साहित्यिक मांगीलाल राठोड

सामाजिक भान असलेले कवी : मांगीलाल राठोड

-----------------------------------------------------

            मांगीलाल हरसिंग राठोड यांचा जन्म ७ जून १९६२ रोजी देऊळगाव साकरशा, तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या गावी झाला. मांगीलाल यांच्या वडिलांचे नाव सोमला भीमला राठोड तर आईचे नाव पिपळी आहे.मांगीलाल हे मय्यत मोठेबाबा हरिसिंग राठोड यांचे दत्तकपुत्र आहे.त्यांचे प्राथमिक शिक्षण देऊळगाव साकरशा येथे झाले.चाळीस घरांच्या तांड्यातून पहिलीत २४ मुले दाखल झाली होती.दरवर्षी गळती लागून शेवटी चौथीपर्यंत एकच विद्यार्थी उरला होता आणि तो म्हणजे एकटेच मांगीलाल राठोड हे होत.

मांगीलाल राठोड म्हणतात की " मी शिक्षण घेऊ शकलो नसतो.पण तांडयातील एक गाणं माझ्या कानावर पडले,

           ' जोरे धोंड्या जोरे,तू शाळेमाही जोरे l

            कोणी जातो बा मन मास्तर मारलं छ रे ll '

हे गाणं ऐकून मला शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली " असे ते म्हणतात.'उठाव नारा' म्हणजे 'शैक्षणिक उठाव' हे गाणे तांड्यावर राहणाऱ्या सर्व पोरापोरींच्या तोंडी गुणगुणत होते.

         आता पोराची शिक्षण घेण्याची धडपड पाहता त्यांच्या वडिलांनी सरस्वती विद्यालय देऊळगाव साकरशा येथे ५ वी ते ७ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मांगीलाल यांना तारेवरची कसरत करावी लागली.ए.के नॅशनल हायस्कूल खामगाव येथे खाजगी वसतिगृहात राहून त्यांनी सन १९७९ मध्ये मॅट्रीकची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली.आईवडिलांना जे कष्ट करावे लागले ते त्यांच्या लेकरांना करावे लागू नये म्हणून वडिलांनी जमीन गहाण ठेवून मांगीलाल राठोड यांना शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय खामगाव आणि नागपूर येथे पाॅलिटेकनिक करण्यासाठी पाठविले. जिद्द,चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करून त्यांनी डिप्लोमा (सिव्हील) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केला.अत्यंत बिकट परिस्थितीत मांगीलाल राठोड यांना शिक्षण घ्यावे लागले.एकच ड्रेस धुवून तो आठवडाभर वापरला. 

         त्यांचे शिक्षण बऱ्यापैकी असल्या कारणाने त्यांना बांधकाम विभागात सिंदखेडराजा आणि देऊळगावराजा या दोन तालुक्यांकरिता सन १९८४ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून नियुक्ती मिळाली. अवघ्या बाविसाव्या वर्षी ही नोकरी लागल्यामुळे त्यांच्या आईवडिलांना जो काही आनंद झाला होता,तो अतिशय अवर्णनीय होता.त्यांनी केलेल्या कष्टाचे चीज झाले होते.हरसिंग राठोड यांचा पोरगा नोकरीवर लागला.त्याकाळी नोकरीला लागलेला नवरदेव मिळणे हे भाग्य समजले जाई.नोकरी लागल्यानंतर तीनच महिण्यात यशोदा नामक मुलीशी त्यांचा विवाह जुळवून आला.यशोदा ही शालीन, रितीरिवाजाने वागणारी आणि आपल्या संस्कृतीला जपणारी होती.तिने संपूर्ण संसाराचा भार उचलला म्हणून ते चांगली नोकरी करू शकले, वाचन लेखन करण्यासाठी वेळ देऊ शकले. ".खरोखर माझ्या यशात तिचा खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा आहे आणि मी म्हणून आज मी साहित्यिक बनू शकलो,"असे म्हणतात.

      शासकीय नोकरी म्हटले की बदली ही आलीच.तेव्हा मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा,चिखली, बुलडाणा अशा ठिकाणी त्यांची बदली होत गेली. विशेषतः ग्रामीण भागात जोड रस्ते तयार करणे, सरकारी इमारती बांधणे, सरकारी दवाखाने आणि शाळा बांधणे ही कामे त्यांच्याकडे असल्यामुळे विविध समाजातील कला, संस्कृती, परंपरा व लोकसाहित्याचा अभ्यास यातून त्यांना करता आला.राजकारण,समाजकारण,आर्थिक उलाढाली,धर्मकारण इत्यादि विषयात मांगीलाल राठोड खोलवर उतरत गेले. त्यांना या कला कौशल्याचा ठाग आणता आला. ग्रामीण संस्कृतीचा बारकाईने अभ्यास करताना ग्रामीण भागातील बेरकी मंडळी विकासाच्या कामात कसे अडथळा आणू शकतात याचा त्यांनी जवळून अनुभव घेतला आहे.लोकांची मने सांभाळून लोककर्माची कामे झाली पाहिजेत, हे त्यांचे ध्येय होते आणि ते त्यांनी साध्य करून दाखवले. 

     त्यांच्या नोकरीच्या कामाचे स्वरूप भौतिक सुविधांशी निगडित असल्यामुळे त्यांना ग्रामीण जीवनाचा अभ्यास करण्याची आयती संधी चालून आली. या अनुभवातून त्यांना कविता लिहिण्याचा छंद जडला.तशी त्यांना शालेय जीवनापासून वाचन लेखन करण्याची आवड होती. तेव्हा या वयापासूनच त्यांची कविता मुळ धरून होती. साहित्य क्षेत्रात काहीतरी आगळं वेगळं करावसं वाटू लागलं.साहित्यिक प्रा सदानंद देशमुख,कवी अजीम राही, शिवाजीराव जवरे, हिंमत शेकोकार,वामन तेलंग,रमेश इंगळे, पद्मश्री नामदेव कांबळे, गोविंद गायकी, नागेश कांगणे,लोकनाथ यशवंत, शिवराम भोंडेकर हे मांगीलाल राठोड त्यांचे सहप्रवासी होते.अशा लोकांचा संपर्क त्यांना प्रेरणादायी ठरला आहे.

        सन १९९७ मध्ये ' बंजारा हिल्स ' नावाचे अनियतकालिक त्यांनी चालू केले. पुढे २००१ मध्ये त्यांनी दुसरे 'गोरनायक ' हे त्रैमासिक नव्या दमाने सुरू केले. पण साहित्याच्या अभावामुळे त्यांचे सातत्य टिकविता आले नाही.बंजारा लोकसाहित्य संकलनाकरिता कर्नाटक,आंध्रप्रदेश,तेलंगणा,मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील मराठवाडा,खानदेश,विदर्भ असा प्रवास केला असता हे लोकसाहित्य लोप पावत चालले आहे,असे त्यांच्या निदर्शनास आले आहे.आता त्याचे अर्थासहित संपादन करून ऐतिहासिक दस्ताऐवज बनवण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

        कविता या साहित्य प्रकारात त्यांना रूची असल्या कारणाने त्यांनी खूप मेहनत घेऊन 'मुनादी' नावाचा मराठी काव्यसंग्रह सन २०१९ मध्ये प्रकाशित केला.तो वाचकांना खूप आवडल्यामुळे त्यास एकूण १४ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहे.

          त्यांनी नोकरी करून फार मोठी कौटुंबिक जबाबदारी पार पाडली आहे.त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे.मुलगी बीएस्सी बीएड असून जावई विक्रीकर अधिकारी आहे. मोठा मुलगा एम‌.टेक.असून स्पर्धा परीक्षा देऊन अकोला येथे वनसंरक्षक -वर्ग १ या पदावर काम करतो आहे.तर धाकटा मुलगा स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी घेऊन रत्नागिरी येथे 'स्थापत्य अभियंता' म्हणून पाटबंधारे विभागात नोकरीला आहे. या सर्व जबाबदारीतून मांगीलाल राठोड मुक्त झाल्यामुळे त्यांना आता वाचन लेखन करण्यासाठी निवांत वेळ मिळाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये असे मला वाटते.

      मांगीलाल राठोड हे प्रदीर्घ ३६ वर्षे सेवा करून सन २०२० मध्ये सेवानिवृत्त झाले. एक लोककर्मीक म्हणून महाराष्ट्र शासन आणि ग्रामीण भागातील समाजामध्ये विशेष जाणिवेने सेवा दिली. आपल्या आयुष्यातील शेवटचे दहा वर्षे त्यांनी शासनाचा निधी तीर्थक्षेत्र आणि पर्यटन विकास या कामासाठी वापरला आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने नंबर एकचे तीर्थक्षेत्र बनविण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. " गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळ,सैलानी दर्गा,मर्दडी देवी, रुईखेड मायंबा,सप्तर्षी पैकी इसवी,डोंगरशेवली येथील सोमनाथ मंदीर अशा अनेक धार्मिक स्थळांचे बांधकाम आणि सौंदर्यीकरण शासननिधीतून करून घेण्याचे काम मला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो." असे ते म्हणतात.

      एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी तांड्यावर राहणाऱ्या मुलामुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली आहे. समाजातील उपवर मुलामुलींचे विवाह जुळवून आणली आहे. वडिलांकडे आठ एकर जमीन होती,ती प्रपंच चालवण्यासाठी कमी पडत होती म्हणून ती वाढवून बावीस एकर करून दिली आहे.जवळपास सर्वच जमीन ओलिताखाली आणली आहे.त्यामुळे ते सुद्धा उर्वरित आयुष्य सुखाने आणि समाधानाने जगत आहे. मांगीलाल राठोड हे एक सामाजिकभान आणि साहित्याची जाण असलेले चांगले लोककर्मीक आणि कवी आहे.त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

   #. प्रा डी एम कानडजे, मधुकोष 

       सागवन- बुलडाणा (८२७५२३१८७४)

      


     

 


     

   


 


Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत