दिनकरराव चिंचोले- एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व

  अदिती अर्बन चे उपाध्यक्ष : दिनकरराव चिंचोले- एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व 

         दिनकरराव चिंचोले यांचा जन्म चिखली शहरापाससून 4 कि.मी.अंतरावर जागृत मारोती संस्थान असलेल्या मालगणी येथे २५ नोव्हेंबर १९५६ रोजी एका छोटयाशा खेडयात झाला.आई वडिलांची गरिबी असल्यामुळे दररोज मोलमजुरी करणे आवश्यक होते. आई वडील निरक्षर होते.परंतु विचाराने व संस्काराने ते शिक्षणापेक्षा एक पाऊल पुढे होते.त्यांना तीन भाऊ होते.त्यांचे वडील अल्पभुधारक शेतकरी असून ते मोलमजुरी करून घरप्रपंच चालवित असत. पूर्वी सालाने राहण्याची पध्दत होती.त्यांच्या वडिलांनी चिखलीचे माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या आजोबाच्या घरी जवळपास वीस वर्ष सालाप्रमाणे कामधंदा केलेला आहे.तीन भावंडामध्ये सुरुवातीपासुनच दिनकरराव शाळेच्या प्रत्येक वर्गामध्ये चांगल्या गुणानी पास होत असे. त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण मालगणी येथे झाले तर सहावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद हायस्कुल सावरगावं डुकरे येथे झाले. 

        त्याकाळात सावरगाव डुकरे हे महाराष्ट्रातील आदर्श गाव म्हणून प्रसिध्द होते. आजही ते टिकून आहे.संतोषराव पाटील आमदार असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नेते मंडळीनी सावरगावला भेटी दिलेल्या आहेत. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण,शरद पवार,मधुकरराव चौधरी,बाळासाहेब भारंबे,रत्नाअप्पा कुंभार, वसंतराव नाईक, खा.पढंरीनाथ पाटील, शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख तसेच नामवंत राजकीय,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तिंची मांदीयाळी सावरगाव डुकरे येथे होत होती.या सर्वांचे विचार त्यांना ऐकण्याची संधी मिळाली. इयत्ता 5 वी मध्ये दिनकररावांचा प्रथम क्रमांक आला.साहजिकच अनपेक्षितपणे ते भारावून गेले. त्यांना याहीपेक्षा जास्तीचा अभ्यास केला पाहिजे याची जाणीव झाली.प्रथम क्रमांकाच्या मित्ताने सार्वजनिक मंचावर बाबासाहेब पाटील, त्रयंबकराव पाटील बामखेड मुख्याध्यापक यांनी दिनकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करुन बक्षिस दिले. या बक्षिसातून आणि मिळालेल्या शाबासकीतून त्यांना खूप अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली.आता पुढे जाण्यासाठी ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये शिक्षणासाठी जावे असा विचार त्यांच्या मनात आला. वडिलांनी आणि तसेच शाळेतील शिक्षकांनी चिखली येथील श्री शिवाजी हायस्कूलला इयत्ता ७ वी मध्ये प्रवेश घेऊन दिला. सन १९७४ पूर्वी वर्ग ९ मध्ये विज्ञान, गणित, वाणिज्य, कला या शाखेमध्ये प्रवेश घ्यावा लागत असे. इतर हुशार मित्रांनी गणित विषय निवडला होता तेव्हा चिंचोले सरांनी देखील त्यांच्या सोबत गणित विषय निवडून अभ्यासाला सुरुवात केली.जेथे खाण्याची सोयच नव्हती तेथे गणित विषयाची शिकवणी लावणे त्यांच्यासाठी कठीण होते.

              मालगणीवरुन ४ कि.मी. दररोज येणे- जाणे अशा परिस्थितीत हायर सेंकडरीसाठी दररोज नित्यनियमाने अभ्यास करणे  क्रमप्राप्त होते. सुटीच्या दिवशी दुस-याच्या शेतावर मजुरी साठी जाणे हे नित्य नियमाचे काम होते.शिक्षणासाठी आर्थिक अडचण वडिलांना जाणवत असे. परंतु समाजात चांगले संबंध असल्यामुळे आबाना म्हणजेच वडिलांना प्रत्येकजण उसनवारी स्वरुपात मदत करीत असत. आबा तुमचा मुलगा दिनकर हुशार आहे. त्याला चांगले शिकवा. तुमचे दारिद्रय तो नष्ट केल्याशिवाय राहणार नाही,असा सल्ला गावातील शामराव गुरुजी, सखाराम पाटील,गोपाळराव मामा ही मंडळी आबांना देत असत.

         चिखली येथील श्री शिवाजी विदयालयात शिक्षण घेत असताना माजी खा.पढंरीनाथ पाटील यांचा अमृतमहोत्सव पाहण्याचा योग सरांना आला. विविध उपक्रमामुळे सरांचा व्यक्तिमत्वाचा विकास होत गेला.कोणत्याही कार्यक्रमात ते आपले भाषण करण्यासाठी भाग घेऊ लागले.त्यांना १९७५ ला वर्ग ११ वी मध्ये प्रथम श्रेणीत येण्याचा मान मिळाला. आजही शिवाजी विदयालायाच्या गुणवंत विद्यार्थी यादीमध्ये सरांचे नाव बोर्डवर पाहायला मिळते. पुढील उच्चशिक्षण घेण्यासाठी  कै.पंढरीनाथ पाटील यांनी स्थापन केलेल्या शिवाजी विज्ञान व कला महाविदयालयामध्ये प्रवेश घेतला. कठोर परिश्रम आणि रात्रंदिवस अभ्यास करून सरांनी बीएस्सी (गणित) ही पदवी मालगणी येथून काॅलेज मध्ये पायी चालत जाऊन व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण केली.त्याकाळी कला व वाणिज्य या शाखांपेक्षा गणित विषयाच्या पदवीधर शिक्षकाला नोकरीत खूप संधी होती..

          सन १९८० मध्ये गजानन महाराज विदयालय काटेपूर्णा जि.अकोला येथे सरांची प्रथम नियुक्ती गणित शिक्षक म्हणून बी.एड. नसतांना देखील झाली.नोकरी मिळाल्याचा आनंद कुटुंबाबरोबर गावालाही झाला. सरांच्या शिक्षणामुळे त्यांच्या काकाची मुले रमेश आणि राजेंद्र हे पण पदवीधर झाले. एकूणच गरिबीतील मंडळी शिक्षण घेऊन पुढे आली होती. शिक्षकांच्या नोकरीसाठी बीएड होणे अनिवार्य असल्याने त्यांनी बीएड होण्यासाठी अर्ज केला आणि दिनकरराव चिंचोले सरांनी बी.एड.शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलडाणा येथे १९८२ मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले. परत त्याच शाळेत ते पुन्हा नोकरीत रुजू झाले.

           त्याच काळात शरद पवार, राजारामबापू पाटील, यांची पायी शेतकरी दिंडी नागपूर कडे आली होती.ती पाहण्याचा योग आला. तसेच मूर्तिजापूर येथे संत गाडगेबाबा विद्यालयात ग.प.प्रधान, लक्ष्मणशास्त्री जोशी, इ. मान्यवरांचे विचार ऐकायला मिळाले. आदर्श व्यक्तींची छाप त्यांच्या विचारावर पडली.त्यामुळे सरांचे विचार सुध्दा त्याकाळी सुदृढ झाले. वसंतराव धोत्रे,महादेवराव भूईभार,बाळासाहेब देशमुख, रामभाऊ सालकुटे, टी.बी.देशमुख यांच्या मार्गदर्शनाचा देखील त्यांना लाभ मिळाला. खाजगी शाळांपेक्षा जिल्हा परिषद शाळेतील नोकरी करणे मानाचे मानले जायचे आणि म्हणून त्यांनी बुलढाणा जिल्हा परिषद मध्ये गणित शिक्षक म्हणून लाखनवाडा येथे १९८३ मध्ये ते नोकरी धरली.लव्हाळा येथील लहाने कुटुंबातील कमलबाई याच्यांशी सरांचा विवाह झाला. सन १९८६ ला सरांची जि.प.हायस्कूल धाड येथे बदली झाली. धाड येथील जिल्हा परिषद शाळा ही त्या परिसरातील सर्वात मोठी शाळा म्हणून नावलौकिकास होती. देठे सर, कासारे सर,एस.एस.राजपुत,किनगे सर,मेढे सर,सदाफळे सर,घिर्णीकर सर या आदर्श मुख्याध्यापकांच्या सोबत काम करण्याची त्यांना संधी मिळाली.

 बाल विज्ञान परिषद यांच्या व्दारे प्रतिवर्ष प्रोजेक्ट सादर करणे, विदयार्थ्याचा सहभाग घेणे जीव ओतून काम करणे, दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा महोत्सव आयोजित करणे, अध्यापन कार्य चांगले असणे अशा विविध उपक्रमांमुळे ह्या शाळेला राज्य स्तरावर प्रथम क्रमांक आणि राष्ट्रीय स्तरावर देखील प्रथम क्रमांक मिळाला .यामुळे जि.प.हायस्कुल धाड या शाळेचे नाव सर्वत्र 'उपक्रमशील शाळा' म्हणून झाले.त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी या शाळेला पत्र पाठवून अभिनंदन केले होते.. पत्रकार प्रमोद बोर्ड,महेंद्र बोर्डे यांनी डी एच चिंचोले सरांना मोलाचे सहकार्य करुन उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रोत्साहित केले.जिल्हा परिषदचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी २००१ साली चिंचोले सरांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या उत्कृष्ट कामामुळे त्यांना दोन वेतनवाढी देण्यात आल्या.शिवाय स्काऊट गाईडमध्ये मुख्यालय आयुक्त म्हणून सतत १० वर्ष काम करण्याचा बहुमान मिळाला होता. विविध उपक्रमामध्ये सहभाग आणि उत्कृष्ट अध्यापन कार्य असल्याने सन २००१ ला जिल्हापरिषद हायस्कूल बुलढाणा येथे बदली झाली. त्यांचे संघटन कौशल्य, प्रामाणिकपणा ,नेतृत्व शैली आणि दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडणे या गुणांमुळे भाऊसाहेब प्रतापराव सपकाळ यांनी निवड जि.प.माध्य शिक्षक संघटना अध्यक्षपदी केली. सर्व जिल्हामध्ये संघटनेचे काम करण्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.

           अनेक विद्यार्थी इंजिनिअर,डॉक्टर,शिक्षक,वकील राजकिय,सामाजिक कार्यकर्ते तयार करण्याचा आनंद आजही जीवनात येत आहे. सन१९०८ मध्ये जिल्हा परिषद हायस्कूल देऊळघाट येथे मुख्याध्यापक पदावर पदोन्नती झाली.जिल्हा परिषद हायस्कूल देऊळघाट ही मराठी आणि उर्दू माध्यम असलेली विद्यार्थी संख्येनुसार सर्वांत मोठी शाळा होती. इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग असल्याने एकूण चाळीसचा स्टाफ, दोन शिफ्ट शाळा, थोडक्यात मोठया आस्थापनेवर काम करण्याचा अनुभव सरांना आला. सेवाज्येष्ठतेनुसार २०११ मध्ये गटशिक्षणाधिकारी या पदावर जिल्हा परिषद जालना येथे पदोन्नती झाली.चार वर्षात चांगला प्रशासकीय अनुभव आला होता .

        भोकरदन, वालसावंगी, येथे काम करण्याची संधी प्राप्त झाली. २०१४ ला ते सेवानिवृत्त झाले. जिल्हा परिषद हायस्कूल धाड येथे काम करीत असताना सुरेश देवकर यांची जिल्हा बदली म्हणून सेवेत त्यांना रुजु करुन घेतले. धाड येथे असताना मोठा स्टाप, चांगला परिसर याचा अनुभव घेवून देवकर सरांनी २००३ मध्ये अदिती अर्बन ची स्थापना बुलढाणा येथे सुरुवातीला चिंचोले सरांच्या निवास्थानी केली. संघटनेचे काम, आदर्श शिक्षक, 32 वर्षाची सेवा, विज्ञान शिक्षक संघटनेचे काम, विविध जिल्हास्तरीय उपक्रम याव्दारे माझे नाव सर्वश्रुत होते. अदिती अर्बन मध्ये मला सरांनी प्रथम संचालक, नंतर कार्यकारी संचालक तर आजरोजी उपाध्यक्ष हे पद दिले आहे. राज्यभर पतसंस्थेच्या माध्यमातून आजतागायत काम करण्याची, पतसंस्थेच्या विकासात भर घालण्याची संधी संस्थापक अध्यक्ष सुरेश देवकर सरांनी डी एच चिंचोले यांना दिली आहे. राज्यस्तरीय गौरव पुरस्कार, 58 शाखा, सहाशे कर्मचारी, सातशे कोटी ठेवी, मोठा व्याप हाताळण्याची संधी देवकर सरांनी दिनकरराव चिंचोले यांना दिलेली आहे. " दिनकरराव चिंचोले सर,तुमची एक दिवस अदिती अर्बनचे पितामह म्हणून ओळख होईल,असे उद्गार संस्थापक अध्यक्ष सुरेश देवकर यांनी काढले आहे. तेव्हा हा माझा शैक्षणीक, सामाजिक,सहकार क्षेत्रातील निश्चीतच मी गौरव समजतो,"असे प्रतिउत्तर डी एच चिंचोले सरांनी त्या प्रसंगी दिले. तसेच सन २००५-७ या कालावधीमध्ये ते जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष देखील होते. व्यक्तीचित्र,लेख, प्रासंगिक,अशा अनेक बाबींवर चिंचोले सर वृत्तपत्रात लेखन करत असतात.एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे त्याच्या पत्नीचा हात असतो, दिनकरराव चिंचोले यांचे यशात सौ कमलबाई यांचे मोलाचे योगदान आहे,यात शंकाच नाही.

       दिनकररावांना तीन मुले आहेत. प्रथम निलेश हा एम.ए.बी.एड. असून तो जिल्हा परिषद(माध्य शिक्षण) मध्ये नोकरी करतो. त्याची पत्नी वर्षा बी.ए.बी.एड.आहे. व्दितीय पुत्र योगेश बी.ई.एम.एफ.ए. असून तो अहमदाबाद येथे चांगल्या कंपनीत नोकरी करतो आहे. तर त्याची पत्नी पुनम बी.एससी (ॲग्री) एम.बी.ए आहे. तृतीयरत्न श्रीकृष्ण असून तो बी.एस.सी(गण‍ित)आहे.सध्या तो शिक्षक म्हणून काम करतो आहे. हे सर्व कुटुंब केलेल्या चांगल्या कर्तृत्वाची चांगली फळे चाखत आहे असे मला वाटते.

  #. प्रा डी एम कानडजे ,मधुकोष  

       सागवन-बुलडाणा (८२७५२३१८७४)     























































Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत