प्रा बी ए खरात - एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व
साहित्यिक प्रा. बी. ए. खरात: एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व
----------------------------------------------------------------------------
निमगाव वायाळ हे छोटेशे गाव असून तालुका सिंदखेड राजा मध्ये आहे. या गावी प्रा बी ए खरात यांचा जन्म दिनांक २८ जानेवारी १९४८ रोजी झाला.
प्रा.बी ए खरात यांचे संपूर्ण नाव बळीराम आश्रुजी खरात
असून त्यांच्या आईवडिलांचे नाव रामकोरबाई आणि आश्रुजी होते. त्यांचे आई वडील निरक्षर असून मोलमजुरी करीत असे.त्यांच्या आईवडिलांची परिस्थिती अत्यंत हलकीची असून त्यांना एक एक दिवस अर्धपोटी राहून काढावा लागत असे. निमगाव वायाळ हे गाव हिवरखेडा (पूर्णा) जवळ असून तेथे ग्रामपंचायत सुद्धा नव्हती. हे गाव विकासापासून कोसो दूर होते. अशा गावी कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या. शिक्षण घेण्यासाठी येथून जवळच असलेल्या हिवरखेड (पूर्णा) या गावी शिक्षणाची सोय होती.तेथे असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राध्यापक बीए खरात यांचे प्राथमिक शिक्षण मे १९५९ साली पूर्ण झाले. ते इयत्ता चौथीच्या बोर्डाच्या परीक्षेत हिवरखेड केंद्रामधून सर्वप्रथम आले होते. तेव्हा अशावेळी त्यांना आणि त्यांच्या आईवडिलांना जो काही आनंद झाला होता तो अतिशय अवर्णनीय होता. एक दलित समाजाचा बळीराम पोरगा हिवरा हिवरखेड केद्रामधून पहिला येणे हे त्याकाळी झालेले नवलच नव्हते. प्राध्यापक बीए खरात यांच्या वडिलांना केंद्रावर निकालाच्या दिवशी बोलविण्यात आले आणि केंद्रप्रमुखांनी आवर्जून सांगितले की तुमचा हा बळीराम पोरगा हिवरखेड केंद्रातून सर्वप्रथम आलेला आहे असे मुख्याध्यापकांनी सांगताच त्यांच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. त्यांना आकाश ठेवणे झाले होते. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आजही तो प्रसंग आठवला की प्रा.बी.ए.खरातांच्या डोळ्यात पाणी तरंगते आणि मन गहिवरून येते.
आता गावाजवळचे शिक्षण तर संपले आता जावे तरी कुठे हा प्रश्न त्यांच्या आई-वडिलांना पडला आणि शिक्षण शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही याची जाणीव शिक्षकांकडून झाली होती. तसेच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा सुविचार देखील मनात घोळत होता. संघर्ष करा, शिक्षण घ्या आणि हक्कासाठी लढा याशिवाय जीवनाला काहीही अर्थ नाही हा विचार मला प्रेरणा देऊन गेला आणि मी पाचवी ते दहावीचे शिक्षण नूतन माध्यमिक विद्यालय किनगाव राजा येथे दररोज १० किलोमीटर पायी चालत जाऊन सन १९६५ मध्ये खूप अभ्यास करून पूर्ण केले. दहावी बोर्डाच्या परीक्षेत जे तीन विद्यार्थी प्रथम आले होते त्यात मी पहिला होतो. हे सर्व ऐकून मी धन्य झालो असे मला वाटले असे उद्गार प्रा बी ए खरात यांनी माझ्याजवळ व्यक्त केले.
आता गावाजवळचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घरच्या भाकरी खाऊन आणि पायाची पायपीट करून तर पूर्णकेलेच परंतु आता पुढे काय? हा मला भेडसावू लागला. आता खऱ्या अर्थाने त्यांना उच्च शिक्षण घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली होती. ते औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे नाव ऐकून होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या नागसेन वनी मिलिंद महाविद्यालयाची भव्य वास्तू पाहून आम्ही भारावून जायचो, मिलिंद महाविद्यालयाचा परिसर जसा काही एखाद्या परिभूमीसारखा पवित्र तथा प्रसन्न वाटायचा! असे भावोद्गार प्रा बी ए खरात यांनी मजजवळ व्यक्त केले.
