व्यक्तिमत्व विकासात श्रवणाचे महत्त्व

 

  - व्यक्तिमत्व विकासात श्रवणाचे महत्त्व -

           महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसांची मातृभाषा मराठी आहे . महाराष्ट्रातील सर्व व्यवहार राजभाषा मराठीत व्हावे असा जरी दंडक असला तरी प्रशासनाचे बरेच व्यवहार इंग्रजी भाषेतच होतात ,असे पहावयास मिळते . दिवसेंदिवस मराठी भाषा लोप पावते की काय अशी भीती वाटायला लागली आहे. जिकडे तिकडे इंग्रजी शाळा स्थापन होत आहे. मराठी माध्यमाच्या बालवाड्या, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा कमी होतांना दिसत आहे. यास एकमेव कारण म्हणजे आता आपला देश जगातील इतर देशांशी जोडला आहे.  एक जानेवारी 2005 पासून गॅट कराराची अंमलबजावणी सुरू झाली आहे.  आता इंग्रजीचाही अभ्यास करावा लागणार आहे.  तेव्हा दोन्ही भाषांना कमी न लेखता  आपल्याला मराठी भाषेचा विकास साधायचा आहे.

श्रवण एक पायाभूत कौशल्य:-

           महाराष्ट्रात 90% लोक मराठी भाषेत विचार विनिमय करतात तेव्हा पाशी कौशल्य विकसित करण्यात श्रवण वाचन लेखन आणि संभाषण ही स्वयं अध्ययन कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. श्रवण कौशल्य हे भाषिक कौशल्याचे प्रथम व पायाभूत कौशल्य आहे. जेव्हा दोन व्यक्ती जवळ येतात तेव्हा भाषिक संवाद होतो. शब्दाने मने जोडली जातात. पेटवली जातात. नव्हे दुभंगली देखील जातात.मात्र शब्द नसते तर माणसे जवळ आली नसती. विचारांचे, भावनांची ,कृतीचे, आदान प्रदान झाले नसते. तेव्हा संभाषण करण्यासाठी भाषा हे एक प्रभावी असे माध्यम आहे.

    श्रवणाची व्याख्या:-

             सभोवतालच्या परिसरात विविध ध्वनी निर्माण होतात. वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकायला येतात. तेव्हा काही कर्णबधिर व्यक्ती व्यतिरिक्त  सर्वचजण ऐकण्याचे काम करतात. सर्वत्र आवाजांचा गोंधळ होतो. आपण किती गोष्टी कान देऊन ऐकतो ? काही ठराविक बाबींकडे आपण लक्ष देऊन ऐकत असतो. जे काही ऐकतो ते तरी प्रामाणिकपणे ऐकतो का ? हा सुद्धा एक प्रश्न आहे. थोड्या वेळाने जर त्या श्रोत्यास विचारले की, " बाबा जे काही ऐकले ते मला पुन्हा सांग पाहू ? " तर तेही त्यास व्यवस्थित सांगता येत नाही याचे कारण काय असू शकते?  तर श्रवण व्यवस्थितरित्या झाले नाही. शिक्षणतज्ञांनी श्रवणाची केलेली व्याख्या अशी आहे की , ' मौखिक संभाषण समजून घेण्याची व त्याला अनुसरून परिणामकारक प्रतिसाद देण्याची कुवत ज्यामुळे निर्माण होते त्यास श्रवण असे म्हणतात.

     श्रवणाचे स्वरूप :-

            श्रवण ही एक नैसर्गिक क्रिया आहे.  त्यास अपवाद मात्र बहिरेपणाचा आहे.  निरक्षर - साक्षर अशा सर्व व्यक्ती श्रवण करण्याचे काम करीत असतात. श्रवण ही जरी नैसर्गिक क्रिया असली तरी श्रवणक्षमता  ही मात्र निसर्ग दत्त नाही. तिला मर्यादा असतात. उदाहरणार्थ- तीन वर्षाचे मूल पाहू शकते. ऐकू शकते. मात्र ते वाचू शकत नाही. पुढे मात्र त्याची शिक्षण सुरू झाले की त्याचे वाचन कौशल्य विकसित होऊ शकते. वेगवेगळ्या व्यक्तींच्या श्रवणक्षमता भिन्नभिन्न असतात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर ' व्यक्ती तितक्या प्रकृती ' असतात. प्रत्येकाची बौद्धिक क्षमता भिन्न असते. बऱ्याच लोकांच्या श्रवण क्षमता कमी अधिक प्रमाणात असतात. आणि त्यानुसार त्यांची श्रवण होत असते. श्रवण या प्रक्रियेत आपण किती अवधान ठेवतो यावर देखील श्रवणक्षमता अवलंबून असते. उदाहरणार्थ आपल्या घरी जर आपला मित्र दुपारी दोन वाजता वाहनावरून येणार असेल तर आपण वेगवेगळ्या वाहनांच्या आवाजांची चाचपणी करीत असतो. अनेक वाहनांचे आवाज घराजवळ ऐकू येतात. मात्र आपण ठराविक गाडीच्या आवाजाकडे कान टवकारून असतो. आपला कान इतर वाहनांच्या आवाजांना दुर्लक्षित करून आपल्या मित्राच्या गाडीच्या आवाजाची वाट पाहत असतो. ती गाडी दाराजवळ आल्याची कानाला लगेच जाणीव होते आणि ते खरे ठरते. तेव्हा अशावेळी अनुभवातून आपण श्रवणक्षमता चांगली बनवत असतो आणि तसे मानसचित्र आपल्या मनात तयार करीत असतो.

' ऐकणे ' आणि ' श्रवण '  दोन भिन्न क्रिया:-

             ' ऐकणे ' आणि ' श्रवण करणे ' या एकच क्रिया वाटत असल्या तरी सूक्ष्म विचार केला तर त्या भिन्न आहेत. ' ऐकणे ' ही एक सहज अशी भौतिक आहे.  मात्र ' श्रवण ' ही एक मानसिक प्रक्रिया असून ' ऐकणे ' या क्रियेपेक्षा अतिशय किचकट आणि गुंतागुंतीची आहे.  ' श्रवण ' या प्रक्रियेत श्रोत्यांकडून आलेल्या माहितीचे आकलन होणे अत्यंत गरजेचे आहे. आकलन जर चांगले झाले तर श्रवण देखील चांगले झाले असा अर्थ निघत निघतो. आणि त्यामुळे आपल्या ज्ञानात अधिक भर पडते . आपली बौद्धिक पातळी वाढते. बऱ्याच व्यक्ती एकच भाषण ऐकत असतात किंवा वर्गात शिक्षक शिकवीत असताना अनेक विद्यार्थी ऐकत असतात. मात्र काही वेळाने जर आपण त्यांना काही माहिती पुन्हा सांगा, असे म्हटले तर 20 टक्के विद्यार्थी देखील अचूक माहिती देऊ शकत नाही. याचे कारण काय असावे ?  हा जो परिणाम आहे तो ' ऐकणे ' आणि ' श्रवण करणे ' यासंबंधीचा आहे.  काहींनी केवळ ऐकण्याचे काम केले पण शब्द स्मृतीत साठविण्याचे काम केले नाही.  अवधान केंद्रित केले नाही. वक्ता साधारणपणे दर मिनिटाला शंभर ते दोनशे शब्द उच्चारतो आणि श्रोता मात्र 600 ते 1200 शब्दापर्यंत दर मिनिटाला श्रवण करीत असतो.  अर्थात ऐकणाऱ्यांची श्रवणक्षमता दर मिनिटाला बोलणाऱ्याच्या पाच ते सहा पट असते. तेव्हा अशावेळी श्रोत्यांचे मन रिकामे असते आणि ते चंचल असल्याने शांत न राहता इतरत्र विचलित होत असते.  तेव्हा अशावेळी विस्मृती होते आणि भाषणाचा अथवा अध्ययनाचा काही भाग आठवत नाही.  त्यामुळे ' श्रवण ' ही प्रक्रिया ' ऐकण्या ' पेक्षा भिन्न असून गुंतागुंतीची असल्याने शिक्षकाने वा वक्त्याने माहिती देत असताना काळजी घेतली पाहिजे.

श्रवण प्रक्रियेतील अडथळे :-

         रस्ता जर खडबडीत असेल, त्यावर मोठमोठी गतिरोधक असतील तर वाहनाचा वेग स्थिर राहत नाही. तशाच प्रकारे वक्ता आणि श्रोता यांच्या बाबतीत सांगता येईल . श्रवण प्रकिया होताना अनेक बाधा आणणारे घटक तेथे असतात . त्यामुळे श्रोता आणि वक्ता यांच्यामध्ये योग्य प्रकारे श्रवण होत नाही.

श्रवण प्रक्रियेत बाधा आणणारे घटक असे आहेत:-

१. वक्ता बोलत असताना आजूबाजूला गोंधळ असेल तर ध्वनीचे वहन योग्य प्रकारे श्रोत्यांपर्यंत होत नाही . श्रवण करणाऱ्याच्या मनापर्यंत वक्त्याची विचार पोहोचत नाही.

२. अथवा वक्ता जलद गतीने बोलत असेल तर श्रवण चांगले होत नाही.

३. शिक्षक अथवा वक्ता बोलत असताना तो तुला बोलत असेल आणि फार सावकाश बोलत असेल तर श्रवण क्रिया प्रभावीपणे होऊ शकत नाही.

४. श्रोत्याच्या आवडीचा विषय नसेल तर श्रवण क्रिया प्रभावीपणे होऊ शकत नाही.

५. श्रोता बऱ्याच वेळा शिक्षकाची अथवा वक्त्याचे मूल्यमापन करीत असतो. अशावेळी त्याचे अवधान विचलित होत असते. त्यामुळे समोरची व्यक्ती काय सांगते याकडे त्याची लक्ष राहत नाही.

६. काही वेळा श्रोता बोलणाऱ्याच्या विचारातील काही भाग समजून घेतो. इतर बाबींना श्रोता किंमत देत नाही.  त्यामुळे सलग श्रवण होत नाही.

७. शिक्षक अथवा श्रोता बोलत असताना ,अनेकजण त्याच्या भाषणाची टिपणं काढत असतात. अशावेळी आपण नोट्स काढण्यात घडवून गेलेलो असतो. त्यामुळे बराच भाग आपण विसरून जातो. असे केल्याने निष्फळ वेळ वाया जातो.

८. बऱ्याच वेळा फक्त ऐकत असताना आपण काही शिल्लक गोष्टी करीत असतो. उदाहरणार्थ हातात बारीक काडी घेऊन माती उकरीत  राहणे, लहान लहान खडे गोळा करत राहणे ,बसल्याबसल्या इतरांची खोडी करणे, मध्येच उठून जाणे, अधून मधून पक्षांचा लहान मोठा आवाज चालू असणे, वक्त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपसात कुजबूज करीत राहणे. अशा वर्तनामुळे श्रोत्याचे लक्ष विचलित होऊन श्रवण परिणामकारक होत नाही.

९. वक्ता देखील बऱ्याच वेळा भान ठेवून बोलत नाही.  विसंगत आणि विषयांतर करून वक्तव्य करीत असतो.  अशावेळी श्रोत्यांचे श्रवण परिणामकारकपणे होत नाही. 

१०. श्रोत्याच्या मनात विविध विचार असतील तर तो केवळ श्रवण करीत असल्याचा बहाणा करतो. चेहरा निर्विकार असतो . सारखा टक लावून पाहत असतो . अशावेळी श्रवण चांगले होऊ शकत नाही.

११. श्रोत्याला देखील वक्त्याचा विषय आवडणारा असावा लागतो किंवा वक्त्याने आपल्या विषयाची पार्श्वभूमी समजावून सांगणे आवश्यक असते.  त्याशिवाय श्रवण देखील परिणामकारक होत नाही. 

वरील प्रमाणे श्रवण प्रक्रियेतील अडथळे असून कमी अधिक प्रमाणात वेगळेही असू शकतात; परंतु सामान्यतः श्रवण प्रक्रियेला बाधा आणणारे हे प्रमुख घटक आहेत.

श्रवणप्रक्रिया सुधारण्यासाठी काही उपाययोजना:-

           आपला भाषिक आणि बौद्धिक विकास व्हावा, आपल्या विचारांचे, भावनांचे आदान प्रदान व्हावे आणि श्रोता व वक्ता यांच्यामध्ये योग्य प्रकारे संवाद साधला जावा, यासाठी श्रवण प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आहे.  श्रवण प्रक्रियेतील अडथळे दूर सारून श्रवण प्रक्रिया अधिक निर्दोष करणे गरजेचे आहे.  निरक्षर आणि साक्षरांसाठी श्रवण कौशल्य विकसित करणे देखील अपरिहार्य आहे. 

त्यासाठी खालील प्रमाणे काही उपाय सुचवता येतील.

१.  वक्त्याने आपले भाषण सावकाश आणि स्पष्टपणे केली पाहिजे. त्यामुळे श्रोत्याचे श्रवण चांगले होईल .

२.  आपल्या विषयाचा परिचय श्रोत्यांना शक्यतो सर्वप्रथम करून द्यावा आणि विषयांतर करून बोलू नये . श्रोत्यांना श्रवण प्रक्रियेत सतत खिळवून ठेवता आले पाहिजेत. 

३.  वक्त्याच्या भाषणाची  ' टिपणं ' काढण्यात श्रोत्यांनी वेळ घालवू नये . थोडक्यात मुद्दे काढून वक्त्याच्या पुढील भाषणाकडे लक्ष केंद्रित करावे.

 ४.  शिक्षक अथवा वक्ता बोलत असताना मनाची एकाग्रता ठेवावी. मन शांत ठेवावे. इतर काही क्षुल्लक  बाबतींत मन गुंतवू नये. खोड्या करणे वगैरे इत्यादी बारीक सारीक गोष्टी करण्याचे टाळावे.

 ५.  आजूबाजूच्या रहदारीमुळे अनेक आवाज कानावर येऊन आदळतात, या सर्व आवाजांकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या वक्त्याचा आवाज  विचारात घेतला पाहिजे.  त्याकडे लक्ष केंद्रित करून काळजीपूर्वक श्रवण केले पाहिजे.

 ६.  श्रवण करताना वक्त्याच्या गणवेशाचा रंग रूपाचा, त्याच्या अभिनयाचा आणि एकूणच त्याच्या व्यक्तित्वाचा विचार   करीत बसू नये. त्याचे मूल्यमापन करण्यात लक्ष न देता तो काय बोलतो याकडे प्रामाणिकपणे लक्ष द्यावे.  असे केल्यास श्रवण प्रक्रिया परिणामकारक होईल.  सर्व भाषण स्मरणात राहील. 

 ७.  आवडत्या विषयात देखील रस घेणे गरजेचे असते . अशा वक्त्याची नावडत्या विषयावरील भाषणे ऐकणे आवश्यक आहे.  त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते . त्यामुळे आपला व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते.

८.  वक्ता अथवा शिक्षक भरभर बोलत असेल तर आपले लक्ष केंद्रित करून आपला श्रवणाचा वेग वाढवावा.  इतर कुठलेही विचार मनात येऊ देऊ नयेत.  असे केल्याने आपल्या ज्ञानात भर पडून आपली वैचारिक पातळी वाढते. 

 ९.  श्रोत्याने भावनेच्या आहारी जाऊन श्रवण करू नये. वक्त्यानी प्रसंगी अपमान केला असेल , वक्ता खोचून बोलला असेल ,अशावेळी डोकं शांत ठेवून, शांतपणे ऐकून घ्यावे व त्याचेशी वाद न घालता त्याचे विचार अवधानपूर्वक श्रवण करावे. सारासार विचार करून चांगले तेवढे संग्रही करावे आणि आपल्या ज्ञानात भर टाकावी.

        व्यक्तिमत्व विकासात श्रवणाची महत्त्व अनन्यसाधारण आहे . श्रवण हे भाषा विकासासाठी आवश्यक आहे . निरक्षरांपासून साक्षरांपर्यंत आणि बालकांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी आणि एकमेकांची मने सांधण्यासाठी जाणीवपूर्वक इतर व्यक्तीचे ऐकून घेतले पाहिजे. काळजीपूर्वक श्रवण केले पाहिजे . जर काळजीपूर्वक श्रवण केले नाही तर व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास खुंटू शकतो.मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास करण्यासाठी मराठी भाषा ही केजी वर्गापासून पासून तर पीजी वर्गापर्यंत पर्यंत अनिवार्य करणे गरजेचे आहे.  शिवाय राज्यशासनाचे आणि न्यायालयांचे सर्व भाषिक व्यवहार मराठीतून झाले पाहिजे, त्याशिवाय मराठी भाषेचा उध्दार होणे शक्य नाही असे मला वाटते.

# प्रा दिगंबर  कानडजे,

मधुकोष निवास, सागवन-बुलडाणा 



Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत