शिवरायांचा ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा

 छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा....


           भगवद्गीतेतील श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुना सांगतात की जेव्हा जेव्हा ,जिथे जिथे धर्माचरणाचा नाश होतो आणि आणि अधर्माचे वर्चस्व होते तेव्हा तेव्हा मी अवतीर्ण होतो. भक्तांचा उद्धार करण्याकरिता , दुष्टांचा विनाश करण्याकरिता आणि धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी युगात युगात प्रकट होतो . याच अर्थाने असे म्हणावे लागेल की अफजलखान ,शाहिस्तेखान ,औरंगजेब, सिद्दी , आदिलशहा व निजामशहा या सर्व सरंजामशाही मोगल मुस्लिम राजांना रयत कंटाळली होती. अगदी तावून सुलाखून निघाली होती. मोगल राजाच्या सैन्यांकडून शेतीची नासधूस होत होती. हिंदू गरीब कष्टकरी शेतकऱ्यांची लेकबाळ सुरक्षित नव्हती. सरमजामांच्या मोगलाई काळात गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. दिवसा ढवळ्या लेकींची अब्रू लुटल्या जायची. आपल्या अब्रूची झालेली माती पाहून लेकीबाळी जीव द्यायच्या.अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली होती.अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या पाच सल्तनी नेस्तनाबूत करुन ६ जून १६७४ रोजी राज्यभिषेक सोहळा घडवून आणला आणि स्वराज्याची स्थापना केली. ही आपल्यासाठी हिंदूस्थानातील जनतेसाठी अभिमानाची गोष्ट होती.

मालोजीराव भोसले आणि लखोजी राजे जाधव या दोघांचा संवाद नेहमी अत्याचार आणि गुलामगिरीवर व्हायचा . आदिलशाही कुतुबशाही आणि मोगलशाही यांनी अत्याचाराचा कळस गाठला होता . आता ही गुलामगिरी सहन करणे शक्य नाही. असे नेहमी मालोजीराव आणि लखोजीराव म्हणायचे . यांचा हा विचार राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी ऐकला होता आणि यांच्या मनात स्वराज्य निर्मिती विषयी जागृती झाली होती. हाच विचार पुढे शिवबाने घेऊन स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले आणि त्या अनुषंगाने स्वराज्य निर्मितीसाठी सगळे सोयरे आणि मावळे पंचक्रोशीतून कसे मिळवता येईल हा विचार करू लागले . गुलामगिरी झुगारून राष्ट्राला आणि रयतेला स्वराज्य मिळवून द्यायचेच हा विचार यांच्या मेंदूत भरला होता आणि त्यातून जिजाऊच्या आणि शिवबाच्या मनात स्वराज्य स्थापन करण्याचे पुल्लिंग निर्माण होऊन पेटते राहिले होते आणि त्यांनी जुलमी सल्तनी नेस्तनाबूत केल्या, विजय मिळवला आणि राज्यभिषेकाचा सोहळा स्वराज्याची राजधानी रायगड येथे केला होता.

      छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले त्यामागे त्यांचे वडील शहाजीराजे आणि आई राजमाता जिजाऊ यांची प्रेरणा होती. त्या दोघांनाही त्यांच्या घराणेशाहीकडून स्वराज्य स्थापनेचे बाळकडू मिळाले होते. दोघांचे घराण्यात दोन पिढ्यांपासून त्या दिशेने वाटचाल सुरू होती. शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता. तर सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावे, यासाठी स्वराज्य पाहिजे होते. गुलामगिरीतून सुटका हवी होती. अन्याय अत्याचार आणि आणि स्त्री जातीवरील अत्याचार थांबले पाहिजेत ,शिवाय स्त्रीला मानसन्मानाने जगता यावे यासाठी स्वराज्य हवे होते.

     छत्रपती शिवाजी महाराज रयतप्रेमी होते. शेतातल्या साध्या गवताच्या काडीला देखील धक्का लागणार नाही याची ते सैन्याकरवी काळजी घेत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही जातीभेद मानला नाही. ते सर्व जाती-धर्मातील मावळ्यांना समान वागणूक देत असत. रामोशी, कोळी, मांग,महार, माळी, कुंभार ,न्हावी ,मराठी, कुणबी, लोहार, धनगर, मुसलमान अशा विविध जाती धर्मातील लढवय्ये शिवाजी महाराजांच्या सोबत होते. ते सर्वजण शिवाजी महाराजांना प्राणापलीकडे जपत असत.

      छत्रपती शिवाजी महाराज जे करतात ते आपलेच कार्य आहे असं समजून शिवाजी महाराज जगले पाहिजे अशी भावना प्रत्येक रयतेच्या मनात होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी संवत्सर शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ रोजी स्वराज्याची राजधानी रायगड येथे पार पडला. या स्वराज्य अभिषेकासाठी काशीचे पंडित विश्वेश्वर म्हणजेच गागाभट्ट यांना बोलवण्यात आले होते यांच्या उपस्थितीत विधिवत वैदिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती महाराणी सोयराबाई आणि छत्रपती युवराज संभाजी राजे यांचा अभिषेक सोहळा गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांच्या साक्षीने पार झाला.

      रयतेला हक्काचा वाली ,आधार छत्र आणि एक विधिवत राजा मिळावा हा राज्याभिषेक सोहळ्याचा हेतू होता.

