मुकुंदराव पारवे : एक परोपकारी-संवेदनशील व्यक्तिमत्व -----------------------------------------
* मुकुंदराव पारवे : एक परोपकारी-संवेदनशील व्यक्तिमत्व *
श्री मुकुंद चिनकू पारवे यांचा जन्म वाशिम जिल्ह्यातील हराळ या खेडवळ गावी झाला. त्यांचे आई वडील पुरोगामी विचारसरणीचे होते. वडील चिनकू सातवा वर्ग पास असल्यामुळे त्यांना त्याकाळी लगेच शिक्षकांची नोकरी लागली. तेव्हा किमान सातवा वर्ग उत्तीर्ण असलेल्यांना हमखास नोकरीची संधी होती. त्यांचे वडील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शेवटी पदोन्नतीने रिसोड पंचायत समितीत शिक्षण विस्तार अधिकारी झाले होते.आई द्रौपदाबाई अल्पशिक्षित असून एक चांगली सुगरण होती. पारवे सरांना तीन भाऊ आणि दोन बहिणी. त्यापैकी दोन भाऊ पदवीधर असून चांगल्या नोकरीवर होते.त्याकाळी त्यांच्या वडिलांनी मुलींच्या शिक्षणाला देखील प्राधान्य दिले जाते.त्यामुळे एक बहीण चांगुणाबाई माजी मुख्याध्यापिका होत्या. तर दुसरी बहीण आशा एम.ए.असून ती गिरनार तांडा,जि.औरंगाबाद येथे सध्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे.
तर स्वत: पारवे सर बी ए, बीएड आणि मूकबधिर शिक्षक प्रशिक्षण डिप्लोमा कोर्स त्यांनी पूर्ण केला होता. एकूणच पारवे सरांच्या कुटुंबाचा अभ्यास केला असता त्यांच्या घरातील बहुतांश सगळेच जण शिक्षित, संस्कारीत, नोकरीत आणि पुरोगामी विचारसरणीचे होते.
सरांचे प्राथमिक शिक्षण लोणी (सखारामबाबा) ,माध्यमिक शिक्षण पुसद आणि पदवी शिक्षण जिजामाता महाविद्यालय बुलढाणा येथे झाले प्रथम श्रेणीत झाले.सर प्राथमिक शिक्षण घेत असताना खूप बंडपणा करायचे. कारण त्यांचे वडील त्याच शाळेत मुख्याध्यापक होते. साहजिकच त्यांच्या आधाराने ते बंडखोरी करण्यात पटाईत झाले. बंडखोरी करणारा मुकुंद पोरगा पुढे बंडू नावाने ओळखल्या जावू लागला. त्यांच्या या प्रवृत्तीमुळे वडिलांनी त्यांना मुलांच्या मागासवर्गीय वसतिगृहात दाखल केले.
जिजामाता महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेतला आणि त्यामुळे त्यांचा सभाधीटतपणा ,स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणा पाहायला मिळाला. महाविद्यालयात शिकत असताना प्रा.डॉ.स.त्र्यं.कुल्ली आणि डॉ.एस.एम.कानडजे ह्या दोन व्यक्ती त्यांचे प्रेरणास्थान. महाविद्यालयात शिकत असताना १९८६-९० या कालावधीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी या पक्षाचे केडर कॅम्पस पूज्यनीय प्रा.डॉ.कुल्ली यांच्या सौजन्याने मुंबई,पश्चिम बंगाल आणि दिल्ली येथे करता आले.यातून मला शिस्त ,स्वावलंबन आणि समता, बंधुता या मूल्यांचे शिक्षण मिळाले. तसेच त्यांच्यामुळे मी एसएफआय या विद्यार्थी संघटना चळवळीकडे आकर्षित झालो. ही चळवळ पुरोगामी विचारसरणीवर आधारित होती. अंधश्रद्धा,अनिष्ट रूढी परंपरेला या चळवळीचा प्रचंड विरोध होता. त्यामुळे या चळवळीत मी नित्य नियमाने काम केले,असे मुकुंद पारवे म्हणतात.
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी प्रगती सार्वजनिक वाचनालय आणि भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बुलढाणा या संस्थेत काम केले.ते अभ्यास करण्यासाठी वाचनालयात नेहमी जायचे आणि तेथेच रात्रभर झोपायचे. सकाळी उठून ५ ते ८ या वेळेत भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या व्यायामशाळेचे काम पाहायचे.या कामामुळे आज त्यांची प्रकृती धडधाकट आणि कसरतीची झाली आहे. मुक्या ,बहिऱ्या आणि अपंग मुलांसाठी सुद्धा शाळा असतात, त्यांना शिकवण्यात जो काही आनंद असतो तो जगावेगळा असतो,हे पुरूषोत्तम गणगेंचे विचार पारवे सरांना पटले.तेव्हा मुकुंद पारवे मुक्या बहिऱ्यांना शिकवण्यासाठी जे प्रशिक्षण लागते ते घेण्यासाठी पुरुषोत्तम गणगे आणि निळकंठ थोरात यांच्या प्रेरणेने पुणे येथे गेले. सन १९९० मध्ये त्यांनी मुक्या बहिऱ्यांना शिकविण्याचे प्रशिक्षण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले.
पारवे सरांनी बीए, बीएड आणि मूकबधिर शिक्षक प्रशिक्षण डिप्लोमा घेतल्यामुळे प्रा.डॉ. स.त्र्यं.कुल्ली यांनी मुकूंद पारवेंना मूकबधिर अपंग निवासी शाळा बुलडाणा येथे 20 डिसेंबर 1990 रोजी शिक्षक म्हणून नोकरीला लावून दिले.मुकबधिरांची भाषा सरांना अवगत असल्या कारणाने त्यांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकविले आणि पालकांप्रमाणे त्यांच्यावर माया केली. या शाळेवर त्यांनी वृक्षारोपण करून एक नंदनवन फुलविले. मुलांवर आणि झाडांवर प्रेम करणारे मुकुंदराव पारवे एक खरोखर परोपकारी व्यक्तिमत्व होते आणि आजही ते तसेच कायम टिकून आहे. " मूकबधिर अपंग शाळा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एस.एन. वानेरे आणि डॉ. गहरवार यांच्या मौल्यवान मार्गदर्शनामुळे मी चांगला घडत गेलो आणि मूकबधिर लेकरांची त्यांच्यामुळे मला सेवा करण्याची संधी मिळाली. यातून माझा देखील विकास होत गेला. यांच्या ऋणातून मी कधीही मुक्त होऊ शकणार नाही." असे भावोद्गार त्यांनी काढले.सेवा ही मनुष्याची स्वाभाविक वृती आहे आणि तिच जीवनाचा आधार आहे, हा विचार मला बाबा आमटे यांच्याकडून शिकायला मिळाला.
वसतीगृहात असताना आपापल्या खोल्यांची स्वच्छता विद्यार्थ्यांना करावी लागत असे. दर रविवारी गाईच्या शेणाने खोली सारवण्याचे काम करावे लागे.विशेष म्हणजे काम नीटनेटके, चांगले आणि स्वच्छ व्हावे यासाठी बक्षीस ठेवण्यात येत असे.उत्तम खोली ठेवण्याचे आणि सारवण्याचे पहिले बक्षीस पारवे सरांना मिळाले होते. पेन, पेन्सिल, वही व खोडरबर हे बक्षीस सरांना मिळाल्यामुळे जो काही आनंद झाला होता तो त्यांच्यासाठी अतिशय अवर्णनीय होता.
तेव्हापासून तर आजतागायत सरांना कोणतेही सार्वजनिक काम असो,की घरगुती असो ते चांगले झाल्याशिवाय करमत नाही. विशेष म्हणजे त्यांना कोणतेही काम करण्यात मनापासून आनंद मिळतो. सरांचा 7 जून 1995 रोजी वाशिम जिल्ह्यातील गोवर्धन येथे सुनिता यांचेशी अतिशय साध्या पद्धतीने विवाह पार पडला. सुनिता त्यावेळी केवळ दहावी उत्तीर्ण होत्या. त्यांना शिक्षणाची खूप आवड असल्यामुळे सरांनी त्यांना स्वातंत्र्य दिले आणि सुनीताताईंनी बीए,बीएड शिक्षण खाजगीरित्या उत्तीर्ण केले.त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये म्हणजे त्या संयमी,शांत,सोशिक, काटकसरीने प्रपंच करणाऱ्या आणि पुरोगामी विचारसरणीच्या आहे. त्यांना एक मानसी नावाची मुलगी असून ती बॅचलर ऑफ दि ऑप्थामिकल झालेली आहे आणि मुलगा अथर्व हा देखील मानसीप्रमाणेच डिग्री घेतो आहे.
त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन अनेक सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांनी पारवे सरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. पारवे सरांचा स्वभाव एक संवेदनशील आणि परोपकारी आहे. ते शक्यतो कोणाचेही मन दुखवत नाही. अडल्या नडल्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे अशी त्यांची मनोधारणा बनली आहे.पारवे सर हे खरोखर समाजाशील, परोपकारी आणि संवेदनशील असे व्यक्तिमत्त्व आहे असे मला वाटते.
# प्रा दिगंबर कानडजे,
सागवन परिसर, बुलडाणा.