अशोकराव निकम - एक स्वयंविकसित व्यक्तिमत्त्व

 समाजशील व्यक्तिमत्व अशोक निकम

------------------------------------------------

       मेहकर तालुक्यातील नायगाव दत्तपुर या गावी अशोक त्र्यंबकराव निकम यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९६३ रोजी एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या आई-वडिलांची परिस्थिती तशी फारच बिकट होती. परंतु आहे त्या परिस्थितीवर मात करून त्यांनी स्वतःच्या मुलांवर संस्कार केले आणि शक्य होईल त्या परीने सर्वांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. आई लक्ष्मीबाई आणि वडील त्रंबकराव सोनाजी निकम हे अल्पशिक्षित आणि अल्पभूधारक शेतकरी होते.शिक्षणाने माणूस मोठा होतो हे ते त्याकाळी जाणून होते. म्हणून त्यांनी शिक्षणाची कास धरली होती.चार बहिणी आणि एक भाऊ असा यांचा कुटुंबा विस्तार होता. त्याकाळी एमबीबीएस होणे तर सोडाच पण एका सामान्य कुटुंबात साधे बीए होणे देखील दुरापास्त होते. पण अशाही परिस्थितीत त्यांच्या वडिलांनी मोठ्या भावाला कष्ट करून, प्रसंगी अर्धपोटी राहून काटकसरीने एमबीबीएस एमएस पर्यंत शिक्षण दिले.वैद्यकिय शिक्षण घेणे हे त्याकाळी साधी गोष्ट नव्हती.हे सामान्य व्यक्तीचे काम नव्हते.परंतु हे या  सामन्यात सामान्य माणसाने करून दाखविले. ही गोष्ट त्या पंचक्रोशीतील गावांसाठी भूषणावह होती, असे म्हटले तर वावगे ठरू नये असे मला वाटते.

   मोठे भाऊ गुलाबराव या़चे सोबतच अशोकराव यांचे  देखील प्राथमिक शिक्षण नायगाव दत्तापूर येथे झाले तर माध्यमिक शिक्षण एमईएस हायस्कूल मेहकर येथे 1979 मध्ये पूर्ण झाले. त्यांनी बारावी (सायन्स) ही परीक्षा 1981 साली प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. त्यांना जीवशास्त्र या विषयामध्ये विशेष प्राविण्य मिळाले होते. त्याकाळी कोणत्याही प्रकारची शिकवणी नव्हती किंवा शिकवणी लावण्यासाठी त्यांचे जवळ पैसे देखील नव्हते. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे घरामध्ये विद्युत पुरवठा सुद्धा घेतल्या जात नव्हता.अशाही परिस्थितीत त्यांनी रात्री दहा वाजेपर्यंत ग्रामपंचायतने रस्त्यावर  लावलेल्या खांबावरील विद्यूत दिव्याखाली रात्री अभ्यास केला आणि घरी मात्र रॉकेल कंदिलाच्या उजेडात वाचन लेखन करावे लागले.

       अशोकरावांना  सकाळी अभ्यास करणे खूप आवडायचे. " साधारणपणे रात्री साडेतीन वाजता घरावरून एक विमान जायचे. त्या विमानाच्या आवाजाने आई जागी व्हायची आणि आम्हाला अभ्यास करण्यासाठी जागे करायची. त्याकाळी घड्याळ कोणालाच माहीत नव्हते. आमच्या आईची घड्याळ म्हणजे रात्री साडेतीन वाजता आकाशातून जाणारे विमान होते. मोठ्या भाऊचे 'एमबीबीएस' चे शिक्षण आणि चार  बहिणींचे लग्न करून वडिलांची आर्थिक परिस्थिती खूप खालावली होती.तरी त्यांनी हिंमत सोडली नाही " असे ते सांगतात. अभ्यास करण्यासाठी आणि गृहपाठ लिहिण्यासाठी वह्या पुस्तके कमी पडत असे. गरिबीमुळे वह्या विकत घेणे शक्य नव्हते. तेव्हा अशा परिस्थितीत मागील वर्षाच्या शाईने लिहिलेल्या जुन्या वह्या पाण्यात बुडवल्या आणि त्या पुन्हा उन्हात वाळू घातल्या. त्या वह्यावरील अक्षरे ही निघून गेली आणि कोऱ्या झालेल्या रेषेंवर मी पुन्हा लिहून अभ्यास केला. हा अविस्मरणीय अनुभव साहेबांनी मला आवर्जून सांगितला.

      साहेबांना शिकण्याची खूप इच्छा होती. " परंतु डबघाईस आलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे माझे शिक्षण थांबते की काय अशी मला भीती वाटत होती. मला बारावीचे 68% गुण मिळाले होते आणि त्याकाळी ७४ टक्केवारी एमबीबीएस ची ऍडमिशन थांबली होती. आता मला डॉक्टर व्हायची इच्छा असूनही डॉक्टर होता येत नव्हते. तेव्हा अशा परिस्थितीत मला माझ्या गुणवत्तेनुसार बीएससी (कृषी) ला नागपूर येथे प्रवेश मिळाला.", असे ते म्हणाले. बीएससी ॲग्रीच्या तिसऱ्या सेमिस्टरला पैशाअभावी वेळेत प्रवेश घेता आला नाही. तेंव्हा तत्कालीन कुलगुरू श्री ठाकरे साहेब यांनी माझ्यावर उपकार केले आणि विशेष कोट्यातून मला ॲडमिशन दिली, अन्यथा मध्येच शिक्षण सोडावे लागले असते, असे ते म्हणाले.

      मोठ्या भावाचा शिक्षणाचा खर्च, बहिणींच्या लग्नांवर झालेला खर्च या सर्व बाबींचा विचार करून  त्यांनी उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न थांबविले आणि पटकन नोकरी धरून कुटुंबाला मदत करावी, आईवडिलांना अधिक आर्थिक ताण आता देऊ नये असे वाटले. अशा परिस्थितीत आई-वडिलांसोबत शेतात काम करायला लागलो. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची जाहिरात बघितली आणि यांनी कृषी क्षेत्र अधिकारी या पदासाठी अर्ज केला. त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली. 4 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या घरी पोस्टमनने एक पत्र आणून दिले आणि आई ते पत्र घेऊन शेतात गेली. ही नोकरीची ऑर्डर आहे, हे कळल्यावर आईच्या आनंदाला पारावार राहिला नाही.तिला आकाश ठेंगणे झाले होते.एकूणच सर्वांनाच अतिशय आनंद झाला होता. 

         केवळ एकविसाव्या वर्षी अशोकराव 8 ऑक्टोबर 1984 रोजी कृषी क्षेत्र अधिकारी म्हणून सर्वप्रथम ते गुजरात राज्यामध्ये विजापूर येथे रूजू झाले. त्यांना पुढे सातारा, सिल्लोड, चिखली, रिसोड आणि बुलढाणा अशा विविध ठिकाणी कृषी क्षेत्राधिकारी म्हणून हे काम करत असताना शेतकरी, शेतमजूर आणि सोबत काम करणारे कर्मचारी यांचेशी स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित करता आला. या नोकरीच्या निमित्ताने विविध भागातील शेतकऱ्यांचे जीवन जवळून अनुभवतात आले. शेतकरी शेतात किती राबतो, शेतीवर किती खर्च करतो आणि त्याला उत्पादन खर्चावर आधारित किती भाव मिळतात याचा त्यांना अभ्यास करता आला. शेवटी एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की शेतकरी हा जगाचा जरी पोशिंदा असला तरी तो दुर्लक्षित असा घटक आहे हे त्यांना समजले.त्यांनी ३५ वर्षे क्षेत्र विकास अधिकारी म्हणून काम केले आणि शेवटी २ वर्षे त्यांना नोवेड जिल्हा व्यवस्थापक आणि शेवटी काही काळासाठी जिल्हा व्यवस्थापक या पदावर त्यांची पदोन्नती होऊन काम करण्याची संधी मिळाली. 

        " बियाणे महामंडळामध्ये सहसा कोणालाही मुदतवाढ आता पर्यंत मिळाली नाही, परंतु माझी 37 वर्षांमधील कार्यक्षमता, काम करण्याची हातोटी, प्रामाणिकपणा, सर्वांशी असलेले सलोख्याचे स्नेहसंबंध विचारात घेऊन आणि माझा गोपनीय अहवाल अभ्यासून मला दोन वर्षांसाठी याच बियाणे महामंडळात जिल्हा व्यवस्थापक या पदावर काम करण्याची पहिल्यांदाच दोन वर्षे मुदतवाढ देऊन मला संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो आणि ही माझ्या चांगल्या कामाची एक विशेष पावती आहे,हा माझा सन्मान आहे असे मी समजतो " असे त्यांनी सांगितले. अशोकराव निकम यांनी कृषी क्षेत्र अधिकारी या पदावर 35 वर्षे आणि 4 वर्षे जिल्हा व्यवस्थापक अशी सलग एकूण 39 वर्षे अविरतपणे " नोकरी हिच ईश्वर सेवा " समजून शेतकऱ्यांना सुखाचे दिवस यावे यांसाठी अहर्निश झटले,जास्तीत जास्त मार्गदर्शन केले आणि अखेर आक्टोबर 2023 मध्ये ते समाधानाने सेवानिवृत्त झाले.

   अशोकराव यांना एकच मुलगा असून तो एमबीबीएस, डी.ऑर्थो.आहे. तर सूनबाई सुध्दा एमबीबीएस,डी.जी.ओ. असून त्या बुलडाणा येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात. तसेच त्या दोघांनी बुलढाणा येथे ' निकम ॲक्सिडेंट हॉस्पिटल ' चालू केले आहे.

 साहेबांचे वाचन दांडगे आहे. नोकरी करित असतांना त्यांनी बीए  आणि एमबीए ( मार्केटिंग) देखील केलेले आहे. महात्मा गांधी, जे.बी. प्रिस्टले आणि शेक्सपियर यांचे त्यांनी सखोल वाचन केले असून त्यांच्या विचारधारेचा प्रभाव साहेबांच्या जीवनकार्यावर कार्यावर पडलेला आहे. सामाजिक विषमता,समाजातील गोरगरीब जनता आणि विशेष करून दिव्यांग यांच्यासाठी ते  कार्य करित राहतात आणि ते शक्य होईल त्या पद्धतीने समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा स्वभाव साधा सरळ, संवेदनशील, सहकार्यशील आणि परोपकारी आहे. पुढील उर्वरित आयुष्यात त्यांच्या हातून अधिक समाजसेवा घडत राहो हीच सदिच्छा!

# प्रा. डी एम कानडजे ,मधुकोष ,

    सागवन-बुलडाणा 


    




  






        

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत