आदिवासींच्या दारी विकासाची गंगा .....

 आदिवासींच्या दारी विकासाची गंगा कधी अवतरेल ?.....

" आदिवासींबद्दल मद्दडपणा कोठून येतो? " दैनिक लोकसत्ता मधील 21 सप्टेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झालेला अग्रलेख काळजीपूर्वक वाचला.हा लेख अतिशय चिंता आणि चिंतन करावयाला लावणारा आहे. हा लेख देवेंद्र गावंडे यांनी लिहिलेला असून त्यांनी आदिवासी ही एक दुर्मिळ जमात असून अत्यंत दुर्लक्षित आहे हा विचार मांडला आहे. आज देशात सर्वत्र अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.पण ज्यांनी आपला देश इंग्रजांच्या ताब्यात असताना अनेक राजे आणि संस्थाने त्यांची गुलामगिरी स्विकारण्यात धन्यता मानत होती, त्याचवेळी हे आदिवासी बांधव प्राणपणाने इंग्रजांविरुद्ध लढत राहिले.हा इतिहास सर्वांना माहीत असताना देखील आज रोजी त्यांच्या दारी अजूनही विकासाची गंगा आलेली नाही, ही खंत लेखकांनी व्यक्त केली आहे. 

         इकडे देश स्वातंत्र्याचा ७५ वा वाढदिवस म्हणजे अमृतमहोत्सवी वर्ष आनंदाने साजरे करीत आहे तर तिकडे आदिवासी बांधव भूक, अत्याचार बेरोजगारी, अंधश्रद्धा , कुपोषण, जंगलातील हिंसाचार आणि वाहतूकीची दुरावस्था अशा अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.आरोग्य सेवेअभावी होणारे मृत्यू , महापूरांमुळे अनेक गावांचा तुटलेला संपर्क, नद्या नाल्यांना महापूर आले. मुलांना शाळेत जायला नदीवर पूल नाही. रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून रुग्णांना नदीच्या खोल पात्रातून झोळीत किंवा खांद्यावर घेऊन जावे लागते.या वर्षी भयंकर पाऊस झाला.त्यामुळे आदिवासी बांधवांना खूप यातना भोगाव्या लागत आहे.हे दुष्टचक्र यांच्या जीवनातून लवकर संपवावे असे मला वाटते. योगायोगाने आपल्या देशाच्या राष्ट्रपती देखील आदिवासी समाजातील आहे, तेव्हा त्यांनी देखील ह्या सर्व गोष्टी माननीय राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्या तर आदिवासी बांधवांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटते.

# प्रा डी एम कानडजे, मधुकोष निवास, शिवकृपा नगर, बुलडाणा.

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत