शिक्षक दिनानिमित्त थोडेसे......


               रक्तदान, अवयवदान, कन्यादान , जीवनदान  असे दानांचे अनेक प्रकार आहेत.पण विद्यादान हे देखील एक महत्त्वाचे दान आहे.म्हणून शिक्षक अथवा गुरूला समाजात आदराचं स्थान दिलं जातं. लोकशाहीप्रधान असलेल्या आपल्या देशात घटनात्मक दृष्ट्या राष्ट्रपती हे पद सर्वौच्च मानले जाते.या पदावर सर्व प्रथम विराजमान होण्याचा मान १९६२ मध्ये डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन् यांना मिळाला. ही शिक्षकी पेशाला अभिमानास्पद अशी बाब आहे.जेव्हा सन १९६२ मध्ये डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती झाले, तेव्हा पासून सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी असे ठरविले की माझा  जन्म दिवस हा   शिक्षकांप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी  तो शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे जाहीर केले. तेव्हापासून डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस हा शिक्षक दिन म्हणून भारतभर आनंदाने साजरा केला जातो.

               तसेच तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु ह्या देखील  शिक्षिकाच होत्या. शिक्षकी पेशातील  दोन व्यक्ती राष्ट्रपती पदी विराजमान झाल्यात, हा एकप्रकारे शिक्षकांचा बहुमानच समजावा लागेल. या सर्व बाबी लक्षात घेऊन शिक्षकांनी एक सामाजिक बांधिलकी समजून विद्यादानाचे पवित्र कार्य   प्रामाणिकपणे पार पडले पाहिजे असे मला वाटते.आजची बदलती  शैक्षणिक प्रणाली विचारात घेता शिक्षकाला  विद्यार्थी केंद्रीत अध्यापन पद्धती राबविणे नितांत गरजेचे आहे .अध्ययन - अध्यापन प्रक्रिया मध्ये  शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व प्रभावी असणे गरजेचे असते.

        " विद्यार्थी हे दैवत माझे, शाळा हे मंदिर असे!

           सदैव त्यांना उन्नत करणे,हा माझा नित्य धर्म असे!! "

ही  भूमिका उराशी बाळगून नित्यनेमाने विद्यार्थ्यांना शिकविण्याचे, नव्हे त्यांना घडविण्याचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे.ही आजच्या काळाची गरज आहे.कारण आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे.साधारणपणे शिक्षक कसा असावा? शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व कसे असावे, याबाबत सहजपणे विचार करता येऊ शकतो.

              साधारणपणे शिक्षकांचे विचार सकारात्मक असावे.विद्यार्थी वर्गांना ते प्रेरणा देणारे असावे.विद्यार्थी आपल्या भाषणातून  नाउमेद होणार नाही याची प्रकर्षानं बोलताना काळजी घ्यावी.प्रत्येक विद्यार्थ्यांना मान सन्मान असतो.त्याचा अहंभाव दुखविला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते.  

        " असाध्य ते साध्य ! करिता सायास!

          कारण अभ्यास तुका म्हणे! " 

या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा भावार्थ मुलांना ओघवत्या आणि सहज सोप्या भाषेत समजावून सांगावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचे सहज आकलन होईल. कोणतीही गोष्ट अशक्य नाही , फक्त  त्याला परिश्रमाची व अभ्यासाची जोड देणे आवश्यक आहे ,याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. हे विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले पाहिजे.

               शिक्षकांची राहणी  साधी आणि भारतीय परंपरेला शोभून दिसणारी असावी.शिक्षक हा  सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे तो निर्व्यसनी असणे अत्यंत आवश्यक आहे. घरी दारी,शाळेत आणि समाजात  वावरताना  तो माणूसकीचे गौरी शंकर आहे असे सर्वांना वाटले पाहिजे.समाजात आणि शालेय परिसरात त्याचा नावलौकिक असला पाहिजे.असे प्रफुल्लित व्यक्तिमत्त्व त्यांचे पाहिजे.

              शिक्षक हा सदैव विद्यार्थीच असला पाहिजे.याचा अर्थ असा की त्याने नियमितपणे वाचन करून स्व:ताचे अनुभव समृद्ध केले पाहिजे. वाचनाच्या बळावर  वेगवेगळ्या पदव्या संपादन करून स्व:ता ची  शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता वाढविली पाहिजे.या सर्व बाबी मुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी निश्चित फायदा होईल, असे मला वाटते.

     आज आपण समाजात बघतो की मुलाने झोपेत बापा/ आईचा खून केला.तर असे का घडते आहे,याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आली आहे. मुलांवर नैतिक मूल्ये  रुजविण्यासाठी आपण कोठे तरी कमी पडतो आहोत का ? याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.एक सामाजिक बांधिलकी समजून विद्यादान करत असताना विद्यार्थ्यांमध्ये भावनिक मूल्ये, नैतिक मूल्ये, सामाजिक मूल्ये आणि राष्ट्रीय मूल्ये रूजविण्याची नितांत गरज आहे. विद्यार्थ्यांना पुढे शिकून अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर , शास्त्रज्ञ,जे काय बनायचे आहे,ते प्राप्त परिस्थितीत आपापल्या योग्यतेनुसार होता येईल, परंतु सर्वप्रथम आपल्याला सच्चा माणूस बनायचे आहे,याची जाणीव करून देणे सर्व शिक्षकांचे काम आहे, असे मला वाटते.आणि या शिक्षक दिनानिमित्त मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा देतो.

# प्रा डी एम कानडजे, जुना अजिसपूर रोड बुलडाणा

             


       



Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत