एक संघर्षशील व्यक्तिमत्त्व : प्रा.आनंद वाघ -
- एक संघर्षशील व्यक्तिमत्त्व : प्रा.आनंद वाघ -
बुलडाणा जिल्ह्यातील गुम्मी या गावी प्रा आनंद खंडू वाघ यांचा 3 फेब्रुवारी 1949 रोजी जन्म झाला. त्यांचे वडील खंडू अर्जून वाघ आणि आई गुणाबाई अतिशय साधे,कष्टाळू,मेहनती आणि काटकसरीने संसार करणारे कुटुंब होते. धोंडरकर गुरूजींच्या आग्रहाखातर आणि सकाळी जंगलात जाऊन एका म्हशीचे गवत आणणे,सकाळी गोठ्यातील शेणपाणी करणे आणि सायंकाळी परत गवारातून म्हशीला आणून चारापाणी करणे या अटीवर वडिलांनी आनंदला वयाच्या आठव्या वर्षी प्राथमिक शाळेत टाकले.सातवीपर्यंतचे शिक्षण गुम्मी येथे घेतले.
आई म्हणाली होती की आपला मुलगा पोलिओग्रस्त आहे.तो शरिराने धडधाकट नाही.त्यामुळे पुढे तो कष्टाची कामे कसा करेल? तेव्हा त्याला शिकू द्या.आईच्या आग्रहाखातर सरांना पुढील शिक्षणाची संधी मिळाली. शेवटी सरांना पाडळी येथे आठव्या वर्गात दाखल केले. मागासवर्गीय बोर्डिंगात राहून ते आठवा वर्ग पास झाले.
सरांनी नववी -दहावीचे शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल धाड येथे टिनांच्या खोली राहून हाताने स्वयंपाक करून पूर्ण केले. रॉकेलच्या दिव्यावर अभ्यास केला.परंतु आईवडिलांना पैशाचा तगादा लावला नाही.खूप अभ्यास करून 1967 मध्ये ते मॅट्रिक झाले.दहावी झाल्यानंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची तीव्र इच्छा होती.परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. वाघ सरांनी स्वतःच निर्णय घेतला,तो असा की कोणालाही पैसे न मागता स्वतः काम करून शिकायचे. धोंडरकर गुरुजींनी शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटलांचे पुस्तक वाचायला दिले होते.सरांना "काम करा, कमवा आणि शिका" हा मूलमंत्र या पुस्तकातून मिळाला.पुढे काम करुन पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करायचे हा निर्णय त्यांनी घेतला.
जिजामाता महाविद्यालय बुलडाणा येथे कॉमर्स साठी त्यांनी प्रवेश घेतला. एक साधी तीन पत्रांची कुडाची खोली घेऊन चुलीवर हाताने स्वयंपाक करून शिक्षण सुरू केले. सकाळी साडेसात ते साडेअकरा कॉलेज आणि दुपारून चार -पाच तास हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले.
जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एन.खर्चे हे एक कर्तव्यदक्ष आणि उत्तम प्रशासक म्हणून महाविद्यालयात कार्यरत होते.कडक शिस्तीचे पण तितकेच प्रामाणिक,प्रेमळ आणि हुशार विद्यार्थ्यांचे कैवारी.एकदा अचानक त्यांची नजर आनंद वाघच्या शरीराकडे गेली. त्यांना कळले की हा विद्यार्थी अपंग आहे, तेव्हा त्यांनी ऑफिसमध्ये बोलावून चौकशी केली.अक्षरशः शर्ट काढून आनंद वाघ या विद्यार्थ्याच्या हातापायांचे निरिक्षण केले. त्यांना कळले की हा विद्यार्थी खरोखर शरीराने विकलांग आहे. तेव्हा याला आर्थिक मदत मिळाली पाहिजे. हा विद्यार्थी हॉटेलमध्ये वेटरचे काम करुन शिक्षण घेतो आहे.म्हणून त्यांनी महाविद्यालयातील प्रा.गव्हाळे यांना बोलावून सांगितले की या मुलाला सिव्हिल सर्जन कडे घेऊन जा आणि अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून द्या.वाघ सरांना पुढे अपंगत्वाची शिष्यवृत्ती मिळाली. तरीही त्यांनी हॉटेलमधील काम सोडले नाही.शासनाची शिष्यवृत्ती, हाताने स्वयंपाक आणि हाॅटेलमध्ये वेटरचे काम यामुळे दोन पैसे शिल्लक राहू लागले.सरांनी घरखर्चासाठी वडिलांना घरी पैसे नेऊन दिले,तेव्हा आईवडिलांना अश्रू अनावर झाले. या गोष्टी आताच्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी आणि शिकण्यासारख्या आहे असे मला वाटते.१९७१ मध्ये सरांनी नागपूर विद्यापीठाची बी.कॉम.पदवी प्राप्त केली.
सरांना शिकण्याचे विलक्षण वेड.तेव्हा वर्धा येथील नामांकित महाविद्यालयात एम.काॅम.ला प्रवेश मिळविला. तेथे सहकार तत्वावर मेस चालवली.ज्या अपंग शिष्यवृत्तीवर हिंमत मारली होती त्याच महाविद्यालयातील बाबुजींच्या निष्काळजीपणामुळे ती मिळू शकली नाही.शेवटी सरांना खर्चासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांची आठवणी झाली. "काम करा, कमवा आणि शिका." हा कानमंत्र सरांना अंगवळणी पडला होता. तेथे सकाळून काॅलेज आणि दुपारून रात्री आठ वाजेपर्यंत हाँटेलमध्ये काम केले. मोठ्या जिद्दीने १९७३ मध्ये एमकाॅम पूर्ण केले.वर्धा येथे असताना सरांना सहकार,संघटन,नेतृत्व, संयमशीलता,श्रमप्रतिष्ठा स्वच्छता,शिस्त,सामाजिक जाण,मनमिळावूपणा इत्यादि नितीमूल्ये शिकायला मिळाली.
वाघ सरांना कै.ॲड.रामभाऊ राऊत आणि कै.रा.दे.भोंडे सरकार यांच्या कृपाशीर्वादाने श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली येथे १ सप्टेंबर १९७३ रोजी एमकाॅम झाल्यामुळे लेखापाल म्हणून नोकरी मिळाली.पुढे त्यांना वरिष्ठ लेखापाल आणि १९८३ मध्ये कार्यालयीन अधीक्षक म्हणून प्रमोशन देखील मिळाले. सरांना वाचन लेखनाची आवड असल्यामुळे त्यांनी बहि:शाल विद्यार्थी म्हणून एमए (अर्थ), आणि बीएड ह्या पदव्या संपादन केल्या.शिक्षक होण्याची आवड असल्यामुळे त्यांनी अधिक्षक पदाचा राजीनामा दिला आणि त्याच महाविद्यालयात एमकाॅम बीएड ह्या पात्रतेच्या जोरावर ४ सप्टेंबर १९८५ रोजी ते कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
८ मे १९७७ रोजी तराडखेड येथील भिवाजी धोंडू कदम यांच्या ललिता नावाच्या मुलीशी त्यांचा अगदी साध्या पद्धतीने विवाह झाला.पुढे सरांनी नोकरीच्या उत्पन्नातून आईवडिलांना जमीन घेऊन दिली. शिवाय दोन भाऊ आणि चार बहिणींचा विवाह केला. सामाजिक बांधिलकी म्हणून गावातील जिल्हा परिषद शाळेला संगणक संच,प्रिंटर,प्रोजेक्टर भेट दिलीत. चिखली येथे १९९३ मध्ये जागृती सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली. श्री शिवाजी वसतिगृहाचे दहाबारा वर्षे अधीक्षक म्हणून विनामोबदला काम केले. गोरगरिबांच्या मुलांना नाममात्र शुल्क घेऊन त्यांना जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी आणि राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या.
शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करत असताना त्यांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांना दोन मुले असून मोठा अनिल एम.एस्सी,बीएड असून शिक्षक आहे. तर सूनबाई शिल्पा एम.एस्सी(कृषी) असून गृहिणी आहे आणि स्वप्निल एमबीबीएस एमएस (ऑर्थो) असून तो बरहाणपूर येथे ऑर्थोपेडिक सर्जन आहे ,तर त्याची पत्नी कोमल बीडीएस असून प्रॅक्टिस करते.सरांना एकच मुलगी असून ती एम.एस्सी.(रसायन) आहे आणि वैज्ञानिक अधिकारी (वर्ग १) म्हणून सरकारी नोकरी करते. तर जावई सचिन गावंडे मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून नोकरीला आहे.
प्रा.ए.के.वाघ सर श्री शिवाजी महाविद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष, विदर्भ महावि.शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष,विज्युक्टा जिल्हा सचिव आणि महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद होते.एकंदरीत सरांनी संघर्षमय जीवन जगून स्वतः अपंगत्वावर मात केली. उदंड इच्छाशक्तीच्या जोरावर स्वतः उच्च शिक्षण घेऊन इतरांना उच्च शिक्षित केले.प्रा ए के वाघ सेवानिवृत्त असून परोपकारी, समाजशील,स्पष्ट वक्ते आणि माणसं जोडणारे असे संघर्षशील असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.
# प्रा दिगंबर कानडजे (८२७५२३१८७४)
सागवन परिसर, बुलडाणा.