ध्येय वेडे मुख्याध्यापक - अनिल चव्हाण


 ध्येय वेडे मुख्याध्यापक - अनिल चव्हाण

--------------------------------------------------------------------------

       अनिल कनिराम चव्हाण यांचा जन्म 8 एप्रील 1975 रोजी डोंगरखंडाळा ता बुलढाणा येथे एका अति सामान्य कुटुंबात झाला. वडील कनिराम हरसिंग चव्हाण बंजारा समाजातील वनविभागात लागलेले फाँरेस्ट गार्ड म्हणून पहिले सरकारी कर्मचारी होते. आई सगुणाबाई खूप मेहनती व कडक स्वभावाच्या होत्या आणि आजही आहेत.सरांचे वडील स्वर्गवासी झाले असून सर कुटुंबात सर्वात मोठे असल्याने त्यांच्यावर फार मोठी कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. सरांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत झाले.तर माध्यमिक शिक्षण संभाजी राजे विद्यालय डोंगरखंडाळा येथे झाले. तर अत्यंत काटकसरीत त्यांनी ११ व १२ वी चे शिक्षण प्रबोधन कनिष्ठ महाविद्यालय बुलडाणा येथे पूर्ण केले. तसेच त्यांनी मंठा येथे डीएड (1995) सुध्दा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून त्यांनी पुढे उच्च शिक्षण न घेता लगेच नोकरी स्विकारली. 

        4 जुलै 1998 ला संग्रामपूर तालुक्यातील निरोड गावी जिल्हा परिषद शिक्षक म्हणून ते रूजू झाले. तेथे त्यांनी अपार कष्ट घेऊन, व्यवस्थित नियोजन करून आणि सर्व टीम हाताशी घेऊन चार वर्षांत त्या शाळेला ISO नामांकन प्राप्त करून दिले.

    निरोड गावात ते 6 वर्षे निवासी शिक्षक म्हणून शाळेतच राहिले. शाळेत राहत असल्याने विद्यार्थी देखील रात्री शाळेत मुक्कामी राहायचे. रात्री ते विद्यार्थ्यांचे मोफत शिकवणी वर्ग घेत असे.सरांच्या अथक परिश्रमाने नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत अनेक विद्यार्थी पात्र ठरले.आज ते विद्यार्थी विविध ठिकाणी डॉक्टर, इंजिनिअर, प्रोफेसर, शिक्षक, राजपत्रित अधिकारी अशा चांगल्या पदावर काम करत आहे.सरांना खेळ व नृत्याची विशेष आवड असल्याने सरांनी अनेक चांगल्या गुणवान विद्यार्थ्यांना हेरून त्यांची तयारी करून घेतली. त्यामुळे निरोड शाळेला खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमातील अनेक बक्षिसे मिळाली आहेत. सहाजिकच सरांच्या या उपक्रमांमुळे निरोड गावात त्यांचा नावलौकिक वाढत गेला.विशेष म्हणजे पोलिस पाटील अनंथा पळसकर, देशमुख बापु, समाधान साबे, पुरूषोत्तम अवचार, प्रमोद सुरडकर, दशरथ साबे या हितचिंतकांनी शाळा विकासासाठी खूप मदत केली आहे.

      2000 साली सरांचे वडील स्वर्गवासी झाले. खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. लहान भाऊ अर्धवट शिक्षण सोडून शेती करत होता.अनुकंपा तत्वावर भाऊ शाम चव्हाण याला 2004 मध्ये सरकारी नोकरी लावून दिली.त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. काही प्रमाणात कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त झाल्याचा आनंद झाला.मोठा भाऊ वडिलाठायी असतो असे म्हणतात, तेव्हा सरांनी सर्वप्रथम अगोदर लहान बहिण भावांची लग्ने लावून दिलीत.सरांनी हे सर्व नोकरीच्या भरवशावर केले.

       किमान कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर अनिल चव्हाण यांनी स्वतःचे लग्न उशिराने 2003 साली पळसखेड नागो येथील बाबुराव राठोड,गटविकास अधिकारी यांचे कन्येशी केले.सरांची पत्नी जयमाला ही बुलडाणा पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद हायस्कूल साखळी येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होती.पुढे पतीपत्नी एकत्रीकरणामुळे 2004 साली सरांची बदली संग्रामपूर येथून मोताळा तालुक्यामध्ये झाली.जयमालाच्या नोकरीमुळे सरांच्या कुटुंबाला फार मोठा हातभार लागत गेला. गरिबी काय असते हे सरांनी जवळून अनुभवले होते.तेव्हा स्त्रीचा प्रपंचात हातभार किती महत्त्वाचा असतो हे सरांना चांगले कळले होते.

    सर ज्ञानोपासक आणि उपक्रमशील असल्याने सरांनी संसार व शाळा सांभाळून खैरखेड येथे असतांनाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे बीएड (2006) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले.त्यामुळे 2008 मध्ये पदवीधर शिक्षक म्हणून मोताळा तालुक्यामध्ये गुळभेळी या गावी सरांची बदली झाली.पत्नी जयमाला सरळसेवा भरतीव्दारे मोताळा येथे 2008 मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून रूजू झाल्या होत्या.सरांनी गुळभेली येथे दोन वर्षे पदवीधर शिक्षक आणि मोताळा येथे उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून काही वर्षे काम पाहिले.सरांना परिपूर्ण शिक्षक होण्याची इच्छा असल्यामुळे पुढे सरांनी पुन्हा अभ्यास करून एमए एमएड पूर्ण केले.त्यामुळे ते मोताळा येथे साधन व्यक्ती म्हणून नियुक्त झाले.

          सर,साधन व्यक्ती असताना मोताळा तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बोराखेडी येथे सरांना जाण्याचा योग आला. आदिवासी वस्तीतील ओसाड माळरानावरील शाळा बघून येथेच मुख्याध्यापक म्हणून आपण काम करावे आणि या शाळेला "माझी शाळा,सुंदर शाळा" म्हणून नावलौकिक मिळवून द्यावा असे वाटले.पत्नीचा विरोध असताना देखील सप्टेंबर 2011मध्ये मुख्याध्यापक म्हणून ते बोराखेडी येथे शाळेत रूजू झाले.

 'एकच ध्यास- शाळेचा विकास' हा एक नाविन्यपूर्ण बोराखेडी शाळेचा ध्येयवेडा प्रवास सुरू झाला.सरांनी भान ठेवून योजना आखल्या आणि बेभान होऊन त्या राबविल्या. यश येत गेले, शाळेचा विकास होत गेला.सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली.पालकांचा, विद्यार्थ्यांचा शाळेप्रती जिव्हाळा निर्माण झाला.

या ओसाड शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून पाण्याची व्यवस्था करण्यात आली. हळूहळू शाळा समिती,गावकरी व ग्रामपंचायत यांच्या मदतीने शाळेला कंपाऊंड केले. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, बोलका परिसर, बोलक्या भिंती,आदर्श परिपाठ, वृक्षारोपण,स्वच्छता, बोलका डेक्स, बालसभा, बोलक्या पट्ट्या, शैक्षणिक साहित्य,लेझीम पथक असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.यातून विद्यार्थ्यांचा गुणात्मक आणि संख्यात्मक विकास होत गेला.

       2012 मध्ये असलेली या शाळेची 223 विद्यार्थी पटसंख्या हळूहळू वाढत जावून आजरोजी ती 431पर्यंत पोहोचली आहे. दरवर्षी वृक्षारोपण करून वृक्षदिंडी काढली जाते.पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याकडे कटाक्षाने लक्ष दिल्या जाते. शाळेतील ज्ञानरचनावादी उपक्रम बघून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा, दीपा मुधोळ यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक करून आयएसओ मिळण्यासाठी प्रयत्न करावे असे सूचित केले. बघता बघता सर्व टीम मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली कामाला लागली.अथक परिश्रमाने अखेर 

 एप्रिल 2017 साली बोराखेडी शाळेला जिल्ह्यातील पहिल्या ISO शाळेचे प्रमाणपत्र पालकमंत्री व आयुक्त यांच्या हस्ते देण्यात आले. नागपूर,पुणे,हिंगोली,जळगाव,वर्धा या जिल्ह्यांतील शिक्षकांनी शाळेला ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती बघण्यासाठी आवर्जून भेटी दिल्यात.

      अनिल चव्हाण यांना शाळा व विद्यार्थी विकासासाठी केलेल्या अविरत शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय आणि वृक्षारोपण -पर्यावरण विषयक कार्यामुळे 5 सप्टेंबर 2018 रोजी महाराष्ट्र शासनाचा "आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार" प्राप्त झाला.ही त्यांच्या प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पावती होय असे मला वाटते.आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, गुणगौरव शिक्षकरत्न पुरस्कार (मुंबई), जिल्हा शिक्षक पुरस्कार (बुलडाणा), जिल्हाधिकारी यांचा ज्ञानरचनावादी शाळा पुरस्कार, स्वच्छ शाळा पुरस्कार, बावस्कर गुरूजी आदर्श शिक्षक पुरस्कार (खामगाव,2021), स्वच्छता मॉनिटर राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक (2023), शिवसन्मान जिल्हा पुरस्कार (बुलडाणा), मुख्यमंत्री "माझी शाळा- सुंदर शाळा" जिल्हा प्रथम क्रमांक (2024), नँशनल इनोव्हेटिव्ह रिसर्च पुरस्कार(2024) आणि शेवटी "मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा " विभागीय द्वितीय क्रमांक (2024) असे विविध पुरस्कार वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर प्राप्त झाले असून सदर पुरस्कारांमध्ये माझ्या सर्व सहकारी शिक्षकांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे, असे ते म्हणतात. 

      शाळेच्या विशेष कार्यामुळे 2016 पासून तर आजपर्यंत 35 लाख रूपयांची वस्तूरूपात तथा लोकवर्गणी जमा करून शाळेचा यथोचित विकास घडवून आणला आहे असे सूतोवाच अनिल चव्हाण यांनी केले आहे. तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोराखडी या शाळेचा "शिक्षणातील दीपस्तंभ" या फ्लिपबुक मध्ये नुकताच समावेश करण्यात आला आहे.या शाळेची यशोगाथा इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरावी हा यामागील मुख्य हेतू आहे.

      एकीकडे इंग्रजी शाळेचे पेव फुटले असताना देखील जिल्हा परिषद मराठी शाळेची बुडती नाव सर्व शिक्षकांनी कठोर परिश्रम घेतले तर आपण मराठी शाळा वाचवू शकतो,असे भावोद्गार अनिल चव्हाण यांनी व्यक्त केले.


# प्रा.दिगंबर कानडजे, मधुकोष 

सागवन-बुलडाणा.(8275231874) 

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत