सखाराम बापू: बहुआयामी व्यक्तिमत्त्व
सखाराम बापू : बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी
विदर्भ आणि मराठवाडा जोडणाऱ्या शिवेपासून उत्तरेस दोन किलोमीटर अंतरावर बोरगाव बुद्रुक (फदाट) एक गाव आहे. या गावी २५ सप्टेंबर १९२९ रोजी एका सामान्य कुटुंबात सखाराम बापू यांचा जन्म झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील हे शेवटचे गाव विकासाच्या दृष्टीने कोसो दूर होते. बोरगाव बुद्रुक (फादाट) येथील सखाराम बापू आणि जालना येथील सुखलाल कुंकूलोळ या दोन स्वातंत्र्य सैनिकांनी अख्या मराठवाड्यात निजामशाही विरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली होती. सखाराम बापू जेमतेम तिसरा चौथा वर्गच शिकलेले होते.या दोघांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष न देता बालवयातच स्वतःला सीमेवरील सैनिकांसारखे प्रपंचाकडे लक्ष न देता मराठवाडा मुक्ती संग्रामात जीवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले होते.
सखाराम तुकाराम फदाट हे गांधीवादी विचारसरणीची असून साधे, सरळ, परोपकारी आणि संवेदनशील असे व्यक्तिमत्त्व होते. सखाराम तुकाराम फदाट हे त्यांचे संपूर्ण नाव असून ते गांधीवादी स्वभावामुळे अख्या पंचक्रोशीत "बापू " म्हणून ओळखू लागले होते.
सखाराम बापूंचे वडील तुकाराम पाटील हे सामाजिक राजकीय आणि धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असायचे. गावातील प्रत्येक व्यक्तीची ते आस्थेने चौकशी करीत असत. त्यांच्या वडिलांना समाजकारणाची आणि राजकारणाची आवड होती.'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' या उक्तीप्रमाणे सखाराम बापू सात्विक,धार्मिक आणि वारकरी संप्रदायाचा प्रभाव असलेल्या सधन आई-वडिलांच्या पोटी जन्माला आले.त्यांचे लग्न बालवयातच मामाच्या कासाबाई नामक मुलीशी झाले होते.
त्यांचे वडील हे निजाम शासनाविरुद्धच्या चळवळीत सक्रिय सहभागी होते. समाजसेवेचे आणि राजकारणाचे बाळकडू सखाराम बापूंना वडिलांकडून बालपणीच मिळाले होते. वडिलांचा हा राजकीय आणि स्वातंत्र्यसंग्रामातील लढाऊवृत्तीचा वारसा सखाराम बापू यांनी जीवाची परवा न करता पुढे चालविला होता.
सखाराम बापूंच्या हैदराबाद मुक्तिसंग्रामातील योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना ''स्वातंत्र्य सेनानी'' म्हणून घोषित केले आणि त्यांचा सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव केला. सखाराम बापूंची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने स्वतःच्या गावातून सुरू झाली. सर्वप्रथम ते ग्रामसेवा सहकारी विविध खरेदी विक्री संस्थेचे चेअरमन झाले.या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना शेतीसाठी पिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत होते.पुढे
बोरगाव बुद्रुक येथे ग्रामपंचायत कायदयानुसार सन १९६० मध्ये ग्रामपंचायतची स्थापना झाली. सखाराम बापूंना नेतृत्वाची आणि सामाजिक कार्याची विशेष आवड असल्याने त्यांना बोरगाव बुद्रुक (फदाट) गावचा प्रथम सरपंच होण्याचा मान सन १९६२ मध्ये मिळाला होता.गावाच्या विकासासाठी त्यांनी खूप धडपड केली होती.सर्वांच्या सुखदुःखात सामील होणे हा त्यांचा स्वभाव होता. "तोरणदारी अन् मरणदारी" ते आवर्जून उपस्थित राहत असे. या माणसाला 40 वर्ष सरपंच होण्याची संधी मिळाली.
सखाराम बापूची संयमशीलता, परोपकारी वृत्ती, संवेदनशीलता, सर्वांच्या अडचणीत धावून जाण्याची वृत्ती आणि जिवाभावाचे माणसं जोडण्याचे कसब त्यांना अवगत असल्यामुळे त्यांची ख्याती सर्वदूर जाफराबाद तालुक्यात पसरली. त्यांच्या या चांगल्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे ते जाफराबाद पंचायत समितीमध्ये १९७२ मध्ये सभापती म्हणून निवडून आले. साहजिकच त्यांच्या विकास कामांच्या कक्षा रुंदावल्या. त्यांनी बोरगाव गावापासून कामाची सुरुवात करून आपली जाफराबाद पंचायत समिती ही विकास केंद्राची नांदी बनवली. औरंगाबाद जिल्हा हा मोठा असल्या कारणाने त्यांना संपर्क वाढवावा लागला. त्यांच्या कार्याची वाढती व्याप्ती लक्षात घेता ते औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून १९८१ मध्ये निवडून आले.
सखाराम बापू औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य झाल्यानंतर त्यांना सर्कल मधील वेगवेगळ्या गावात कामानिमित्त जावे लागले. या सर्कल गावांमधील अनेक लोकांशी कामानिमित्त संबंध आला. औरंगाबाद जिल्ह्याची मोठी व्याप्ती लक्षात घेता जाफराबाद तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना जिल्ह्याच्या ठिकाणी काम करण्यासाठी जाणे येणे अवघड झाले होते.शिवाय कोणतेही शासकीय कार्यालयातील काम एका खेपेत शक्य होत नव्हते. म्हणून औरंगाबाद जिल्ह्याची विभागणी होऊन जालना जिल्ह्याची वेगळी निर्मिती झाली पाहिजे, ही गोष्ट सर्वप्रथम बापूच्या लक्षात आली. नवीन जालना जिल्हा व्हावा, यासाठी त्यांचे योगदान देखील मोलाचे होते.
सखाराम बापूंनी समाजकारण आणि राजकारण तर केलेच पण कौटुंबिक जबाबदारी देखील पार पाडली. त्यांना तीन मुले आणि तीन मुली असून सर्वजण आपापल्या परीने सुखी आणि समाधानी आहे. मोठा मुलगा मोतीराम प्रगतशील शेतकरी आहे. दुसरा मुलगा पंजाबराव पदवीधर असून जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक आहे. तर लहाना विजय आयटीआय संस्थेत लिपिक या पदावर काम करतो आहे.एकंदरीत त्यांनी कौटुंबिक जबाबदारी देखील उत्तम प्रकारे पार पाडली आहे.
माजी खासदार ॲड भाऊसाहेब देशमुख, माजी खासदार पुंडलिकराव दानवे,माजी खासदार बाळासाहेब पवार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री भगवंतराव गाढे, माजी आमदार रंगनाथ पाटील, माजी आमदार बबनराव दसपुते, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिक्षणमहर्षी द्वारकादास पाथरीकर, माजी आमदार नारायण चव्हाण, माजी खासदार बाबुराव काळे,माजी खासदार माणिकराव पालोदकर, भास्करराव शिंगणे अशा अनेकांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. तसेच माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी, माजी मुख्यमंत्री अ.र.अंतुले आणि वसंतराव नाईक यांची देखील बापूंना भेट घेण्याची संधी मिळाली होती.त्यांचे विचार ऐकायला मिळाले.
मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी वेगळे मराठवाडा राज्य निर्माण व्हावे ही मागणी त्यांनी इंदिरा गांधी भेटीच्या वेळी त्यांच्याकडे लावून धरली होती. बापू सभापती असताना औरंगाबाद येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आले असता त्यांची भेट घेतली. भेटीच्या वेळी बापूंनी स्वतः केलेल्या कामाची माहित त्यांना दिली. ती संपूर्ण माहिती ऐकून मुख्यमंत्री प्रसन्न झाले आणि त्यांनी बापूला एक घड्याळ म्हणून भेट दिली. ती घड्याळ बापूंनी आजतागायत त्यांची आठवण म्हणून कायम जपून ठेवली होती.
ग्रामसेवा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अरमन, हैदराबाद मुक्ती संग्रामात सहभाग, गावचा ४० वर्षे सरपंच, जाफराबाद पंचायत समितीचे सभापती,औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य आणि स्वातंत्र्य सेनानी,अशा विविध पातळ्यांवर त्यांनी काम केलेले होते.सखाराम बापू 95 वर्षे यशस्वी जीवनाची लढाई लढून ते इहलोक सोडून गेले आहे . त्यांच्या जाण्याने ही जी पोकळी निर्माण झाली आहे,ती कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या या कामाचा आवाका लक्षात घेता ते एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते , असे मला वाटते.
# प्रा. दिगंबर कानडजे, मधुकोष निवास,
सागवन, बुलडाणा.(८२७५२३१८७४)