मराठा सोयरीक ग्रुप अध्यक्ष: सुनीलभाऊ जवंजाळ
मराठा सोयरीक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष - सुनील जवंजाळ
--------------------------------------------------------------------
संपूर्ण भारतभर पसरलेला मराठा समाज आणि मराठा समाजातील पाटील,कुणबी,देशमुख,राजपूत,धनवटे,तिरळे,खैरे कुणबी, वानदेशी या सर्व मराठा समाजातील उपजातींना एकत्रित आणणारा वधूवर परिचय मेळावा महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुपच्या वतीने बुलढाणा येथे 5 जानेवारी 2025 रोजी आयोजित केला आहे. हा सकल मराठा वधूवर परिचय मेळावा सुनील जवंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली जिजाऊंच्या लेकींच्या पुढाकारातून आणि स्थानिक समाज बांधवांच्या सहकार्याने गर्दे वाचनालयाच्या भव्य सभागृहात आयोजित केला आहे.
काही काही माणसं अगदी साधी असतात.साधी कामं करतात. त्यांचं कधी कोणी कौतुक करत नाही. पण ते आपल्या मनात घर करून राहतात. सुनील जवंजाळ हे त्यापैकी एक महाराष्ट्र मराठा सोयरीक चळवळीतील कार्यकर्ते आहे.
त्यानिमित्ताने मी मराठा सोयरीक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुनील जवंजाळ यांचेशी संवाद साधून मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रश्न :- आदरणीय सुनीलभाऊ जवंजाळ, कृपया आपली शैक्षणिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी मला सांगाल का?
उत्तर :- वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळा साखळी बुद्रुक येथे झाले. माझे वडील स्व.श्रीराम जवंजाळ हे कृषी पदवीधर असल्याने ते कृषी पर्यवेक्षक म्हणून खामगावला नोकरीला होते.त्यामुळे माझे पदवी शिक्षण (बीए) खामगावला १९८७ मध्ये पूर्ण झाले.तसेच मी पशुवैद्यकीय डिप्लोमा देखील औरंगाबाद येथून (१९८९) पूर्ण केला आहे.माजी मंत्री श्रीकांत जिचकार यांच्या झिरो बजेटमुळे मात्र मला नोकरीत संधी मिळाली नाही. त्यानंतर मी शेतीविषयक, सामाजिक आणि राजकीय कामात स्वतःला गुंतवून घेतले. खामगाव येथे असताना भाऊसाहेब फुंडकर यांचे घर माझ्या घराच्या बाजूला असल्याने, मला खास करून भाऊसाहेब फुंडकर यांचा सहवास बालपणी लाभला.त्यांचे विचारांने मी भारावून गेलो होतो.त्यांच्यामुळे मी सामाजिक आणि राजकीय चळवळीला पूर्णवेळ वाहून घेतले. खऱ्या अर्थाने स्व.भाऊसाहेब फुंडकर हे माझे राजकीय गुरू होते.पुढे 1993 मध्ये खामगाव सोडून बुलढाणा येथे स्थायी झालो आणि फुंडकरांच्या प्रेरणेने भाजपाचा झेंडा सन 1993 मध्ये हाती घेतला.मी तेव्हा बुलढाणा तालुका भाजपाध्यक्ष,भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष, प्रदेश किसान आघाडी सचिव, अशा विविध राजकीय जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या. सन 2012 मध्ये माझी प्रथम हृदय शस्त्रक्रिया झाली.नंतर मात्र मी राजकीय झेंडा खाली ठेवून समाजकारणाकडे वळलो.
प्रश्न :- मला सांगा,आपण स्वतःच्या लग्नाच्या रेशीमगाठी कधी आणि केव्हा बांधल्यात.आपण पत्नीला किती स्वातंत्र्य दिले?
उत्तर :- लग्नासाठी मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्ष हे कायदेशीर विवाहयोग्य योग्य आहे. बहुतांश ही वयोमर्यादा आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे व्यवस्थित आहे. योग्य वेळी लग्न करून संसार करणे आणि आपल्या डोळ्यादेखत आपल्या मुलाबाळांचा सुखी समाधानी संसार पाहणे, ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. हा सामाजिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून माझ्या वडिलांनी माझे लग्न १९९१ मध्ये दुधा ब्रम्हपुरी येथील उत्तमराव रामराव म्हस्के (मुख्याध्यापक) यांच्या पुष्पा नावाच्या मुलीशी लावून दिले.माझी पत्नी लग्नापूर्वी दहावी पास होती.मी तिला शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले.ती घरप्रपंच करून बीए झाली. माझ्या सामाजिक आणि राजकीय कार्याचे ती प्रेरणास्थान आहे.तिने प्रपंचाची आणि मुलाबाळांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्यामळे मी मनसोक्तपणे सामाजिक कार्य करू शकलो.
प्रश्न :- सुनीलभाऊ, पूर्वीच्या आणि आताच्या विवाहाबाबत तुमचे काय मत आहे?
उत्तर :- आता मात्र खूप बदल झाला आहे.उच्च शिक्षणापायी मुलामुलींचे वय वाढत जात आहे. मुलंमुली योग्य वेळी लग्नांच्या रेशीमगाठी बांधायला लवकर तयार होत नाही.साहजिकच वय वाढत जाऊन लग्न जुळवण्यासाठी पालकांना अनेक अडचणी येतात. याला पालक देखील तितकेच जबाबदार आहे, असे मला वाटते. मुलंमुली उच्च शिक्षण घेऊन वैद्यकीय आणि नोकरी विषयक स्पर्धा परीक्षेची बरेच वर्षे तयारीसाठी घालवतात. त्यापैकी काही नोकरीला लागतात तर काहींना शक्य होत नाही. शक्यतोवर मुली नोकरी लागल्यावर दोन तीन वर्षांचा पगार घरी देतात.आपल्या शिक्षणावर झालेल्या खर्चाची भरपाई म्हणून त्यांना हे करावसं वाटतं. म्हटलं तर त्यात गैर काही नाही.पण यामुळे मात्र मुलींच्या लग्नाला उशीर होतो.म्हणून माझं स्पष्ट मत आहे की पालकांनी मुलामुलींना योग्य वेळी विवाह बंधनात अडकावयला पाहिजे. मुलींच्या कमाईचा पैसा बापाने खाऊ नये असे मला वाटते.
प्रश्न :- सोईरसंबंध जुळवाजुळवीची कल्पना तुम्हाला कशी सूचली.या मागची पार्श्वभूमी काय?
उत्तर :- सर,वडिलांना सोयरीक जुळविण्याचा छंद होता.माझे वडील स्व.श्रीराम जवंजाळ पाटील कृषी पर्यवेक्षक असल्याने नालाबंडिंगची कामे रोजगार हमी योजनेच्या मजुरांकडून करून घेत असत. साधारणपणे त्यांची संपूर्ण नोकरी मजुरांच्या सहवासात गेली. सर,मोलमजुरी करणारी माणसं सामान्य, साधी भोळी आणि गरीब असतात.या मजूरवर्गांची समस्या आणि व्यथा ते जाणून असायचे. त्यांच्या सोयरिकी, लग्नं हे नालाबंडींगच्या कामावर जुळायची.माझे वडील हे मध्यस्थी असायचे. मी नेहमी माझ्या वडिलांच्या सोबत साईटवर जायचो.माझ्या वडिलांच्या समोर हे लग्नांचे रेशीम धागे पक्के व्हायचे.ते त्यांना थोडीफार आर्थिक मदत देखील करायचे.ही लग्न कार्य यशस्वीपणे पार पाडण्याची जणूकाही माझ्या वडिलांचीच जबाबदारी होती.सर,मी वडिलांसोबत असल्यामुळे मला नेहमी ह्या सोयरिकीच्या गोष्टी कानावर पडायच्या.यातून मलाही आनंद मिळायचा.तेव्हा सोयरिक जुळवून देण्याचे बाळकडू मला वडिलांकडून मिळाले. यातून मला सोयरीक जुळवण्यासाठी मदत करणे या सामाजिक कार्याचा लळा लागला.
प्रश्न :- तुम्हाला महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुप स्थापन करण्याची कल्पना कशी सुचली?
उत्तर :- विवाह हा मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो. तो मानवी जीवनाला कलाटणी देणारा धार्मिक संस्कार आहे,असे मला वाटते.विवाहापूर्वी मुलामुलींच्या पसंतीचा, त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा, विचारसरणीचा, शैक्षणिक पात्रतेचा आणि आवडीनिवडींचा देखील अभ्यास केला जावा असे मला वाटते. एक दिवस मी रात्रभर विचार करत बसलो. ती २९ जानेवारी २०१६ ची रात्र होती.अचानक माझ्या मनात विचार चमकून गेला की आपण मराठा सोयरिक ग्रुप स्थापन करावा आणि या माध्यमातून महाराष्ट्रभर वधूवर परिचय मेळावे आयोजित करावे.या निमित्ताने मुलामुलींकडील आईवडील, नातेवाईक आणि उपवर वधूवर उपस्थित राहतील.मराठा समाजातील मुलामुलींच्या भविष्याच्या विचार होईल.मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबई अशा विविध ठिकाणी या मराठा सोयरीक चळवळीचा प्रचार प्रसार होईल, तेव्हा मला लग्न जुळवण्यासाठी महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुपची स्थापना करणे आवश्यक वाटले. तेव्हा पासून आजतागायत मी महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष म्हणून या चळवळीला वाहून घेतले आहे.
प्रश्न :- संस्थापक अध्यक्ष या नात्याने तुम्ही वधूवर सूचक-परिचय मेळावे, कोण कोणत्या ठिकाणी घेतलेत ? तसेच या मेळावाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये काय सांगता येईल?
उत्तर :- महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुपच्या वतीने आजपर्यंत 35 वधुवर पालक परिचय मेळावे विनाशुल्क अनेक ठिकाणी स्वयंस्फूर्तपणे घेतले आहेत. महाराष्ट्रभर विखुरलेल्या मराठा समाजातील उपवर वधूवरांचा सोयरीक जुळण्यासाठी सभा, संमेलने, मेळावे आणि सोशल मिडियाचा आधार घेऊन महाराष्ट्राभर ही चळवळ उभी केली आहे. स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या सहवासात राहिल्याने माझा महाराष्ट्रभर जनसंपर्क होता. त्या परिचयाचा उपयोग ही चळवळ राज्यभर नेण्यासाठी मला झाला.आता मी सामाजिक कार्याचा वसा घेतला आहे.आजपर्यंत औरंगाबाद,बीड, तुळजापूर, उदगीर, उस्मानाबाद,पंढरपूर, कुर्डुवाडी, सोलापूर,मुरूड, जाफराबाद, भोकरदन , सिंदखेडराजा, चिखली, बुलडाणा अशा विविध ठिकाणी मराठा समाजातील सर्व उपजातींतील पालकांना आवाहन करुन विवाहयोग्य मुलामुलींना आमंत्रित केले आणि हे सर्व मेळावे यशस्वीपणे पार पाडून दाखविले आहेत.
ही चळवळ येथेच न थांबता मी सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन राज्याबाहेर नेली. मध्यप्रदेश,हरियाणा,तेलंगणा अशा ठिकाणी वधूवर परिचय मेळाव्यांची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्याभागातील मराठा समाजातील उपजातींना एकत्र आणण्याचा प्रयत्न या मराठा सोयरिक ग्रुपच्या माध्यमातून केला आहे. तसेच आजपावेतो अंदाजे पंचवीस हजारांपर्यंत वधूवरांचे विवाह जुळविण्यात माझी मदत झाली आहे.
प्रश्न :- सुनीलभाऊ, या पुढील भविष्यातील तुमच्या योजना काय आहे?
उत्तर :- सोशल मीडियाचा आधार घेऊन प्रदेशात असलेल्या सकल मराठा समाजातील उपवर वधूवरांना महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुपची संकल्पना मी समजावून सांगितली आहे. त्या दिशेने चळवळीची वाटचाल सुरू आहे. अरविंदबापू देशमुख, दिनकरराव बावस्कर,नारायणराव मिसाळ, सुनील सपकाळ, सुनील शेळके, मीनलताई आंबेकर, डॉ अशोक खरात, सुरेश देवकर, शिवाजीराव तायडे, श्रीकृष्ण जेऊघाले, ॲड.विजय सावळे, गणेश निकम, कैलास राऊत या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन उपवर वधूवरांचा आणि घटस्फोटिता,विधवा, विधूर अशा़चा सामुहिक विवाह मेळावा आयोजित करण्याचा मानस आहे. तसेच मुलींची घटती संख्या विचारात घेता असे लक्षात येते आहे की येत्या २०-२५ वर्षात मराठा समाज अल्पसंख्याक यादीत येईल की काय अशी भिती वाटते आहे.
5 जानेवारीच्या वधूवर परिचय मेळाव्याच्या निमित्ताने समाजातील विविध राजकीय, सामाजिक संस्थांना आव्हान करतो की त्यांनी सुद्धा असले सोहळे आयोजित करण्यासाठी पुढे यावे आणि सकल मराठा समाजातील मुलामुलींच्या विवाहासंबंधी गांभीर्याने विचार करावा असे मला वाटते.
# प्रा. दिगंबर कानडजे
सागवन परिसर,बुलडाणा