महाविद्यालय शिक्षण घेत असताना "जयभीम" या शब्दातील स्वाभिमान' ,आंबेडकरी विचारांची प्रेरणा व शिक्षणातून प्राप्त झालेली अस्मिता त्यांच्या मनात परिवर्तन निर्माण करत होती. त्यांची परिस्थिती अत्यंत गरीबीची आणि हलाखीची होती. परंतु त्यावेळी दरमहा मिळणारी 30 रुपये स्काॅलरशिप त्यांना सोन्याच्या किमतीची वाटत होती. कारण यातून त्यांचा महाविद्यालयीन खर्च भागत होता. महिन्याच्या शेवटी शेवटी तर त्यांना एक एक दिवस जेल सारखा जायचा. त्यांनी 31 ऑगस्ट 1965 चा प्रसंग मला सांगितला. तो असा की रूममध्ये खाण्यासाठी काहीच नव्हते. पिठ,मिठमिरची सर्वकाही संपले होते.महिन्याभरात फेकून दिलेली वांगी, जी वाळलेली होती ती गोळा करून शिजवून खाल्ली आणि कशीबशी रात्र काढली. एवढ्या मोठ्या औरंगाबाद सारख्या शहरात आपली लेकरं उपाशी निराधार होऊन झोपते आहे, हे त्यांच्या मनातून जात नव्हते." जीवनाची खडतर परीक्षा आणि अभ्यासक्रमाची परीक्षा सरांना तेव्हढेच चटके देत होती. यातून सर तावून सुलाखून बाहेर पडले आणि एकदाची बी ए ची पदवी सन १९७० मध्ये प्राप्त केली.
बी ए खरात यांना शिक्षक होण्याची आवड असल्यामुळे त्यांनी नोकरी करण्याची ठरविले. दिनांक १६ जुलै १९७० रोजी श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी कंधार, जिल्हा नांदेड या संस्थेत इंग्रजी शिक्षक म्हणून सर रुजू झाले. जेव्हा प्रथम नोकरी त्यांना लागली तेव्हा त्यांच्या आई-वडिलांचे काळीज सुपाएवढे झाले. आपला पोरगा नोकरीवर लागला म्हणून गावभर सांगू लागले.
पोरगा नोकरीवर लागला की नातेवाईक मंडळी काहीच असू देत नाही. आमची मुलगी करा, असा तगादा ते सतत त्यांच्या वडिलांकडे लावत होते. एक दिवस तो उजाडला आणि शेवटी मी एक मुलगी पसंत केली आणि २१ नोव्हेंबर १९७१ रोजी एचएससी डीएड झालेल्या शांता नावाच्या मुलीशी बी ए खरात यांनी लग्न केले. पत्नी जीवनाची आधार असते, अडल्यानडल्याची माय असते असे म्हणतात. माझी पत्नी सौ शांता खरात हिने माझा मन लावून संसार केला आणि माझ्या यशात ती वाटेकरी झाली. प्रपंच करून, अध्यापन कार्य करून सरांनी कोणाचीही टिंगल टवाळी न करत बसता आपल्या वेळेचा सदुपयोग केला आणि ज्ञानार्जन करून सन १९७२ मध्ये एम ए ( इंग्रजी) केले. वास्तविक बीएड केल्याशिवाय शिक्षकाला परिपूर्णता येत नाही असे मला वाटते. सरांनी फार उशिराने नोकरी करून अवकाशकालीन बीएड शासकीय शिक्षण महाविद्यालय नांदेड येथून सन १९७६ मध्ये यशस्वीरित्या पूर्ण केले. शिक्षक म्हणून सरांनी अनेक ठिकाणी मन लावून अध्यापन कार्य केले आहे.सरांनी एकूण ३५ वर्ष सहा महिने आणि सतरा दिवस असे अखंडपणे ज्ञानदानाचा यज्ञ तेवत ठेवला आहे.सरांनी सहाय्यक शिक्षक म्हणून श्री शिवाजी हायस्कूल कंधार, ज्युनिअर कॉलेज टिचर म्हणून श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज बारूळ, व्यंकटेश महाविद्यालय देऊळगाव राजा आणि एसपीएम कॉलेज चिखली येथे सर्वांशी चांगले संबंध प्रस्थापित करुन प्रामाणिकपणे सेवा दिली आहे. ते एसपीएम महाविद्यालय चिखली या संस्थेतून १५ वर्षे प्रदीर्घ सेवा करून ते ३१ जानेवारी २००६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहे.
नोकरी लागल्यानंतर एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी काकांनी गहाण ठेवलेले शेत सावकाराकडून सोडवून त्यांच्या ताब्यात दिले. सर्जेराव आश्रुजी खरात या त्यांच्या भावाला सरांनी सन १९८५ मध्ये वर्दडी खुर्द शिवारात ५ एकर जमीन त्यांच्या नावाने घेऊन दिली. तसेच त्याच गावी पुन्हा अडीच एकर जमीन भावाला घेऊन दिली. हे सगळे सरांनी भावबंधासाठी मन लावून काम केले पण पदरी निराशाच आली असे भावोद्गार बी ए खरात यांनी माझ्याजवळ काढले.करूनसवरून नाव नाही अशी खंत सरांनी व्यक्त केली. "तसेच कंधार,देऊळगाव राजा आणि चिखली अशा विविध ठिकाणी नोकरी करत असताना अनेकांशी वेगवेगळ्या कारणांनी माझा संबंध आला. मला सर्वांनी माणूसकीने वागवले. अतिशय प्रेमाची वागणूक दिली.कुठेही आपपरभाव जाणवला नाही. सर्व मित्रमंडळीमध्ये माणूसकीचे दर्शन झाले" असे विचार सरांनी प्रदर्शित केले.समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि माणुसकी ही नैतिक जीवनमूल्ये मला अनुभवाला मिळाली .याचा प्रत्यय मला जागोजागी पाहायला मिळाला असे प्रा बी ए खरात सर आवर्जून सांगतात.
जीवन जगत असताना त्यांच्या जीवनात अनेक नैसर्गिक चढ-उतार आले ,खूप संकटे आली पण ते कधी डगमगले नाही की हतबल होऊन नैराश्यात गेले नाही. कधीही मानसिक स्वास्थ्य बिघडून दिले नाही , ही त्यांची खरी जीवनशैली मला त्यांच्यात पहायला मिळाली. या सर्व वाटचालीत मला समर्थपणे माझ्या पत्नीने हिंमत दिली.जीवन जगण्यासाठी आत्मिक बळ दिले आणि म्हणूनच आजरोजी मला जो साहित्यिक म्हणून मानसन्मान मिळतो आहे ,याचे सर्व श्रेय हे माझ्या पत्नीला जाते असे त्यांनी मला कबुल केले.
बी ए खरात सरांना तीन मुले आणि एक मुलगी असून सर्वजण उच्च विद्याविभूषित आहे. त्यापैकी एक शिक्षक, एक व्यावसायिक आणि एक एम.ए.( मराठी),बी.एड. असून स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे. संपत्ती, संतती आणि संगती चांगली असेल तर आपला जीवन जगण्याच्या मार्ग सुकर होऊ शकतो असे मला वाटते. बी ए खरात सरांनी शिक्षकाची नोकरी करत असताना प्रामाणिकपणे आणि विद्यार्थीकेंद्रीत राहून अध्यापनाचे कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पंचायत समिती कंधार, जिल्हा परिषद नांदेड आणि महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.तसेच प्रा बी ए खरात यांनी चिखली येथे झालेल्या राज्यस्तरीय, शाहू, फुले,आंबेडकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील भूषविले आहे..
आतापर्यंत सरांच्या चार साहित्यकृती प्रकाशित आहेत. तसेच ते एक उत्कृष्ट साहित्यिक असून 'वेदनेवरील फुंकर'(आत्मचरित्र) आणि 'विचारपुष्प' (ललितगद्य) हे त्यांचे दोन ग्रंथ सर्वांना सुपरिचित असून संग्रही ठेवण्यासारखे आहे. विशेष बाब म्हणजे त्यांचे 'वेदनेवरील फुंकर' हे पुस्तक या वर्षीपासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एम ए मराठीच्या अभ्यासक्रमासाठी संदर्भग्रंथ म्हणून लागले आहे. तर त्यांचे दुसरे पुस्तक 'विचारपुष्प' हे सुद्धा या वर्षीपासून अमरावती विद्यापीठाच्या बीकाॅमच्या अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी नेमलेले आहे.त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहे. खरोखर प्रा बी ए खरात हे एक नामांकित लेखक, आदर्श शिक्षक आणि सर्वांची मने जपणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे, यात शंकाच नाही.
# प्रा डी एम कानडजे,
मधुकोष निवास, सागवन-बुलडाणा.(८२७५२३१८७४)