प्रल्हाद काटकर : एक कर्तव्यदक्ष माजी पोलीस निरीक्षक

       

प्रल्हाद काटकर : एक कर्तव्यदक्ष माजी पोलीस निरीक्षक

-----------------------------------------------------------------

      वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील कासोळा या आडवळणी गावी प्रल्हाद किसनराव काटकर यांचा 20 फेब्रुवारी 1966 रोजी एका सामान्य कुटुंबात जन्म झाला. त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरिबीचे आणि काटकसरीचे होते. वडील किसनराव मारुती काटकर आणि आई मनकर्णाबाई किसनराव काटकर यांचा व्यवसाय शेतमजूरीचा होता. वडील सालगडी म्हणून दुसऱ्याच्या शेतीवर काम करायचे. तर आई शेतमजुरी करायची.जे आहे त्यात समाधान म्हणून जीवन जगणे आणि आजचा दिवस कसाबसा काढून उद्याच्या दिवसाची वाट पाहणे हा त्यांचा दृष्टिकोन होता.त्याकाळी शिक्षणाकडे आई-वडील विशेष लक्ष देत नसे.कारण कुटुंबाचे पोट भरविण्यासाठी मुलांनी दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जाऊन घर प्रपंचाला हातभार लावला पाहिजे असे प्रत्येक गरीब कुटुंबांचे मत होते.

वडील सालगडी असताना गावात येणाऱ्या पोलीस पाटलाकडे पोलीस आणि पोलीस ठाणेदार बऱ्याच वेळा येत असे. त्या ठाणेदाराचा रुबाब पाहून त्यांच्या वडिलांना वाटायची की एक दिवस आपला मुलगा असा पोलीस ठाणेदार झाला पाहिजे अशी त्यांची मनोकामना होती. त्यासाठी आता कसेही करून आपला मुलगा शाळेत घातला पाहिजे हा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी अनेक अडचणींवर मात करून प्रल्हादला गावातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत घातले.त्याकाळी श्रीमंतांची मुले पुस्तकांना कव्हर लावून तिच पुस्तके दुसऱ्या वर्षी अर्ध्या पाऊण किंमतीत दुसऱ्या विद्यार्थ्यांना विकायची. सुट्टीच्या दिवशी दुसऱ्याच्या शेतात रोजाने जाऊन जे पैसे मिळाले त्यात बऱ्यापैकी असलेली पुस्तके त्यांनी अर्ध्या किंमतीत विकत घेतली.पुस्तके मिळाल्याचा प्रल्हाद काटकर यांना खूप आनंद झाला. 

       आता माध्यमिक शिक्षणाची कुठे घ्यावे ,हा विचार प्रल्हादला पडला. गावात पुढील शिक्षण घेण्याची व्यवस्था नव्हती. वडिलांजवळ पैसे नसल्यामुळे बाहेर गावी शिक्षण घेण्यासाठी खोली घेऊन राहणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांनी ५ किलोमीटर पायी चालत जाऊन जय किसान विद्यालय काळेगाव येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या वडिलांना आयुष्यभर मुलांनी मोलमजुरी करून जीवन जगणे पसंत नव्हते.त्यांना प्रल्हादाला पोलीस ठाणेदारांच्या रूपात बघायचे होते.आपल्यासारखे काबाडकष्ट त्याच्या वाटेवर पुन्हा येऊ नये म्हणून त्यांनी मोलमजुरी करून, प्रसंगी सालगडी राहून प्रल्हाद काटकर यांचे ११ व १२ वी चे शिक्षण श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे पूर्ण केले.प्रल्हाद काटकर बारावी पास झाल्याचा आनंद यांच्या वडिलांना झाला होता.

      प्रल्हाद काटकर यांची प्रकृती उत्तम आणि धडधाकट होती. ते उंचीनेही पुरेशे होते. तेव्हा वडिलांना न सांगताच आपण पोलीस दलात भरती व्हावे आणि देशाच्या संरक्षणामध्ये आपला हातभार लागावा हा विचार त्यांच्या मनात आला आणि म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन भरतीची परीक्षा दिली. शेवटी ते पोलीस भरतीत यशस्वी झाले. बारावीचा निकाल लागण्यापूर्वीच त्यांना 1 ऑगस्ट 1984 रोजी अकोला पोलीस दलात नोकरी मिळाली. 700 प्रशिक्षणार्थी असलेल्या अकोला येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रथम क्रमांकाने आले. जेव्हा ही बातमी त्यांच्या आईवडिलांना कासोळा गावी कळाली तेव्हा त्यांच्या कुटुंबाला झालेला आनंद लय होता. गरिबीवर मात करून आपल्या मुलाने पोलीस अंमलदार ही नोकरी मिळवली होती.पोलीस अंमलदारांचा बाप म्हणून मिरविण्यात त्यांना खूप भूषण वाटत होते.

      दर्यापूर येथील तलाठी अनंतराव पवार आणि आई शिक्षिका यांच्या निलिमा नामक मुलीशी काटकर प्रल्हाद काटकर यांचे 1989 मध्ये अगदी साध्या पद्धतीने लग्न झाले. प्रल्हाद काटकर हे अभ्यासू वृत्तीचे होते. त्यांना शिक्षणाची विशेष आवड असल्यामुळे आपण पुढे शिकले पाहिजेत हा विचार त्यांच्या डोक्यात होता आणि वडिलांची उच्च शिक्षण घेण्याची सुध्दा इच्छा होती. तेव्हा ती प्रल्हाद काटकर यांनी पूर्ण करून दाखविली.पोलीस खात्याची परवानगी घेऊन, सकाळी कॉलेज केले आणि दुपारून रात्रभर पोलीस ड्युटी केली, शिवाय प्रपंच देखील केला. विशेष बाब म्हणजे नीलिमा ताई लग्नाआधी पदवीधर होत्या. यांच्या पत्नीने घरीच नोट्स काढून दिल्या आणि इंग्रजीचे व्याकरण सुध्दा शिकविले.परिणामस्वरूप त्यांनी श्री शिवाजी महाविद्यालय अकोट येथे बीकाॅम ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. या यशाबद्दल अकोट येथील नागरिकांनी आणि प्राध्यापकांनी त्यांचा यथोचित नागरी सत्कार करुन गौरव केला होता. प्रल्हाद काटकर साहेब यांच्या यशात नीलिमा ताईंचा मोलाचा वाटा आहे,हे नाकबूल करता येणार नाही.

     प्रल्हाद काटकर हे शारीरिकदृष्ट्या सुदृढ होते आणि त्यांची बुद्धिमत्तेची धार देखील तेज होती. ते अभ्यासू ,चौकस, बुद्धिमान आणि होतकरू वृतीचे होते. पदवीधर असल्यामुळे ते एमपीएससीची पीएसआयची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले.सन 2000 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत अकोला आणि वाशिम जिल्ह्यांमधून प्रथम येण्याचा त्यांनी बहुमान मिळविला. ते 1 एप्रिल 2004 रोजी गडचिरोली जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाले.या घटनेमुळे कासोळा गावांमध्ये त्यांच्या आईवडिलांनी आणि गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली पोलीस स्टेशन मध्ये असताना तीन वेळा नक्षल दलम सोबत चकमक झाली होती. त्यात ते मुख्याधिकारी म्हणून सहभागी होते. कोणत्याही प्रकारची जीवित हानी न होऊ देता त्यांनी ही मोहीम यशस्वी करून केली.त्याबद्दल पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी विशेष दखल घेऊन त्यांना पोलीस पदक देऊन सन्मानित केले शिवाय त्यांना 2011 मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून बढती सुध्दा दिली. पुढे पाच वर्षानंतर उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल त्यांचे 2016 मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून प्रमोशन झाले.

       " सदरक्षणाय l खलनिग्रहणाय ll " हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे.याला स्मरून त्यांनी समाजाला प्रामाणिकपणे सेवा देण्याचं काम केलं.दुष्ट माणसाला त्याची जागा दाखवून दिली आणि चांगल्या माणसाला ‌न्याय मिळवून दिला. त्यांना गरिबीची जाणीव होती. गरीबांवर पूर्वी कसा अन्याय होत होता हे त्यांनी जवळून अनुभवले होते. तेव्हा आता आपण ठाणेदार झालो आहोत, आपल्याला गरिबांना न्याय मिळवून देण्याची संधी आली आहे, हे त्यांनी जाणले आणि त्याच पद्धतीने ते जीवन जगले. त्यांनी पोलीस अंमलदार, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक पदांवर विविध विभागात 39 वर्षे 7 महिने एवढी प्रदीर्घ सेवा दिली.पोलीस दलाची नोकरी म्हणजेच समाजकार्य करण्यासाठी मिळालेली एक प्रकारे चांगली संधी आहे असे समजून त्यांनी नोकरी केली.त्यांना 39 वर्षाच्या कार्यकाळात दोनशे दहा बक्षिसे आणि बारा प्रशस्तीपत्रे मिळाली आहेत. ही त्यांच्या अथक परिश्रमांची आणि प्रामाणिकपणे केलेल्या कामांची पावती आहे. ही खरोखर आपल्या पोलीस दलासाठी आणि समाजासाठी भूषणावह बाब आहे असे मला वाटते. 

        प्रल्हाद काटकर साहेब यांना दोन मुले असून मोठा मुलगा कुलदीप सिव्हिल इंजिनियर असून शासकीय कंत्राटदार आहे, तर दुसरा मुलगा विक्रांत बीएससी(कृषी) एमबीए असून तो एक चांगला मोठा व्यावसायिक बनला आहे. सध्या प्रल्हाद काटकर हे सेवानिवृत्त असून ते आपल्या कुवतीनुसार शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक कामात सदैव व्यस्त असतात. त्यांचा स्वभाव मितभाषी,संयमी,प्रेमळ,सहकार्यशील, सेवाभावी आणि संवेदनशील आहे. त्यांना उर्वरित आयुष्यासाठी दैनिक महाभूमी कडून हार्दिक शुभेच्छा!

      # प्रा.डी.एम.कानडजे, मधुकोष, 

         सागवन परिसर, बुलडाणा.(८२७५२३१८७४)

 .


Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत