शेतकऱ्यांची व्यथा आणि  त्यावर फुंकर ..

        पूर्वी एक म्हण होती की  " राजाने दुर्लक्षिले, पावसाने  झोडपले आणि  नवऱ्याने बायकोला मारले "  तर तक्रार कुणाकडे द्यायची ? हा प्रश्न सर्व सामान्यांना पडत होता.कारण प्रत्येक जण स्वामीत्वाच्या भावनेने वागतो आहे. आपलं कोणीही वाकडं करू शकत नाही असे प्रत्येकाला वाटत असते. शेतकरी बांधवांची हीच गत झाली आहे. दाद मागायची तर किती आणि कुणाला ? शेतात पेरताना जे हिरवं स्वप्न पाहिले होते, ते  धो धो पावसामुळे मातीसोबत पार वाहून गेले.उरलं सुरलं पीक  ज्या भागात कमी पाऊस पडला होता तेथे ते करपून गेलं आणि जिथे ढगफुटी झाली, तेथील पिकं अति पावसामुळे पार पाण्यात बुडून सडून गेले आहे.

       " बुडत्याला काडीचा आधार" या न्यायानुसार सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार  देण्याचे वचन  दिले. तसेच पीक विमा कंपनी, जर शेतकऱ्यांनी   बॅंकेकडून पीक कर्ज घेतले असेल तर परस्पर पीक विमा हप्ता कापून घेते, शेतकऱ्यांना  थांगपत्ताही लागू देत नाही . आता पीक विमा द्यायची वेळ आली तर हात वर करतात. हवामान खात्याला विचारून सांगू, असे म्हणतात. हीच का किसान बांधवांच्याप्रती आस्था! प्रसंग आला की सगळे जण म्हणतात, ' जय जवान - जय किसान '    वा रे !  विमा कंपनी आणि वा रे सरकार!! .

          खूप माणसं  ' कोरोना ' मुळे देवाघरी  गेली अन् आता  महापुरातून जी उरली सुरली जनावरं होती ती पण  ' लम्पी ' रोगामुळे घायाळ होऊन,  देवाघरी गेली आहे. शेतकरी हवालदिल होऊन निपचित पडला आहे. त्याला काहीही सुचेनासे झाले आहे. शेतकऱ्यांसाठी काय करता येईल, यावर महाचर्चा सत्र आयोजित करून चिंतन करण्याची वेळ आली आहे.

       ' कोरोना ' काळात अनेकांचा रोजगार बुडाला.सर्वसामान्य जनता  आर्थिक दृष्ट्या डबघाईस आली. घरात कोटीने पैसा असला म्हणजे आपण जगू ,असा समज करून घेऊ नका.घरात ज्याच्या एक - दोन पोतं ज्वारी बाजरी असेल तरच तो जगू शकतो याची जाणीव ठेवण्याची आज गरज आहे.पैसा म्हणजे सर्व काही आहे असे समजू नका. शेती हा महत्त्वाचा मुद्दा आहे.शेती कसवणारा शेतकरी हा महत्त्वाचा आहे.या अनुषंगाने विचार केला गेला पाहिजे असे मला वाटते.

       ' शेतकरी सुखी तर जग सुखी ' ही म्हण सार्थ करून दाखवायची असेल तर शेतकरी बांधवांसाठी  एक स्वतंत्र कृषी वित्त पुरवठा आयोग असावा.सरकार ,नोकरदार, व्यापारी , मोठ मोठी ट्रस्ट, देवस्थानच्या तिजोऱ्या व उद्योगपती या सर्वांनी योग्य प्रमाणात योगदान करावे . करदात्यांवर शेतीकर म्हणून काही प्रमाण ठेवावे. असे जर करता आले तर फार मोठा निधी उभा करून दर वर्षी  शेतकरी बांधवांना मदतीचा हात दिला जावू शकतो. शासन शक्य होईल तेवढे  देते.पण शेतकऱ्यांच्या समस्या एवढ्या आहे की जेथे आभाळच फाटले तर थिगळ लावणार तरी किती ?

              शेतकऱ्यांना  किमान तरी काय अपेक्षित आहे ? तर  घरापर्यंत आणि शेतापर्यंत पक्का रस्ता  असावा . रात्रंदिवस शेतात वीज पंपासाठी वीज जोडणी करून देऊन  मोफत वीज पुरवठा  असावा. शेतकरी राजाला शेतात  रात्रीचे पिकांना पाणी देण्याची  वेळ येऊ नये. जलसिंचनाच्या मुबलक प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

              कर्जमाफी हा काही शेतकरी- शेतमजूर वर्गांचे जीवनमान उंचावण्यासाठी रामबाण उपाय नव्हे, असे मला वाटते. असे काही ठोस उपाय केले पाहिजेत की  शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि पुन्हा शेतकरी नव्या जोमाने कामाला लागेल.

# प्रा. दिगंबर कानडजे 

सागवन - बुलडाणा     

 

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत