एका माजी सैनिकाची मुलाखत

                - एका माजी सैनिकाची मुलाखत -  

               ‌ ‌--------------------------------------

         सैनिक हा भाकरीसाठी जरी लढत असला तरी देशसेवा ही आपसूकच त्याच्या नसानसात, मनामनात भिणलेली असते. अगदी घरादारावर तुळशीपत्र ठेवून आणि जीवावर उदार होऊन  डोळ्यात तेल घालून तो लढत असतो. ऊन,वारा, पाऊस,थंडी आणि आकस्मिक नैसर्गिक आपत्तीची कोणतीही तमा न बाळगता तो अहर्निश देशासाठी लढत असतो. 

               "सोडिले घरदार ; त्यागिला सुखी संसार|

                जे देशासाठी लढले ; ते अमर हुतात्मे झाले|" 

अशा महान त्यागासाठी सैनिक देशासाठी लढत असतात.खरोखर या सैनिकांचे कार्य महान आहे, त्याला तोड नाही.आपण संपूर्ण समाजांनी त्यांच्या प्रती आदरभाव राखला पाहिजे.  त्यांच्या या कार्याला मी भारावून जाऊन एका सच्चा माजी सैनिकाची मुलाखत सादर करीत आहे.त्याच्या भावभावना मी समजावून घेण्याचा मी प्रयत्न केला आहे.साहजिकच इतर सैनिकांना देखील मुलाखत प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते.

प्रश्न :-  एक माजी सैनिक म्हणून आपलं स्वागत आहे. कृपया आपलं नाव आणि मूळ गाव कोणते?

- सर, माझे नाव राजू वाघला चव्हाण. माझं गाव नाईकनगर, तालुका मोताळा,जिल्हा बुलढाणा हे आहे.  हे एक छोटसं गाव असून या गावाशी माझी नाळ जोडलेली आहे. सध्या मी बुलडाणा येथे तुळशीनगर मध्ये राहतो.

प्रश्न :- ठीक आहे. तर मला सांगा,आपला जन्म दिवस कोणता?

- सर,माझा जन्म दिवस १ मार्च १९६८. आम्ही सहा भाऊ आणि दोन बहिणी असा आमचा कुटुंब विस्तार आहे. भावांमध्ये मी सर्वात लहान भाऊ. मी केवळ १५ दिवसांचा असताना माझे वडील अपघाती वारले, असे आईने मला सांगितले होते. सर, त्यावेळी आमचे गावातील घर धाब्याचे होते आणि वर एक जुनाट मोठी माडी होती. अचानक ती माडी कोसळली आणि माझे वडील त्याखालील दबून वारले. तेव्हापासून माझे वडिलाचे छत्र हरपले आहे. मला कळायला लागल्यापासून मी मोठ्या भावाला 'बाबा' म्हणतो.तेच माझे खऱ्या पालक बनले.

प्रश्न  :- ठीक आहे. आता मला सांगा,आपलं शिक्षण किती आणि कोठे झाले?

- सर, माझ्या गावी त्या वेळी शिक्षणाची सोय नव्हती.गाव फार आडवळणी होते. माझ्या मामाच्या गावी पळसखेड नागो येथे पाचवी पर्यंत  शिक्षण घेतलं. मी अभ्यासाने थोडा हुशार असल्याने आणि बंजारी समाजातील असलेल्या आरक्षण मिळाले. पुढे मला भारत विद्यालय बुलडाणा येथे शिकण्यासाठी प्रवेश मिळाला. तसेच मला  वसतिगृहात देखील प्रवेश मिळाला.सहाजिकच मला खूप बरे वाटले. तेथे मी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि चांगल्या गुणांनी बोर्डाची परीक्षा पास केली. त्यावेळी मला खूप आनंद झाला.

प्रश्न  :- शक्यतोवर त्याकाळी मिलिटरीमध्ये भरती होण्यासाठी ग्रामीण भागातील माणसं आपल्या मुलांना पाठवित नसत. त्यांना असे वाटायचे की सैन्यात भरती होण्यासाठी गेलेला मुलगा शक्य तोवर घरी वापस येत नाही. तो तिकडेच शहीद होण्याची भिती वाटते.असे असताना देखील तुम्ही सैनिक होण्याचे का ठरवले?

- सर, सैनिक झाल्यावर खूप काही जग पाहायला मिळते. चांगले ड्रेस घालायला मिळतात. खूपकाही पोटभर खायला देखील मिळते.अशा अनेक गोष्टी मला सैनिक मित्रांनी सांगितल्या होत्या. देशाची सेवा केली की आपल्याला देखील चांगला पैसा मिळतो हे मी ऐकले होते . म्हणून निश्चय केला की सैन्यात भरती व्हायला जायचं. शेवटी मी वयाचे १८ वर्ष पूर्ण झाल्या झाल्या १९८६ मध्ये बीएसएफ मध्ये भरती झालो. माझी प्रथम नियुक्ती दिल्ली येथे झाली. त्यावेळी माझ्या कुटुंबाला जो काही आनंद झाला होता तो अतिशय अवर्णनीय होता.

प्रश्न :- आता सांगा राजूभाऊ,आपली नोकरी कोठे कोठे झाली? आणि किती वर्ष तुम्ही देशाच्या संरक्षण खात्यात सेवा दिली?

- सर, मी सर्वप्रथम दिल्ली येथे ७ वर्षं, पंजाब मध्ये ४ वर्षं, श्रीनगर मध्ये २ वर्षं, आणि शेवटी मी त्रिपुरा - आगरताला येथे माझी ७ वर्ष सेवा झाली. अशी माझी एकूण २० वर्षं सेवा झाली आहे. मी बीएसएफ  खात्याच्या नोकरीतून  दिनांक ३१/१२/२००६ रोजी नाबाद सेवानिवृत्त झालो. मी सहिसलामत नोकरी करून घरी परतल्यावर माझा गावातील लोकांनी जंगी सत्कार केला. मी सुखरूप घरी परत आल्यामुळे सर्वात जास्त आनंद जर कोणाला झाला असेल तर तो माझ्या विजया पत्नीला. तिच्या मते खऱ्या अर्थाने आता आपला संसारगाडा सुरू झाला होईल.आपल्याला आता चांगले काम करायला वेळ मिळेल. तेव्हा कुटुंबाचा सर्व चार्ज मी माझ्या पतीला देऊन मोकळी झाले,हा माझ्यासाठी खरा विलक्षण आनंदाचा क्षण होता.हा माझ्यासाठी एक भावनिक प्रसंग होता., असे विजयाताई अभिमानाने बोलत होत्या.

 प्रश्न :-   आता मला सांगा राजूभाऊ, नोकरी करत असताना काही अविस्मरणीय अनुभव तुम्हाला आलेत का?

- सर, मी श्रीनगरमध्ये असताना उग्रवादी ऑपरेशन करण्याची वेळ आली होती.आम्ही पाचजण ड्युटीवर होतो. त्यांना चारही बाजूने आम्ही घेरले.फायरींग करण्यात आली. दोन उग्रवादी जागीच ठार झाले. ऑपरेशनमध्ये आमचा एक सैनिक ठार झाला आणि एक जखमी झाला.बाकीचे उग्रवादी पळून गेले. माझं नशीब बलवत्तर आणि आईवडीलांचे आशीर्वाद म्हणून मी सहीसलामत वाचलो. दुसरा अनुभव पश्चिम बंगाल मधील आहे. आम्ही आठजण ड्युटीवर होतो. आमचा सामना डाकूंशी झाला. त्यात देखील तीन डाकू ठार झाले. त्यांनी आम्हाला गराडा घालून ठार मारण्याचा चंग बांधला होता.

 प्रश्न :- आता मला सांगा,आपले लग्न केव्हा झाले होते आणि आपल्या कुटुंबासाठी तुम्ही काय केले?

- सर, माझे लग्न विजया नावाच्या मुलीशी १९९५ मध्ये झाले. त्याकाळी शक्य तोवर आर्मीच्या माणसाला खेड्यातील मंडळी मुली देत नसत. लढाईवर जावे लागते. मुलगा घरी येईल की नाही याची खात्री नसते. परंतु विजयाताईने मन खंबीर करून देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला, म्हणजेच मला होकार दिला आणि यशस्वीपणे  हा संसाराचा गाडा चांगला चालवून दाखविला.एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका सामान्य स्त्रीचा हात असतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. मी, माझी पत्नी विजया,अजय हा एक मुलगा आणि अश्विनी ही एक मुलगी असा माझा छोटा परिवार आहे. मी नोकरीतून २००६ मध्ये सेवानिवृत्त झालो. तेव्हा मी स्वतः ३८ वर्षाचा होतो.माझ्या नोकरीतील जमापुंजी आणि पत्नीने काटकसरीने केलेला संसार यातून मी मुलामुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी खर्च केला. आज माझा मुलगा अजय बीई इलेक्ट्रिकल झाला असून सध्या तो एमबीए करतो आहे.तर मुलगी अश्विनी डॉक्टर झाली असून तिने बीएचएमएस ही वैद्यकीय पदवी मिळवली आहे. एका माजी सैनिकाची मुले उच्च शिक्षण घेऊन सुसंस्कारित झाली आहे,याचा मला सार्थ अभिमान आहे. हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई आहे असे मला वाटते.

   प्रश्न :- आता मला सांगा,  कुटुंबातील एक व्यक्ती या नात्याने एक सामाजिक बांधिलकी म्हणून सख्खे भाऊ आणि इतर भावबंध यांचेसाठी तुम्ही काय काय केले? थोडे सविस्तर बोला.

- सर, मला १९८६ मध्ये नोकरी मिळाली. सैन्यात भरती झाल्यापासून तब्बल दहा वर्षे मी माझ्या कुटुंबाला मदत केली. माझ्या गावी विशेष करून मोठ्या भावाला बळीराम दादाला , ज्याला मी 'बाबा' म्हणायचो त्यांना सर्व प्रकाराची मदत केली आहे. माझ्या कुटुंबात आम्ही एकूण सहा भाऊ होतो. त्यापैकी दोन भाऊ पोलिस आणि मी स्वतः बीएसएफ मध्ये नोकरीला होतो. आम्ही तीन भाऊ नोकरीला होतो आणि तीन भाऊ शेतीत काम करणारे होते. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही तीन भाऊंनी प्रत्येकी चार-चार एकर  वडिलोपार्जित जमीन आमच्या शेतकरी भावांना अधिकृतपणे देऊन टाकली. आता आपण स्वतंत्र आहोत असे समजून आपापली प्रगती करावी असे देखील सर्वानुमते ठरले.  आमच्या कुटुंबातील हे एक आदर्श उदाहरण इतरांना विचार करायला लावणारे ठरेल असे म्हटले तर वावगे ठरू नये असे मला वाटते.

दुसरी गोष्ट म्हणजे मी इतरांना सांगत आलो आहे की विद्यार्थी मित्रहो तुम्ही शारीरिक मेहनत घेत चला. मी तुम्हाला मैदानी खेळांची माहिती देतो. सैनिक होऊन देशाची सेवा करा. खूप पगार मिळतो आणि अनेक सुखसुविधा देखील मिळतात. शिवाय आता पहिल्यासारखी ही नोकरी अवघड नाही.  भरती व्हावयाचे असेल तर शारीरिक परीक्षेत आणि लेखी परीक्षेत पास व्हा आणि या सैनिक नोकरीला  कमी न लेखता ती मिळविण्यासाठी प्रयत्नशील रहा.मी  माझ्या कुवतीप्रमाणे तुम्हाला सदैव मदत करायला तयार आहे. अनेक विद्यार्थ्यांना मी प्रत्यक्षात त्यांना बोलावून घेतले आणि पोलीस ग्राउंडवर  अवघड गेम्स समजावून सांगितली.

प्रश्न :- मला सांगा राजूभाऊ, तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर इतर ठिकाणी काय काय काम केले?

-  सर,मी १९८६ मध्ये नोकरीला लागलो आणि २००६ मध्ये सलग २० वर्षे निष्कलंक नोकरी केली. नोकरीतील फंड मिळाला. मला चांगली पेन्शन लागू झाली. तरीही मी ठरवले की 'रिकामं मन सैतानाचा कारखाना' होऊ नये म्हणून आपल्या अनुभवाचा आणि क्षमतेचा उपयोग एखादी नोकरी मिळावी म्हणून मी प्रयत्न केला. मी बालाजी स़ंस्थान बुलडाणा येथे २ वर्षे, बुलडाणा जिल्हा सहकारी केंद्रीय बँक येथे ५ वर्षे वाॅचमन म्हणून प्रामाणिकपणे नोकरी केली. आज रोजी मी सीएमएस कंपनीच्या एटीएम मध्ये कॅश सिक्युरिटी गार्ड म्हणून सेवा देत आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर मी असे सांगेन की रिकामे न राहता दोन पैसे कष्टाने मिळवित रहा. ते संसार प्रपंचासाठी उपयोगी पडेल.

प्रश्न  :-   तुमच्या सैनिक बांधवांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?

-   मी माझ्या अनुभवावरून सांगतो की अनेक फौजी/ सैनिक  सेवेत असो अथवा सेवानिवृत्त असाल, एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे सर्वप्रथम आपल्या कुटुंबाला सुखी समाधानी ठेवण्यासाठी आपली मायापुंजी  व्यसनामध्ये वाया घालू नका.आपल्या मुलाबाळांना उच्च शिक्षण देऊन त्यांना माजी सैनिकाचे आरक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे करा. आपल्या ताकदीचा उपयोग गावातील मुलामुलींना सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठी वापर करावा. सैनिक म्हणून सेवेत असताना ज्या काही वाईट सवयी होत्या, त्या सेवानिवृत्त झाल्यानंतर  लगेच सोडून देणे नितांत गरजेचे आहे. अन्यथा आपले हाल झाल्याशिवाय राहणार नाही.समाजासाठी, गावरक्षणासाठी काही विधायक कार्य करता आले तर जरूर करा. काहीतरी करता येणे शक्य होणार नसेल तर चालेल.पण कुणाला त्रास होईल असे कृत्य करू नका, असे मला याप्रसंगी एक माजी सैनिक म्हणून सांगायचं आहे.धन्यवाद!

🌹🪷🌺💐

# . प्रा दिगंबर माणिकराव कानडजे 

     मधुकोषनिवास, सागवन-बुलडाणा 








Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत