मानद संचालक: डॉ अण्णासाहेब म्हळसणे -एक चंचल व्यक्तिमत्त्व
II प्रकाशझोत ll
मानद संचालक: डॉ.अण्णासाहेब म्हळसणे - एक चंचल व्यक्तिमत्त्व
----------------------------------------------------------------------
चिखली तालुक्यातील करतवाडी खेड्यात १५ ऑगस्ट १९६१ रोजी अण्णासाहेब म्हळसणे यांचा जन्म झाला. त्यांचे बारशाच नाव अण्णा आणि गुरुजींनी शाळेत घातलेले नाव मात्र अण्णासाहेब. तेव्हापासून आजतागायत ते अण्णासाहेब म्हळसणे म्हणून ओळखले जातात. या गावाची ख्याती म्हणजे भाजीपाला पिकविणारे गाव.गाव लखपती झाले, परंतु दुसरी बाजू मात्र अतिशय लंगडी होती ती म्हणजे पोरांना शिकून काय करायचं ?कुठे नोकरी लागते? असं म्हणून या गावाने शिक्षणाकडे पार दुर्लक्ष केलं.आता मात्र बदल झाला.गावातील अनेक विद्यार्थी शिकायला लागली. शिक्षणाचे महत्त्व जाणू लागली.
गावातच सरांचे ३ री पर्यंतचे शिक्षण चावडी असलेल्या शाळेत झाले.अगदी शाळा सारवण्याचंही त्यांच्या नशिबात आलं.त्यांना शाळेची घंटी वाजवण्यात,गुरूजींचे काम करण्यात आणि वर्गावर लक्ष ठेवाण्यात त्यांना फार मोठेपणा वाटत होता.कधी कधी दुपारच्या सुट्टीत बोरं खायला त्यांना हुक्की यायची. ते काही मित्रांसह दोनच्या सुट्टीनंतर शाळेला दांडी मारत.दुसऱ्या दिवशी मात्र त्याची शिक्षा देखील भोगावी लागत असे.आता मात्र ते दिवस आठवले की आत्मानंद मिळतो,असे ते म्हणतात.
करतवाडी पासून टाकरखेड (मु) दोनअडीच किलोमीटरच अंतर. मोठमोठ्या वाढलेल्या गावरान ज्वारीतून, चिखलातून त्यांनी एकटे जाणंयेणं करून चौथीचे शिक्षण पूर्ण केले.सरांचे ५ ते १० वी पर्यंतचे शिक्षण अमर विद्यालय अमडापूर येथे
झाले.गावातील साधारणतः सात आठ मुलं मधल्या गाडवाटेने शाळेत पायी चालत जायचे.सातव्या वर्गात अण्णासाहेब वर्गाचा मॉनिटर झाले.अमर विद्यालयात त्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती.त्यांनी पहिल्यांदा आठव्या वर्गात तिळगुळाच्या कार्यक्रमात भाग घेऊन पहिलं भाषण दिलं होतं.मुख्याध्यापक भाऊसाहेब कलोरे यांना सरांचे भाषण एवढे आवडले की त्यांनी 'रामचरितमानस' पुस्तक त्यांना बक्षीस दिले.तो त्यांच्यासाठी फार मोठा ठेवा होता.पुढे सरांना भाषणं करण्याची चटक लागली. त्यांना अनेक वेळा भाषणं करण्याची संधी मिळत गेली.यातून सरांचा आत्मविश्वास आणि सभाधीटपणा वाढत गेला.
सन १९७८ मध्ये माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलजी वाजपेयी यांचे चिखली येथे भाषण ऐकायला मिळाले.
"अमर विद्यालयाचे संस्थापक स्वर्गीय नारायणराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त नवव्या वर्गात वार्षिक परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला ६०रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते. सरांना मिळालेले ते साठ रुपये बक्षीस म्हणजे आजच्या साठ लाखापेक्षाही ते अधिक मोलाचे होते",असे त्यांनी सांगितले.
मॅट्रिकमध्ये अमडापुर परीक्षा केंद्रावर जे पहिले चार विद्यार्थी गुणानुक्रमे आले होते,त्यामध्ये अण्णासाहेब एक होते. त्यावेळच्या फर्स्ट क्लासची किंमत फार मोठी होती.शालेय जीवनात केशव रत्नपारखी,विजय रत्नपारखी,विठ्ठल इंगळे,जगदीश देशमुख,सदानंद सोनवणे,देवानंद मानकर,गुलाब खंडारे,अरुण खंडेलवाल असे जिवाभावाचे वर्गमित्र मिळाले होते.
एसपीएम कॉलेज चिखली येथे सरांनी उच्च माध्यमिक शिक्षण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले.या काळात ग्रंथालयातील भरपूर पुस्तके वाचायला मिळाली.यातून त्यांना वाचण्याचा व्यासंग जडला.या वाचनाचा त्यांना आयुष्यात फार मोठा फायदा झाला. पुढे याच काॅलेजमध्ये ते बीए झाले.चिखलीचे समाधान मोरे आणि अंत्रीचा गजानन वाघ हे दोन वर्गमित्र फार जिवलग आणि चांगले सहप्रवासी त्यांना मिळाले होते.
सरांचे बाबा अगदी ग्रामपंचायत स्थापनेपासून गावचे सरपंच होते.घरातील राजकारणाचा प्रभाव त्यांच्या महाविद्यालयीन जीवनावर पडला होता.त्यांनी काॅलेजमध्ये विद्यार्थी निवडणूकी लढविली आणि काॅलेजचे जीएस बनले
त्यांना विद्यापीठांतर्गत महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्याची चांगली संधी मिळाली.यातून ते घडत गेले.
उच्च शिक्षणासाठी नागपूरला एम.ए.इतिहास ला प्रवेश घेतला.खूप मेहनत घेऊन विद्यापीठात पहिल्या दहाच्या मेरिट लिस्टमध्ये येण्याचा बहुमान मिळविला.
सर्वप्रथम ते लोणार येथील विनाअनुदानित भगवान बाबा कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले.काही काळ ते येथे रमले.नंतर त्यांची महाविद्यालय बदललं.वीस वर्षाची सेवा प्राध्यापक म्हणून आर्णी,जिल्हा यवतमाळ येथील श्रीमद भारती महाविद्यालयात गेली.अभ्यासुवृत्ती,महत्वाकांक्षी स्वभाव , मोठे होण्याची धडपड ,विद्यार्थ्यांसाठी मनस्वी योगदान ही त्यांच्या स्वभावाची खास पैलू होती.दरम्यान च्या काळात सरांनी एम.फील.केले.भविष्यात आपल्याला बुलढाणा जिल्ह्यात येता यावे म्हणून अण्णासाहेब म्हळसणे यांनी १९९३ साली डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे मार्गदर्शनाखाली बुलढाणा येथे विदर्भ शिक्षण संस्थेची नोंदणी केली,परंतु काही अडचणींमुळे त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला नाही.
महाविद्यालय सुरू करण्याचा विचार त्यांना मात्र स्वस्थ बसू देईना.केंद्रीय मंत्री मा.प्रतापराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली मेहकर येथे धर्मवीर दिलीपराव रहाटे शिक्षण संस्था,रजिस्टर करण्यासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केले.पुढे अधिकृतपणे तत्कालीन कुलगुरू एस.टी.देशमुख यांचे परवानगीने सन १९९७ पासून मेहकर येथे महिला महाविद्यालय सुरू झाले.प्राचार्यासाठी पीएच.डी.अट आवश्यक असल्याने तेथे त्यांना अधिकृतपणे प्राचार्य होता आले नाही.पुढे त्यासाठी त्यांनी पीएच.डी.पूर्ण केली आणि शेवटी अण्णासाहेब म्हळसणे जूलै २००७ मध्ये मेहकरला महिला महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झाले.
मात्र त्या ठिकाणी प्राचार्य म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांचे मन तेथे फारस रमले रमले नाही आणि म्हणून नंतर ते खामगावच्या स्व. भास्करराव शिंगणे महाविद्यालयात रुजू झाले.त्या ठिकाणी त्यांनी चार वर्षे नोकरी केली.पुढे मात्र बुलडाणावासी होण्याची त्यांना ओढ लागली म्हणून की काय ते बुलढाणा येथे सन २०१३ मध्ये विदर्भ कला आणि वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्यपदी रूजू झाले. या ठिकाणी आठ वर्ष सेवा करून ते शेवटी नोव्हेंबर २०२० मध्ये सेवानिवृत्त झाले.
सर, सेवानिवृत्तीचे पुढील तुमचे नियोजन काय ? तर त्यांनी मला समर्पक असे उत्तर दिले. ते म्हणाले," मी बुलढाणा शहरालगतच काही वर्षांपूर्वी शेती विकत घेतली आहे .त्या ठिकाणी एक फार्महाऊस आणि गोटफार्म विकसित करण्याचा मानस आहे. हे सगळे करत असतानाच अमरावती विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ मालखेडे यांनी मॉडेल डिग्री कॉलेज, बुलडाणा येथे माझा कामाचा उत्साह आणि जोश पाहून नोव्हेंबर 2023 पासून मानद संचालक म्हणून नियुक्ती केली आहे."
कृषी,शैक्षणिक,सामाजिक व वृक्षारोपण या क्षेत्रात डॉ म्हळसणे यांनी उल्लेखनीय काम केले आहे.विशेष करून सेवानिवृत्त मित्रांना हाताशी धरून त्यांनी एक 'आनंदी परिवार सेवाभावी ट्रस्ट' स्थापन केली असून या माध्यमातून त्यांनी होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे. तसेच अनेक ठिकाणी वृक्षारोपण देखील केले आहे.
अण्णासाहेब म्हळसणे सरांचे आजरोजी ६३ वर्षे वय विचारात घेता ते कोणत्याही बाबतीत टोकाची आग्रही भूमिका न घेता प्राप्त परिस्थितीला संयमाने सामोरे जातात. आहे त्या परिस्थितीत कोणाचीही मने न दुखविता मध्यम मार्गाचा अवलंब करतात. संयम, सहिष्णुता, सकारात्मकता दृष्टीकोन ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये आहे असे मला वाटते. त्यांना कुठलाही आधार नसताना त्यांनी स्वतःला घडविले, यातून ते स्वावलंबी उत्साही, चंचल आणि ध्येनिष्ठ असे व्यक्तिमत्व आहे असे मला वाटते. उर्वरित आयुष्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा!
# प्रा डी एम कानडजे,
मधुकोष,सागवन-बुलडाणा