मोहळाईचा भक्तयोगी:शिवाजी काकडे महाराज

  मोहळाईचा गजानन महाराज भक्त - शिवाजी महाराज काकडे 

    ---------------------------------------------------------------

         जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हरिभक्त परायण शिवाजी महाराज काकडे यांचा जन्म १ जानेवारी १९५६ रोजी मोहळाई या विकासाच्या दृष्टीने मागास असलेल्या खेडवळ गावात झाला. त्यांची आई सोजाई आणि वडील सखाराम हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते. काटकसरीने संसार करून परमार्थ करण्यात त्यांना आनंद वाटत असे. जेव्हा १९७२ मध्ये मोठा दुष्काळ पडला तेव्हा ते बिकट परिस्थितीत खूप हलाखीचे जीवन जगले.मोठा कुटुंब विस्तार होता.त्यांना शिवाजी, पद्मिनी, वसुदेव ,चिंधाई ही चार लेकरं होती.आई फार साधी, सरळ आणि मायाळू स्वभावाची होती.ब्रम्हचारी राहून केवळ धर्माच्या कामात स्वतःला गुंतवून घ्यावे अशी त्यांची धारणा होती.परंतु आई सोजाईच्या आग्रहाखातर शिवाजी महाराज लग्नासाठी तयार झाले. दहिगाव येथील श्री नरसोबा पाटील यांची कन्या कस्तुरी हिच्याशी शिवाजी महाराजांचा विवाह झाला.वैवाहिक आणि आध्यात्मिक जीवनाचा मेळ घालत आळंदी येथे राहून जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी वारकरी प्रशिक्षण घेतले.प्रशिक्षण पूर्ण करून परतत असताना त्यांना तुम्ही गावामध्येच आपले वारकरी कार्य सिद्धीस न्यावे असे गुरु जोग महाराजांनी सांगितले.

          संसाराची वाढलेली जबाबदारी चिंतेचा विषय होता. त्यांचा एक मुलगा व तीन मुली असा मोठा परिवार होता.शेतीवरील उदरनिर्वाह, कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ, कधी नापिकी तर कधी गारपीट हे शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेले होते. राहायला घर नाही. चार लहान लेकरं. गावातील चार पाच ठिकाणी राहण्याची व्यवस्था झाली. परंतु दुसऱ्याच्या घरात किती दिवस राहणार? याला कुठे तरी मर्यादा असते आणि म्हणून शेतामध्ये टिनाचे घर करून त्यांनी राहायला सुरुवात केली.दिवसा मागून दिवस जात होते. परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याऐवजी अजून बिकटच होत चालली होती. कधी अर्धपोटी तर कधी उपाशी राहावे लागत असे.त्यांच्या पत्नी कस्तुराई या परिस्थितीला तोंड देण्यास समर्थ होत्या.संघर्ष करणारी ती वाघीण होती. कुटुंबाला हिंमत आणि बळ देणारी ती एक आदर्श गृहिणी होती.त्या कधी शिवाजी महाराजांना, कधी देवाला, तर कधी आई-वडिलांना, तर कधी स्वतःला दोष द्यायची. हे माझ्याच नशिबी का ? माझा वनवास कधी संपेल? असं ती देवाला विचारायची.पण ती कधी हरली नाही. हतबल झाली नाही.पुन्हा नव्या जोमाने कामाला आपल्या कामाला लागायची.असं नेहमी व्हायचं.दारिद्रय हे तिच्या पाचवीला पुजलेले होते.

        एकदा आषाढी एकादशीला शिवाजी महाराजांना पंढरपूरला जाण्याची तीव्र इच्छा झाली.परंतु जवळ एक रुपया सुध्दा नाही. आता जायचे कसे हा मोठा प्रश्न पडला होता, शेतात काम करत असताना एक म्हातारा त्यांना रस्त्यावर दिसला. महाराजांनी तुमच्याकडे पैसे आहे का? असे विचारले. "माझ्याकडे फक्त एकच रुपया आहे. तो तुला देऊ शकतो" असं म्हातारा म्हणाला. तो प्रसादरुपी एक रुपया घेऊन शिवाजी महाराज पंढरपूरला पायी दिंडीत जाऊन विठुरायाचे दर्शन घेऊन परत आले.त्यांच्या समोर आर्थिक अडचणीचा मोठा डोंगर उभा होता. पण त्याचा परिणाम त्यांनी अध्यात्मिक आणि धार्मिक कामावर होऊ दिला नाही.

          त्यांनी बहुतांश तीर्थक्षेत्रांवर पायी प्रवास केला. शेगाव पायी वारी त्यांनी ९० वेळा पूर्ण केली. मुक्ताईनगर पायी वारी त्यांनी १०-१२ वेळेस केली. तीर्थक्षेत्र राजुर पायी वारी१०-१५ वेळेस केली.मोहळाई ते श्रीक्षेत्र अंबऋषी पायी वारी कमीत कमी १५-१६ वेळेस पूर्ण केली. पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त ते कमीत कमी दोनतीन वेळेस पायी दिंडीत सहभागी झाले. या पायी प्रवासात त्यांना खूप चांगला अनुभव आला. अनेकांच्या सुख दुःखात सहभागी होता आले.समाधान आणि सुख कशात असते याची जाणीव झाली. मोहळाई ते ओंकारेश्वर जलतीर्थ कावड यात्रा पायी चालत जाऊन एकदा पूर्ण केली.त्यांनी ओंकारेश्वर ते नर्मदा परिक्रमा 3600 किलोमीटरची पायी चालत जाऊन सपत्नीक चार महिने दहा दिवसांत पूर्ण केली.ते जिथे जाईल तिथे आध्यात्मिक विचार आणि शैक्षणिक जनजागृती करत असतात,हे येथे आवर्जून सांगितले पाहिजे.

       शिवाजी महाराज हे बालपणात शिक्षणापेक्षा सवंगडी जमा करणे, गणपती करणे,त्याची पूजा आरती करणे,बालगोपाळांना जमवून गोपाळकालाचे कार्यक्रम करणे,याकडेच शिवाजी महाराजांचा विशेष ओढा असायचा. त्याकाळी टिचभर पोटांची खळगी भरण्यासाठी सर्वांना टिकास आणि फावडे घेऊन नालाबंडींगची कामं करण्यासाठी जावे लागे.तेव्हा बागायती शेती जवळपास नसायची. कोरडवाहू काळकुसळी गहू, हरबरा, करडी जवस, कराळ, अशी पिकं कोरडवाहू जमिनीत घेतली जात असे. सांगायचे तात्पर्य हे की दुष्काळसदृश्य परिस्थित असायची.जीवन जगणे ही तारेवरची कसरत असायची.              

     सर्व काही सुरळीत चालू असताना त्यांच्या वडिलांना अचानक ताप आला. ताप काही थांबता थांबेना. बराच औषध उपचार केला. त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांचे आकस्मिक निधन झाले आणि सर्व कुटुंब उघड्यावर पडले.शिवाजी महाराजांचे ऐन दहा-बारा वर्षाचे वय असताना वडिलांचे छत्र हरवल गेलं. साहजिकच आभाळ कोसळल्यागत झाले. सर्व लहान भावंडांची जबाबदारी सांभाळून ते आध्यात्माकडे वळले. आता खऱ्या अर्थाने त्यांची कसरत सुरू झाली होती.

      चार दशकांपूर्वी गाव अस्वस्थ आणि भांडखोर होते.भांडणं करणं जणूकाही हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे प्रत्येकाला वाटत होते.भावाभावांमधील भांडणं, शेतीच्या बांधावरील भांडणं, जागेच्या अंगणारुन भांडणं, कोणीतरी करणी जादूटोणा केला म्हणून गावात भांडणं सातत्याने चालत होते.हा सगळा प्रकार एका अविद्येचा होता. आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण त्याला कारणीभूत होते. शक्य होईल तेवढी भांडणे गावातील पोलिस पाटील कै.संतोषराव पालकर बैठक घेऊन निपटत असे.जे भांडणआवाक्याबाहेरचे असायचे ते पोलिस स्टेशनकडे जात होते.

          गावकऱ्यांच्या मदतीने गावामध्ये सार्वजनिक गणपती बसवून अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करावे,वारकरी धर्माचा प्रचार- प्रसार करावा.संतांचे विचार ऐकवून आपले आणि गावकऱ्यांचे जीवन धन्य करून घ्यावे असे विचार त्यांच्या मनात आले. शिवाजी महाराजांची आर्थिक परिस्थिती फार नाजूक आणि बेताचीच होती.तेव्हा गावकऱ्यांची मदत घेऊन धार्मिक कार्यक्रम करू लागले.गावातील माणसांना वारकरी संप्रदायचे महत्व सांगितले पाहिजे असे त्यांनी ठरविले.

 त्यांनी गावात एकादशीचे महत्व समजावून सांगितले. एकादशी व्रत करणाऱ्या मंडळींची एक यादी तयार करून एक एकादशी वारकरीमंडळ तयार करण्यात आले.दर एकादशीला ते एकादशी घालायचे. वारकरी संप्रदायचे व्रत आणि काही नियम सर्वांना समजावून सांगितले जायचे. यातून गावकऱ्यांचा वर्तनात बदल होत गेला.गावात भक्तीमय वातावरण तयार झालं. काकडा आरती, हरिपाठ,भजन, कीर्तन भारुड, प्रवचन असे अनेक अध्यात्मिक कार्यक्रम दरवर्षी त्यांनी पुढाकार घेऊन गावकऱ्यांची मदत घेऊन राबविले. अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक किर्तनकारांचे मोहळाईला पाय लागले.त्यामुळे गावामध्ये व्यसनाचे प्रमाण कमी झाले. बहुतांश मंडळी सात्विक, धार्मिक आणि भाविक बनली.साहजिकच प्रत्येक बाया माणसांना जीवनातील रहस्य उमगू लागले. जीवनाचा अर्थ कळला.अध्यात्मिकतेकडे गावकऱ्यांचा कल वाढत गेला. गावातील भावबंधकीतील भांडणं, साध्या साध्या गोष्टी वरून होणारे वाद जवळपास कमी झाले.एकूणच तंटामुक्त गाव होऊन ते आदर्शाकडे वळले.

       दानशूर व्यक्तींनी त्यांना आध्यात्मिक वातावरण निर्मिती करिता कधीच आर्थिक अडचणी येऊ दिले नाही. गजानन महाराजांची मूर्ती बसवणे असो की मंदिर उभारणीचे काम असो कशाचीच कमतरता भासू दिली नाही.महाराजांचे वय सध्या 68 वर्षाचे असून सुद्धा जानेवारी 2025 मध्ये पुन्हा नर्मदा परिक्रमा करण्याचे नियोजन झाले आहे. संसाराच्या मोठ्या व्यापातून त्यांना एवढा वेळ मिळतो कसा हा मला पडलेला एक प्रश्न आहे? अशा मनमिळावू, कष्टाळू, होतकरू आणि प्रपंच करून परमार्थ करणाऱ्या गजाननभक्त शिवाजी काकडे महाराजांना जीवन जगण्यासाठी परमेश्वर अधिक बळ देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना!

# प्रा दिगंबर कानडजे,मधुकोष 

     सागवन परिसर,बुलडाणा. 


            

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत