आयुष्य आणि मानसिक स्वास्थ्य
शिक्षण,आयुष्य आणि मानसिक स्वास्थ्य
दैनिक लोकसत्ता अंकातील २० जानेवारीच्या चतुरंग पुरवणी मधील डॉ हरीश शेट्टी यांचा " बुध्दिमत्ता - मनाचा तोल " हा विचारपूर्वक लिहिलेला मानसशास्त्रीय लेख वाचण्यात आला. हा लेख आवडला असून चिंतन करायला लावणारा आहे हे खास. मानसशास्त्र म्हणजे ढोबळमानाने मनाचा अभ्यास करणारे शास्त्र असे म्हटले तर वावगे ठरू नये असे मला वाटते. माणूस खूप शिकला ,त्याने अनेक विषयांवर प्रभुत्व मिळवले याचा अर्थ त्याचे शारिरिक आणि मानसिक आरोग्य चांगलेच असते अशी समजूत करून घेणे हे योग्यच आहे, असे ठरवून टाकणे चुकीचे आहे आहे असे मला वाटते.
समजा एखादी व्यक्ती उच्च शिक्षित आहे, युपीएससी अथवा एमपीएससी मधून आपल्या आयुष्यात प्रचंड यशस्वी झाली आहे, म्हणजे जीवनभर तिचे आयुष्य निरोगी आणि मानसिकदृष्ट्या चांगलं राहीलच याची शाश्वती देता येत नाही. शिक्षण घेत असताना दुर्दैवाने असे म्हणावे लागेल की आपल्या विद्यार्थ्यांना भावनिकदृष्ट्या जागरूक राहणं शिकविले जात नाही. विद्यार्थ्यांचा त्यांच्या बुद्ध्यांकानुसार भावनिक विकास होत नाही , त्यामुळे बरेच विद्यार्थी अपयशामुळे खचून जातात.त्यांच्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेमस निर्माण होतात . त्याची अवस्था रणभूमीतल्या एखाद्या अर्जूनासारखी होऊन जाते.अशावेळी तो प्रसंगी आत्महत्या देखील करतो हे विदारक सत्य आहे. ते नाकारता येत नाही. कारण आजकाल या स्पर्धेच्या युगात युवकांपुढील आव्हाने खूप आहे.
म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे की जर भावनिक विकास झाला नसेल तर उत्तम शिक्षण आणि पैसा या गोष्टी केवळ वर वरच्या ठरतात. व्यक्तीच्या मानसिक आरोग्याची हमी शिक्षण व त्याचं भौतिक यश देऊ शकणार नाही. तर तो आहे त्या परिस्थितीमध्ये कसे समायोजन करतो आणि कुठलेही ताण तणाव न घेता कसे समाधानी जीवन जगतो यावर त्याची मानसिक स्थिती आणि मानसिक आरोग्य अवलंबून असते असे मला वाटते.
शिक्षण आणि आपलं आरोग्य या बाबतीतला पहिला गैरसमज जो समजून घेणे आवश्यक आहे , तो म्हणजे एखादी व्यक्ती शैक्षणिक आणि पुढच्याही आयुष्यात प्रचंड यशस्वी आहे म्हणजे जीवनभर तिचं मानसिक आरोग्यही चांगलं राहील, ते शक्य नाही. ह्या दोन गोष्टी अत्यंत भिन्न आहे. तसेच शिक्षण आणि आपलं आरोग्य याबाबतीतला दुसरा गैरसमज असा आहे की नैराश्य म्हणजे प्रत्येक वेळी रडू येणं, दुःखी कष्टी वाटणं, एकटं एकटं राहणं, किंवा एकांतात राहणं एवढीच लक्षणे असतात, असे वाटते.परंतु तसंही नाही. नैराश्यग्रस्तांमध्ये अस्वस्थं होणं किंवा हिंसक वागणं दिसणं, आणि अशा वागण्यामुळे स्वतःबद्दल शरम वाटत असते आणि अशा वेळी कधी कधी अफलातून फार भयंकर घडत असते, अशा घटना अनेक ठिकाणी पहायला मिळतात. तसेच शिक्षण आणि आपलं आरोग्य याबाबतीतला तिसरा गैरसमज असा आहे की एखादी व्यक्ती सुस्थितीत आहे, शिवाय खूप श्रीमंत आहे म्हणजे तिचं मानसिक आरोग्य चांगले आहे. याबाबत देखील खरं म्हणता येईल असे मला वाटत नाही. कारण महाराष्ट्र राज्य हे एक संतांचे आणि सधनांचे जरी मानले जात असले तरी महाराष्ट्रात आत्महत्या करण्याचे प्रमाण खूप जास्त आहे असे असे एका पाहणीत सिद्ध झाले आहे.
वेचूनी धन उत्तम व्यवहारे |
उदास विचारे वेच करी |
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार जीवन जगले,
आणि " मन करा रे प्रसन्न | हेचि सिद्धीचे कारण| " या उक्तीप्रमाणे जीवन प्रवास केला तर मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील आणि निरोगी जीवन जगणे अगदी सुसह्य होईल असे मला वाटते.सतत कष्ट करून समाधानी आणि आनंदी जीवन जगणं हे मानवाच्या हाती आहे.जे अलभ्य आणि अप्राप्य आहे त्याच्या मागे धावणे उचित ठरत नाही असे मला वाटते.
# प्रा दिगंबर कानडजे , सागवन-बुलडाणा