भगवान राईतकर : एक व्यासंगी व्यक्तिमत्त्व
- भगवान राईतकर : एक व्यासंगी व्यक्तिमत्त्व -
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुका.गोभणी या गावी भगवान विष्णुदास राईतकर यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात २० जून १९७७ रोजी झाला. त्यांचे आईचे नाव विमल असून वडील विष्णूदास राईतकर हे सध्या सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक आहेत. त्यांना दोन भाऊ असून त्यापैकी एक डॉ.ज्ञानेश्वर राईतकर जात पडताळणी विभागात लिपिक तर दुसरे बंधू संजय राईतकर मंडल अधिकारी (महसूल विभाग) म्हणून कार्यरत आहे.
सरांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केनवड येथे झाले.वर्गशिक्षक रावणचौरे सरांचा भगवान हा आवडता, शिस्तबद्ध आणि हुशार विद्यार्थी म्हणून नावलौकिक होता. इयत्ता चौथीमध्ये तालुक्यामधून भगवान पहिला आला होता.परंतु गटशिक्षणाधिकारी मॅडमच्या मुलीला पहिला नंबर दिल्याची कुणकुण गुरूजींच्या कानी पडली,तेव्हा गुरुजींनी त्यांच्याशी भांडण केले होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते शाळेत आले तेव्हा अक्षरशः ते रडले." विद्यार्थ्यांच्यासाठी अधिकाऱ्यांसोबत भांडणारे रावणचौरे गुरुजी मी बघितले होते"असे ते सांगतात.
त्यांचे श्री शिवाजी हायस्कूल गोभणी येथे ५ ते १० वी पर्यंतचे शिक्षण ग्रामीण भागात झाले.पुढे सरांनी बारावी विज्ञान साठी श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली या ठिकाणी प्रवेश घेतला.या महाविद्यालयात सरांच्या वडिलांचे विद्यार्थी प्रा.आनंद साबळे होते.ते गोभणी या गावचे असल्याने सहाजिकच त्यांच्याविषयी जिव्हाळा निर्माण झाला.त्यांनी भगवान राईतकरांना खूप मदत केली. त्यानंतर सरांनी सीताबाई कला महाविद्यालय अकोला येथे इंग्रजी (साहित्य),भारतीय संगीत (गायन) आणि समाजशास्त्र हे विषय घेऊन बी.ए.प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले.
भगवान राईतकरांनी एम.ए.(इंग्रजी) आणि बी.जे. (वृत्तपत्रशास्त्र) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा औरंगाबाद विद्यापीठात तर बी.एड.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव खान्देश या ठिकाणी पूर्ण केले. सरांना गाण्यात आणि तबला वाजविण्यात रस होता आणि म्हणून त्यांनी तबला विशारद ही पदवी देखील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई येथून संपादन केली. "उच्च शिक्षण घेत असताना प्रा एस.एल.देशपांडे,प्रा.कुमोदिनी कुळकर्णी, प्रा खरे, एनएनएस अधिकारी प्रा.पंकज लधवे, डॉ.खान सर, डॉ.किंबहुना, डॉ.सतीशजी देशपांडे ,डॉ.फर्नांडिस मॅडम,प्रा.भोसले हे अतिशय अभ्यासू ,अनुभवी आणि गुणी शिक्षकवृंद लाभल्यामुळे माझ्या जीवनाचे सार्थक झाल्याचे वाटते, असे ते सांगतात." वृत्तपत्रशास्त्राची पदवी घेत असताना आम्हाला लिहिण्याचा आणि जगण्याचा संवेदनशीलपणा ज्यांनी निर्माण केला असे गुरुवर्य डॉ.सुधीरजी गव्हाणे, डॉ.सुरेशजी पुरी आणि डॉ. वि.ल. धारूरकर. यांच्या ऋणातून मुक्त होण्याची माझी इच्छा नाही,असा भगवान राईतकरांनी मजवळ आवर्जून उल्लेख केला.
गुणवत्ता असतांनाही नोकरी मिळवण्यासाठी झालेली ही फरपट जीवनामधून कधीही जाता जाणार नाही. बीएड निकाल बाकी असतांना मंगरुळपीरला अध्यापक विद्यालयात इंग्रजी आणि शैक्षणिक मूल्यमापन या दोन विषयांसाठी तात्पुरत्या स्वरूपात नोकरी मिळाली.त्यानंतर त्यांना मेहकर येथील एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नोकरी करण्याचा योग आला.पण ते कदाचित नियतीला मान्य नसावे. कधीही शब्द न फिरवणाऱ्या अध्यक्ष महोदयांनी शब्द फिरवला आणि पाच वर्षे तासिका बेसवर काम केलेली नोकरी निष्फळ ठरली. ती क्षणार्धात सोडावी लागली.खूप मनस्ताप झाला.फक्त एक जमेची बाजू म्हणजे त्यांना चांगला अध्यापनानुभव आला होता आणि प्रसिद्धी देखील मिळाली होती.
