डॉ कलाम यांचा जन्म दिवस : एक वाचन प्रेरणा दिन
* डॉ.कलाम यांचा जन्म दिवस - एक वाचन प्रेरणा दिन *
भारताचे 11 वे राष्ट्रपती ' मिसाईल मॅन ' म्हणून प्रसिद्ध असणारे शास्त्रज्ञ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली तामिळनाडू राज्यात रामेश्वरम येथे झाला. त्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन फार मोठे नाव कमविले. त्यांची घरची परिस्थिती हलकीची असल्यामुळे त्यांनी माध्यमिक शिक्षण रामनाथपुरम येथे सरकारी शाळेत अक्षरशः गावात वर्तमानपत्रे विकून पूर्ण केले.जिद्द,चिकाटी,तल्लख बुद्धी आणि शिकण्याची विशेष आवड असल्यामुळे त्यांनी तिरुचिरापल्ली येथे विज्ञान शाखेची पदवी घेऊन शिक्षण पूर्ण केले . कुशाग्र बुद्धिमत्ता, चिकाटी, गणिताची आवड या सर्व क्षमतांमुळे त्यांनी शिक्षण थांबविले नाही, तर मद्रास येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये बी.एस्सी ( गणित ) ही पदवी उत्तीर्ण केली. तसेच तेथे त्यांनी एरोनॉटिक्स चा डिप्लोमा देखील प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण केला.
अमेरिकेत जाऊन " नासा " या संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून ते भारतात परतले.डॉ कलाम उच्च विद्याविभूषित असल्यामुळे त्यांना 'संरक्षण ,संशोधन व विकास संस्था' (DRDO) या संस्थेत 1958 ते 1963 पर्यंत काम करण्याची संधी मिळाली.चांगल्या कार्याची पावती म्हणून 1963 मध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्थेत म्हणजेच " इस्रो " या संस्थेत त्यांना काम करण्याचा मान मिळाला.तेथे त्यांनी "अग्नी" या क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी पूर्ण केल्यामुळे त्यांना " मिसाईल मॅन " म्हणून जगभर ओळखू लागले.भविष्यात त्यांना आपल्या कुशल कामगिरीमुळे पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांना नियुक्ती करण्यात आले. तेथे त्यांना अनेक महत्त्वाची धोरणे आखण्याची संधी मिळाली. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांना 2002 ते 2007 या कालावधीसाठी भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून निवडून देण्यात आले .
डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची गुणग्राहता, वैज्ञानिक दृष्टीकोन, संवेदनशील वृत्ती, कुशाग्र बुद्धिमत्ता,मिसाईल मॅन,एक महान शास्त्रज्ञ आणि साधा,सरळ,प्रांजळ,प्रेमळ हे सर्व गुण विचारात घेऊन भारत सरकारकडून त्यांना पद्मविभूषण,पद्मभूषण आणि भारतरत्न ह्या सर्वोच्च सन्मानांने गौरविण्यात आले आहे.आणि म्हणूनच ते आपल्या सर्वांसाठी भूषणावह ठरले आहे.
भारतीय घटनेतील 45 व्या कलमानुसार 14 वर्षापर्यंतच्या मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण पुरवण्याची जबाबदारी सरकारवर आहे. 1964 सालच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार औपचारिक शिक्षण,अनौपचारिक शिक्षण,शिक्षण व्यवसाय इत्यादि बाबींचे व्यवस्थापन करून सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देणे ही शासनाची विशेष जबाबदारी आहे,असे त्यात नमूद करण्यात आले आहे. या सर्व बाबींना अनुसरून बालवाडी, पाळणा घर,अंगणवाडी, बाल संगोपन केंद्र, पूर्व प्राथमिक शाळा, प्राथमिक व माध्यमिक शाळा सरकारने विविध भागात चालू केल्या आहेत. तसेच काही ठिकाणी आदिवासी वस्तीमध्ये इतर काम करणाऱ्या मुलांना शिक्षण घेता यावे,ते शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून तेथे रात्रशाळा देखील चालवल्या जात होत्या. सर्वांना सक्तीचे व मोफत शिक्षण हे उद्दिष्ट साध्य झाले नसले तरी टप्प्याटप्प्याने सर्वांपर्यंत शिक्षण सुविधा आज रोजी पोहोचत आल्या आहेत. परंतु अलीकडे गावोगावी, गल्लोगल्ली, शहरात इंग्रजी माध्यमांच्या शाळा उदयास आल्यामुळे मराठी शाळेतील मुलांचे गळतीचे प्रमाण वाढले आहे. पालकांची युद्धातल्या अर्जून सारखी द्विधा मनस्थिती झाली आहे. मुलाला इंग्रजी शाळेत पाठवू की,सेमी इंग्लिश पाठवू की मराठी माध्यमाच्या शाळेत पाठवू.याचा परिणाम असा झाला की २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. नव्हे शासन बंदच करु पाहतो आहे. हे विदारक भयावह सत्य आहे. यावर फुंकर म्हणून शासनाने समूह शाळा किंवा केंद्रीय शाळा येथे शिकण्यासाठी असे विद्यार्थी पाठवले जातील असे शासनाने नमुद केले आहे. मात्र हे विद्यार्थी तेथे जाणे पसंत करतीलच असे नाही . तेथे जाण्यासाठी स्कूलबसची सुविधा दिली असली तरी ती लहान बालके असल्यामुळे तेथे जाऊन शिक्षण घेतीलच याची शाश्वती काय ? कारण विद्यार्थी तेथे रमणार नाहीत.शिवाय पावसाळ्यात रस्ते चांगले नसल्याने मुलांना अशा समूह शाळेत जाणे अवघड होऊन जाईल.आज आदिवासी वस्तीमध्ये जाण्यासाठी नदीवर पूल नाहीत.तेथे स्कूल बस कशा पोहचणार ? एकंदरीत कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद पाडणे हाच सदरहू शासनाचा अप्रत्यक्ष डाव तर नाहीं ना,असे सामान्य जनतेला वाटू आहे .
पालक देखील तेथे आपल्या पाल्याचे नियोजन करून, शिक्षण घेण्यास अशा समूह शाळेत जाण्यासाठी भाग पाडतीलच असे वाटत नाही.
संपूर्ण गाव साक्षर व्हावं आणि मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शाळा हे एक महत्त्वाचे साधन आहे. गाव तिथे शाळा ही संकल्पना आता शासनाने मोडीत काढण्याचा चंग बांधलेला आहे. असे दिसते आहे.
परंतु त्यासोबतच गावातील इतरही व्यक्तींना वाचन करून आपलं जीवन समृद्ध करता यावं म्हणून 'गाव तेथे वाचनालय'असणे ही काळाची गरज आहे . जवळपास 90% गावांमध्ये आजरोजी वाचनालय कार्यरत असून गावांसाठी शासन ही वाचन चळवळ राबवित आहेत. "वाचाल तरच वाचाल" या म्हणीचा अर्थ आता ग्रामीण भागातील जनतेला समजावून सांगण्याची विशेष जबाबदारी वाचनालयावर येऊन पडली आहे.तेव्हा शासनमान्य वाचनालयाने म्हणजेच वाचनालयाच्या कर्मचारी वर्गाने
विशेष काळजी घेऊन आणि डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आठवण ठेवून घरोघरी आबालवृद्धांना वाचनाची गोडी लावावी . आणि वाचनालयात डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे जयंती निमित्त " वाचन प्रेरणा दिन " आनंदाने साजरा करावा असे मला वाटते. वाचनाने माणूस किती मोठा होतो हे डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना सर्वप्रथम कळले आणि म्हणूनच त्यांनी स्वतःचा जन्म दिवस हा " वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करावा असे शासनाला सांगितले.
# प्रा.डी.एम कानडजे,
जूना अजिसपूर ,सागवन बुलडाणा
(८२७५२३१८७४)