 परकीयांकडून कर मिळावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना राजेपद रीतसर बहाल व्हावे आणि राजेपदाला मान्यता मिळावी या हेतूने हा राज्याभिषेक सोहळा लाखो लोकांच्या साक्षीने ६ जून१६७४ रोजी पार पडला छत्रपती शिवाजी महाराज यांना रीतसर राजपद मिळालेले आहे याची जाणीव करून देण्यासाठी तसेच परकीय सत्ता वचकून राहावी यासाठी विदेशातील इंग्रज, डच, पोर्तुगीज, विदेशी व्यापारी आणि कानाकोपऱ्यातून श्रीमंत प्रांतातील राजे महाराजे आणि त्यांचे श्रीमंत गणमान्य व्यक्ती यांना छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याची रितसर निमंत्रण देण्यात आले होते. या सोहळ्यासाठी खास करून सर्व भागातील रयत आवर्जून उपस्थित होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोहळ्याची जवळपास जय्यत तयारी तीन ते चार महिने अगोदर चालू होती. हा राज्याभिषेक सोहळा कशा पद्धतीने करावा याची सुद्धा निश्चित अशी रीत किंवा परंपरा माहीत नव्हती. तरी विविध ग्रंथांचा अभ्यास करून राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्याचे ठरले होते. निश्चलपुरी गोसावी यांचा संस्कृत ग्रंथ "शिवराज्याभिषेक कल्पतरू " ह्याचा आधार घेण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज १२ मे १६७४ रोजी रायगडावर आले. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरला जाणे शक्य होत नसल्याने त्यांनी प्रतापगडावरील भवानी मातेला नमस्कार करून सव्वा मन सोन्याची छत्री अर्पण केली आणि भवानी मातेचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर ते लगेच २१ मे रोजी पुन्हा रायगडी परत आले. दर दिवशी विविध प्रकारचे धार्मिक विधी पार पाडण्यात आले. २८ मे ला त्यांनी प्रायचित्त घेऊन जाणवे घातले आणि वेशभूषा, आभूषणे, वस्त्रे आणि गळ्यात माळा परिधान केल्या. सकाळीच दानधर्म करून कुलदेवतांचे स्मरण करून संस्कार अंघोळ आणि गोरगरिबांना दानधर्म करून राज्याभिषेकासाठी तयार झाले. तसेच दुसऱ्या दिवशी विधीनुसार दोन राण्यांसोबत पुन्हा विवाह देखील करावा लागला होता . 

 या विधिवत राज्याभिषेकासाठी काशीचे पंडित विश्वेश्वर म्हणजेच गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना आमंत्रित करण्यात आले होते. महाराजांनी या अभिषेकासाठी ७०००होऊन गागाभट्टाला दक्षिणा म्हणून आणि इतर ब्राह्मणांना १७००० होन दक्षिणा म्हणून देण्यात होती.. सात पवित्र जल, सप्तधातू , सप्त वस्तू इत्यादी साहित्य पूजेसाठी ठेवण्यात आले होते. मंत्रोच्चार , कुलदैवत स्मरण, संस्कार, आभूषणे अशा अनेक मौल्यवान वस्तू पूजेसाठी ठेवण्यात आल्या होत्या. अष्टप्रधानंची देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी नियुक्ती केली होती. १६ सुवासिनींनी पंचारती करून महाराजांची ओवाळणी केली. पवित्र नद्याच्या पाण्याने जलाभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांचा , महाराणी सोयराबाईं आणि छत्रपती युवराज यांचा जलाभिषेक करण्यात आला. मंगलमय आणि पवित्र वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. लाल रंगाचे वस्त्र परिधान करून जडजवाहिर, अलंकार, हार आणि डोक्यात राजमुकुट घालून छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठ्या थाटामाटात राज्याभिषेक सोहळा उत्साहाच्या आणि चैतन्याच्या वातावरणात पार पडला.

 हिंदू परंपरेनुसार 32 शकुनी चिन्हांनी सजवलेले आणि 32 मन सोन्याचे सिंहासन तयार करण्यात आले होते. "शिवराज की जय" प्रत्येक गडावरून ठरल्याप्रमाणे तोफा डागण्यात आल्या होत्या. मुख्य पुरोहित गागाभट्ट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत "शिवछत्रपती" असा उच्चार केला आणि राजाला राजेपद बहाल करण्यात आले.हा एक अव्दितीय ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा होता.

     राज्याभिषेक सोहळा संपल्यानंतर ते प्रथमच घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराचे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे गेले आणि तिकडून येताना हत्तीवर स्वार होऊन रायगडावर भव्य मिरवणुकीसह आले. तसेच त्यांनी अष्टप्रधान मंडळात मंत्र्यांना विशिष्ट संस्कृत नावे देऊन त्यांना पदे आणि अधिकार बहाल केले. शिवाय ही पदे वंशपरंपरागत न ठेवता ती मंत्र्यांच्या कर्तबदारीवर ठेवण्यात आली होती असे करण्यामागे जेणेकरून कोणीही वारसा हक्क दर्शवणार नाही ही राजनिती होती. त्यांची एक आदर्श भूमिका होती. खरोखर ते एक रयतप्रेमी आणि आदर्श राज्यकर्ते होते. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा हा मराठी मुलखात एक नवचैतन्याचा सोहळा होता. इतिहासातील एक व्यापक आणि ऐतिहासिक प्रसंग होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती पद हे धारण केले होते. छत्रपती म्हणजेच सार्वभौम आणि सर्वेसर्वा एक छत्री कारभार करणारा असा होतो.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकानित्ताने त्या विनम्र अभिवादन!!


# प्रा दिगंबर कानडजे,

मधुकोष निवास, सागवन-बुलडाणा.

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत