवडिलांची तीव्र इच्छा होती.त्यांची आर्थिक परिस्थिती फार नाजूक होती.तरीही अशा परिस्थितीत काटकसरीने, प्रसंगी अर्धपोटी राहून पंजाबराव देशमुख यांचे माध्यमिक शिक्षण कारंजा लाड येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे पूर्ण केले.
डॉ पंजाबराव देशमुख यांनी कठोर परिश्रम घेऊन सर्व शिक्षण प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण करून त्यांच्या वडिलांच्या कष्टाचे चीज केले.राधाबाईने फाटका संसार नेटका करून, प्रसंगी अतिशय हाल सोसून पंजाबरावांच्या प्रकृतीची आणि शिक्षणाची काळजी घेतली.त्यांचेवर सुसंस्कार करून विदर्भाचा शिवाजी घडविला.डाॅ.पंजाबराव देशमुख हे फार संवेदनशील वृत्तीचे होते.ते गोरगरिबांचा सहानुभूतीपूर्वक विचार करीत असत.ते कनवाळू स्वभावाचे होते.याचे सहज प्रत्यंतर या उदाहरणावरून दिसून येते.एकदा प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली. एक मित्र त्यांच्या सोबत शाळेत येत यायचा.त्याच्या अंगात सदरा नव्हता.त्याचे अंग उन्हाने भाजत होते.ही गोष्ट डॉ पंजाबराव देशमुख यांना लगेच खटकली.त्यांचे संवेदनशील मन गहिवरून आले.त्यांनी स्वतः चा अंगातील सदरा त्या मुलाला काढून दिला.
डॉ पंजाबराव देशमुखांचे आई-वडील अतिशय प्रेमळ, संवेदनशील, परोपकारी, कनवाळू आणि प्रामाणिक होते.असे म्हणतात की "शुद्ध बिजापोटी! फळे रसाळ गोमटी!!"या उक्तीप्रमाणे पंजाबराव देशमुख जन्माला आले आणि त्यांनी आपल्या आईवडिलांचे नाव इतिहासात अजरामर केले.
डॉ पंजाबराव देशमुख यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांनी स्वतः ची शेती सावकाराकडे गहाण ठेवून कर्ज घेतले आणि २१ ऑगस्ट १९२० रोजी बॅरिस्टर पदवी घेण्यासाठी इंग्लंडला रवाना केले.शिवाय तेथे त्यांनी कुशाग्र बुद्धीची झलक दाखवून "व्हॅन्स डनलॉप संस्कृत स्कॉलरशिप "मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.रात्रंदिवस अभ्यास करून ही सन्मानाची स्कॉलरशिप प्राप्त केली.त्यांच्या जीवनातील हा एक अतिशय आनंदाचा प्रसंग होता.तेथील वृत्तपत्रांनी या भारतीय विद्यार्थ्याचा तोंड भरून कौतुकाचा वर्षाव केला.हा केवळ डॉ पंजाबराव देशमुख यांचा सन्मान नव्हता तर एका गरीब आई-वडिलांचा आणि आपल्या भारत देशाचा यथोचित सन्मान होता.
विलायतेत ते केवळ शिक्षणच घेत नव्हते तर तेथील सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक आणि कृषीविषयक बाबींचा चिकित्सकपणे अभ्यास करीत होते. आपल्या अनुभवाची गाठोडी मोठी करीत होते.विलायतेतील ऐश्वर्यसंपन्न जीवन भारतात आणण्यासाठी आम्ही "शिक्षण" या संजीवनीचा उपयोग करून घेऊ अशी खूणगाठ पंजाबराव देशमुख यांनी मनाशी बांधली होती. समाज सेवेची तळमळ त्यांना हेलावून सोडवत असे. विलायतेत असताना त्यांनी अनेक वैशिष्ट्यांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांचा अभ्यास केला . तेथील बहुजनांचे जीवन, सामाजिक सुधारणा, शेतकरी संघटना इत्यादी चळवळींचे स्वप्न प्रत्यक्षात भारतात कधी साकारू असे त्यांना झाले होते.
एडिनबर्ग विश्वविद्यालयात बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. खरोखर त्यांच्या बुद्धीची धार तेज होती. "बॅरिस्टर " ही कायद्याची पदवी आणि "वेद वाड्.मयातील धर्माचा उद् गम आणि विकास " या प्रबंधावर त्यांनी पीएच.डी संपादन करून डॉक्टर पंजाबराव देशमुख 1926 ला मायदेशी परतले. मायदेशी येतांना त्यांनी समाजसेवा आणि शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही , ह्या दोन प्रेरणा सोबत आणल्या होत्या. भारतात त्यांना प्रात्यक्षिक करायचे होते. आयसीएस होऊन ऐश्वर्यसंपन्न जीवन जगायचे नव्हते तर मायदेशाची सेवा करायची होती. भारतात त्यांना मोठ्या पदाची जागा मिळवून सुखी व्हायचे नव्हते तर आपल्यासारखे अनेक बॅरिस्टर सर्वसामान्य कुटुंबात तयार करायचे होते. शिक्षणाची ज्ञानगंगोत्री खेड्यापाड्यातील झोपडीपर्यंत पोहोचली पाहिजेत असा ध्यास त्यांनी घेतला होता.
केंब्रिजमध्ये असताना त्यांची गाठ एकदा सुभाष चंद्र बोस यांच्याशी पडली त्यावेळी बोस आयसीएस ची परीक्षा देत होते. बोसने घरी पाठवलेल्या पत्रात लिहिले होते की मी या पदवीचा उपयोग मान- सन्मान व पैसा मिळवण्यासाठी करणार नाही तर माझ्या मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी करेन. या विचाराने भाऊसाहेब पंजाबराव भारावून गेले होते. या दोघांचे विचार मिळतेजुळते असल्यामुळे त्यांनी ते प्रत्यक्षात आणण्याचे ठरवले होते.
समाज क्रांतीची मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराज यांनी रोविली.पुढे ते अनंतात विलीन झाल्यामुळे हेच कार्य पुढे नेटाने चालविण्याचे व्रत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केले. पंजाबराव अवघ्या 27 वर्षाचे असताना त्यांना "तत्त्वज्ञानाचे महापंडित" ही उपाधी प्राप्त झाली होती. खरोखरच ते एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी संपादन केलेल्या ज्ञान कणांचा उपयोग मातृभूमीच्या सेवेसाठी केला. ते केवळ बोलके सुधारक नव्हते तर कर्ते सुधारक होते.
शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडण्याचे त्यांचे परम कर्तव्य असल्यामुळे जनसेवे बरोबरच त्यांनी वकिली सुरू केली. बहुजनांसाठी त्यांनी योग्य तो न्याय मिळवून दिला. मी जरी बॅरिस्टर झालो तरी त्याचा काहीच उपयोग नाही, कारण माझा विलायतेचा अनुभव हेच सांगतो की आपल्या रक्ताचा एक एक थेंब ,एकेक कण सर्वांच्या अभ्युदयाकरिता खर्च करीत रहा. ज्ञान यज्ञ अखंड चालू दे.
विद्याअमृतानेच विद्यार्थ्यात आणि विदर्भात नवचैतन्य निर्माण होईल असे त्यांनी हेरले होते. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले, लोकमान्य टिळक, लोकहितवादी, चिपळूणकर ,आगरकर या थोर शिक्षणतज्ञांनी शिक्षणालाच विशेष प्राधान्य दिले होते. यांच्या शैक्षणिक विचारांचा पगडा डॉ पंजाबराव देशमुख यांचेवर पडला होता.
इकडे विदर्भात विशेष करून बहुजनांचे कैवारी दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांनी शिक्षण कार्याला वाहून घेतले होते. तसेच आनंदराव मेघे , शामरावजी गुंड, आप्पासाहेब देशमुख, इत्यादींनी या सत्कार्याला वाहून घेतले होते. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना या कार्याची जाणीव होती. म्हणून त्यांनी पंढरीनाथ पाटील यांना आपले स्नेही मानून यांच्यावर शिक्षणाची विशेष जबाबदारी सोपवली होती आणि ती त्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडली.
त्यावेळी विदर्भात केवळ चार-पाच शाळा होत्या.अशा शाळेत केवळ भांडवलदारांची आणि गर्भ श्रीमंतांचीच मुले शाळेत जात होती. कुठल्याही खेड्यापाड्यात शाळा नव्हती. त्यामुळे गोरगरिबांची आणि मागासवर्गीयांची मुले शिक्षणापासून वंचित होती . मागासलेल्यांना शिक्षित करण्याची तीव्र इच्छा डॉक्टर पंजाबरावांची होती. अशा मुलांना शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणी येतात याची जाणीव ठेवून त्यांनी एक "श्रद्धानंद छात्रालय " स्थापन केले. या कामासाठी त्यांना आबासाहेब खेडकर ,नानासाहेब मोहोड, मारोतराव कदम, दलपतसिंग चव्हाण इत्यादी मंडळीचे मोलाचे सहकार्य लाभले.
या छत्रालयात सर्व जाती-धर्माची मुले एकत्र येऊन शिक्षण घेतात ,एकत्र बसतात ,जेवतात हे पाहून संत गाडगेबाबा खूप खुश झाले . त्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे तोंड भरून कौतुक केले आणि त्यांना आशीर्वाद दिला. अमरावती येथे बहुजन समाजाची आणि हक्काची एक शाळा होती ती म्हणजे श्री शिवाजी मराठा हायस्कूल ही होय . या संस्थेवर अनेक संकटे आलीत . तिला जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र भाऊसाहेबांनी जातीने लक्ष घालून तिचे रक्षण केले. पुढे या संस्थेला पालवी फुटली आणि त्याचे पाहता पाहता वटवृक्षात रूपांतर झाले. एक जुलै 1932 रोजी तिचे रूपांतर "श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती" असे करण्यात आले. या ज्ञान गंगेचा उगम अमरावती येथे जरी झाला असला तरी ती ज्ञानगंगा आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्याने वाहत जाऊन मोठी झाली. या संस्थेचे हेतू उदात्त होता म्हणून छोट्या छोट्या मोठ्या संस्था तिच्यात येऊन मिळाल्या. बेरार एज्युकेशन सोसायटी, या शिवगंगेत येऊन मिळाली आणि अनेक कार्यकर्ते त्या दृष्टीने संस्थेच्या हितासाठी झटू लागलीत.
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी म्हटले होते की भाऊसाहेबांनी वर्षानुवर्षे हालअपेष्टा सोसून गंगेच्या उगमातून लहान-लहान झोपड्यातून , या पवित्र कार्याची सुरुवात केली. मानवतेच्या विशाल दृष्टीकोनातून श्री शिवाजी शिक्षण संस्थेला विराट रूप आणून दिले.
शाळेसाठी इमारत नाही, पुरेसा पैसा उपलब्ध नाही, सरकार मदत करीत नाही, तर परिस्थितीतून पुढे कसे जायचे? अशा वेळी भाऊसाहेब खूप विचार करीत असत. त्यातून मार्ग काढत असे. आणि मित्रांकडून व शत्रूकडून देखील पैसा मिळवत असत. प्रसंगी स्वतःचा बंगला गहाण ठेवीत पण संस्थेचे कार्य खंडित होऊ दिले नाही. अमरावती येथे एक इमारत उभी केली.लोक तिला " तट्टा हायस्कूल " म्हणून हिनवत होते . काही विघ्नसंतोषी लोकांनी तर तिला आग लावून दिली. भाऊ साहेबांना अतिशय दुःख झाले. पण ते घाबरले नाहीत. चिमणीने एक-एक काडी गोळा करून घर बांधावं आणि ते कोणी एका क्षणात मोडून टाकावं असा प्रकार घडला. तरीही त्यांनी द्वेष न करता त्यांचे अज्ञानच आहे, हे गृहीत धरून पुन्हा योजना आखून नव्या जोमाने शिक्षणाच्या कामाला लागले.
निजमापासून दोन लाख रुपये दैणगी मिळवली .रावां पासून तर रंका पर्यंत , राजापासून ते शिपायापर्यंत मदत मागितली. श्री शिवाजी शिक्षण संस्था, उभारणीसाठी पुन्हा कार्य मोठ्या उत्साहाने सुरू झाले. अण्णासाहेब पडोळे, बाबासाहेब घारफळकर, मामासाहेब लांडे , डॉक्टर आबासाहेब खेडकर, बी.एम.देशमुख कानफाडे गुरुजी आणि पंढरीनाथ पाटील अशी अनेक मोलाची माणसे त्यांनी जोडली .
गुणग्राहक वृत्तीचे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे एक समाजसेवक होते. कोणत्या व्यक्तीचा कोठे उपयोग करून घ्यायचा, यासंबंधीचा त्यांचा दांडगा अभ्यास होता.
शिक्षणमहर्षी, कर्मयोगी , कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची २७ डिसेंबरला जयंती आहे,ते भारताचे पहिले कृषीमंत्री होते.शिक्षण आणि शेती या दोन गोष्टीला त्यांनी विशेष महत्त्व दिले होते.अशा या महामानवाला माझे विनम्र अभिव
# प्रा. डी .एम . कानडजे, जुना अजिसपूर रोड, बुलडाणा.
मोबाईल नंबर- ८२७५२३१८७४