स्वातंत्र्य सेनानी: सखाराम बापू
सखाराम बापू- एक निष्ठावान स्वातंत्र्य सैनिक
-------------------------------------------------------------
मराठवाडा विदर्भ सिमेवर जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील बोरगाव बु.(फदाट) या आडवळणी गावी सखाराम तुकाराम फदाट (पाटील) यांचा जन्म सन १९२९ मध्ये एका सधन कुटुंबात कासाबाई हिच्याशी झाला. त्यांचे वडील तुकाराम पाटील फदाट हे शेती करायचे. सखाराम फदाट यांना वडिलांकडून कमी वयातच देशप्रेमाचे धडे मिळाले.सखाराम फदाट हे १४ वर्षाचे असताना त्यांचे वडिलांवर निजाम सरकार विरुद्ध लोकांना भडकवण्याचा आरोप ठेवून त्यांना निजाम सैनिकांनी मारहाण केली.या घटनेने सखाराम बापू खूप व्यथित झाले.या प्रसंगातून बापूच्या मनात निजाम सरकार विषयी मनात रोष निर्माण झाला. बोरगावला 'बोरगाव नाका' म्हणून देखील ओळखले जायचे.
बोरगाव हे गाव तत्कालीन निजाम- ब्रिटिश विदर्भ सीमेला लागून आहे. बोरगाव येथे रझाकारांचा एक नाका होता. तिथे कायम निजाम सैनिकांची तुकडी देखरेखीसाठी असायची.नाक्यावरून ते सीमेवरील हालचाल व व्यापारांवर नियंत्रण ठेवायचे.नाक्यावरील सैनिक व रझाकारांचा बोरगाव परिसरातील सर्वसामान्य गावकरी शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होता.रझाकार गावकऱ्यांना शुल्लक कारणावरून मारहाण करायचे. ते गावकऱ्यांची संपत्ती व शेतकऱ्यांच्या मालाची लूटकरायचे.शेतकऱ्यांचे कोंबडे-बकरे जबरदस्तीने न विचारताच घेऊन जायचे.अशा अत्याचाराला बघून सखाराम बापू यांच्या मनात निजाम शासना विरुद्ध प्रचंड चीड निर्माण झाली.त्यांच्या मनात क्रांतीचे बीज रोवले गेले .
सखाराम बापूंनी,रझाकाराच्या भितीने गावातून पळून गेलेल्या लोकांना आणि भूमिगत क्रांतीकारांना भाकरी पुरविण्याचे काम केले. क्रांतीकारांना भाकरी पुरविण्याचे काम करत असतानाच त्यांची काही क्रांतिकारांशी ओळख झाली.सखाराम बापू त्यांच्या देशप्रेमाने भारावून गेले आणि आपण देखील या मोहिमेत सामील व्हावे असे त्यांना मनापासून वाटले.सखाराम बापूंनी पंचक्रोशीतील खेड्या-पाड्यात आणि वाड्या-वस्त्यांवर जाऊन निजाम सरकार जनतेवर कसा जुलूम, अन्याय-अत्याचार करीत आहे,याची माहिती लोकांना पटवून दिली.जास्तीत जास्त लोकांनी निजाम शासनाच्या विरोधात बंड करावे असे आवाहन त्यांनी केले. जनजागृती करण्यासाठी बापूंनी छोट्या छोट्या सभा घेतल्या. निरक्षर लोकांना वृत्तपत्रे वाचून दाखवली.स्वामी रामानंद तीर्थ,गोविंद भाई श्रॉफ, महात्मा गांधी यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम केले.
जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे क्रांतीकारांच्या एका गुप्त बैठकीचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. त्या बैठकीला सखाराम बापू हजर होते. त्या सभेत त्यांची जालना जिल्ह्यातील काही ज्येष्ठ क्रांतीकारांशी भेट झाली. ज्येष्ठ क्रांतीकारांच्या त्यागाने आणि मार्गदर्शनाने सखाराम बापू प्रभावीत झाले. त्यांनी त्या दिवसापासून उघडपणे निजाम सरकार विरुद्ध बंड करण्याचा निर्णय घेतला.भारत देश स्वतंत्र झाला पण आपला भाग मात्र अजूनही पारतंत्र्यात असल्याने, बापूंना प्रचंड दुःख झाले. त्यांनी पंचक्रोशीत उघडपणे उठाव सुरू केला. सखाराम बापू यांचे स्वातंत्र्य संग्रामातील सर्वात जास्त योगदान स्वातंत्र्य लढ्यातील शेवटच्या दीड वर्षात जाणवले. त्यावेळी बापू केवळ १८-१९ वर्षाचे होते.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंद सखाराम बापूंनी आणि त्यांच्या मित्रांनी गावकऱ्यांना गुळ वाटून साजरा केला. गावात तिरंगा झेंडा फडकला. ही बातमी जेव्हा रझाकारांना कळाली तेव्हा रझाकारांची एक तुकडी बापूंना कैद करण्यासाठी बोरगावला रवाना झाली.पण त्यापूर्वीच सखाराम बापु व त्यांचे मित्र विदर्भातील जंगलात पळून गेले होते. या गोष्टींचा राग मनात धरून, रझाकारांनी सखाराम बापू व त्यांच्या साथीदारांच्या घरादाराची व शेतमालाची नासधुस केली. ही वार्ता बापूला कळताच त्यांना प्रचंड राग आला. त्यांनी रझाकारांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला.बापूंनी व त्यांच्या साथीदारांनी एक योजना आखली. दुसऱ्या दिवशी रात्री बापूंनी त्यांच्या साथीदारांसोबत नाक्यावर अचानक हल्ला चढवला.अचानक झालेल्या हल्ल्याने रझाकारांना प्रत्युत्तर देण्यास वेळ मिळाला नाही.जीव वाचवण्यासाठी रझाकार पळत सुटले.बापूंनी नाक्यावर कब्जा मिळवला. गावकऱ्यांचा लुटलेला माल गावकऱ्यांच्या स्वाधीन केला आणि नाक्यावर तिरंगा फडकवला. ही बातमी जाफ्राबाद येथील निजाम सैन्य अधिकाऱ्याला कळताच, त्यांनी पुन्हा एक सैन्याची तुकडी बोरगावला पाठवली.यावेळेस बापू कैद होण्यापासून थोडक्यात बचावले. विदर्भात पळून जाऊन त्यांनी रझाकारांना हुलकावणी दिली.
निजामाचे सैनिक बापूंना अटक करण्यासाठी शोध घेत होते. स्वत:ला अटकेपासून वाचण्यासाठी बापू भूमिगत झाले होते.बापूंना खापरखेडा येथील त्यांच्या एका नातेवाईकाने आश्रय दिला होता. बापूंना आपल्या शेतात लपवून ठेवले होते. एक दिवस निजामाच्या रझाकारांनी बंड केल्याच्या आरोपाखाली,एका शेतकऱ्यांचे घर जाळून टाकले आणि नि:शस्त्र गावकऱ्यांवर हल्ला चढवला. गावकरी जीव वाचवण्यासाठी पळत सुटले. हा अन्याय अत्याचार माहित झाल्यावर बापूंना राहवले नाही. जीव गेला तरी बेहत्तर,पण आता त्यांना धडा शिकवायचाच असे त्यांनी मनोमन ठरविले.रझाकारांनी केलेल्या अत्याचारामुळे खापरखेड्यातील काही तरुण पेटून उठले. यामध्ये प्रामुख्याने अण्णा पाटील,भीमराव गवळी, खेरुबा खरात,सिताराम पाटील यांचा सहभाग होता.बापूंनी यांना सोबत रझाकारांवर हल्ला चढवला. हाती सापडेल त्या शस्त्राने हल्ला चढवून चारपाच रजाकारांचा त्याच दिवशी खात्मा केला होता. काझीम रझाकाराला जाळून टाकण्यात आले.या लढ्यात खेरुबा खरात, रंगनाथ गवळी यांनी उत्तम भाला चालून शौर्य गाजवले.तसेच खापरखेडच्या सर्वसामान्य नागरिकांनी हाती येईल त्याला शस्त्र बनवून लढा दिला.
खापरखेडा येथील रजाकारांच्या संहाराची बातमी जाफराबाद येथील रझाकारांच्या ठाण्यावर धडकली. रझाकारांच्या सैन्याच्या तुकड्या खापरखेडा गावावर कूच करून आल्या. त्या आधीच गावकरी गाव सोडून पळून गेले होते. रझाकारांनी प्रतिशोध मोहीम राबवली आणि पूर्ण गाव जाळून टाकले.सखाराम बापू आणि इतर गावकरी मंडळी विदर्भात पळून गेले.
सखाराम फदाट महात्मा गांधी (बापू) यांना आपला आदर्श मानत असे.गांधीजींच्या विचारांचा त्यांचावर प्रभाव पडला होता. त्यांना गांधीजींचे वेड होते. यामुळेच लोक सखाराम फदाट यांना 'बापू' म्हणून हाक मारू लागले. कालांतराने सखाराम फदाट यांची गावात आणि पंचक्रोशीत 'बापू'' म्हणून ओळख निर्माण झाली.
सखाराम बापूंच्या हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना स्वातंत्र्य सैनिक सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते. सखाराम बापू स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामसेवा विविध कार्यकारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन,४० वर्षे सरपंच,५ वर्षे जाफराबाद पंचायत समिती सदस्य आणि ५ वर्षे औरंगाबाद जिल्हा परिषद सदस्य आणि स्वातंत्र्य सेनानी अशा विविध भूमिका त्यांनी सचोटीने आणि प्रामाणिकपणे निबविल्यात. यावरून ते एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते हे लक्षात येते.
# प्रा. दिगंबर कानडजे, मधुकोष,
सागवन-बुलडाणा .