प्राचार्य डॉ.एस.एम. कानडजे : एक स्वयंविकसित व्यक्तिमत्व
सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.एस.एम.कानडजे हे माझे मोठे भाऊ. त्यांच्याबद्दल लिहितांना मला काहीसे अवघडल्यासारखे वाटते. ते वयाच्या बासष्टव्या वर्षी निवृत्त होऊन 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. 28 जून 1951 ही त्यांची जन्मतारीख. गाव धाडजवळील कुलमखेड, पो.सातगाव (म्हसला) ता.जि.बुलढाणा. आमचं गाव सत्तर वर्षांपूर्वी एक आडवळणी आणि अविकसित खेडं होतं. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील मागासलेलं खेडं. आता मात्र बरंच सुधारलं आहे. भावाचे आणि माझेही प्राथमिक शिक्षण गावातल्या जिल्हा परिषद शाळेतच झाले. आईवडील अत्यल्पभूधारक शेतमजूर. घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची. खूपच हलाखीची. शिक्षणाचा कुठलाही वारसा नाही. भाऊंचे 5 वी ते 8 वी पर्यंतचे शिक्षण म्हसला बु|| येथे झाले. त्यासाठी त्यांना दररोज 5-6 कि.मी. पायी येणे-जाणे करावे लागत असे. धाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ते दहावी पास झाले. 1968 साली झालेल्या एस.एस.सी.च्या परीक्षेत त्यांना प्रथम श्रेणी मिळाली. तसेच त्याअगोदर म्हसला बु|| येथे झालेल्या चौथीच्या बोर्डाच्या परीक्षेत त्यांचा पहिला नंबर आला होता. त्यामुळे त्यांना आठवीपर्यंत स्कॉलरशीप मिळत होती.
1968 ते 72 या चार वर्षांत त्यांनी बुलढाणा येथे बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यासाठी त्यांना जिजामाता महाविद्यालयातील ग्रंथालयात काम करावे लागले. सुप्रसिद्ध प्राचार्य रा.ना.खर्चे साहेब ह्यांनी त्यांना शिक्षणासाठी खूपच मदत केली. तसेच शिक्षकाची नोकरीही लावून दिली. बी.ए.फायनलच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवसापासून ते श्री शिवाजी हायस्कूल, चांडोळ, ता.जि.बुलडाणा येथे शिक्षक म्हणून काम करू लागले. माहोरा येथील ज्येष्ठ शिक्षक श्री.पी.एस.कानडजे यांच्या सक्रीय प्रोत्साहनामुळे 1973-74 साली त्यांनी औरंगाबाद येथे बी.एड्.चा शिक्षणक्रम प्रथम श्रेणीत पूर्ण केला. पुढे त्यांनी नोकरी करीत असताना एम.ए. केले. ते नागपूर विद्यापीठातून या परीक्षेत सर्वप्रथम आले होते. त्यांना त्यावेळी राज्यपालांच्या हस्ते ना. के. बेहरे सुवर्ण पदक मिळाले होते.
1976 साली वडिलांचे निधन, 1977 साली लग्न, 1980 साली नागपूर विद्यापीठातून मराठीमध्ये एम.ए. आणि 1982 साली जिजामाता महाविद्यालयामध्ये कनिष्ठ प्राध्यापक म्हणून बदली, अशी त्यांची वाटचाल सुरू होती. पुढे 1986 मध्ये त्यांची वरिष्ठ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी स्वत: अमरावती विद्यापीठाची पीएच.डी. पदवी (1993) संपादन केली, तसेच त्यांनी वेळोवेळी अनेक विद्यार्थ्यांना एम.ए., एम.फिल. आणि पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. प्रा.कानडजे ह्यांनी महाविद्यालयात प्राचार्य आर. के. सोनुने साहेब यांच्या काळात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र सुरू केले. महाविद्यालयात आजही त्या केंद्रामार्फत बी.ए. बी.कॉम. आणि एम.ए.च्या अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अमरावती विद्यापीठांतर्गत एम.ए.मराठीच्या वर्गांना त्यांनी वीस वर्षे अध्यापन केले. यु.जी.सी.दिल्ली आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या निर्देशांनुसार त्यांनी जिजामाता महाविद्यालयात मराठी संशोधन आणि संस्कृती केंद्रामार्फत अनेक संबंधित तरूणांना वेळोवेळी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
आपल्या आयुष्यातील निवडणुकांबद्दल ते म्हणतात, "महाविद्यालयात असतांना वर्ग प्रतिनिधीसाठी मी उभा होतो. पण आम्हा दोन उमेदवारांना समान मते मिळाल्यामुळे ईश्वरचिठ्ठीनुसार मला विजयी घोषित केले नाही.’ माझे मूळ गाव ‘कुलमखेड येथील ग्रामपंचायतच्या निवडणूकीत मात्र सदस्य म्हणून मला गावकऱ्यांनी अविरोध निवडून दिले होते’. ‘संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मराठी ‘बोर्ड ऑफ स्टडीज’च्या निवडणूकीत मी सदस्य म्हणून निवडून आलो होतो’ अशी माहिती मला त्यांच्याकडून मिळाली." ‘तुम्ही काही संस्थात्मक पातळीवर काम केले आहे काय?’ या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “आपल्या जन्मभूमीमध्ये, कुलमखेड येथे श्री. मारोती व देवी संस्थान या धार्मिक ट्रस्टची गावकऱ्यांच्या सहकार्याने मी पुनर्स्थापना केली. त्यावेळी सचिव म्हणून मी सुमारे दहा वर्षे जबाबदारीने काम केले. तसेच गावात ग्रामविकास सार्वजनिक वाचनालय सुरू केले आहे. ह्या दोन्ही संस्था आज चांगल्याप्रकारे कार्य करीत आहेत. सध्या बुलढाणा येथे मी ‘मातृभाषा प्रतिष्ठान’ मार्फत मराठी भाषा आणि साहित्यासंबंधी यथाशक्ती काम करीत आहे.”
जुलै 1972 पासून जून 2013 पर्यंत सुमारे 40 वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. त्यात 11 वर्षे मराठी विभाग प्रमुख आणि दोन वर्षे पूर्ण वेळ मान्यताप्राप्त प्राचार्य म्हणून प्रशासनाचेही कार्य केले. 7 जानेवारी 2007 रोजी बुलढाणा येथे पार पडलेल्या सातव्या जिल्हा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वाणिज्य-मराठी अभ्यासक्रम समितीचेही ते अध्यक्ष होते, त्यावेळी त्यांनी तीन पाठ्यपुस्तकांचे संपादन केले. आनंद यादव आणि रा.रं.बोराडे या प्रथितयश ग्रामीण साहित्यिकांच्या लेखनाची समीक्षा करणारी दोन पुस्तके त्यांनी लिहिली. ती पुस्तके चार विद्यापीठांमध्ये संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली होती. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत मराठी प्राध्यापकांच्या 2012 साली झालेल्या परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अलीकडे 16 जून 2024 साली मेहकर येथे झालेल्या राज्यस्तरीय ‘साहित्य जगत’ मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला आहे.
त्यांचा मोठा मुलगा (रवीन्द्र) आणि मोठी सून (स्मिता) दोघेही प्रथम श्रेणीच्या राजपत्रित प्रशासकीय पदांवर कार्य करीत आहेत. त्यांचा लहान मुलगा (सुनील) आणि लहानी सून (प्रतीक्षा) एका नामांकित विद्यालयात अध्यापनाचे काम करीत आहेत. माजी प्राचार्य डॉ.कानडजे ह्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले, त्यांनी आपल्या एकत्र कुटुंबाला बिकट परिस्थितीतून पुढे नेण्याचा कसोशीने प्रयत्न केला, त्यांनी वाचन-लेखन-संशोधनाच्या माध्यमातून स्वत:तील ‘शिक्षका’ला जाणीवपूर्वक घडविले आणि मनापासून, तळमळीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. कानडजे यांना संतवाङ्मय, ललित लेखन आणि वैचारिक साहित्याची आवड आहे. विद्यार्थी, शिक्षक, नवोदित साहित्यिक आणि पत्रकार यांच्याशी त्यांचा सतत संवाद सुरू असतो. वर्तमानपत्रे आणि मासिके यांतून ते सतत लिहित राहतात. मराठी भाषा आणि साहित्याचा त्यांचा दांडगा व्यासंग आहे. कोणत्याही बाबतीत टोकाची आग्रही भूमिका न घेता ते प्राप्त परिस्थितीला संयमाने सामोरे जातात. आहे त्या परिस्थितीत कोणाचीही मने न दुखविता मध्यममार्गाचा अवलंब करतात. संयम, सहिष्णुता, सकारात्मकता ही त्यांच्या वर्तनाची त्रिसूत्री आहे. कुठला आधार, वारसा, गॉडफादर नसताना त्यांनी स्वत:च स्वत:ला घडविले. असा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मी आढावा घेतला आहे. त्यातून मला त्यांचे एकूण व्यक्तिमत्व स्वावलंबी, ध्येयनिष्ठ आणि स्वयंविकसित असल्याचे जाणवते. त्यांच्या पुढील वाचन-लेखन आणि वाङ्मयीन कार्यास मनापासून हार्दिक शुभेच्छा!
#. प्रा. डी. एम. कानडजे, मधुकोष,
सागवन-बुलढाणा (८२७५२३१८७४)