महिला सक्षमीकरण - एक चिंतन
महिला सक्षमीकरण: एक चिंतन
भारतमातेच्या कुशीत राष्ट्रमाता जिजाऊ झाशीची राणी, लक्ष्मीबाई,सावित्रीबाई फुले ,अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर, मदर तेरेसा, फातिमाबी,संत जनाबाई, कवयित्री बहिणाबाई अशा अनेक विरांगणांनी म्हणजेच भारत मातेच्या सुकन्यांनी जन्म घेऊन आपल्या असामान्य कर्तृत्वाने भारताची शान जगाच्या इतिहासात राखली आहे. असे असतानाही भारतात महिलांची हेळसांड होत आहे ही एक चिंतनीय बाब आहे.
1948 साली दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता. तो जाहीरनामा स्वीकारल्यानंतर तब्बल 51 वर्षानंतर भारतात मानवी हक्कांचे संरक्षण करणारा कायदा अस्तित्वात आला. मानवी हक्क आयोग कायदा 1993 मधील कलम 30 व 31 नुसार प्रत्येक जिल्ह्यात मानवी हक्क न्यायालय असायला पाहिजे होते, तेही तूर्त दिसत नाही. स्त्रियांवर होणारे अन्याय, कौटुंबिक अत्याचार, यातना, स्त्रियांची कुचंबणा , विशेष करून स्त्रियांना कमी लेखणे,त्यांचा अपमान करणे, स्त्रियांना मुलगा न होता मुलीच होतात म्हणून हिणवणे इत्यादि बाबत कोणीही गांभीर्याने विचार करीत नाहीत. याबाबतीत स्त्रियांना दाद मागणे कठीण जाते.शिवाय दाद मागायची तर कोणाकडे ? हाही प्रश्न त्यांना पडतो. म्हणतात ना राजाने टाफरले ,पावसाने झोडपले आणि नवऱ्याने मारले तर कोणाकडे स्त्रिने दाद मागावी?
संसार करणे अवघड आहे.प्रत्येक जीव जन्माला आल्यानंतर जीवन जगण्यासाठी धडपडत असतो. हा भवसागर तरुण जाण्यासाठी स्त्री पुरुषांना फार हेलकावे घ्यावे लागतात. सुखदुःखांच्या अनेक लाटा येत असतात. या लाटांवर मात करून सागरकिनारा गाठायचा असतो. बहिणाबाईंनी संसाराचे मार्मिक वर्णन त्यांच्या गाण्यात केले आहे. त्या म्हणतात -
अरे संसार संसार |जसा तवा चुल्ह्यावर ||
आधी हाताला चटके | तेव्हा मिळते भाकर ||
एकंदरीत संसाररुपी रथाची दोन चाके म्हणजेच एक चाक स्त्री
पत्नी व दुसरं चाक पुरुष - नवरा हे होत. एक चाक जरी नैसर्गिक किंवा मानवी आपत्तीमुळे निखळलं तरी हा संसाराचा गाडा चालविणे फार दुरापास्त होऊन जातो.कमालीची हतबलता येऊन मरगळ अवस्था निर्माण होते.
तसे पाहिले तर निसर्गाने स्त्री जातीला नाजूकपण आणि कोमलता बहाल केली आहे. नाही म्हटलं तरी पुरुष हा राकट आणि दणकट असून स्त्री जातीपेक्षा शारीरिकदृष्ट्या धष्टपुष्ट आणि सक्षम असतोच. साहजिकच त्याच्यामागे स्वामित्वाची भावना निर्माण होते आणि तो स्त्री जातीवर जास्तीचे अधिकार गाजवतो. सबब स्त्री स्वतःला आपला समजते आणि पुरुष जातीचा जास्तीचा बडेजाव करते. पती हा परमेश्वर समजून त्याची जास्त प्रमाणात सेवा करते. या सवयीमुळे पुरुषवर्ग हा जास्तीचा शेफारला असून स्त्रीजातीवर अधिकार गाजवण्याचा तो प्रयत्न करीत आहे. या सर्व बाबींमुळे आजची स्त्री ही अबला बनली असून स्वतःला कमकुवत समजत आहे . तिला सक्षम होणे ही काळाची गरज आहे. शरीर सुदृढ करून प्रसंगी पुरुष जातीशी दोन हात करण्याची मानसिक तयारी तिने ठेवली पाहिजे असे मला वाटते.
स्त्री ही अबला नसून ती सक्षम आहे. मात्र तिला पुरुषवर्गच स्वतःच्या स्वार्थासाठी मानसिकदृष्ट्या हतबल करण्याचा प्रयत्न करतो आहे . जादूटोणा, करणी, भानामती इत्यादि सारख्या अंधश्रद्धेच्या सर्वात जास्त बळींची संख्या स्त्रियांचीच आहे. अंधश्रद्धेच्या ते बळी ठरतात. केवळ स्त्रियांबाबतीत असं का घडतं? हा एक चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे असे मला वाटते. याचे एकमेव कारण म्हणजे स्त्रियांची मानसिकता दुर्बल केली जाते. हे काम पुरुषच करतो. या अंधश्रद्धेच्या बाबतीत स्त्रियांनी जागरूक राहून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. मला काहीच झालेले नाही. कोणाची हिम्मत आहे ,कोणाची हिम्मत आहे माझे वाकडे करण्याची! असा आशावाद तिच्या मनात येणे गरजेचे आहे. तिचा जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. यासाठी सामाजिक चळवळ म्हणून महिलांनी एकत्र आले पाहिजे. ग्रामीण आणि स्त्रिया भिन्न भिन्न नसून त्यांच्या विचारसरणीत मात्र बदल झालेला दिसतो आहे.
महिला केवळ शिक्षण न घेतल्यामुळे वैचारिक व मानसिकदृष्ट्या मागास राहिल्या आहेत. शिक्षण हा तिसरा डोळा असून तो उघडायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे महात्मा फुलेंनी आवर्जून सांगितले आहे. शिक्षणाचा अभाव असला तर स्त्रियांना वैचारिक पातळीवर संघर्ष करणे अवघड जाते.चिकित्सकवृत्तीचा अभाव निर्माण होतो. चांगलं- वाईट याबाबतीत निर्णय घेण्यास अडसर निर्माण होतो. साहजिकच महिलांचे शोषण होते. अन्याय व यातना खूप सहन कराव्या लागतात. यासाठी ग्रामीण व शहरी महिलांनी दुजाभाव न करता अनेक चांगल्या कामांसाठी एकत्र येऊन संघटन केल्याशिवाय स्त्रियांच्या हक्कांचे संरक्षण होणार नाही असे मला वाटते.
अंगात ताकद नसेल, संघर्ष करण्याची क्षमता असेल आणि अन्याय- अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याची उर्मी नसेल तर तिने असले लाजिरवाणे जिणे किती दिवस आणि कसे जगावे? स्वतःला अबला म्हणून किती दिवस हाल-अपेष्टा सहन कराव्यात? एक दिवस तापून उठल्याशिवाय इलाज नाही. सहनशीलतेला देखील एक अंत असतो. सहनशीलतेचा बांध फुटला की स्त्रिचे देखील एक मायावी रुप दिसायला लागते. अशावेळी शक्तिशाली समजणारा पुरुष अबला झाल्याशिवाय राहणार नाही. तो क्षण आता दूर नाही. फक्त महिलांनी एकत्र येऊन विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन जपान मधील स्त्रियांसारखे रूद्र रुप धारण करून सहकार चळवळ उभी केली पाहिजे असे मला वाटते.
व्यसनाधीनता हा तर समाजाला लागलेला एक कलंक आहे. पुरुषाच्या व्यसनाधीनतेमुळे अनेक चांगले सुखी संसार धुळीस मिळाले आहे.अक्षरश: धुळीस मिळाले आहेत.व्यसनाधीन पती असेल तर एकटी स्त्री फटका संसार नेटका कुठपर्यंत करीत राहील ? जेथे आभाळच फाटलं तेथे ती किती दिवस लावत बसणार? अशा प्राप्त परिस्थितीत पत्नी संसाराला लागणारी मीठ- मिरची काबाडकष्ट करून मिळवते. मुलाबाळांना शिकविण्याचा जीवघेणा प्रयत्न करते. परंतु अशा परिस्थितीत व्यसनाधीन झालेला पती घरी येऊन पत्नीने काबाडकष्ट करून मिळवलेली माया म्हणजेच पैसे हिसकावून घेतो. पत्निलाच लाथाडतो.तेव्हा हतबल झालेली एकटी स्त्री आक्रोश करणार नाही तर काय करणार? अशावेळी समदुखी महिलांनी आणि चार चांगल्या सुशिक्षित बायांनी एकत्र येऊन महिला अत्याचार विरोधी चळवळ उभारली पाहिजे. मद्यपानाच्या आहारी गेलेल्या पतींना वठणीवर आणले पाहिजेत, असे मला वाटते. ही आजच्या काळाची गरज आहे. अनेक गावातील महिलांनी व्यसनमुक्तीसाठी लढा देऊन गावातील दारूची दुकाने बंद पाडली आहेत. संपूर्ण गाव व्यसनमुक्त करण्याची काम स्त्रियांनी हाती घेतले आहे. एवढी ताकद महिलांच्या चळवळीत आहे. अशा परिस्थितीत शासन अथवा कायदा दारुड्या नवऱ्यांना वटणीवर आणू शकत नाही. मात्र हे काम महिला चळवळींनी यशस्वीरित्या पूर्ण करून दाखविले आहे. अशी अनेक उदाहरणे लोकराज्य मासिकात आणि दैनिक वृत्तपत्रात वाचायला मिळतात. आणि म्हणून महिलांनी स्वतःला अबला न समजता स्वतःचा उद्धार स्वतःच केला पाहिजे असे मला वाटते.
आता खऱ्या अर्थाने ताराबाई शिंदे यांच्या 'स्त्री पुरुष समानता'
ग्रंथाचे पारायण करण्याची वेळ आली आहे. आता स्त्री पुरुष समानता खूप वाढली असून जवळपास 50 टक्के महिला आरक्षण, पंचायतराज मध्ये आले आहे. ताराबाई शिंदे या लेखिकेला अभिप्रेत असलेली स्त्री पुरुष समानता आज सर्वत्र दिसायला लागली आहे. ग्रामपंचायत,पंचायत समिती आणि जिल्हा परिषद परिषदांमध्ये 50 टक्के महिला आरक्षण आल्यामुळे राजकारणात महिलांचा वाढता सहभाग वाखाण्याजोग आहे यात शंकाच नाही. मात्र येथे पुरुषी अहंकार नागाच्या फण्यासारखा डंख मारण्याचा प्रयत्न करतो आहे. महिलाच्या पदाचा पुरेपूर फायदा तिचा पती, तिचा भाऊ, अथवा तिचा दीर घेताना दिसतो आहे. महिला जरी ग्रामपंचायत सरपंच झाली असली, पंचायत समितीची सभापती झाली असली, किंवा जिल्हा परिषदेची अध्यक्षा झाली असली, तरी तिचा पती अथवा दीर स्वतःलाच सर्व काही समजून तिच्या खुर्चीचा पुरेपूर उपयोग करून घेतो आहे. हा प्रकार सर्रास सर्वत्र पहावयास मिळतो. वास्तविक स्त्रिला तिचे काम तिला प्रामाणिकपणे करू दिले पाहिजेत. कारण अशा कामातून तिला अनुभव येत असतो आणि अनुभवाने माणूस शहाणा होतो असे म्हणतात ते काही खोटे नव्हे. स्त्रिला जर सक्षम करायचे असेल तर तिचे हक्क तिला वापरू दिले पाहिजेत किंवा मिळवून दिले पाहिजे असे मला वाटते. परंतु यास कारणीभूत पुरुषवर्ग असून विशेषतः तिचा पती आहे. अशा परिस्थितीत बिचारी महिला हतबल ठरते. 'इकडे आड तिकडे विहीर' अशी तिची अवस्था होते. तिला कुठल्याही सभेला मनमोकळेपणाने जाता येत नाही. स्वतःचे विचार- भावना प्रकट करता येत नाही. ही एक खरोखर शोकांतिका आहे असे मला वाटते. पुरुष सांगेल तसेच तिला कठपुतळीसारखे नाचावे लागते. वागावे लागते. याला महिलाराज म्हणता येईल का? यासाठी स्त्रियांनी उच्चविद्याविभूषित होऊन स्वतःचे निर्णय स्वतः घेतले पाहिजे. अनेक सभा अभ्यास करून गाजवल्या पाहिजेत. स्वतःचे कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध करून दाखविले पाहिजे. निर्वाचित झालेल्या महिलांची एक चळवळ उभी राहिली पाहिजे..
थोडक्यात संवेदनशून्य समाज आणि असंवेदनशील स्त्रियांना समाज चळवळींच्या माध्यमातून जागृत करणे अपरिहार्य आहे.आपणा सर्वांना आई हवी असते .संसारात सह-धर्माचरिणी हवी असते आणि भाऊबीजेसाठी बहीण हवे असते. असे असताना देखील सामाजिक सुधारणांचा भरभक्कम वारसा असलेल्या महाराष्ट्रात अजूनही स्त्रिची अस्मिता, पाहिजे तेवढी वाढलेली नाही, याची खंत वाटते. चला तर सर्व मिळून स्त्रियांच्या अस्मितेसाठी झटू या ! महिला सक्षमीकरणासाठी चिंतन करू या!
८ मार्च हा जागतिक महिला दिन असून तो आपण सर्वत्र साजरा करीत असतो.या दिनी स्त्रियांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो . तेव्हा या
महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने सर्व महिला जगताला माझ्या हार्दिक शुभेच्छा!
# प्रा दिगंबर कानडजे., भ्रमणध्वनी -;८२७५२३१८७४
मधुकोष निवास, सागवन- बुलडाणा .