भारत आणि जपान मधील प्राथमिक शाळांचे शैक्षणिक कार्य....एक चिंतन
शिक्षण घेण्याचा मुख्य उद्देश कोणता असावा? शिक्षण हे माणूस घडविणारे असावे,ते नोकऱ्या देणारे कारखाने ठरू नये असे मला वाटते . जपान मधील शिक्षणपध्दतीचे आपल्याला उदाहरण देता येईल.शिक्षणाची सांगड जपानने नोकरीशी घातली नाही तर माणूसकी निर्माण करण्याशी घातली आहे.एक आदर्श , जबाबदार आणि सुजाण नागरिक तयार झाला पाहिजे हा जपान मधील शिक्षणपद्धतीचा उदे्दश आहे. तेथील शिक्षण व्यवस्थाच विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडवण्यासाठी तयार केली आहे. तेथे पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात नाही असे माझ्या वाचनात आले आहे.. कारण जपानी लोकांचा विश्वास आहे की या वयात पारंपारिक शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणे आणि त्यांच्यावर सुसंस्कार करणे हे फार महत्त्वाचे आहे.हे बालवय संस्कारक्षम असते. ओल्या मातीच्या गोळ्याला जसा पाहिजे तसा आकार देता येतो.आणि म्हणून या गोष्टीला ते सर्वप्रथम प्राधान्य देतात. आपल्या देशात मात्र अगदी सुरुवातीपासून म्हणजेच अगदी बालवाडी पासून, तो बालक मराठी माध्यमाच्या शाळेत असो की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असो त्याला शाळेत विविध विषयांवर जबरदस्तीने शिकवले जाते. त्याच्याकडून घोकंपट्टी करून घेतली जाते. आपलं पोरं इतरांपेक्षा पोपटासारखे बोलले पाहिजे, त्याला इंग्रजी, गणित, विज्ञान या सारख्या विषयांत खूप मार्क्स मिळाले पाहिजे असा आग्रह पालकांचा असतो. यासाठी पालक शाळेत तर नियमितपणे पाठवितात शिवाय खाजगी शिकवणी देखील लावतात. शाळा आणि खाजगी ट्युशन या ओझ्याखाली लहान मुले त्यांचं बालपण पार हरवून जातात. वास्तविक लहान मुला़ंचं हे वय हसण्या- खेळण्याचं असतं.जपानमध्ये मात्र अशा बालकांवर ना परीक्षा,ना अभ्यास ना खाजगी शिकवणी याचा कुठलाच ताण नसतो. त्यांचे शिक्षण आनंददायी,हसत खेळत आणि ताणविरहित असते.कारण त्या़ंना सुजाण व जबाबदार नागरिक घडवायचा असतो हे येथे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे.
स्वतःची कामे स्वतःच केली पाहिजेत. सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे, रोडवर कसे चालावे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता कशी ठेवावी,लोकांशी विनम्रतेने कसे बोलावे, एकमेकांना मदत कशी करावी, टीमवर्कने काम कसे करावे, वेळेचे नियोजन करून वेळेचे भान कसे जपावे, हे संस्कार या बालवयात केले जातात आणि हेच फार महत्त्वाचे आहे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे, मानवी जीवनमूल्ये सर्वत्र दिसून येणे आणि आनंदाने काम करताना दिसणे ही जपान शिक्षण पध्दतीची खास
मुख्य वैशिष्ट्ये आहे. हाच प्रकार भारतीय शिक्षण पध्दतीत दिसायला पाहिजेत.तसे आपणास जाणवत नाही. येथे आपण कमी पडतो की काय असे वाटायला लागले आहे.
जपान मध्ये पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षा घेत नसल्याने तेथे विद्यार्थ्यांना भरपूर वेळ मिळतो. शिवाय परीक्षेचा आणि अभ्यासाचा कोणताच तणाव विद्यार्थ्यांवर दिसत नाही. सहाजिकच त्यामुळे विद्यार्थी स्वतःहून शाळेत १०० टक्के हजर राहण्याचा प्रयत्न करतात. यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन एक सुजाण नागरिक तयार होतो. जपान मध्ये हुशार नागरिक तयार झाल्यापेक्षा तो एक जबाबदार, सुजाण नागरिक व्हावा या कडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. उलट आपल्याकडे शाळेत विद्यार्थी हुशार कसा होईल याकडे विशेष लक्ष दिले जाते.मात्र तो एक जाणकार आणि जबाबदार नागरिक कसा तयार होईल याकडे मात्र विशेष लक्ष दिले जात नाही, मूल्याधिष्ठित शिक्षणाची धडे विद्यार्थ्यांना देणे अत्यंत गरजेचे आहे असे मला वाटते.
जपानमध्ये चौथ्या वर्गापर्यंत आनंदीदायी शिक्षण दिल्या जाते. शिवाय आयुष्यात किती व्यस्त असा, कितीही आव्हाने, दडपणे आली असली तरी त्यावर मात करून पुढे जायचे असते,असा सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे काम जपान मधील शाळेत केल्या जाते.त्यामुळे जपानी लोक कित्येक तास आनंदाने काम करताना आजरोजी आपणास दिसतात.हे जपानी शिक्षण पध्दतीचे खास वैशिष्ट्ये आहे.
वास्तविक आपल्या शाळांमध्ये नैतिक मूल्ये, सामाजिक मूल्ये, धार्मिक मूल्ये, कार्यानुभव मूल्ये, स्वच्छता मूल्ये, भावनिक मूल्ये एकूणच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ही सर्व जीवनमूल्ये आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहेत. मात्र त्याकडे बऱ्याच अंशी आणि बऱ्याच ठिकाणी दुर्लक्ष केले जाते.त्याची अंमलबजावणी योग्य दिशेने होत नाही असे मला वाटते.
आपल्या शाळेमध्ये दैनिक परिपाठ देखील होतो,पण तो परिपाठ कृतीतून, वर्तनातून विद्यार्थ्यांमध्ये दिसला पाहिजे.शाळेत शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, मूल्यशिक्षण, पर्यावरण शिक्षण , स्काऊट व गाईड,असे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहेत,हे जरी वास्तव असले तरी त्या तासिकांमध्ये ते विषय बहुधा शिकविले जात नाही,उलट अशा तासिकांमध्ये इतरच मुख्य विषय शिकवले जातात.आपला स्वतःचा विषय चांगला पूर्ण करून त्यामध्ये जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येईल याकडे शिक्षकाचे लक्ष असते.अर्थात याला अनेक शाळा अपवाद देखील असतात.
बऱ्याच वेळा शिक्षकाची श्रमप्रतिष्ठा, सार्वजनिक स्वच्छता, वृक्षारोपण, इत्यादि नैतिक मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रूजवणूक करण्याची इच्छा असते, मात्र अशावेळी विद्यार्थ्यांचे पालक आड येतात. अभ्यासासोबतच शिक्षक विद्यार्थ्यांकडून वर्गखोल्या , स्वच्छतागृह, शाळा परिसर स्वच्छ करून घेऊन स्वच्छतेची धडे देऊ इच्छितात, विद्यार्थ्यांनी स्वतः खड्डे खोदून वृक्षारोपण करणे, झाडांना पाणी देणे आणि शालेय परिसर स्वच्छ करणे अशी कामे विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने केली किंवा करून घेतली तर विद्यार्थी स्वावलंबी बनेल, भविष्यात चांगल्या सवयी लागतील.शिवाय ही भावी पिढी भविष्यात एक जबाबदार नागरिक बनतील.पण अशी ही कामे शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतली तर अशा वेळी विद्यार्थी घरी जाऊन पालकांना शाळेतील कामे करून घेतल्याबद्दल सांगतात,तेव्हा पालक रूद्र अवतार धारण करून शाळेत येतात.शिक्षकांना चांगले म्हणण्याऐवजी अपशब्द वापरून अपमानित केल्या जाते.वेळ प्रसंगी जीवे मारण्याची धमकी देखील देतात.आमचा मुलगा आमचा एकुलता एक आहे. त्याला कोणत्याही प्रकारची कामे सांगू नका, अशी शिक्षकाला धमकी देतात.अपशब्द वापरून शिक्षकांचा अपमान केल्याबद्दल अनेक शिक्षकांनी शाळेत आत्महत्या केल्याचे वृत्त पेपरमध्ये आले आहेत. आता मला सांगा , अशा वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नैतिकतेची धडे कशी द्यावीत? भविष्यात असे विद्यार्थी सुजाण नागरिक कसे तयार होतील.जपानमध्ये मात्र हुशारी पेक्षा मुलांमध्ये नैतिक मूल्ये रुजवून जबाबदार नागरिक तयार झाला पाहिजे असा आग्रह धरतात. हा फरक आहे जपान आणि भारत मधील शिक्षण पध्दतीत!.
प्रा दिगंबर कानडजे
मधुकोष निवास,सागवन-बुलडाणा