रा.दे.ऊर्फ भोंडे सरकार - एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व
कृषिरत्न ॲड.भोंडे सरकार : जीवन व कार्य
विदर्भ आणि मराठवाडा यांना जोडणाऱ्या म्हसला बुद्रुक या गावी रामसिंग देवसिंग भोंडे यांचा जन्म २३ फेब्रुवारी १९१८ रोजी झाला. रामसिंग देवसिंग भोंडे हे त्या गावी व इतर परिसरात, नव्हे एकूणच बुलडाणा जिल्ह्यात " भोंडे सरकार " म्हणूनच ओळखले जाऊ लागले आणि आजही त्यांना बुलढाण्यात हिच पदवी कायम आहे.
भोंडे सरकार ही या पंचक्रोशीतील फार मोठी आसामी होती.तो स्वातंत्र्यपूर्व काळ होता. मोगलाईचे साम्राज्य होते. मराठवाडा होरपळून निघाला होता. त्याची झळ मराठवाड्याला लागून असलेल्या जवळपास सर्वच गावांना पोहचत होती. त्या काळी शिक्षण घेण्याची सोय नव्हती.गरीबांना तर शिक्षण घेणे फार दुरापास्त झाले होते.त्या काळी सर्वसामान्य माणसं राजकारणात कधीही भाग घेत नव्हते. राजकारण करणे आपलं काम नाही हे त्यावेळची जनता ओळखून होती.आपलं काम भलं आणि आपण भलं,हिच त्यांची जीवन जगण्याची साधी पध्दती होती. तो स्वातंत्र्यपूर्व काळ असल्याने रझाकारांचा फार मोठा प्रभाव या भागात होता.अशाही परिस्थितीत आपल्या मुलांनाचं नव्हे तर गरिबांच्या सर्व मुलांना.शिक्षण घेता आले पाहिजे, ही भोंडे कुटुंबांची तळमळ होती. परंतु हा मोगलाईचा काळ असल्याने अनेक सुविधांचा अभाव होता.सर्वांसाठी शिक्षण घेणे फार अवघड होते.परंतु रादे ऊर्फ भोंडे सरकार यांची शिकण्याची जिद्द, हुशारी, चिकाटी आणि बाहेर गावी जाऊन शिक्षण घेण्याची तयारी लक्षात घेता वडिलांनी त्यांना शिक्षण घेण्यासाठी परवानगी दिली. त्यांनी प्राथमिक शिक्षण साखळी बुद्रुक आणि शिरपूर येथे तर माध्यमिक शिक्षण बुलडाणा येथे यशस्विरित्या पूर्ण करून दाखविले.
महात्मा ज्योतिबा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ पंजाबराव देशमुख या महान समाजसुधारकांनी आम जनतेला शिक्षण घेण्याचे महत्त्व पटवून दिले होते.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याची जाणीव या महामानवांनी करून दिली होती.त्यांच्या विचारांनी भोंडे सरकार फार प्रभावित झाले आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी ते प्रवृत्त झाले.त्यांच्या वडिलांनी रादे सरकारांना नागपूर येथील हिस्लॉप कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला.तेथे त्यांनी खूप मेहनत घेऊन बीए ची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली.यावरच ते थांबले नाही तर त्यांनी कायद्याची देखील एल.एल.बी.परीक्षा प्राविण्य श्रेणीत पास केली होती.ही बाब त्यांच्यासाठी तर आनंदाची होतीच,पण इतर गावातील लोकांसाठी देखील अभिमानाची होती.कारण त्या काळी दहावी पास झालेला माणूस दिसणे दुरापास्त झाले होते.मग उच्च शिक्षण घेणे तर महाकठीण होते.
तो स्वातंत्र्यपूर्व काळ होता.अशा बिकट परिस्थितीत खेड्या पाड्यात कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या. शिक्षण घेत असतानाच त्यांना राजकारणाची आवड निर्माण झाली होती. त्यांनी विद्यार्थी दशेत राजकारणात भाग घेऊन विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम पाहिले होते..तसेच ते विद्यार्थी छात्रसंघाचे अध्यक्ष म्हणून अविरोधपणे निवडून आले होते.ही त्यांच्या चांगल्या स्वभावाची आणि संघटन कौशल्याची एक चुणूक होती असे म्हटले तर वावगे ठरू नये असे मला वाटते.
रादे उर्फ भोंडे सरकार हे कायद्याची परीक्षा उत्तीर्ण होणे, महाविद्यालयात विद्यार्थी छात्र संघाचे अध्यक्ष म्हणून अविरोध निवडून येणे ह्या गोष्टी त्या काळी काही सामान्य नव्हत्या.या गोष्टींचा त्यांच्या कुटुंबाला,भोंडे परिवाराला, नातलगांना आणि त्या पंचक्रोशीतील गावांना फार मोठा अभिमान वाटला होता.
सर्व स्तरातील नागरिकांना कायद्याचे ज्ञान मिळावे, त्यांना, त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कुठे तरी तालुक्यातील अथवा जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी घर करून रहावे हा विचार घेऊन ते बुलडाणा येथे स्थायिक झाले.
बुलडाणा या जिल्ह्याच्या ठिकाणी वास्तव्यास असताना देखील त्यांनी ग्रामीण भागातील लोकांना अंतर दिले नाही.रादे उर्फ भोंडे सरकार हे म्हसला बुद्रुक येथील मुळ निवासी होते.तेथे त्यांच्या कुटुंबाचा फार मोठा विस्तार होता.शेकडो एकर जमीन भोंडे परिवारांची होती.आजही त्यांचे मुलांजवळ खूप मोठी जमीन आहे. शेती ही " काळी आई " असून तिची आम्ही लेकरं आहोत ही मूळ धारणा त्यांची होती.म्हणूनच ते खऱ्या अर्थाने स्वत:ला भूमीपुत्र असे संबोधत असे.
"शेती आणि शेतकरी" यांचे विषयी यांच्या मनात कळवळा होता. ते वकील असल्याने अत्यंत कमी खर्चात ते कष्टकरी, कामगार ,शेतकरी, शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकरी यांचे न्यायनिवाडे जिल्ह्याच्या कोर्टात करून देत होते.खऱ्या अर्थाने त्यांनी गोरगरीबांसाठी वकीली व्यवसाय सुरू केला होता.त्यांचे एक बंधू विठ्ठलराव भोंडे कृषीतज्ज्ञ होते. " शेती हा उत्तम व्यवसाय असून शेती ही एक सोन्याची खाण आहे,"अशी विचारधारा कृषीरत्न विठ्ठलराव भोंडे यांची होती. तसेच यांचे तिसरे बंधू श्रीराम देवसिंग भोंडे हे पंचायत समितीचे माजी सभापती होते.एकंदरीत तिन्ही भावांचे शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक,आर्थिक आणि कृषी क्षेत्रातील कार्य वाखाणण्याजोगे होते.
बुलडाणा येथे वकिली व्यवसाय करत असताना भोंडे सरकारांना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सहकार या क्षेत्रांत काम करण्याची आवड निर्माण झाली.राजकारणात पडल्याशिवाय जनतेच्या मूलभूत गरजा सोडविता येणे शक्य नाही,याची जाणीव त्यांना झाली आणि म्हणूनच ते राजकारणात पडले.नेतृत्वगुण, संघटन कौशल्य, सहकार्यशील वृत्ती, काही तरी करून दाखविण्याची धडपड ,माणूसपारखी स्वभाव आणि समाजाविषयी असलेला कळवळा ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन जनतेनी त्यांना बुलडाणा नगर परिषदेच्या अध्यक्षपदी १९६२ मध्ये निवडून दिले होते. त्यांना समाजाभिमुख काम करण्याची संधी निर्माण करून दिली होती.
तत्कालीन परिस्थितीत बुलडाणा जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होती.बुलडाणा शहर आणि लगतच्या ग्रामीण भागात पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी कसे उपलब्ध करून देता येईल, याचा रादे उर्फ " भोंडे सरकार" हे रात्रंदिवस विचार करीत असे.पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने सरकारी नोकरी करणारे कर्मचारी देखील बुलढाण्यात नोकरी करण्यासाठी तयार होत नव्हते.अशा कठीण परिस्थितीत भोंडे सरकार यांनी मोठा संघर्ष करून येळगाव धरणाची कल्पना मांडली.एवढ्यावरच ते थांबले नाही तर येळगाव धरण पूर्णत्वास नेऊन बुलडाणा शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील लोकांची तहान भागविली.आजही भोंडे सरकार यांना बुलडाणा नगरी आणि लगतचा परिसर कदापिही विसरणे शक्य नाही.आज हे धरण " भोंडे सरकार येळगाव जलाशय " या नावाने ओळखले जाते. येळगाव धरणाचे प्रणेते म्हणून आज बुलडाणा शहरात त्यांची ख्याती आहे.
पुढे नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर भोंडे सरकार थांबले नाहीत.उलट ते अधिक जोमाने कामाला लागले. सन १९७२ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले.ही त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची फार मोठी उपलब्धी होती.जनतेच्या अडीअडचणी आणि भौतिक सुविधा सोडविण्यासाठी त्यांना चांगली संधी चालून आली होती.बुलडाणा मतदार संघाचे ते आमदार असताना भोंडे सरकार यांनी जनतेच्या विकासाची अनेक कामे केलीत. घाटाखाली अनेक खेडी अंधारात चाचपडत होती.घरादारात आणि शेतात वीजेची व्यवस्था नव्हती. सर्वत्र अंधार होता.शेतकऱ्यांची ही दैन्यावस्था पाहून भोंडे सरकारला गहिवरून आले.त्यांना राहवले नाही. त्यांनी सर्व शेतकऱ्यांसाठी अधिकारी वर्ग हाताशी धरून वीज जोडणी अभियान राबविले.शेतकरी बांधवांच्या जीवनात प्रकाश निर्माण करून दिला.या कामामुळे शेतकरी, शेतमजूर खूप आनंदीत झाले. गावात आणि शेतात विजेची सोय करून दिल्याबद्दल शेतकरी शेतमजूर सुखावला होता.
भोंडे सरकारचा स्वभाव तसा फणसासारखा. " फणसा अंगी काटे,आत गरांचे साठे " या उक्तीप्रमाणे ते आपले चुकले असेल तर कडक शब्दांतून समज देत होते आणि लगेच त्यांना क्षणात दया देखील येत असे आणि भोंडे सरकार त्या व्यक्तीचे लगेच काम करून देत असे.थोडक्यात असे सांगता येईल की ज्या व्यक्तीला ते जास्त आणि कडक शब्दांत बोलतील, त्याचे काम झालेच म्हणून समजावे. " शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही " हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे ब्रीद वाक्य मानून, त्यांनी आमदार असताना ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना विशेष प्राधान्य दिले. " गाव तेथे प्राथमिक शाळा" हे एक प्रकारे अभियान राबवून सर्वच गावात शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली होती. आज मात्र खाजगी शाळांचा सुळसुळाट झाला आहे, त्यामुळे येत्या काळात जिल्हा परिषद शाळा बंद पडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्या काळी गोरगरिबांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून डॉ पंजाबराव देशमुख,दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांना भोंडे सरकार यांनी समर्थपणे साथ दिली. त्यांच्या विचारधारेला वाहून घेतले आणि त्यांच्या सहकार्याने बुलडाणा येथे जिजामाता महाविद्यालय स्थापन केले.तसेच चिखली येथे देखील पंढरीनाथ पाटील यांना श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय स्थापन करण्यात मदत केली.अशाप्रकारे कला,वाणिज्य आणि विज्ञान शाखेत गोरगरिबांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बुलडाणा आणि चिखली येथे सोय करून दिली गेली.श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख, दलितमित्र समाजभूषण पंढरीनाथ पाटील आणि कै.ॲड.ज्योतीराव राऊत यांचे सोबत राहून श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व्दारा संचालित बुलडाणा,चांडोळ,हतेडी,मासरूळ,मेरा बु., देऊळगाव मही,आंचरवाडी, चिखली,ईसोली,किन्होळा, शिरपूर, नांदुरा, अशा मोठ्या गावी दहावी- बारावी पर्यंतचे शिक्षण गोरगरिबांच्या मुलां-मुलींसाठी उपलब्ध करून दिले.गरीब विद्यार्थ्यांना जेवणाची व राहण्याची सोय व्हावी म्हणून काही ठिकाणी वसतिगृह देखील सुरू केले.एकूणच शहरी आणि ग्रामीण भागातील मुलां- मुलींसाठी शिक्षण घेण्यासाठी फार मोठी व्यवस्था करुन दिली.
" विना सहकार नाही उद्धार " या उक्तीप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक अडचण समजून घेतली.गावोगावी जाऊन ग्राम सेवा सहकारी पतसंस्थांचे जाळे विणले.पतसंस्थेचे महत्व पटवून दिले. शेतकऱ्यांसाठी पतपुरवठा करण्याची व्यवस्था करुन दिली.यातून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली. ग्रामसेवा सहकारी सोसायटी आणि जिल्हा सहकारी केंद्रीय बॅक यांचे नाते दृढ करून दिले.परिणाम स्वरूप भोंडे सरकार यांना बुलडाणा जिल्हा सहकारी केंद्रीय बॅकचे उपाध्यक्ष म्हणून निवडून देण्यात आले." शुद्ध बिजापोटी,फळे रसाळ गोमटी " या न्यायानुसार बियाणे जर चांगले असेल तर शेतात भरघोस पीक येईल.तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी चांगले बियाणे वापरावे असे आवाहन भोंडे सरकार यांनी केले.तसेच ते एवढ्यावरच थांबले नाही तर शेतकऱ्यांसाठी सहकारी बीजोत्पादक संस्था स्थापन केली. तसेच ते महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेचे देखील संचालक होते.
इ.स.१९६८ मध्ये चिखली येथे दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांच्या हिरक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवासाठी यशवंतराव चव्हाण उपस्थित राहणार होते.यावेळी एक लाख रुपयांची थैली दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांना देण्याचे ठरले. त्यानुसार भोंडे सरकारांनी जनतेच्या सहभागातून एक लाख रुपये निधी उभा करून हिरक महोत्सव यशस्वी करून दाखवला. मिळालेला निधी पंढरीनाथ पाटलांनी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय उभारणीसाठी देऊन टाकला होता.
तत्कालीन मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांचेशी भोंडे सरकार नेहमी संपर्कात असत. शेतकऱ्यांसाठी पाणी पुरवठा कसा करता येईल ? धरणे,तलाव कसे बांधता करता येईल ? यावर ते भारतभाऊ सोबत नेहमी चर्चा करीत असत. पद्मावती धरणाची मुहूर्तमेढ भारतभाऊ बोंद्रे यांचेकडून रोवून घेतली.
१५ ऑगष्ट हा दिवस त्यांचे साठी काळरात्र ठरला. ते मृत्यू शय्येवर पडून असताना देखील त्यांनी पद्मावती धरणाची आठवण माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांना करून दिली होती.यावरून भोंडे सरकार यांना शेतकऱ्यांविषयी किती कळवळा होता हे लक्षात येते.भोंडे सरकार यांचें शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक व सहकार क्षेत्रातील कार्य लक्षात घेता ते एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते, हे निर्विवाद सत्य आहे . १५ ऑगस्ट रोजी त्यांची पुण्यतिथी येते, त्या निमित्ताने मी त्यांच्या जीवन-कार्याला उजाळा दिला आहे. त्यांना विनम्र अभिवादन!
# प्रा डी एम कानडजे, मधुकोष निवास
जुना अजिसपूर रोड,बुलडाणा (८२७५२३१८७४)