आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस
* आनंदी जीवन - सुखी संसाराची गुरुकिल्ली *
२० मार्च हा "आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस" सर्वत्र साजरा केला जातो. जगभरातील लोकांचा आनंद आणि त्यांचं कल्याण कशात आहे, किती आहे,हा एक निरूत्तरीत प्रश्न आहे. पण एक मात्र खरं आहे की आनंदावस्था ही प्रत्येकालाच हवी असते हे मात्र नक्की. त्या आनंदाचे असंख्य पैलू आहेत. मात्र आनंदाला इतर काही भावनांचा एक जरी तडा गेला की त्याच्या आनंदात विरजण पडते आणि म्हणूनच आनंद कसा वाढवावा याचा शोध प्रत्येकाने दररोज घेतला पाहिजे.आपले जीवन आनंदी आणि सुसह्य कसे होईल याचा शोध घेतला पाहिजे असे मला वाटते.
जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेला आशावाद, उमेदीने कार्य करण्याची आस आणि आंतरिक क्षमतांचा शोध घेण्याचे बळ महत्वाचे असते. ज्ञान, साधना,स्वप्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा वापर केल्यास आपल्या जीवनात समृद्धी येते आणि समृद्धीचा बडेजाव न करता माणसाने माणसाशी माणसासारखे वागले तर निश्चित जीवनात आनंद प्राप्त होतो. जीवन सार्थकी झाल्यासारखे वाटते.ही खरी सुखासमाधानाची गुरुकिल्ली आहे असे मला वाटते.
कोणत्याही वस्तूची प्राप्ती, उपभोग, मालकी यातून जे मिळते ते सुख होय.अधिक सुख शोधताना त्याला कळते की
खरे सुख वस्तू नसून मन आहे. सुखाचे उगमस्थान आपले मन आहे. आपल्या मनात इच्छा निर्माण झाली की हवी ती वस्तू मिळण्याची ओढ लागते. यालाच आपण आसक्ती म्हणतो. एक इच्छा तृप्त झाली की दुसरी इच्छा दत्त म्हणून उभी राहते. इच्छापुर्ती साठीची आसक्ती म्हणजे तृष्णा. ही तृष्णा पूर्ण झाली नाही की यातून क्रोध उत्पन्न होतो . इच्छापूर्ती मध्ये अडथळे निर्माण झाली की यातून क्रोध,लोभ आणि आसक्ती वाढते.तेव्हा हेच घटक आनंदाला दूर सारतात. इच्छापूर्ती चा मार्ग सोडणे ही खऱ्या अर्थाने आनंदाकडे जाण्याची पहिली पायरी आहे.
मानसशास्त्र म्हणजे ढोबळमानाने मनाचा अभ्यास करणारे शास्त्र असे म्हटले जाते. माणूस खूप शिकला,त्याने अनेक विषयांवर प्रभुत्व मिळवले याचा अर्थ त्याचे शारिरिक आणि मानसिक आरोग्य चांगलेच असते अशी समजूत करून चुकीचे ठरते, असे मला वाटते. समजा एखादी व्यक्ती उच्च शिक्षित आहे, स्पर्धा परीक्षा देऊन मोठ्या पदावर आरूढ झालेली आहे.म्हणजेच ती व्यक्ती आपल्या आयुष्यात प्रचंड यशस्वी झाली आहे, उत्तम सामाजिक , राजकीय आणि धार्मिक कार्यकर्ता अथवा कार्यकर्ती आहे . म्हणून ती व्यक्ती सुखी, समाधानी आणि आनंदी आहे असे देखील नव्हे. जीवनभर तिचे आयुष्य निरोगी आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ राहीलच असे नाही ..
बरेच विद्यार्थी अपयशामुळे खचून जातात.त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात . त्याची अवस्था रणभूमीतल्या एखाद्या अर्जूनासारखी होऊन जाते.अभिमन्यू सारखा तो त्या समस्येच्या चक्रव्यूहात अडकत जातो.अशावेळी तो हतबल होऊन प्रसंगी आत्महत्या देखील करतो हे विदारक सत्य आहे. . कारण आजकाल या स्पर्धेच्या युगात युवकांपुढील आव्हाने खूप आहे.आनंदी जीवन काय असते,याचा साधा स्पर्श देखील त्याला होत नाही. प्रत्येक दिवस आपल्यासाठी आनंदी दिवस ठरला पाहिजे, असे जीवन जगण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
माझं असं स्पष्ट मत आहे की जर व्यक्तीचा भावनिक, शारीरिक, वैचारिक, मानसिक आणि सांस्कृतिक विकास चांगला झाला नसेल तर उत्तम शिक्षण आणि पैसा या गोष्टी केवळ वर वरच्या ठरतात. व्यक्तीच्या सुखी आणि आनंदी जीवनासाठी त्याचे शिक्षण,त्याची भौतिक प्रगती व त्याचं भौतिक यश हमी देऊ शकत नाही. तर तो आहे त्या परिस्थितीमध्ये कसे समायोजन करतो आणि कुठलेही ताण तणाव न घेता कसे समाधानी जीवन जगतो यावर त्याची मानसिक स्थिती आणि मानसिक आरोग्य अवलंबून असते. तेव्हा कुठे त्याला आनंदी जीवनाचा आस्वाद घेता येतो.
एखादी व्यक्ती आयुष्यात प्रचंड यशस्वी झालेली आहे म्हणजे जीवनभर तिचं मानसिक आरोग्य चांगलं आहे असे नव्हे.,ती आनंदी असणे ते देखील शक्य नाही. ह्या दोन गोष्टी अत्यंत भिन्न आहे. तसेच नैराश्यात प्रत्येक वेळी रडू येणं, दुःखी- कष्टी होणं, एकटं एकटं राहणं, किंवा एकांतात राहणं, आत्मकेंद्रित होऊन सतत विचार करीत बसणं अशी लक्षणे असतात.परंतु तसंही नाही. नैराश्यग्रस्तांमध्ये अस्वस्थं होणं किंवा हिंसक वागणं, अशी लक्षणे दिसतात, आणि अशा वागण्यामुळे स्वतःबद्दल शरम वाटत असते आणि अशा वेळी कधी कधी अफलातून फार भयंकर घडत असते, अशा घटना अनेक ठिकाणी पहायला मिळतात. तसेच एखादी व्यक्ती सुस्थितीत आहे, शिवाय खूप श्रीमंत आहे म्हणजे तिचं मानसिक आरोग्य चांगले आहे. याबाबत देखील खरं म्हणता येईल असे मला वाटत नाही.ती व्यक्ती सुखी, समाधानी आणि आनंदी असेलच असे नाही.
वास्तविक पाहता महाराष्ट्र हे एक संतांचे आणि सधनांचे राज्य आहे असे जरी मानले जात असले तरी महाराष्ट्रात आत्महत्या करण्याचे प्रमाण खूप जास्त आहे असे असे एका पाहणीत सिद्ध झाले आहे.
. संत तुकाराम म्हणतात - " प्रपंच आणि परमार्थ यांची प्रत्येकाने आपापल्या जीवनात उचित सांगड घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी अनासक्तीला ,संयमाला महत्त्व दिले पाहिजे. जिंकावा संसार, असे संत तुकाराम महाराज म्हणतात ते काही उगीच नव्हे! परोपकार, भूतदया, शांती, संयम यांच्या आधारे जो चांगले जीवन जगतो तो जीवनात आनंदी व यशस्वी होऊ शकतो. पण परस्त्री माते समान मानणे, परनिंदा न करणे, परधनाची आशा न करणे, सत्यवचन बोलणे, नीती आणि सदाचाराची वागणूक ठेवणे, इत्यादी गोष्टींचे पालन करून संसार केला तर निश्चितपणे तो जीवनात सुखी होऊ शकेल आणि आनंदी जीवन जगेल यात शंकाच नाही.सर्व संतांनी मानवी मन, शरीर, जीवन, सुख याविषयीचे वास्तव स्वरूप सामान्य जनतेला समजून सांगितले आहे. आपल्या मनातील कामक्रोधादि शत्रूंवर विजय मिळवला पाहिजेत. माणसाने आपले मन शुद्ध केले पाहिजे आणि शरीर सुदृढ ठेवले पाहिजे असे देखील संतांनी आवर्जून सांगितले आहे.
" मन करा रे प्रसन्न | हेचि सिद्धीचे कारण| " या उक्तीप्रमाणे जीवन प्रवास केला तर मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. निरोगी जीवन जगणे अगदी सुसह्य होईल, आनंदी जीवन लाभेल असे मला वाटते.सतत कष्ट करून समाधानी आणि आनंदी जीवन जगणं हे मानवाच्या हाती आहे.जे अलभ्य आणि अप्राप्य आहे त्याच्या मागे धावणे उचित ठरत नाही,ते एक मृगजळ आहे, असे मला वाटते. थोडक्यात असे म्हणता येईल की कोणत्याही व्यक्तीला सुख, समाधान हवे असेल तर सर्वप्रथम त्याचे मन प्रसन्न, उत्साही व आनंदी असले पाहिजे,तरच त्याच्या जीवनात आनंदी दिवस दिसेल असे मला वाटते.
आनंदी जीवन जगण्यासाठी काही उपाय -
सहजपणे मैत्री करणे ,छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मजा घेणे, विविध उपक्रमात सामील होणे, विनोदी साहित्य वाचणे.(उदाहरणार्थ-बटाट्याची चाळ, एरंडाचे गुऱ्हाळ, रामनगरी, मुद्दे आणि गुद्दे इत्यादि ग्रंथ) स्वतःच्या क्षमता आणि कमतरतांचा शोध घेऊन त्या डोळसपणे स्विकारणे, इतिहासात झालेल्या चुकांची वारंवार पुनरावृत्ती करणे टाळावे.माझ्या आयुष्यातील अर्धा ग्लास रिकामा आहे हेच वारंवार सांगत दुःखी कष्टी होत राहणे म्हणजेच अर्धा ग्लास भरलेला आहे याचे महत्त्व विसरणे होय. जवळ खूप काही संपत्ती असून देखील माणूस त्याचा मनमुराद आनंद घेत नाही. माणूस "आपलं काही खरं नाही बुवा" असे सतत बोलत राहतो आणि स्वतःचे अवमूल्यन करुन घेतो. संत तुकाराम महाराज म्हणतात - येणे सुखे रूचे एकांताचा वासl नाही गुण दोष अंगा येतll
दुसऱ्याकडून काहीतरी हिरावून घ्यायचे आणि त्यावर आपल्या सुखाचे इमले बांधायचे. असे वागल्याने आपल्या जीवनात आनंद कसा बरे निर्माण होईल? आपल्या स्वतःच्या बोलण्यात वागण्यात जितकी आस्ता आणि ऋजुता निर्माण होईल तितका आनंद वाढेल. सुख- दुःख ,यश-अपयश, आशा- निराशा या भावनांच्या पलीकडे जाऊन स्वतःतील आनंद शोधला पाहिजेत. आपणच आपल्या जीवनावर प्रेम केलं पाहिजेत तरच खऱ्या आनंदाची निर्मिती होऊ शकते आणि आपण आनंदी जीवन जगू शकतो. केवळ कोणताही उत्सव हा एका दिवसाचा न राहता त्याचा आस्वाद सतत घेत राहिला पाहिजे. "आनंदाचे डोही आनंद तरंग" अशी अवस्था निर्माण झाली पाहिजे.
-------------------------००--------------------
# प्रा दिगंबर कानडजे , मधुकोष निवास
सागवन-बुलडाणा, भ्रमणध्वनी- ८२७५२३१८७४