सकाळी फिरायला जाण्याचे महत्त्व

 - सकाळी फिरण्याचे महत्त्व -

          सकाळी लवकर उठून ५ ते ७ या वेळेत मोकळ्या हवेत, खुल्या परिसरात फिरणारी टीम नेहमी आनंदी दिसते. सकाळी चार पासून मोकळ्या हवेत फिरणे फारच महत्त्वाचे असते. शिवाय सकाळी हवेत ओझोनवायूचा स्तर खूप चांगला असतो. या मोकळ्या वातावरणातून आपण दिवसभरासाठी एक प्रकारे चांगले प्राणवायू चे सिलिंडर भरून नेऊ शकतो. सकाळ संध्याकाळ फिरणारी ही टीम कधी फिरण्याची वेळ होते , याची आतुरतेने वाट पाहत असते. ही सर्व मंडळी हास्य क्लब मध्ये न जाता प्रासंगिक, शाब्दिक आणि आशयनिष्ठ विनोद निर्मिती करून मनमुराद हास्यांचे फवारे हवेत तयार करतात.ओढून ताडून , शब्दाला शब्द जोडून कधी विनोद तयार होत नाही.ते उपजतच असतात . त्या विनोदात ते न्हाऊन निघतात. त्यामुळे सर्वांना अस्सल , निखळ आनंद मिळतो. ते विनोद इतके जबरदस्त असतात की हसून हसून डोळ्यात पाणी येते. मन हलकं हलकं झाल्यासारखं वाटतं. दिवसभरातील नैराश्य सहजगत्या निघून जाते. मन, बुध्दी नितळ होते. या हास्यात कृतिमता नसून ते नैसर्गिक हास्य असते. प्रत्येकाला मनापासून काही ना काही तरी नवीन सांगावसे वाटते.सकाळ संध्याकाळ कधी होते अन् मी घराबाहेर पडून फिरणाऱ्या मित्रांना कधी भेटतो असे होऊन जाते.' कधी माझ्या मनातील विचार मी इतरांना सांगतो असे होऊन जाते. मन मोकळं करण्यासाठी जणू काही एक चांगली संधी चालून येते. " अंतरीचे धावे स्वाभावे बाहेरी " अशी जवळपास सर्वांची गत होते. अशा वेळी काहींना आवर देखील घालावा लागतो. प्रत्येकांची स्वभाव वैशिष्ट्ये जरी वेगळी असली तरी सर्वजण एकमेकांना समजावून घेण्यात पटाईत असतात. अशावेळी दैनंदिन जीवनात क्षुल्लक कारणावरून आलेले ताणतणाव या हास्यात विरघळून जातात. सर्वांची मने हलकी हलकी होऊन जातात . सुखदुःख, बरेवाईट अनुभव एकमेकांना सांगितल्यामुळे मन तरळ आणि मोकळं झाल्यासारखं वाटतं. एकमेकांच्या समस्या सोडविण्यासाठी एक खुले व्यासपीठ सर्वांसाठी उपलब्ध होते . साहजिकच एकमेकांना आपसूक मदत होते. संपूर्ण दिवस आनंदात आणि निरोगी वातावरणात कसा निघून जातो हे सुद्धा कळत नाही . चांगल्या मित्रांचा सहवास आपल्या दैनंदिन जीवनात यशस्वी होण्यासाठी खूपच महत्वाचा असतो आणि म्हणून सकाळी उठण्याचा आळश करू नये असे मला वाटते. एकदा का सकाळी लवकर उठून फिरायला बाहेर पडण्याची सवय लागली की ती शक्यतोवर बंद पडत नाही.सकाळी आपोआप वेळेवर जाग येते.सकाळच्या नैसर्गिक क्रिया पार पडल्या की मन आणि शरीर हलके होऊन जाते. आता हे सर्व एवढं अंगवळणी पडते की हे सर्व केल्याशिवाय राहवत नाही.आता त्याचा परिणाम असा होतो की कायम स्वरूपी सकाळी उठून फिरायला गेल्याशिवाय करमत नाही.

            फिरतांना उठता बसता भूतकाळात जरूर डोकावून पहा. आपण खूप हलाखीचे जीवन जगलो आहोत. अनेक जीवघेणे संघर्ष आपल्या वाट्याला आले आहेत . ते निमूटपणे आपण काहीही कुरकुर न करता भोगले आहे. आता मात्र आपण त्यावर मात केली असून थोडाफार का होईना पण सुखाचा घास घातो आहोत . त्यातून आपण सहिसलामत सुटून आज चांगल्या स्थितीत जीवन जगतो आहोत. आता यात समाधान माना. भुतकाळात जे वाईट भोग आपल्या वाट्याला आले होते , ते विसरून जा. त्याचा सूडबुद्धीने विचार करणे थांबविले पाहिजे. आता आपण त्याचा वचपा काढण्यासाठी आपली शक्ती वाया घालवणार आहात काय ? मला त्याचा सुड घेतल्याशिवाय करमणार नाही, अशी भाषा बोलणे थांबविले पाहिजे.मला असे वाटते की हा विचार आता आपण सोडण्याची गरज आहे.आज असे जर आपण करत बसलो तर सध्या जे सुख, वैभव , आनंद आपल्या वाट्याला आला आहे,ते कधी उपभोगणार आहे.त्याचे महत्त्व कधी कळणार. त्याचा आनंद कधी घेणार ? नरदेह एकदाच मिळतो. पुन्हा हे जीवन मिळणे नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. त्याबाबतीत आपण आतल्या आत कुढत, जळत राहणार का ? भूतकाळात आपला समृद्ध सुखी जीवनाचा ग्लास संपूर्ण रिकामा होता. आता कोठे थोडेफार बरे दिवस आपल्या वाट्याला आले आहेत. आपण ढोरमेहनत करून तो संपूर्ण रिकामा ग्लास जेमतेम अर्धा भरून काढला आहे. त्याबद्दल आपण सुख, आनंद आणि आभार मानले पाहिजे. . त्याबद्दल आपण धन्यता मानली पाहिजे. कृतार्थता व्यक्त केली पाहिजे.आपल्या कष्टाचे चीज झाले. आपले जीवन धन्य झाले.असे समजावून घ्यायला आता काय हरकत आहे? पण नाही. आपले मन तयार होत नाही. अशाने जीवनात सुखाचा शोध कसा घेता येईल ?अन्यथा वड पिकला अन् कावळ्याचे डोळे आले अशी आपली सर्वांची गत झाल्याशिवाय राहत नाही.

      तुम्ही चांगल्या आयुष्याचा अर्धा ग्लास भरलेला असताना नेहमी कुरकुर करत बसता, हे योग्य आहे का? रिकाम्या अर्धा ग्लास बद्दल नेहमी कुढत बसणार आहात का ?

        म्हणून मित्रहो,संत तुकाराम महाराज सांगून गेले की,

     ‌ " ठेविले अनंते तैसेचि रहावे,

      चित्ती असू द्यावे समाधान! 

  या अभंगाचा भावार्थ समजून घेऊन तसे वर्तन करणे गरजेचे आहे. प्राप्त परिस्थितीत जे मिळत आहे,मिळाले आहे नव्हे मिळणार आहे,त्यांचा आदर करा. स्वीकार करावा आणि कुढत न बसता त्यात समाधान मानून आनंदाने जीवन जगावे. याचा अर्थ असा नव्हे की पुढे काहीच करू नये. जे आहे त्यात समाधान मानून न थांबता अव्याहतपणे प्रामाणिकपणे कष्ट करीत रहावे आणि शाश्वत विकास घडवून आणला पाहिजे.शाश्वत विकास म्हणजे जे आहे ते टिकवून ठेवून ,जे आहे त्यात वाढ करणे होय.

       तर, मित्रहो आता तुम्हीच मला सांगा जीवन कसे जगायचे?

कण्हत कण्हत, कुरकुरत, कुथत कुथत की समाधानी ? हे ज्याने त्याने ठरविण्याची वेळ आली आहे.


# प्रा डी एम कानडजे, 

सागवन बुलडाणा .(८२७५२३१८७४)

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत