छत्रपती शिवराय - एक रयतेचा राजा
छत्रपती शिवराय - एक रयतेचा राजा
-----------------------------------------
यदा यदा हि धर्मस्य, ग्लानिर्भवति भारत |
अभ्युत्थानम धर्मस्य , तदात्मानं सृजाम्यहम ||
परित्राणाय साधुनां, विनाशायच दुष्कृत्यम|
धर्मसंस्थापनार्थय संभवामी युगे युगे ||
भगवद्गीतेतील या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुना सांगतात की जेव्हा जेव्हा , जिथे जिथे धर्माचरणाचा नाश होतो आणि आणि अधर्माचे वर्चस्व होते तेव्हा तेव्हा मी अवतीर्ण होतो. भक्तांचा उद्धार करण्याकरिता , दुष्टांचा विनाश करण्याकरिता आणि धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी युगात युगात प्रकट होतो . याच अर्थाने असे म्हणावे लागेल की खऱ्या अर्थाने अफजलखान ,शाहिस्तेखान ,औरंगजेब, सिद्दी , आदिलशहा व निजामशहा या सर्व सरंजामशाही मोगल मुस्लिम राजांना रयत कंटाळली होती. अगदी तावून सुलाखून निघाली होती. मोगल राजाच्या सैन्यांकडून शेतीची नासधूस होत होती. हिंदू गरीब कष्टकरी शेतकऱ्यांची लेकबाळ सुरक्षित नव्हती. सरमजामांच्या मोगलाई काळात गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. दिवसा ढवळ्या लेकींची अब्रू लुटल्या जायची. आपल्या अब्रूची झालेली माती पाहून लेकीबाळी जीव द्यायच्या.अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली होती.अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले हे आपले भाग्यच समजावे.
शिवबाच्या आई जिजाऊ, हया सिंदखेड राजा येथील असून त्यांचे वडील निजामशाहीतील एक शूर व स्वतंत्र बाण्याचे सरदार लखुजीराजे जाधव हे होते. लखोजी राजे यांचे बंधू जगदेवराव यांना मूलबाळ नसल्यामुळे यांनी राजमाता जिजाऊचे खूप लाड केले.यांनी राजमाता जिजाऊला मैदानी शिक्षण दिले आणि युद्धानीती देखील समजावून सांगितली. घोडदौड करणे, युद्धकला जाणून घेणे, राजनीति समजून घेणे, न्यायदान करण्याची पद्धती जाणून घेणे , तलवार चालविणे , अचूक भालाफेक करणे इत्यादि लढाई संबंधित सर्व कला जिजाऊने अवघ्या नवव्या वर्षी अवगत केल्या होत्या. एवढ्या त्या शूरवीर आणि धाडसी होत्या. अशा या निष्णात, युद्धकलेत पारंगत असलेल्या राजमाता जिजाऊ यांचा विवाह 1610 मध्ये सिंदखेडराजा येथील शहाजीराजे भोसले या विद्वान सरदाराशी झाला.
अशा त्या काळात कुणीतरी रयतेचा ,गोरगरिबांचा वाली असावा, म्हणून की काय 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांचे पोटी एक वीररत्न जन्माला आले आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे होत. शिवबाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.अधर्माचा नाश करण्यासाठीच यांचा जन्म झाला असे म्हटले तर वावगे ठरू नये असे मला वाटते. सर्वत्र आनंदी आनंद झाला . गावोगाव हत्तीवरून साखर वाटण्यात आली. अनेक सरदार ,प्रजा यांना भेटवस्तू अथवा इनाम देण्यात आले. गोरगरिबांना अन्नधान्य , कपडालत्ता , मिठाई , शेतजमिनी बक्षीस म्हणून वाटण्यात आल्या. ब्राह्मण , भिक्षुक, ज्योतिषी, पुरोहित, भट, भाट, शाहीर आणि बारा बलुतेदार यांना उपयुक्त अशा वस्तू वाटण्यात येऊन छत्रपती शिवबांचा हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा उत्सव अद्वितीय होता.
शिवबांचे वडील शहाजीराजे भोसले यांचाही फार मोठा दरारा होता. शहाजी राजे यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ या गावी 18 मार्च 1594 रोजी झाला. त्यांचे भोसले घराणे हे एक जगप्रसिद्ध घराणे होते अहमदनगर जिल्ह्यामध्ये बुऱ्हानपूर जवळ एक एक बऱ्यापैकी दर्गा होता तेथे शहा आणि शरीफ हे दोन संत राहायचे हे दोघे सख्खे होते. मालोजीराजांनी या दोन संतांच्या नावावरून स्वतःच्या मुलांना शहाजी आणि शरीफजी अशी दोन नावे हौसेने ठेवली. निजामशहाच्या दरबारात पुढे मालोजीराजे सोबत शहाजीराजे आणि शरीफराजे यांचा फार मोठा दरारा निर्माण होऊन एक प्रकारे यांना वचक निर्माण झाला होता.
मालोजीराव भोसले लखोजी राजे जाधव या दोघांचा संवाद नेहमी अत्याचार आणि गुलामगिरीवर व्हायचा . आदिलशाही कुतुबशाही आणि मोगलशाही यांनी अत्याचाराचा कळस गाठला होता . आता ही गुलामगिरी सहन करणे शक्य नाही. असे नेहमी मालोजीराव आणि लखोजीराव म्हणायचे . यांचा हा विचार राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी ऐकला होता आणि यांच्या मनात स्वराज्य निर्मिती विषयी जागृती झाली. हाच विचार पुढे शिवबाने घेऊन स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले आणि त्या अनुषंगाने स्वराज्य निर्मितीसाठी सगळे सोयरे आणि मावळे पंचक्रोशीतून कसे मिळवता येईल हा विचार करू लागले . गुलामगिरी झुगारून राष्ट्राला आणि रयतेला स्वातंत्र्याचे पाणी पाजायचेच हा विचार यांच्या मेंदूत भरला. आणि त्यातून या वातावरणामुळे जिजाऊ च्या आणि शिवबाच्या मनात स्वराज्य स्थापन करण्याचे पुल्लिंग निर्माण होऊन पेटते राहिले.
राजमाता जिजाऊ यांनी बाल शिवाजीला अगदी लहान वयातच भारताचा धार्मिक, ऐतिहासिक, भौगोलिक ,आणि सांस्कृतिक इतिहास समजावून सांगितला. पूर्वजांनी इतिहासात केलेल्या चुका समजून सांगितल्या. त्या भविष्यात होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले. भारतातील खरा संघर्ष हा राजकीय नसून सांस्कृतिक आहे याची जाणीव करून दिली. राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना घडवितांना थोडीही उणी ठेवली नाही अरबी फारसी संस्कृत अशा भाषेतून पत्रव्यवहार करण्याची शिकवले शिवाजी महाराजांनी फारशीतून देखील उत्तम काव्य केलेले आहे आजची मराठी मातृभाषा जिवंत ठेवण्याचे कार्य छत्रपती शिवरायांनी केलेले आहे. औरंगजेबाने हिंदूंवर जिझिया कर लावला तेव्हा त्याला प्रतिउत्तर म्हणून औरंगजेबास एक खास पत्र लिहिले. तो एक खऱ्या अर्थाने राजनीतीचा एक सर्वोच्च कळस म्हणावा लागेल. यामुळेच औरंगजेबाने शिवाजी महाराजांना ' राजा ' ही पदवी देऊन ' मुसलमान धर्मरक्षक ' ही उपाधी लावून पत्र लिहिले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले त्यामागे त्यांचे वडील शहाजीराजे आणि आई राजमाता जिजाऊ यांची प्रेरणा होती. त्या दोघांनाही त्यांच्या घराणेशाहीकडून स्वराज्य स्थापनेचे बाळकडू मिळाले होते. दोघांचे घराण्यात दोन पिढ्यांपासून त्या दिशेने वाटचाल सुरू होती. शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता. तर सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावे, यासाठी स्वराज्य पाहिजे होते. गुलामगिरीतून सुटका हवी होती. अन्याय अत्याचार आणि आणि स्त्री जातीवरील अत्याचार थांबले पाहिजेत ,शिवाय स्त्रीला मानसन्मानाने जगता यावे यासाठी स्वराज्य हवे होते आणि त्यांनी अठरापगड जातींचे मावळे एकत्र आणून ते स्वराज्य महतकष्टाने मिळविले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रयतप्रेम होते. शेतातल्या साध्या गवताच्या काडीला देखील धक्का लागणार नाही याची ते सैन्याकरवी काळजी घेत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही जातीभेद मानला नाही. ते सर्व जाती-धर्मातील मावळ्यांना समान वागणूक देत असत. रामोशी, कोळी, मांग,महार, माळी, कुंभार ,न्हावी ,मराठी, कुणबी, लोहार, धनगर, मुसलमान अशा विविध जाती धर्मातील लढवय्ये शिवाजी महाराजांच्या सोबत होते. ते शिवाजी महाराजांना प्राणापलीकडे जपत असत.
शिवाजी महाराजांवर जिवापाड प्रेम करणारी रयत (प्रजा) -
जेव्हा सिद्दी जौहर आणि अफजलखान यांनी पन्हाळ्याला वेडा दिला तेव्हा त्यातून शिवाजींची सुटका व्हावी म्हणून एका गरीब शेतकरी कुटुंबातील शिवा न्हावी खोटा शिवाजी बनला आणि यातून शिवाजी महाराजांची सुटका केली.यावेळी एका रयतेला आपला राजा महत्त्वाचा वाटला. पन्हाळगडावरून विशालगड गाठण्यासाठी गाठण्यासाठी शिवाजी महाराजांना वेळ लागेल म्हणून घोटखिंडीत स्वतः बाजीप्रभू देशपांडे आपल्या मूठभर मावळ्यासह उभे ठाकले, हेही केवळ राजाच्या प्रेमापोटी.
छत्रपती शिवाजी महाराज जे करतात ते आपलेच कार्य आहे असं समजून शिवाजी महाराज जगले पाहिजे अशी भावना प्रत्येक रयतेच्या मनात होती. शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुखरूप सुटका व्हावी म्हणून मुस्लिम समाजाचा मदारी मेहतर आणि सोबत हिरोजी फर्जंद या दोघांनी जीवाची पर्वा न करता छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली. मोगल आणि आदिलशहा यांच्या सरहद्दीवर वारंवार स्वाऱ्या व्हायच्या. त्यामुळे गावं ओस पडायची. शेतीची नासाडी होऊन तिची अवस्था बिकट व्हायची. अशावेळी शिवाजी महाराजांनी गावे वसवली. आणि शेतकऱ्यांना जमीन कसायला बी बियाणे दिलीत. शेती करायला प्रोत्साहन देखील दिले. दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतीवरील महसूल माफ केला. राझ्यांच्या पाटलाची गोष्ट सर्वांना माहित आहे . त्याने एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीवर बलात्कार केला होता आणि तिला मारून टाकले होते ही बातमी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांना कळली तेव्हा त्यांनी रांझ्या पाटलांना बोलावून मरेपर्यंत अंधार कोठडीत डांबून ठेवले . शिवाय त्याचे दोन्हीही कोपऱ्यापासून हात छाटून त्याचे दोन्ही डोळे फोडावेत असा आदेश दिला नाही तर ती अमलात सुद्धा आणली. यावरून शिवाजी महाराज किती रयतप्रेमी होते हे देखील सिद्ध होते.
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांना मानाचा मुजरा!
# प्रा दिगंबर कानडजे,
मधुकोष निवास, सागवन-बुलडाणा .