अशोकराव देशमुख - एक भला माणूस

   

            अशोकराव देशमुख सर : एक भला माणूस

           ------------------------------------------------------

              देशमुख सरांचे संपूर्ण नाव अशोक त्र्यंबकराव देशमुख असून त्यांचा जन्म सहा जुलै 1966 रोजी शेलगाव मुकुंद येथे झाला. त्यांचे बालपण साखळी बुद्रुक येथे गेले, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांनी श्री शिवाजी हायस्कूल रायपूर येथे पूर्ण केले. आर्थिक परिस्थितीमुळे यांच्या संपूर्ण कुटुंबाला चरितार्थ चालवण्यासाठी सातगाव भुसारी येथे नाईलाजास्तव जावे लागले. देशमुख सरांचे वडील शिक्षक होते,तर एक काका फौजी होते.बाकी दोन काका शेतकरी होते. कष्ट मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही याची त्यांना जाणीव होती. या जाणीवेतूनच अशोकराव देशमुख सरांनी कमवा, काटकसर करा आणि शिक्षण घ्या, या तत्त्वानुसार त्यांनी मलकापूर येथे शिक्षण घेतले आणि चांगली मेहनत घेऊन सन १९८३ साली एमईएस हायस्कूल मलकापूर येथून बोर्डाची परीक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण केली.

            त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षण घेत असताना त्यांना त्रास झाला. सुगडी खाऊन, शाळेत दूध घेऊन त्यांनी बरेच काही भागविले. शिवाय त्यांना गणित न आल्यामुळे खूप छड्या देखील खाव्या लागल्या. इतरांची बरीच कामे करून देणे हा त्यांचा आवडता छंद होता.त्यामुळे त्यांना गणित या विषयात इतर मुलांनी सहकार्य केले. समाजसेवा करण्याचे बाळकडू त्यांना प्राथमिक शिक्षणापासून मिळाले ,ते आजतागायत टिकून आहे हे विशेष. त्यांच्या वडिलांची नोकरी खूप काळ रायपूर येथे गेली. साहजिकच ते रायपूर येथे रमले आणि कायमचे स्थायिक झाले.

            वडील शिक्षक असल्यामुळे शिक्षक होण्याचे त्यांनी पसंत केले आणि सन 1985 मध्ये यशवंत अध्यापक विद्यालय बुलढाणा येथे त्यांनी डीएड चे शिक्षण पूर्ण केले.एसएससी डीएड झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी शिक्षकांच्या नोकऱ्या उपलब्ध होत्या. परंतु विशेष मार्गदर्शन नसल्यामुळे नेमकं काय करावं? आणि कुठे जावे? हे कळत नव्हते.,, संत ज्ञानेश्वर विद्यालय पेठ येथील शाळेची जाहिरात पाहून तेथे नोकरी करावी हे निश्चित केलं.सन 1985 ते 1988 या कालावधीमध्ये पेठ तेथे तीन वर्षे सहाय्यक शिक्षकांची नोकरी त्यांनी प्रामाणिकपणे जीव ओतून केली.त्या शाळेत फार मोठे वृक्षारोपणाचे काम त्यांनी हाती घेतले.नुसती झाडेच लावली नाही तर एका रेषेत पाण्याचा दांड काढून प्रत्येक झाडाला पाणी पाजले, तेव्हा कुठे ती झाडे जगली. परंतु खूप काही करूनही नाव नाही, हे त्यांच्या लक्षात आले आणि तेथे विशेष समाधान न झाल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडून दिली.                                             

            एक दिवस भाग्याचा दिवस उजाडला आणि अशोकराव १५ जुलै 1990 पासून खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत लोणार तालुक्यातील पांग्रा (डोळे) या आडवळणी खेड्यात जिल्हा परिषद शिक्षक म्हणून रुजू झाले.या क्षणी त्यांना जो काही खूप आनंद झाला तो अवर्णनीय होता.पाच वर्ष पांग्रा येथे मनोभावे शाळा हे विद्यामंदीर मानून विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी ते अहर्निश झटत राहिले आणि त्या शाळेला ISO नामांकन मिळवून दिले. ही खरी त्यांच्या चांगल्या कार्याची पावती आहे असे मला वाटते. ‌

             त्याकाळी महिलांना शिकण्याची विशेष सोय नव्हती. तरीही अशा परिस्थितीत जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वाढोणा येथील मदनराव तनपुरे यांच्या छाया नावाच्या मुलीशी अशोकरावांचा विवाह सन १९९१ मध्ये अगदी साध्या पद्धतीने पार पडला. छायाताई बीएडीएड असल्याने त्यांना लग्नापूर्वीच शिक्षिकेची नोकरी लागलेली होती. छाया ही अशोकरावांच्या जीवनात आली आणि ते खरोखर गारेगार झाले. या माऊलीची छाया त्यांच्या आयुष्यावर पडली आणि ते टप्प्या टप्प्याने लक्ष्मीपती झाले. ही सर्व छायाचीच कृपा म्हणावी लागेल असे म्हटले तर वावगे ठरू नये असे मला वाटते.आजरोजी छायाताई देशमुख दाभा येथे गेल्या अनेक वर्षांपासून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे.तसेच त्यांना शिक्षकी पेशाबददल नितांत आदर आहे.

       शासकीय नोकरी म्हटले की बदली ही ओघाने आलीच. त्यामुळे देशमुख सरांची बदली सन १९९५ मध्ये भडगाव येथे झाली. जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा भडगाव या शाळेला दैवत म्हणून त्या शाळेच्या विकासासाठी सदैव झटत राहिले.तेथे कासोद सरांच्या मदतीने जवळपास 40 विद्यार्थ्यांना त्यांनी वेळ देऊन सतत तीन महिने पोहणे शिकविले. आज ते विद्यार्थी फार मोठे झाले असून जेथे जेथे योगायोगाने भेटतात तेव्हा तेव्हा देशमुख सरांचा चारचौघात आवर्जून उल्लेख करतात, खऱ्या अर्थाने हाच त्यांना आदर्श पुरस्कार दिल्यागत वाटते. सर बदलीवर जेथे जाईल तिथे ही माझी शाळा आणि त्या शाळेला उन्नत करणे हा माझा धर्म आहे असे समजून देशमुख सरांनी प्रामाणिकपणे काम केले आहे.

             १० वर्षांनंतर भडगाव मायंबा येथून दुसऱ्या शाळेच्या विकासासाठी देशमुख सरांची बदली सन २००५ मध्ये पळसखेड भट येथे करण्यात आली. तेथे जवळपास अकरा वर्षे नोकरी करण्याची संधी त्यांना मिळाली. या दरम्यान शाळेला कंपाउंड वॉल, शाळेला एक चांगले मैदान, एक भव्य गेट तयार करण्यासाठी गावातील पालकांचे सहकार्य घेतले. शैक्षणिक उठाव केला. सहकार चळवळीतून त्यांनी किती काम फुकट आणि लवकर होऊ शकते याची प्रचिती त्यांना आली.गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि इतर पालकांना तसेच गावातील तरुण युवकांना विश्वासात घेतले तर फार मोठी प्रगती गावाची आणि शाळेची होऊ शकते हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. मैदानाचे मुरूम टाकून सपाटीकरण केले. त्यामुळे "माझी शाळा सुंदर शाळा" एक अभियान चळवळ सुरू झाली. मुलं तणावविरहित आणि हसत खेळत शिक्षण घेऊ लागली. हे आपल्या कार्याचे खरे फलित आहे असे आम्हा सर्वांना वाटू लागले.

            देशमुख सरांच्या नोकरीचा प्रवास हळूहळू घाटावरून घाटाखाली सुरू झाला. दाभा, तालुका मोताळा येथे शिक्षक म्हणून त्यांनी काळ नोकरी केली आणि लगेच त्यांच्या चांगल्या कामासाठी पावती म्हणून देशमुख सरांना मुख्याध्यापक म्हणून नळकुंड येथे प्रमोशन मिळाले. तेथे त्यांना बरेच काही शिकायला मिळाले. खूप काही प्रशासकीय अनुभव आला. तणावरहित जीवन जगण्याचा मूलमंत्र त्यांनी सर्वांना दिला आहे. आनंदी रहा, सुखी रहा आणि निरंतर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, असे साधे सोपे हे देशमुख सरांचे तत्वज्ञान आहे.

         देशमुख सर- एक संयमी,शांत, समाजाभिमुख, निरागस, निर्मळ मनाचे,सदैव आनंदी असणारे प्रसन्न असे व्यक्तिमत्त्व आहे. ते नेहमी समाजकार्यात, शैक्षणिक कार्यात नव्हे सगळ्या गल्लीमध्ये काम करण्यासाठी जातीने हजर असतात. ते पूर्णवेळ व्यस्त असतात. पक्षी, प्राणी ,झाडे ,डोंगर ,माती ,शेती, घरातील लहान लेकरं , प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यामध्ये रमणारे देशमुख सर लहानपणापासूनच संवेदनशील आणि कनवाळू आहे. लहान मुलासारखी त्यांच्या मनाची निरागसता आहे. सदा आनंदी राहायचं, दुसऱ्यांवर माया करायची, संकटं अंगावर ओढवून दुसऱ्याचा जीव वाचवायचा हे त्यांचे गुण खरोखर वाखाणण्याजोगे आहे. 

         गरिबी फार वाईट असते हे त्यांनी जवळून अनुभवले होते . गरिबांना मदत करण्याचा  त्यांना लहानपणापासूनच लळा लागलेला आहे.. वास्तविक देशमुख मंडळी ही गढीवर राहणारी मंडळी होती. आजही काही ठिकाणी त्यांचे गढीवर वास्तव्य आहे. गढी जरी खचली असली तरी रुबाब मात्र अनेकांचा तसाच कायम आहे. मात्र देशमुख सर त्याला अपवाद आहे. ते त्यातले नाही. त्यांना गढीतील देशमुखी थाटाचा गर्व नाही.अहंकार नाही. खऱ्या अर्थाने ते एक भला माणूस आहे हे मला लक्षात आले. ते निर्विकार, शांत , संयमी आणि इतरांना गप्पात गुंगवून ठेवणाऱ्यांपैकी एक आहे. त्यांचा समजून सांगण्याचा हातोटा वेगळा आहे. ते जीवनातील चढउतार कसे असतात, हे जीव तोडून समजून सांगतात.जीवन जगत असताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे असे त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे. अशा विचारातून माणसाला जीवन जगण्यासाठी बळ मिळते.

         अशोकराव देशमुख सरांनी 58 वर्ष पूर्ण केलीअसून त्यांनी जवळपास ३९ वर्षे शिक्षकाची प्रामाणिकपणे निष्कलंक सेवा केली आहे.आज ते नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले असले तरी देशमुख सर शरीराने थकलेले नाही. मनाने आणि विचाराने देखील थकलेले नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील तेज, निरागसपणा आणि आनंद आजही ओसंडून वाहतो आहे. आज ते सेवानिवृत्त झाले आहे. त्यांनी आता स्वतः ला समाजकार्यात चांगले गुंतवून ठेवावे असे मला वाटते.

# प्रा डी एम कानडजे, मधुकोष 

सागवन-बुलडाणा .(भ्रमणध्वनी-८२७५२३१८७४)

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत