दिवानसिंग महाराज - एक सच्चा वारकरी

 संस्थाध्यक्ष, दिवानसिंग महाराज - एक सच्चा वारकरी 

  बुलढाणा जिल्ह्यातील धाड नजीक सातगाव (म्हसला) येथील दिवानसिंग मानसिंग जाधव यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1954 रोजी एका अतिशय सामान्य कुटुंबात झाला. आई भागुबाई आणि वडील धनसिंग हे दोघेही जेमतेम शिकलेले असून आर्थिक परिस्थितीने जर्जर झालेले होते. चार मुलांचा चरितार्थ चालविणे त्यांचेसाठी फार अवघड होता. तरीही शेतमजूरी करून त्यांनी हे कुटुंब कसोशीने चालविले होते.

        दिवानसिंग महाराजांना शिकण्याची फार धडपड होती. कारण "शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही" हे महात्मा फुल्यांचे वाक्य त्यांच्या तोंडपाठ होते. त्यांच्या वडिलांनी चार मुले असताना देखील या मोठ्या मुलाला शिक्षणाची सवड दिली आणि सातगाव येथील शाळेत त्यांचे नाव दाखल केले. तेथे त्यांनी घरकाम आणि थोडीफार शेतमजुरी करून पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण इमानदारीने पूर्ण केले. सातगाव येथे पुढील शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे त्यांनी वडिलांच्या मागे सारखे टुमणे लावून पाच किलोमीटर दररोज म्हसला बुद्रुक येथे पायी जाऊन आठवा वर्ग कसातरी पास केला. धाड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गावातील काही मुले जात असल्यामुळे महाराजांनी त्यांच्यासोबत पायी जाऊन नववी आणि दहावी 1971 साली चांगल्या गुणांनी पूर्ण केली.

    कुटुंब मोठे आणि परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आता पुढील शिक्षण घेणे शक्य नाही हे दिवानसिंग यांच्या लक्षात आले. ते आता बेचैन झाले. डीएड केले की पटकन नोकरी लागते असे अनेकांनी त्यांना सांगितले होते.तेव्हा वडिलांना न विचारताच त्यांनी डीएड साठी अर्ज केला आणि योगायोगाने प्रायव्हेट डीएड कॉलेजमध्ये नंबरही लागला. परंतु त्यावेळी केवळ 21 रुपये प्रवेश फी होती. ती फी सुद्धा वडील भरू शकले नाही. दिवानसिंग महाराजांना ते असह्य झाले.ते ओक्साबोक्शी रडू लागले.परंतु परिस्थिती फार हलाखीची होती आणि गावातील कोणीही धनवान व्यक्ती मदत करायला इच्छुक नव्हती. गरीबी फार वाईट असते, हे त्यांनी जवळून अनुभवले. शेवटी त्यांना 21 रुपये भरू शकत नसल्यामुळे डीएडला प्रवेश घेता आला नाही, ही त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी शोकांतिका होती.

    त्यांनी दररोज आई-वडिलांसोबत मजुरी करून घरप्रपंचाला हातभार लावला होता. साधारणपणे 1971 ते 1975 चा तो काळ होता. मजुरी करत असताना सैन्यात भरती होऊन नोकरी मिळू शकते हे अनेकांच्या तोंडून यांनी ऐकले होते. तोही प्रयत्न केला, दोन तीन वेळा भरती मारून पाहिली, पण जमले नाही. ते खूप नाराज झाले होते. मन हताश झाले होते.जीवन नकोसे झाले होते.काय करावे म्हणजे मनःशांती लाभेल, हा विचार महाराजांच्या अंतर्मनात धुमसत होता.मन सैरावैरा झाले होते.अशात एका महाराजांची गाठ पडली. त्यांनी कानमंत्र दिला. रंजल्या गांजलेल्या अनेक वारकरी संप्रदायातील संतांची उदाहरणे दिलीत. हे सर्व ऐकून त्यांचे मन शांत झाले. कोणत्याही प्रकारचे मला व्यसन नसल्याने त्यांना वारकरी संप्रदायाची ओढ लागली.कोणालाही न सांगता ते वारकरी संप्रदायाचा अनुयायी बनले .

     महाराजांनी आई वडिलांचे दर्शन घेतले आणि पंढरपूर गाठले. पुढे 1977 मध्ये ते पंढरपूर वरून श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्याकरिता रवाना झाले. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथे वारकरी शिक्षण संप्रदायाचा अभ्यासक्रम त्यांनी 1977 ते 1981 या कालावधीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केला. वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेऊन ते त्या संस्थेतून बाहेर पडले. यापुढे भागवत धर्माचा प्रचार, प्रसार, प्रवचन आणि कीर्तन करून सामाजिक प्रबोधन करायचे, व्यसनमुक्त समाज निर्माण करायचा, हा विचार घेऊन ते पुन्हा सातगाव म्हसला येथे परत आले.

       " संत तुकाराम महाराजांनी प्रपंच करून परमार्थ केला हे ऐकले होते.तेव्हा आई-वडिलांच्या आग्रहाखातर त्यांनी 25 डिसेंबर 1985 रोजी विवाह केला. संसार म्हटलं की खर्च हा आलाच. त्यासाठी अर्थार्जन आलेच. तेव्हा पैसा कुठून उभा करायचा हा विचार मनात आला. कथा कीर्तन आणि प्रवचन करून जो पैसा मिळेल त्यावर संसार करायचा, हे मनाला पटले नाही आणि म्हणून कुठेतरी छोटी मोठी नोकरी धरली पाहिजेत हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्या दिशेने ते कामाला लागले."

     सातगावातील त्र्यंबक पालकर हे बुलडाणा जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकचे संचालक होते. त्याच गावात श्री बाबुराव पाचरणे हे सहकारी सोसायटीचे गटसचिव म्हणून नोकरीला होते. डॉ उमरावसिंग राजपूत यांचे कै.भास्करराव शिंगणे यांचेशी खूप चांगले संबंध होते. गटसचिव होण्यासाठी एल.डी.सी. होणे आवश्यक असल्याने दिवानसिंग महाराज यांनी अकोला येथे जावून एलडीसी हा सहकार क्षेत्रातील कोर्स पूर्ण केला. कै. भास्करराव शिंगणे साहेब हे त्यावेळी बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची अध्यक्ष होते. त्यांच्या सहकार्याने 13 डिसेंबर 1988 रोजी गटसचिव म्हणून दिवानसिंग महाराज यांना नांदुरा तालुक्यात 350 रुपये पगारावर प्रथम नोकरी मिळाली. आता कुठे संसाराची गाडी रुळावर आली होती. काही काळानंतर वडनेर भोलजी व धानोरा येथे गटसचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली. दिवानसिंग महाराज यांना गरिबीची जाणीव होती. गरिबीचे दिवस त्यांनी जवळून अनुभवले होते. गरिबी फार वाईट असते, याचा त्यांनी पदोपदी अनुभव घेतला होता. हाच विचार समोर ठेवून त्यांनी अनेक शेतकऱ्यांची सोसायटीमार्फत चांगली कामं करून दिलीत. साहजिकच या चांगल्या कामामुळे गावातील शेतकरी त्यांना  सोडायला तयार नव्हते. घरच्या कुटुंबाला चांगली मदत करता येईल म्हणून विनंती वरून त्यांनी स्वतःची बदली बुलढाणा तालुक्यात करून घेतली.रुईखेड टेकाळे,हतेडी खुर्द आणि  दुधा येथे गटसचिव म्हणून त्यांनी काम केले.जेथे जाईल तिथे त्यांनी मायबाप शेतकऱ्यांची सेवाच केली.कुणाचीही अडवणूक केली नाही. शेतकरी सुखी तर जग सुखी, ही भावना त्यांच्या मनात खोलपर्यंत रुजली होती.

     जीवन म्हटलं की जीवनात चढ-उतार हे ओघाने आलेच. सुखदुःख हे सावली सारखे असतात हे त्यांनी वारकरी संप्रदायातून अभ्यासले होते. शेवटी राजकारण आड आले आणि त्यांची बदली एकदम शेगाव तालुक्यात चिंचोली व गायगाव बुद्रुक येथे करण्यात आली. पुन्हा दैवाचा फेरा फिरला आणि स्वतःच्या कामगिरीवर आई-वडिलांची सेवा करण्यासाठी गावाजवळच बदली मिळाली. धाड आणि जामठी ग्रामसेवा सहकारी सोसायटीचा कारभार पाहण्याची संधी मिळाली. सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने सोडविले. साहजिकच गावकऱ्यांची दिवाणसिंग महाराज यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी कास्तकार मंडळी सोबतीला मिळाली. सर्व कामे त्वरित आणि विनामूल्य करून दिलीत. जनतेची सेवा करण्याची संधी या नोकरीच्या निमित्ताने परमेश्वरांनाच मला दिली अशी भावना त्यांनी मजजवळ व्यक्त केली. 24 वर्ष शेतकऱ्यांची सेवा करून दिवानसिंग महाराज फेब्रुवारी 2012 मध्ये सेवानिवृत्त झाले.

       गरिबीवर मात करण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षण हे एक रामबाण औषध आहे हे  त्यांनी हेरले. तसेच त्याकाळी गावापासून 5-7 किलोमीटर अंतरावर धाड येथे जिल्हा परिषद शाळा होती.बहुतेक पालक मुलींना शिक्षण घेण्यासाठी धाड येथे पायी पाठवित नव्हते. त्यामुळे मुलींना शिकण्याची इच्छा असूनही शाळेत जायला जमत नव्हते. अशा परिस्थितीत ज्यांची लहानपणी शिक्षण घेण्यासाठी हेळसांड झाली, त्या दिवानसिंग महाराजाला मुलामुलींच्या शिक्षणाची गावातच सोय व्हावी म्हणून चुटपुट लागली.मुलींच्या शिक्षणासाठी गावातच एखादी शिक्षण संस्था स्थापन करावी अशी इच्छा झाली. तेव्हा प्रा डॉ.यु.बी.राजपूत सर यांचेशी चर्चा करून संत मुक्ताई शिक्षण प्रसारक मंडळ सातगाव म्हसला बुद्रुक,या नावाने,(र.नं. एफ/4781/बुलडाणा) 1998 साली स्थापन केली.काही तांत्रिक अडचणींमुळे उशिराने संत मुक्ताई शिक्षण प्रसारक मंडळाला शैक्षणिक सत्र 2003-04 पासून शाळा चालू करण्याची रितसर परवानगी मिळाली.तेव्हा दिवानसिंग महाराजांना जो काही आनंद झाला होता तो विठ्ठलभेटी इतका अवर्णनीय होता. 


कलाबाई राजधरसिंग पवार माध्यमिक विद्यालय सातगाव म्हसला बुद्रुक ताजी बुलढाणा या नावाने ही शाळा असून तब्बल आठ वर्षांनी (2011)या शाळेला शंभर टक्के अनुदान मिळाले. दिवानसिंग महाराजांनी शाळेकडे विशेष लक्ष देऊन ही शाळा नावारुपाला आणली असून सध्या ती चांगली प्रगतीपथावर आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, सैनिक, वकील झाले असून जवळपास ४०/५० विद्यार्थी सरकारी नोकरीत आहे, असे संस्थापक अध्यक्ष दिवानसिंग महाराज अभिमानाने सांगतात.

# प्रा. डी. एम. कानडजे, मधुकोष

    सागवन-बुलडाणा.

  



     



     

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत