माझे मॅट्रिकचे शिक्षण
आजकालच्या मुलांना अभ्यास करण्यासाठी खूप सुविधा आहेत. नवनवीन अध्ययन साहित्य उपलब्ध आहे. खाजगी शिकवणी वर्ग सुद्धा चालू आहे.पाहिजे त्या विषयाचे दर्जेदार कोचिंग क्लासेस पाहिजे त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिवाय घरापासून तर शिकवणी वर्गापर्यंत आणि शाळेपर्यंत पालकांनी वाहन सुद्धा जाण्या येण्यासाठी विकत घेऊन दिले. एकंदरीत सर्व सुविधा दिल्या असताना देखील बहुतांश विद्यार्थी गुणवत्तेत कमी पडत आहे. अभ्यासाची चिंता जेवढी विद्यार्थ्यांना पाहिजेत.तेव्हढी त्यांना राहिली नाही. त्यापेक्षा जास्त चिंता पालकांनाच असते.
मुलं खूप काही हुशार व्हावी म्हणून त्यांना बाहेर गावी लातूर ,पुणे ,अकोला, नागपूर अशा विविध ठिकाणी प्रवेश घेऊन दिले जातात. शिवाय त्यांची खाण्या-पिण्याची आबाळ होऊ नये म्हणून सोबत आईला किंवा आजीला भाकरी खाऊ घालण्यासाठी पाठवले जाते. पत्नी मुलाच्या शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यामुळे घरी तिच्या पतीची खाण्यापिण्याची आबाळ होते. हे ती आणि इतर सर्वजण जाणून असतात. पण इलाज नव्हता. तो बिचारा घरी चिंता करीत बसायचा.. मला वाटते खरं तर ज्याचं त्याला शिक्षण घेऊ दिले पाहिजे, तरच त्याला शिक्षणाचे महत्त्व भविष्यात कळते.आपण किती कष्टाने शिक्षण घेऊन मोठे झालो, याची जाणीव होते.मला याप्रसंगी माझं मॅट्रिकचे शिक्षण आठवलं.बघा तुम्हाला काय वाटते ते!
माझे पाचवी ते सातवी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल म्हसला बुद्रुक येथे झाले. पुढे मोठे भाऊ डाॅ.एस.एम.कानडजे यांना श्री शिवाजी शिक्षण संस्थेत शिक्षकाची नोकरी मिळाली.सर्वाना खूप आनंद झाला.मीपण त्यांचे सोबत शिक्षणासाठी चांडोळ येथे गेलो.आठवीत नाव टाकले आणि अभ्यासाला लागलो.त्यावेळी आठवीपासूनच भुगोल- सायन्स, गणित- सायन्स आणि कला शाखा निवडण्याची पध्दत होती.मला काय करावे काही सुचत नव्हते. गणित - सायन्स हा खूप भारी विषय असतो असे मला अनेकांनी सांगितले होते.
शेवटी माझ्या हिमतीवर गणित-सायन्स हा विषय निवडून मी मोठी जोखीम घेतली. खोलीतील शिक्षकांचा स्वयंपाक करणे आणि इतर कामं करून मग शाळा, अभ्यास, पाठांतर आणि पाठ झालेले वारंवार लिहून पाहणे असा सपाटा सुरू ठेवला. तेथे मला एम. एच. शिंब्रे सर गणितासाठी आणि एल .डी .पाटील सर हे विज्ञान शिकण्यसाठी होते. खूप तळमळीने ते गणित आणि विज्ञान हे अवघड विषय सोपे करून शिकवायचे.चुकले तर शिक्षाही खूप करायचे.माझी आठवी आणि नववीची शाळा चांडोळ येथे पूर्ण झाली.मोठ्या भाऊंचा नंबर बी.एड.साठी औरंगाबाद येथे लागला होता.बीएड करावे की करू नये अशा व्दिधा परिस्थितीत ते सापडले होते . बीएड झाल्यामुळे नोकरी पक्की होणार होती . शिवाय दोन पैसे पगारात वाढ देखील होणार होती. हे सर्व जाणून असल्यामुळे भाऊला बीएड करणे आवश्यक होते.
परिस्थितीही फार मोठी बिकट होती. तो काळ 1972 चा होता. तेव्हा महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला होता.सर्व शेतकऱ्यांचे आणि मजुरांचे हाल खूप होत होते. परंतु अशाही परिस्थितीत बी.एड. करायचेच असे मोठ्या भावाने ठरवले आणि ते औरंगाबादला निघून गेले . आता काय करावे हा माझ्यासमोर प्रश्न पडला. हे मॅट्रिकचे शेवटचे वर्ष होते. चांडोळाला राहणे शक्य नव्हते . शिक्षणात खंड पडतो की काय अशी भीती निर्माण झाली होती.नाईलाजास्तव मी घरचा रस्ता धरला.घरी जमीन नसल्यामुळे होती.सर्व भावंडांची शिक्षण घेण्याची ओढ लक्षात घेता आई बाबांना काही सुचत नव्हते.
दुष्काळ पडल्या मुळे कामधामही मिळणे कठीण झाले होते.मी जेव्हा चांडोळा होतो तेव्हा येथील ए.डी. शिंदे नावाचे सर जिल्हा परिषद हायस्कूल म्हसला बुद्रुक येथे ते दहावीला गणित विषय शिकवत होते. तेव्हापासूनच त्यांची माझी ओळख झाली होती. पुढे मी जिल्हा परिषद हायस्कूल म्हसला येथे दहावीत नाव टाकले आणि कुलमखेड येथून म्हसला येथे शाळेसाठी जाणे येणे सुरू केले .त्या ठिकाणी ए.डी. शिंदे सरांशी माझी भेट झाली.खूप बरे वाटले. यांनी मला खूप हिम्मत दिली आणि जाहीर केले की ' दिगंबरा मी तुला दहावीत पहिल्या नंबर ने पास करून दाखविल ही काळ्या दगडावरची रेघ आहे.' हे ऐकून मला हायसे वाटले.
आता माझ्यावर विशेष जबाबदारी येऊन पडली होती. अभ्यास केल्याशिवाय पर्याय नव्हता. मला वह्या पुस्तके नव्हती.घरची परिस्थिती फार हलाखीची होती.त्याकाळी दहावीच वर्ष फार महत्त्वाचे समजले जायचे.आदरनीय ए.डी.शिंदे सरांचे स्वप्न मला साकार करणे भाग होते.माझ्या अन् त्यांच्या प्रतिष्ठेचा तो प्रश्न बनला होता. माझे आई वडिल फार कष्टाळू होते. आई फार स्वाभिमानी होती . फुकटचे कोणाचेही खायचे नाही.कुणालाही शरण जायचे नाही.लाचारी अजिबात पत्कारायची नाही. एकूणच आई जहाल स्वभावाची होती. मात्र वडील अभिमानी होते खरे,पण फार मवाळ स्वभावाचे होते.मी घरी शिंदे सरांची माझ्याबद्दलची अट सांगितली.दहावीत मला पहिला येऊन दाखविणे भाग होते, असे मी घरच्यांना सांगितले.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़