त्यानंतर नोकरी करायची नाही, अशी खूणगाठ मनाशी बांधली. आपल्या विषयज्ञानाचा मुलांना फायदा व्हावा म्हणून त्यांनी स्पर्धा परीक्षा आणि इंग्रजी विषयाचे कोचिंग क्लासेस सुरू केले.गुणवत्ता असूनही नोकरी मिळाली नाही म्हणून ते बेचैन व्हायचे. मानसिक स्वास्थ्य चांगले रहावे, मनःशांती लाभावी म्हणून केवळ २०००/- रु. मानधनावर हिवराआश्रम येथे विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, विवेकानंद कृषी महाविद्यालय आणि विवेकानंद कृषी व्यवस्थापन महाविद्यालयात इंग्रजी विषयासाठी त्यांनी नोकरी स्विकारली.त्यात त्यांचा वेळ चांगला जावू लागला.एकदा विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातील लिपिक विजयबापू देशमुख सहज म्हणाले ," राईतकर,हायस्कूलला शिक्षक पदासाठी मुलाखती सुरू आहेत. अगोदर पाठीशी असलेला वाईट अनुभव सोडून द्या आणि नव्या दमाने पुन्हा मुलाखतीला सामोरे जा " शेवटी भगवान राईतकरांनी त्यांचे एकले.मुलाखत दिली.कर्मयोगी संत शुकदासजी महाराज यांच्या कृपेने आलेल्या सर्व अडचणीवर मात करत, शेवटी भगवान राईतकर शिक्षक म्हणून विवेकानंद आश्रमात अनुदानित शाळेवर रुजू झाले. हा क्षण त्यांच्यासाठी आणि कुटुंबासाठी खूप आनंददायी होता.
"गत जीवनातील गुरुवर्यांचा आशीर्वाद आणि सहकारी मित्रांचा सहवास हा माझ्या रोजच्या जगण्यामध्ये नवीन ऊर्जा शक्ति निर्माण करणार होता आणि आजही आहे " असे भगवान राईतकर आवर्जून सांगतात. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी गीता साधी आणि सरळ स्वभावाची होती. सर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आणि सकल संतांच्या विचारांचे पाईक असल्याने आणि त्यांची पत्नी ही ग्रामीण भागातील असल्यामुळे तिचे नाव गीता जरी असले तरी ते तिला आदराने 'ग्रामगीता' म्हणायचे.गीताताईंनी घरप्रपंच करून बी.ए. ब्युटीपार्लर,योगशिक्षिका, एमएस.सीआयटी आणि संगीत विशारद एवढे शिक्षण घेतले आहे. या बाबतीत त्या खरोखर उच्चविद्याविभूषित असून अभिनंदनास पात्र आहे. शिवाय त्यांना वाचन लेखन करण्याची आवड असून त्या एका मासिकाच्या मुख्य संपादिका देखील आहेत.खरोखर नेटका प्रपंच करून इतर क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहे, असे मला वाटते.
स्वामी विवेकानंद हिवरा आश्रम द्वारा संचालित विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, हिवरा आश्रम येथील अनुभव सांगावयाचा झाला तर, महाराष्ट्रभरातील आणि बाहेरच्या राज्यातील सुद्धा विद्यार्थी आमच्या विवेकानंद शैक्षणिक संकुलात प्रवेश घेतात. त्यामुळे आम्ही केवळ एका शाळेचे शिक्षक न राहता महाराष्ट्राचे शिक्षक आहोत.अशा विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना आई नसते तर ,कोणाला वडील नसतात.तर काहींना दोघेही नसतात. त्यांचे कोणते तरी नातेवाईक त्यांचा आमच्या विवेकानंद शैक्षणिक संकुल मध्ये प्रवेश करून देतात. अशाही मुलांसाठी आपल्या जीवनाचा सदुपयोग होतो, यामध्ये आम्हा सर्वांना जीवनाचे सार्थक झाल्यासारखं वाटते, अशा भावना सरांनी व्यक्त केल्यात.
सरांना अथर्व आणि यजुर्व ही दोन मुले असून मोठा एचएससी झाला असून लहानगा आठवीत शिकतो आहे.सामाजिक बांधिलकी म्हणून सुशिक्षित बेरोजगारांना कायमस्वरूपी नोकरी लागेपर्यंत मेहकर तालुक्यातील विद्यार्थ्यांना अत्यल्प फी मध्ये गेल्या दहा वर्षांपासून राईतकर सर स्पर्धा परीक्षेची आणि मुलाखतीची तयारी करुन घेतात. तसेच ते व्याख्यान आणि प्रवचनाच्या माध्यमातून नोकरीकडे दुर्लक्ष न होऊ देता,शक्य होईल तेव्हा समाज प्रबोधनाचे काम करतात. वर्तमानपत्रांमध्ये विविध विषयांवर लेखन करतात. स्पर्धा परीक्षा,प्रेरणादायी कथा, साहित्य विषयक पुस्तके अशी एकूण आठ पुस्तके सरांचे प्रकाशित झाली आहेत. तसेच ते विश्वजगत या दैनिकात साहित्यजगत हे पान संपादित करतात.
# प्रा डी एम कानडजे, मधुकोष निवास,
सागवन-बुलडाणा.(भ्रमणध्वनी ८२७५२३१८७४)