डॉ विकास बाहेकर - एक सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व

   डॉ.विकास बाहेकर - एक सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व

         डॉक्टर विकास आत्माराम बाहेकर हे एक बुलढाणा शहरातील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ असून एक चांगले साहित्यिक कीर्तनकार प्रबोधनकार आणि प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचा जन्म पिंपळगाव उंडा या मामाच्या गावी आठ डिसेंबर १९६४ रोजी झाला. सध्या त्यांचे वास्तव्य यशवर्धन निवास बसस्टँडमागे बुलढाणा येथेअसून ते सातत्याने वैद्यकीय सेवा आणि कीर्तन प्रवचन यामध्ये सदैव मग्न असतात. वेळेचे नियोजन ते अशा रीतीने करतात की त्यांची संपूर्ण दैनंदिनी त्यांच्या वेळापत्रकानुसार चालते.

      त्यांच्या आईचे नाव प्रमिला आणि बाबाचे नाव आत्माराम अर्जुन बाहेकर असे आहे.त्यांच्या आईचे प्राथमिक शिक्षण झाले असून वडिलांचे शिक्षण बीएससी (कृषी) बीएड होते.त्यांचे आजोबा ह.प. वैकुंठवासी साहेबराव बापू काळे महाराज असून ते कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होते. 

त्यांच्याच कार्याचा वसा डॉ विकास बाहेकर या नातवाकडे आला असून ते आजरोजी छानपैकी कीर्तन करत असतात. त्यांच्या आई प्रमिलाबाई यांना शेतीचा आणि राजकारणाचा देखील चांगला अनुभव होता. डॉ विकास बाहेकर यांचे वडील आत्माराम बाहेकर हे शिवाजी शिक्षण संस्थेत शिक्षक, प्राचार्य, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे बोर्डमेंबर आणि अमरावती व नागपूर या विद्यापीठात ते सिनेटर मेंबर देखील होते. अशा आईवडिलांच्या पोटी डॉ विकास बाहेकर जन्माला आले,हे खरोखर त्यांचे भाग्यच समजावे लागेल असे मला वाटते.

       डॉ विकास बाहेकर हे साधन कुटुंबातील असल्यामुळे त्यांना शिक्षण घेण्यासाठी बहुतांश कोणत्याही प्रकारची चणचण भासली नाही. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिखली येथील श्री शिवाजी अभ्यास शाळा येथे सन १९७४ ला पूर्ण झाले तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण देखील श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय चिखली येथेच सन १९८२ ला प्रथम श्रेणीत पूर्ण झाले.

  होती. यांना मिल्ट्रीची, संरक्षण खात्यात नोकरी करण्याची आवड होती आणि म्हणून त्यांनी इयत्ता ६ वी ते ९ वी पर्यंत एनसीसी घेतली होती. एनसीसी ऑफिसर चिंचोले सर यांनी आयोजित केलेल्या पाच कॅम्प मध्ये डॉ विकास बाहेकर यांनी आवर्जून भाग घेतला होता.

 "माझे वडील आत्माराम बाहेकर हे त्याच शाळेत शिक्षक असल्या कारणाने मला जर शाळेत यायला उशीर झाला किंवा शाळेत काही चुकले तर मला शिक्षकाचा मुलगा असल्याने इतरांपेक्षा दोन छड्या जास्त खाव्या लागत असे. एकंदरीत माझ्यावर शिस्तीचे फार दडपण होते ," असे डॉ विकास बाहेकर यांनी मला सांगितले.इटोकार सर हे एटीडी असल्याने ते खूप चांगली चित्रकला शिकवित असत. ते भौमितिक आकृत्या, रचना अगदी तंतोतंत काढून दाखवित असत. डाॅ विकास बाहेकर यांना चित्रकलेत रस होता. त्यांच्या या रचनेचा त्यांना डोळ्यांचे ऑपरेशन करतांना बऱ्यापैकी फायदा होतो.गावंडे सर हिंदी शिक्षक होते. ते मन लावून हिंदी शिकवत असे. डॉ विकास बाहेकर यांना हिंदी आवडायला लागली आणि म्हणून यांनी हिंदी कोविद परीक्षा देखील उत्तीर्ण केली.

      त्यांच्या घरात शिस्त, संस्कार, अभ्यास आणि आईवडिल अनुभवी असल्या कारणाने मुलांनी कोणत्या प्रकारचे उच्च शिक्षण घ्यावे हे त्यांना खूप चांगले कळत होते.तेव्हा बारावीची गुणवत्ता आणि विज्ञान विषयांच्या गुण वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी विचारात घेतले जात होते.तसेच एनसीसी आणि इंटरमेजिएट ड्राइंग झालेल्या विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेशासाठी अतिरिक्त गुण देण्याची पद्धत होती.सहाजिकच या निकषांच्या आधारे विकास बाहेकर यांना एमबीबीएस साठी प्रवेश मिळाला. यावेळी संपूर्ण कुटुंबाला झालेला आनंद अवर्णनीय होता.यांचे वैद्यकीय शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे सन १९८७ मध्ये पूर्ण झाले. जिद्द चिकाटी, मेहनत आणि अभ्यासाचे नियोजन यामुळे ते एमबीबीएस होऊ शकले. त्याकाळी एमबीबीएस होणे सामान्यांचे काम नव्हते.गर्भश्रीमंतीत शिक्षण घेणारी मंडळी त्या काळी दुर्मिळ होती.त्या काळी शिक्षणाला महत्त्व दिल्या जात नसे. 'उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी' हे धोरण त्या काळी विशेष करून उच्चवर्णियांनी आपल्यामध्ये खोलपर्यंत रूजवले होते. पण डॉ विकास बाहेकर हे याला अपवाद ठरले. त्यांना खरोखरच बालपणापासून शिक्षणाची आवड होती आणि म्हणून ते विद्याविभूषित झाले. अधिकृतपणे यांनी एमबीबीएस ची पदवी सन १९८७ मध्ये एमबीबीएस तर डीओएमएस प्रथम श्रेणीत १९८९ मध्ये उत्तीर्ण केले.

     अधिकृतपणे एमबीबीएस,डीओएमएस झाल्यानंतर कामाचा अनुभव येण्यासाठी त्यांनी राजावाडी हॉस्पिटल मुंबई येथे पीजी रजिस्ट्रार म्हणून काम पाहिले. डॉ नाहार हे या हाॅस्पिटलचे प्रमुख होते.गुरूवारी डॉ नाहार यांना हाॅस्पिटलचा ऑफ होता. त्या दिवशी डाॅ विकास बाहेकर यांनी त्या दिवशी बऱ्याच ऑपरेशनच्या केसेस काढल्या.जबाबदारीने डॉ नाहार यांच्या गैरहजेरीत बुबुलरोपन यशस्वी केल्याचा झालेला आनंद काही विरळाच होता. 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अशी गत झाली होती. सहा महिन्यांत ५५० बुबुलरोपन (केराॅटो प्लॉस्टी) डॉ विकास बाहेकर यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे.तसेच भाभा हॉस्पिटल बांद्रे येथे सुध्दा डॉ रमेश प्रभू यांच्या हाताखाली अनुभवासाठी सहा महिने काम केले आहे. इथे तुम्ही जी घाण करुन ठेवली वार्डात राहील, तेव्हा चांगले काम करा,असा सल्ला त्यांनी दिला. ते दोन्ही हाताने ऑपरेशन करीत असत. त्यांचे पाहून डाॅ विकास बाहेकर यांनी सुध्दा दोन्ही हाताने काम करण्याची सवय लावून घेतली. डॉ नाहार आणि डॉ रमेश प्रभू यांच्या ऋणात राहणे डॉ विकास बाहेकर पसंत करतात.

         १७ ऑक्टोबर १९९१ रोजी डॉक्टर प्रकाश गुप्ता यांच्या मार्गदर्शनामुळे स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. ॲडव्होकेट पवार आणि पंजाबी यांच्या जागेत जवळपास सातआठ वर्षे खाजगी डोळ्याचा दवाखाना सुरू केला आणि आठ डिसेंबर १९९८ रोजी स्वतःचे हॉस्पिटल 'अक्षयज्योत' या नावाने स्वतःच्या जागेत चालू केले. त्यांचा भाचा अक्षय याच्या नावावरून अक्षयज्योत हाॅस्पिटल बुलढाणा येथे सुरू केले.

         प्रा. जे.बी देवडे आणि भगवान इंगळे यांच्या कामानिमित्त श्री शिवाजी हायस्कूल बुलढाणा येथे गेलो असता तेथे एमसीव्हीसी साठी एमएलटी ची प्राध्यापकाची एक जागा रिक्त आहे असे कळले आणि अनेकांच्या आग्रहाखातर त्यांनी सहज अर्ज केला आणि त्याकाळी एमबीबीएस डॉक्टर अशा नोकरीसाठी तयार होत नसे. परंतु हे शैक्षणिक कार्य समजून डॉ विकास बाहेकर यांनी संमती दिली आणि 1991 पासून सलग 30 वर्षे त्या कनिष्ठ महाविद्यालयाला सेवा दिली.योगायोगाने वैद्यकीय आणि शैक्षणिक सेवा करण्याची संधी मिळाली.

       "सन १९९१ ते २००० पर्यंत पोहण्याचा छंद जडला. पुढे या संगम तलावातील पाणी पाहता येथे पोहणे योग्य नाही असे मनाला वाटले. ते सोडले आणि हार्मोनियम वाजवता वाजवता गाणे जमू लागले.यातून भजनाची ओढ निर्माण होऊन एक भजनी मंडळ स्थापन केले.गावोगावी जावून पाचवीवर,बारादीवर तर कधी एकादशीला भजने म्हणू लागलो " अशी माहिती मला त्यांचेशी संवाद साधल्यामुळे कळाली.एकदा उंद्री येथे भजन म्हणत असताना वामनराव गायकवाड यांनी डाॅक्टर ऊभे राहून भावार्थ सांगून भजन म्हणण्याचा प्रयत्न करा,असे वामणराव गायकवाड म्हणाले होते. तेव्हा पासून कथा कीर्तन, प्रवचन करण्याची सवय लागली ती आजतागायत चालू आहे. 

            किर्तन, प्रवचन करण्याचीसाठी मराठी भाषेतील विपुल साहित्य वाचन , लेखन, मनन आणि चिंतन केल्याशिवाय पर्याय नसतो. या निमित्ताने डॉ विकास बाहेकर यांनी सर्व वाड्मय प्रकार अभ्यासला. पी.एच.डी.करण्याचे ठरविले.मात्र त्यासाठी कोणत्याही एका विषयात एम ए असणे आवश्यक असते.तेव्हा डॉ विकास बाहेकर यांनी मराठी, इतिहास आणि तत्वज्ञान या तीन विषयात एम ए केले.'संत तुकारामांच्या अभंगगाथेतून व्यक्त झालेले मनाविषयीचे चिंतन : एक अभ्यास' या विषयावर मराठी डॉ एस एम कानडजे यांचे मार्गदर्शनाखाली पीएच.डी केली. विशेष म्हणजे त्यांना तत्वज्ञान या विषयात सुवर्णपदक मिळाले आहे.

       आध्यात्मिक प्रबोधनासाठी ते दर गुरुवारी 'जीवनदर्शन व्यासपीठ' या माध्यमातून ज्ञानेश्वरी चिंतनवर्ग आयोजित करतात. ग्रामीण जनतेच्या प्रबोधनासाठी त्यांनी कोलवड येथे दर बुधवारी सायंकाळी ग्रामगीता चिंतनवर्ग देखील आयोजित केले आहे. ८ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुबोध संस्कृतीदर्शन वर्ग सुध्दा चालू केले आहे.

     डॉ विकास बाहेकर हे आयईएम चे कोषाध्यक्ष,शरद कला महाविद्यालयाचे सहसचिव, शिवस्मारक समितीचे कोषाध्यक्ष ही विविध पदे भूषविले असून ते वैद्यकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रात देखील अग्रेसर आहे. तसेच डॉ गाडगेबाबा चरित्र, डॉ पंजाबराव देशमुख चरित्र, ग्रामगीता प्रणित श्रमप्रतिष्ठा,मना पाहिजे अंकुश हे ग्रंथ लिहिले आहे. थोडक्यात वैद्यकीय, शैक्षणिक, धार्मिक संघटनात्मक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात यांचे काम असून खरोखर ते एक सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व आहे असे मला वाटते.

# प्रा डी एम कानडजे, मधुकोष 

सागवन-बुलडाणा .

 

 

      

        

   

     



 

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत