मराठी विषयाचा गुणात्मक निकाल निकाल

  मराठी विषयाचा गुणात्मक निकाल सुधारण्यासाठी मार्गदर्शन ------

             विद्यार्थी मित्रहो ! सावधान ! आता शारिरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवा. कारण सीबीएससी बोर्डची दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून तर स्टेटबोर्डची बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे . स्वतःवर विश्वास ठेवून परीक्षेला सामोरे जा. उदंड  आत्मविश्वास आणि सतत परिश्रमामुळे यश आपल्या दारी चालू देईल . मनात कोठलाही मानसिक गोंधळ न होऊ देता, सारासार विचार करून आणि वेळेचे नियोजन करून पेपर सोडवण्यासाठी सज्ज व्हा. आपणास परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा .  त्यासोबतच मराठी विषयाच्या पेपरसंबंधी थोडेशे मार्गदर्शन आणि मराठी विषयाचा गुणात्मक निकाल सुधारण्यासाठी काही उपाय या लेखात सांगण्याचा  मी प्रयत्न करणार आहे.

         परीक्षा म्हटलं की मानसिक ताणतणाव आलाच.आपल्याला विशेष भीती वाटते ती परीक्षेची. ज्याची चांगली तयारी झाली आहे त्यास परीक्षेची विशेष भीती वाटत नाही. मात्र ज्याने नियोजनबद्ध अभ्यास केलेला नसतो त्यास परीक्षा नसत्या तर बरे झाले असते , असे वाटणे साहजिकच आहे. चांगले यश संपादन करण्यासाठी सुरुवातीपासूनच अभ्यासाची सवय अंगी बाणली पाहिजे. सर्व विषयांना सारखे महत्त्व देऊन श्रवण, वाचन, लेखन, मनन, चिंतन आणि प्रश्नपत्रिका सोडवण्याचा चांगला सराव केला, तर सर्वच विषयात चांगले गुण पडून आपण गुणवत्तायादीत देखील येऊ शकतो.एवढा आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे.मराठी  विषयाच्या संदर्भात मी प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहे. मराठी विषयाचा संख्यात्मक निकाल साधारणपणे नेहमी 90 ते 95 टक्के असतो.

           मात्र विद्यार्थ्यांच्या प्राप्त गुणांचे विश्लेषण केले असता असे लक्षात येते की किमान गुण मिळवणारे विद्यार्थी खूप असतात .      40 ते 50 टक्के गुण प्राप्त करणारी विद्यार्थीसंख्या जवळपास 80 टक्के असते.  प्रथम श्रेणीत (60-74 गुण )उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या दहा ते पंधरा टक्के असते आणि प्राविण्यश्रेणीत (75 -85 गुण) उत्तीर्ण होणारे विद्यार्थी जवळपास पाच टक्के आढळतात . तर विशेष प्राविण्य श्रेणीत (85-95 गुण) उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या मात्र अर्धा ते एक टक्का असते . एकंदरीत असे लक्षात आले आहे की संख्यात्मक निकाल ( पास होण्याची टक्केवारी ) जरी फार चांगला असला तरी गुणात्मक निकाल मात्र चांगला नसतो. 

         गद्य, पद्य,  स्थूलवाचन , व्याकरण आणि लेखन हे मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील विभाग असतात. साधारणतः बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी तक्रार असते की प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळ पुरत नाही. वास्तविक तीन तासांमध्ये आपणाला पेपर सोडवायचा असतो. आपण नेमके ,मुद्देसूद आणि विषयाला अनुसरून लेखन करीत नसल्याने आपणास उत्तरपत्रिका लेखन करण्यासाठी वेळ मिळत नाही असे मला वाटते. 

       उत्तरपत्रिका लेखन करण्यासाठी वेळचे नियोजन :-

            प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचून घ्यावी. या प्रश्नपत्रिकेत दीर्घोत्तरी, लघुत्तरी ,वस्तुनिष्ठ या प्रकारचे प्रश्न दिलेले असतात. काही प्रश्न दीर्घोत्तरी निबंधवजा या प्रश्नप्रकारात मोडतात. निबंधलेखन , कथालेखन, कल्पनाविस्तार आणि पत्रलेखन हे सर्व प्रश्न उपयोजित मराठी यावर आधारित असतात. प्रश्नपत्रिकेतील लघुत्तरी ,वस्तुनिष्ठ आणि दीर्घोत्तरी- निबंधवजा प्रश्नप्रकार लक्षात न घेता विद्यार्थी प्रश्नपत्रिका सोडवण्यास सुरुवात करतात. कोणत्या प्रश्नांची शब्द मर्यादा किती आहे , प्रश्नाचे स्वरूप लक्षात न घेता विषयांतर करून लिहिणे, यामुळे वेळेचा अपव्यय होतो आणि त्यामुळे उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी तीन तास पुरेशे होत नाही.सर्वप्रथम वस्तुनिष्ठ प्रश्न कमी वेळात आणि अचूक सोडवावीत.  लघुत्तरी प्रश्न सोडवताना दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असते.

       प्रश्नांची उत्तरे लिहित असताना घ्यावयाची काळजी :-

              लघुत्तरी प्रश्न हे साधारणपणे ३ ते ४ गुणांचे असतात. ते 100 ते 150 शब्दांत  लिहिणे बंधनकारक असताना विद्यार्थी मात्र विषयाला धरून लिहित नाही,तर तो विषयांतर करून लिहितो . त्यामुळे तो लघुत्तरी प्रश्न गरज नसताना 200 शब्दांचा तयार होतो. या ठिकाणी विद्यार्थी जास्तीचे लेखन करुन आपला अमूल्य वेळ वाया घालवून बसतो. अशा वेळी विद्यार्थ्यांने लेखन करण्यातांना भान ठेवले पाहिजे. आपल्याला विचारले काय आणि आपण लिहितो काय ?  याचा ताळमेळ लागत नाही. सबब आपला वेळ वाया जातो. 

             दीर्घोत्तरी प्रश्न अथवा निबंधवजा प्रश्नप्रकार हे  साधारणपणे ६ ते ८ गुणांचे असतात. सूचनांचे पालन करून ते सोडवायचे असतात. गद्य पद्य , उपयोजित मराठी आणि स्थूलवाचन  या विभागावर असे दीर्घोत्तरी प्रश्न 100 ते 150 शब्दांमध्ये लिहिणे अपेक्षित असते. दिलेल्या घटकांवर आधारित मोजके आणि मुद्देसूद लेखन करुन आपला वेळ वाचवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे.  

            उत्तरपत्रिका लिहित असताना शब्दमर्यादा लक्षात ठेवून, प्रश्नाचे स्वरूप लक्षात घेऊन नेमके उत्तर लिहावे. प्रश्नाच्या संदर्भातच  स्पष्टीकरण असावं.  तक्त्यात सांगितल्याप्रमाणे वेळेचे नियोजन केले तर 170 मिनिटांत प्रश्नपत्रिका सोडविणे सहज शक्य होते. उरलेल्या 10 मिनिटात प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सूचनेनुसार उत्तरपत्रिकेत    सोडवली की नाही ते तपासून घ्यावे. बऱ्याच  वेळा काही प्रश्न अनावधानाने उत्तरे येत असून देखील सोडविण्याचे राहून जातात. त्यामुळे कमी गुण मिळतात. सबब मराठी विषयाचा गुणात्मक निकाल घसरतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषेत कमी गुण मिळतात.

   मराठी विषयाचा गुणात्मक निकाल सुधारण्यासाठी उपाय :-

            दुसरे असे की आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून उत्तरांचे चांगले स्मरण होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. बोर्ड परीक्षेच्या  मागील किमान तीन वर्षांच्या जुन्या प्रश्नपत्रिका सराव म्हणून घरी लिहून त्या संबंधित विषय शिक्षकांकडून तपासून घ्याव्यात. झालेल्या चुका लगेच दुरूस्त करून घ्याव्यात. जेणेकरून पुढे होणाऱ्या  परीक्षेत  चुका होणार नाहीत, असे  केल्याने ९५ टक्के गुण मराठीत  मिळेल असा आत्मविश्वास वाढेल.   विषयाचे मूळ पाठ्यपुस्तक आणि त्या संदर्भात इतर प्रकाशनाची काही पुस्तके मार्गदर्शनासाठी   संदर्भ ग्रंथ म्हणून घ्यावीत आणि ती देखील अभ्यासावीत . गद्य ,पद्य, स्थूलवाचन, कथा लेखन, निबंध लेखन, पत्रलेखन,बातमीलेखन , जाहिरातलेखन उतारा सारांशलेखन , उतारा आकलन   आणि व्याकरण या घटकांचा समजून उमजून चांगला अभ्यास करावा . तसेच लेखन विभागाकडे देखील विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आपले लेखन व्याकरण दृष्ट्या निर्दोष आणि शुद्ध असणे गरजेचे असते.

मराठी भाषेविषयी असलेला विद्यार्थ्यांचा गैरसमज :-

          मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. ती सहज अवगत होणारी आणि सोपी आहे असे मराठी भाषा बोलणाऱ्यांना वाटते. विद्यार्थी तर मराठी विषयाला अगदी दुय्यम समजतात. विज्ञान शाखांचे विद्यार्थी आणि संपूर्ण इंग्रजी माध्यमांचे विद्यार्थी हेतुपुरस्सर मराठी विषयाकडे दुर्लक्ष करतात. मराठी  विषय हा अभ्यास करण्याचा विषय नाही. हा एक फालतू विषय म्हणून या विषयाची हेटाळणी करतात. मराठी भाषेला दुय्यम लेखतात. हा विषय वेळेवर वाचन करून घेऊ असा त्यांचा समज झालेला असतो. पण विद्यार्थी मित्रहो हे साफ चुकीचे आहे. एक वेळ इंग्रजी,हिंदी सहज समजून जाईल,पण मराठी भाषा हा विषय आकलनासाठी, संभाषणासाठी, भाषणासाठी, लेखनासाठी , मुलाखतीसाठी आणि संवादासाठी सोपा नाही. मराठी विषयाची खूप तयारी करावी लागते आणि म्हणून मला सांगायचे आहे की विद्यार्थी मित्रहो मराठी विषयाचा चांगला अभ्यास करून गुणात्मक निकाल सुधारण्यासाठी चांगले प्रयत्न करणे ही काळाची नितांत गरज आहे. पुढे स्पर्धा परीक्षेसाठी सुध्दा विषय खूप उपयुक्त आहे.

   ‌          मराठी भाषा आपली जरी मातृभाषा असली तरी लेखन करणे आणि व्यासपीठावर भाषण करणे सोपे नाही. शक्यतोवर प्राकृत भाषेमध्ये स्वच्छ हस्ताक्षरात शुध्दलेखन करावे . त्यासाठी खूप वाचन लेखन करणे आवश्यक असते. लेखन विभागात उताऱ्याचे आकलन आणि सारांशलेखन ,पत्र लेखन आणि निबंध लेखन असे प्रकार आहेत . तसेच कल्पनाविस्तार आणि कथाकथन हा देखील प्रश्नप्रकार नवीन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. उताऱ्याचे सारांशलेखन करण्यासाठी आणि आकलनावर आधारित प्रश्न लिहिण्यासाठी सर्वप्रथम उतारा वाचून  उताऱ्याचे चांगले आकलन होणे आवश्यक आहे . तो गद्य - पद्य उतारा दोन वेळा वाचावा आणि त्यानंतर त्याखाली दिलेल्या पर्यायी  उत्तरातून अचूक  सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक असते. सीबीएससी बोर्ड असो अथवा स्टेट बोर्ड यांचे जवळपास प्रश्न  सारखे आहेत .  व्याकरण हा एक असा घटक आहे की त्यामध्ये पूर्णपैकी पूर्ण गुण मिळतात. 

            लेखन प्रकारात पत्रलेखन हा एक उपयोजित मराठीचा एक उत्कृष्ट असा प्रकार आहे. दैनंदिन जीवनात अनेक विषयांवर पत्रव्यवहार करून आपल्या समस्यांची माहिती द्यावी लागते. पत्रलेखन ही एक कला आहे. आपल्या मनातील भावभावना विचार चांगल्या भाषेत संक्रमण करून दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे  पत्रलेखन एक उत्तम साधन आहे. पत्रलेखनाचे अनौपचारिक आणि औपचारिक असे दोन भाग पडतात. अनौपचारिक पत्रलेखन जवळच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला पाठवले जाणारे पत्र असते .आणि विशिष्ट वस्तूंची मागणी करणारे , विनंती करणारे हे कार्यालयीन व व्यावसायिक पत्र   हे औपचारिक पत्रलेखन या प्रकारात मोडते . पत्रलेखन करताना स्वतःचा पत्ता, मोबाईल नंबर अथवा ईमेल लिहिणे आवश्यक असते. त्यानंतर  ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्या अधिकाऱ्याचा हुद्दा अथवा पद लिहून कार्यालयाचा पत्ता लिहावा लागतो. आपल्याला जे सांगायचे आहे ते थोडक्यात लिहावे, यालाच पत्राचा मजकूर म्हणतात.आणि पत्राचा शेवट आपल्या स्वाक्षरीने करावा लागतो. या पद्धतीने पत्र लेखन केले तर निश्चितपणे पूर्णपैकी पूर्ण गुण मिळू शकतात. 

          कथालेखन  करताना विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती, नवनिर्मिती व सुर्जनशीलतेला वाव द्यावा लागतो. कथा ऐकणे व सांगणे हा आबाला वृद्धांच्या आनंदाचा विषय आहे.  कथाबीज हा कथेचा प्राण असतो . कथा ही आपल्या कल्पनेने , विचाराने आणि सृजनशीलतेने रचली जाते.  ती पूर्णतः काल्पनिक किंवा सत्य घटनेवर आधारित असते. कथाबीजाच्या  विषयाला पात्र ,घटना, प्रसंग, तर्कसंगत विचार यांनी फुलवणे हे  लेखन कौशल्य आहे.  लेखन कौशल्य विकसित करणे हा या कथेमागचा हेतू आहे.  . दिलेल्या मुद्द्याच्या आधारे  प्रसंगानुसार वातावरण निर्मिती करून ती कथा अथवा गोष्ट पूर्ण करावी लागते. शेवटी  कथालेखन पूर्ण झाले की त्याला योग्य ते शीर्षक द्यावे.

      निबंधाचे स्वरूप :-     

निबंध या शब्दातच बांधीवपणा, आखीव रेखीव मांडणी अभिप्रेत आहे. तो सुनियोजित , मुद्देसूद, विषयाची शिस्तबद्ध  मांडणी करणारा असला पाहिजे. वर्णनात्मक, व्यक्तिचित्रणात्मक, आत्मवृत्तात्मक, कल्पनाप्रधान , वैचारिक हे निबंधाचे प्रकार आहेत. व्यक्ती ,वस्तू ,ठिकाण,  पशु पक्ष्यांचे संदर्भातील हालचाली, सवयी ,लकबी यांची बारकाव्यासह तपशीलवार मांडणी वर्णनात्मक निबंध या प्रकारात केलेली असते. निबंधाची भाषा  साधी, ओघवती प्रत्यकारी व चित्रदर्शी असली पाहिजे.  उदाहरणार्थ निबंध - पावसाळ्यातील सृष्टीसौंदर्य,मी केलेली शैक्षणिक सहल.

व्यक्तिचित्रणात्मक निबंध :-

             व्यक्तिचित्रणात्मक निबंध प्रकारात एखाद्या विशेष व्यक्तीचे शब्दात चित्र काढणे यालाच व्यक्तिचित्रणात्मक निबंध असे म्हणतात. व्यक्तीच्या हालचाली, लकबी ,बोलण्याच्या पद्धती, विचार व दृष्टिकोन इत्यादि घटकांचे प्रत्यकारी वर्णन  या व्यक्तिचित्रणात्मक निबंध प्रकारात असते. व्यक्तिमत्त्वाचे सर्व पैलू दर्शवणारे हुबेहूब  व्यक्तिचित्रण या निबंध प्रकारात येते. उदाहरणार्थ - निबंध - माझा आवडता लेखक, परोपकारी गंपू.

आत्मवृत्तात्मक निबंध :-

   सजीव व निर्जीव वस्तू स्वतः जीवनाचे आत्मकथन करते, तेव्हा त्याला आत्मवृत्तात्मक निबंध असे म्हणतात.  या प्रकाराला आत्मनिवेदन, आत्मवृत्त, मनोगत, कैफियत,  इत्यादि वेगवेगळे शब्दही योजता येतात .  या निबंध प्रकारात निवेदक स्वतः बोलत असल्याने येथे  प्रथमपुरुषी निवेदन आवश्यक असते . आनंद , कृतार्थता ,व्यथा- वेदना , सुप्त- अतृप्त इच्छा, सुखदुःखे यांचे यथोचित वर्णन या निबंध प्रकारात असते. उदाहरणार्थ  निबंध - पडक्या किल्ल्याची आत्मवृत्त, म्हाताऱ्या बैलाचे मनोगत.

 कल्पनाप्रधान निबंध : -

             वास्तव ,अवास्तव कल्पनांचा मुक्त वापर करून लिहिलेल्या निबंधाला कल्पनाप्रधान निबंध असे म्हणतात. एखाद्या गरजेच्या वस्तूचा अभाव असेल तर काय घडेल याची कल्पना आवश्यक असते . निसर्गातील ऋतू आले नाहीत तर होणारी दुरावस्था व हानी यांचा तपशील या निबंध प्रकारात असतो. जर - तर ची भाषा या निबंध प्रकारात असते . एखाद्या कल्पनेभोवती गुंफलेली मनोरंजक व लालित्यपूर्ण भाषा यामध्ये असते. उदाहरणार्थ निबंध - सूर्य मावळला नाही तर ..... , पाऊस पडला नाही तर .....

वैचारिक निबंध  :-

         ज्या निबंध प्रकारात विचार मांडलेले असतात अशा निबंध प्रकाराला वैचारिक निबंध असे म्हणतात. यामध्ये विचारप्रधान, चिंतन पर ,समस्याप्रधान किंवा वादविवादात्मक व चर्चात्मक स्वरूपाचे विषय  हाताळलेले  असतात. समस्येचे स्वरूप व उपाय यांची साधक बाधक  चर्चा या वैचारिक निबंधात केली जाते . गंभीर ,विचारगर्भ आणि विवेकी भाषा या निबंध प्रकारात मांडलेली असते.उदाहरणार्थ निबंध - मी माझ्या देशाचा नागरिक,  मद्यपान -एक सामाजिक कलंक

        कोणताही एक निबंध विद्यार्थ्यांनी निवडून वर सांगितल्याप्रमाणे सविस्तर, मुद्देसूद, आकर्षक भाषाशैली , सुवाच्च हस्ताक्षर आणि शुध्दलेखन या सर्व बाबी लक्षात घेऊन किमान २५०-३०० शब्दांत निबंध लिहिला तर खूप चांगले गुण मिळवता येतात. मराठी या विषयाचा गुणात्मक निकाल सुधारण्यास नक्कीच मदत होईल. शिवाय आपल्याला मराठी या भाषा विषयावर प्रभुत्व मिळविता येईल.

          विद्यार्थी मित्रहो, उदाहरणादाखल  वर एक तक्ता दिला आहे. त्याचे  अवलोकन करावे अशी माझी इच्छा आहे. हा तक्ता सध्या चालू असलेला सीबीएससी इयत्ता दहावी मराठी भाषा  विषयाचा आहे . त्यात घटक, प्रश्नप्रकार, दिलेले गुण आणि त्यासाठी उत्तरे लिहिण्यासाठी किमान किती वेळ दिला पाहिजे आणि उत्तर लेखनासाठी दिलेली शब्द मर्यादा  या संबंधी नियोजन करून दिले आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन उत्तरप्रत्रिका सोडवली तर तीन तासांचा पेपर दोन तास सत्तर मिनिटांत पूर्ण होऊ शकतो. शिवाय 10 मिनिटे आपल्या जवळ शिल्लक राहतात. या दहा मिनिटात आपल्याला उत्तरपत्रिका तपासून घ्याव्याची आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक उत्तराला व्यवस्थित दिले आहेत का, काही प्रश्न सोडवण्यचे राहून गेले तर नाही ना? हे देखील तपासून घ्यावे.सारांश  अशा पद्धतीने मराठी भाषेचा अभ्यास मनःपूर्वक केला आणि अभ्यासाची वेळापत्रक तयार करून खूप परिश्रम घेतले शिवाय प्रश्नपत्रिका सोडवण्याची तंत्र अवगत झाले तर मराठी विषयांमध्ये किंवा 95 गुण मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी मला वाटते. पुनश्च एकदा आपणास येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!

# प्रा दिगंबर कानडजे,

भ्रमणध्वनी - 8275231874

सागवन - बुलडाणा 




 



Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत