प्रल्हाद ताठे - मितभाषी व्यक्तिमत्त्व
प्रल्हाद ताठे - मितभाषी व्यक्तिमत्त्व
-------------------------------------------------------
प्रल्हाद दगडुजी ताठे यांचा जन्म 5 ऑगष्ट 1957 रोजी झाला. त्यांचे मूळ गाव मोहखेड असून ते मेहकर तालुक्यात आहे. त्यांचे वडील दगडूजी भिवा ताठे असून ते अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर होते.तर आई एका पायाने अधू असून घरकाम करून शेत काम करायची.प्रल्हाद ताठे यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले तर लव्हाळा व साखरखेर्डा येथून माध्यमिक शिक्षण 7 कि.मी.अंतर पायी चालत जाऊन पूर्ण केले. 1975 ला त्यांनी एसएससी बोर्डाची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली.शाळेत पूर्वी वीज नसल्याने मुख्याध्यापक आदरणीय आर.बी.मालपाणी सर व लाकडे सर यांनी कुडाच्या खोलीत गणित व इंग्रजी या विषयांचे मोफत वर्ग घेतले.कंदिलावर अभ्यास करावा लागला.
ताठे साहेबांना दोन विवाहित बहिणी आहेत.त्यापैकी पहिली तुळसाबाई जाधव ह्या असून त्या मोहखेड येथे अंगणवाडीत काम करतात. तर दाजी उद्धवराव जाधव हे माजी सरपंच आहे आणि दुसरी धाकटी बहीण सुमन प्रकाश सास्ते पाटील ही गृहिणी असून तिचे पती जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक आहे.
त्यांनी वर्ग 11वी (कला) श्री शिवाजी हायस्कूल मेहकर येथे मागासवर्गीय अशोक वसतिगृहात राहून केली. इयत्ता 11वी तर झाली, आता पुढे काय? 12 वी ची सोय कुठं आणि कशी लागेल, या चिंतेने वडिलांचे मन ग्रासले होते.मध्येच शिक्षण सुटते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अस म्हणतात की योग्य अडचणीच्या वेळी परमेश्वर धावून येतो आणि खरोखर तसेच झाले. आदरणीय प्र.ग.बयेस सर, तत्कालीन प्राचार्य, श्री शिवाजी हायस्कूल लोणार हे देवासारखे भेटले. सरांनी होस्टेल वर त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था मोफत करून दिली. एक गरीब, प्रामाणिक, होतकरू, अभ्यासू अशा विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले. त्यांची परीक्षा फी सुद्धा भरली.मला जेव्हा ताठे साहेब हे सांगत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी दिसले.सर कोणीही कोणाला शिकवत नसते,तर स्वतःहून स्वतःचा मार्ग काढत काढत शिकायचे असते असे हे उद्गार त्यांनी काढले.
1977 ला ते एचएससी परीक्षेत मेहकर आणि लोणार या दोन्ही तालुक्यांतील कला शाखेतून प्रल्हाद ताठे सर्वप्रथम आले.त्यामुळे बयेस सरांना जो काही आनंद झाला होता तो अवर्णनीय होता. पुढील वर्षांत त्यांना सर जगन्नाथ शंकर शेठ (मुंबई) शिष्यवृत्ती मिळाली होती.
प्रल्हाद ताठे यांनी चिखली येथील श्री शिवाजी महाविद्यालयात बी.ए.ला प्रवेश घेतला. शिक्षण घेण्यासाठी पैसे नाहीत. चिखली येथे नुकतेच समाजकल्याण विभागाचे मुलांचे नवीन शासकीय वसतिगृह चालू झाले होते. प्रल्हाद ताठे, मोतीराम कानडजे आणि कृष्णा इंगळे या तिघांची गुणवत्तेनुसार समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात निवड झाली होती. या गरीब, होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची सोय लागली.ही बातमी त्यांच्या घरी जेव्हा पोहोचली, तेव्हा त्यांच्या आई-वडिलांना एवढा आनंद झाला की,तो शब्दांत व्यक्त करणे अवघड होते.श्री शिवाजी महाविद्यालयात ते बीए ला प्रथम आल्याबद्दल माजी आमदार कै.रा.दे.भोंडे सरकार यांचे हस्ते मेरीट सर्टीफिकेट देऊन प्रल्हाद ताठेंना गौरविण्यात आले होते. हा क्षण त्यांच्यासाठी अविस्मरणीय होता.
मोहखेड येथील एस.के.मोरे यांची एमपीएससी मार्फत 1976-77 मध्ये विक्रीकर अधिकारी पदावर निवड झाली होती.पदवीधर झाल्यानतंर आपण सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून अधिकारी पद मिळवू शकतो अशी जिद्द ताठे साहेबात निर्माण झाली होती. तेव्हापासून लोकसत्ता , महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडिया व फ्री प्रेस जर्नल वर्तमानपत्रे इत्यादि साहित्य ते स्पर्धा परीक्षेसाठी वाचायचे.1980 ला पदवीधर झाल्यानंतर त्यांनी 1981 ला पहिली राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. तेव्हा एकच मुख्य परीक्षाअसायची.माननीय श्री शरद पवार साहेब 1978 ला मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सेवेत जास्त प्रमाणात संधी मिळावी या उद्देशातून लेखी परीक्षेत मिळणाऱ्या एकूण गुणाच्या 10%बोनस गुण 1979 पासून देण्याचे धोरण निश्चित केले होते.
ताठे साहेब गावात राहून पहिल्यांदाच परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले होते .दोन महिन्यात मुलाखती सुरू होणार होत्या.तेवढ्यात दोन वर्षांपासून शहरी भागातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या बोनस गुणांविरूद्ध मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. त्या याचिकेवर नेमका याच वेळेस निर्णय होवून बोनस गुण देण्याची पद्धत रद्द करण्यात आली होती. त्यामुळे ताठे साहेबांना मुलाखतीस बोलावणे आले नाही.त्यांना नाराज व्हावे लागले.परंतु ते हतबल न होता पुन्हा जोमाने अभ्यासाला लागले.
1982 च्या एमपीएससी परीक्षेसाठी ताठे साहेबांनी भाग घेतला.ते पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले.तेव्हा पत्र व्यवहारासाठी पोस्ट ऑफीस दुसरे गाव असायचे. गावाकडे फोन सुद्धा नव्हते. प्रवेश पत्र सुद्धा पोस्टाने यायचे.परत दुसर्यांदा त्यांचे दुर्दैव आड आले.मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र पहिल्या दिवशीचे मराठी व इंग्रजी पेपर झाल्यानंतर हाती पडले. पोस्टमनच्या हलगर्जीपणामुळे परीक्षा हातातून गेली.1983 च्या तिसऱ्या परीक्षेला मात्र ते सतर्क झाले. त्यांचे मित्र एम.एम.कानडजे,हे बँक ऑफ इंडियात दोडामार्ग (सावंतवाडी) येथे नोकरीस होते. त्यांचेकडे ताठे साहेब अभ्यासाला गेले. मोतीराम साहेबांनी त्यांना खूप सहकार्य केले. तेथे अभ्यास करून ते मुलाखतीपर्यंत जाऊन पोहोचले. आक्टोबर 1984 मध्ये श्री प्रल्हाद ताठेंची राजपत्रित अधिकारी वर्ग 2 पदासाठी एकदाची निवड झाली. त्यांच्या आईवडिलांना, नातलगांना आणि मित्रपरिवाराला प्रल्हाद ताठे नोकरी लागल्याचा विलक्षण आनंद झाला होता.
प्रशिक्षण काळात माजी आमदार तोतारामजी कायंदे , माजी आमदार रंगनाथ पाटील, माजी आमदार बाबुराव पाटील यांचेशी संपर्क आला. मार्च महिन्यात एक दिवस भोकरदनचे माजी आमदार कै.रंगनाथराव पाटील यांची भेट झाली असता त्यांनी कुलमखेड येथील त्यांची भाची मंगला लग्नाची असल्याबद्दल सांगितले.तेव्हा 7 मे 1985 ला कुलमखेड येथील कै.मार्तंडराव कानडजे यांचे मुलीशी (मंगला) प्रल्हाद ताठे यांचा विवाह झाला, तेव्हा मंगला कानडजे एस.एस.सी.झालेली होती. मंगला देखील हुशार,चंचल आणि सर्वगुणसंपन्न होती. लग्नानंतर पुढे मुक्त विद्यापीठातून तिने बी.ए.केले.
श्री प्रल्हाद ताठे लेखाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे दिनांक 1/10/1985 ला रुजू झाले.परिस्थिती कितीही वाईट असली तरी मनात जिद्द,चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर जीवनात कोणतीही व्यक्ती यश मिळवू शकते, असे मला वाटते.
ते जेव्हा एमपीएससी मार्फत अधिकारी झाले तेव्हा पासून त्यांना आणि त्यांच्या घराला गावात वैभव प्राप्त झाले.. ते जसे गरिबीत जगले तसेच अधिकारी झाल्यावरही जगले. त्यांना कधी 'ग' ची बाधा झाली नाही. सर्वांमध्ये ते मिळून मिसळून राहिले.त्यांना गरिबीची जाणीव होती.नोकरी लागल्यानंतर त्यांनी अडल्यानडल्यांची कामे केलीत. त्यांनी माणसे जोडण्याचा सातत्याने प्रयत्न केला. प्रत्येक कार्यात ते जातीने हजर राहत होते आणि आजही ते तसेच वागतात.
त्यांनी लेखाधिकारी,अप्पर कोषागार अधिकारी, सहाय्यक संचालक, उपसंचालक आणि मुख्य वित्त व लेखाधिकारी, जिल्हा कोषाधिकारी या पदांवर 32 वर्षे सेवा करून ते सेवानिवृत्त झाले आहेत.
त्यांना 3 मुली आणि एक 1मुलगा असून मोठी मुलगी मनिषा वकील आहे तर जावई अनिल चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय उबाळखेड येथे प्राचार्य आहे.दिपाली ही बी.ई.असून जावई ओम माधवराव ठाकरे हे वाशिम जिल्ह्यात अनसिंग येथे उद्योजक आहे. तर लहानी मुलगी भाग्यश्री बीएएमएस,एमएस असून माजी आमदार शशिकांत खेडेकर यांची सून आहे.मुलगा अनिकेत बीएएमएस असून तो सध्या कोकणामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतो आहे.
वाईट ते सोडावे आणि चांगले ते घ्यावे असा स्वभाव ताठे साहेबांचा आहे.कोणत्याही बाबतीत टोकाची आग्रही भूमिका न घेता ते प्राप्त परिस्थितीला संयमाने सामोरे जातात.आहे त्या परिस्थितीत कोणाचीही मने न दुखवता मध्यम मार्गाचा अवलंब करतात.संयमी,शांत,निगर्वी आणि मितभाषी असा त्यांचा स्वभाव आहे.
# प्रा डी एम कानडजे, मधुकोष
सागवन-बुलडाणा (८२७५२३१८७४)