पशुवैद्यकीय डॉ.भिवसनराव दाभाडे:- एक संघर्षशील व्यक्तिमत्त्व

  पशुवैद्यकीय डॉ.भिवसनराव दाभाडे:- एक संघर्षशील व्यक्तिमत्त्व

-------------------------------------------------------------------------

        स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ.भिवसनराव राघोजी दाभाडे यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील भालेगाव या छोट्याशा गावात १० एप्रिल १९४३ रोजी झाला. ते गाव पैनगंगेच्या तीरावर वसलेले एक निसर्गरम्य आणि नदीचा परिसर असलेले दाट झाडीचे आहे.त्यांची आई सारजाबाई ही अडाणी जरी असली तरी शेतमजुरी करून घरकाम करायची. स्वयंपाकात ती एक उत्तम सुगरण होती. वडील राघोजी शेतीपूरक लाकडी अवजारे तयार करायचे आणि त्या बदल्यात त्यांना गावातील शेतकरी हंगामी बलुतं म्हणून शेतीतील मण दीड मण धान्य द्यायचे. त्याकाळी 12 बलुतेदार ही सर्रास पद्धत होती. संपूर्ण गावगाडा या पद्धतीने चालत होता. 

    डॉ भिवसनराव यांना यशवंतराव आणि अर्जुनराव ही दोन भावंडे होती तर चंद्रभागा आणि इंद्राबाई या दोन बहिणी होत्या. एकूणच मोठा कुटुंब विस्तार असल्यामुळे फार मोठी आर्थिक ताणाताणी व्हायची. तेव्हा त्यांच्या आईची मजुरी आणि वडिलांचे बलुतं यावर एकूणच घर प्रपंच चालत असे.

       डॉक्टर भिवसनराव यांचे प्राथमिक शिक्षण भालेगाव येथे मराठी प्राथमिक शाळेत झाले.शिक्षण घेत असताना त्यांनी वडिलांच्या हाताखाली सुतारकीचे काम केले.त्यांना मदत केली.

      डॉ भिवसनराव दाभाडे यांचा देवावर जरी विश्वास नसला तरी " देव तारी त्याला कोण मारी " या म्हणीची मात्र त्यांना प्रचिती आली.लहानपणी गणेश अवसरमोल यांचे सोबत ते पोळ्याच्या दिवशी पैनगंगा नदीवर पोहायला गेले. त्यांना पोहणे येत नव्हते. तरीही धीटपणा आणि धाडसीपणा त्यांच्या अंगलट आला. पाणी खोल असल्याने त्यांचे पाय टेकले नाही.त्यात नदीला लोंढा आला आणि बघता बघता पाणी वाढले आणि भिवसन गटांगळ्या खाऊ लागला.पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला.गणेशला काही सुचले नाही.त्याने घरी जाऊन आपला भिवसन पाण्यात वाहून गेला असे त्यांच्या वडिलांना सांगितले.बघता बघता शोककळा पसरली. इकडे मात्र दूर अंतरावर बैलं धुत असलेले श्रीराम मिस्त्री देवदूतासारखे धावून आले.त्यांच्या पायाला वरून वाहत येणारे पोरं लागले.त्यांनी पाण्याच्या बाहेर काढून पोटातील पाणी काढले. मला जीवदान दिले.आज माझा पुनर्जन्मच झाला असे भावोद्गार त्यांनी काढले.

         बाहेर शिक्षण घ्यायचे म्हटल्यावर राहायचे कोठे आणि कसे? एवढा खर्च आपल्या वडिलांना कसा झेपवणार? या विचाराने भिवसनराव चक्राहून गेले.बाभुळखेड येथील मल्हारी काळे नावाचे एक समाजसेवक अचानक त्यांच्या दारी अवतरले आणि वडिलांना म्हणाले की राघोजी बुवा! तुमच्या मुलाला मेहकरला बोर्डिंग मध्ये शिक्षणासाठी पाठवता का? फक्त महिना दहा रुपये देत रहा म्हणजे झाले. सर्व काही खाण्यापिण्या सगट व्यवस्था होऊन जाईल. हे ऐकल्यावर वडिलांना हायसे वाटले. चिंताच मिटली.रामशंकर दाभाडे, संपत दाभाडे, सुदाम दुतोंडे, गोपाळा दाभाडे अशी चौघेजण मेहकरला शिक्षणासाठी गेलो. होस्टेलमध्ये राहून ते शिक्षण घेऊ लागले. श्री शिवाजी हायस्कूलमध्ये दहावी पर्यंत शिक्षण घेतले.होस्टेलमध्ये राहत असताना खूप काम करावे लागे.शिवाय सुट्टीच्या दिवशी आमचे समाजसेवक मल्हारी काळे खेडोपाडी आम्हाला घेऊन जात असे. होस्टेलला सरकारी अनुदान नव्हते.कसेही करून मण दोन मण धान्य द्या, अशी विनवणी ते गावांतील मोठ्या आसाम्यां करीत असत. नायगाव, भालेगाव, मोळामोळी,लोणीगवळी, सुलतानपूर अशा खेड्यातील लोकांच्या घरातून ज्वारी, गहू, तांदूळ, डाळ, इत्यादी धान्य होस्टेल चालविण्यासाठी गोळा होत असे.शिवाय जमा झालेले धान्य ७-८ किलोमीटर डोक्यावर घेऊन मेहकरला आणावं लागे.असं वाटे की हे होस्टेल सोडून द्यावे.पण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याची जाणीव होती. शेवटी एकदाचे १० वीचे शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल मेहकर येथे पूर्ण झाले.

     दहावीनंतर पशुसंवर्धन खात्यामार्फत 'एलएसएस 'चा डिप्लोमा १९६५ मध्ये हिंगोली येथे मागासवर्गीय वस्तीगृहात राहून प्रथम श्रेणीत पूर्ण गेला. वडिलांना सुद्धा या गोष्टीचा अभिमान वाटला. आता पोरगं काहीतरी नक्कीच करणार,या आशेने वडील हरकून गेले होते. त्याकाळी नोकरीची संधी चालून आली. लागलीच पंचायत समिती मेहकर येथे १९ ऑगस्ट १९६५ रोजी सहाय्यक विस्तार अधिकारी म्हणून पशुसंवर्धन खात्यात नोकरी मिळाली.

   त्याकाळी बालविवाह पद्धतीकडे विशेष करून कोणीही लक्ष देत नव्हते. तेव्हा लहानपणीस मुलामुलींची लग्न व्हायची. अशातच त्यांच्या वडिलांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १९५७ रोजी निरक्षर असलेल्या कमल नामक मुलीशी लग्न लावून दिले. त्याकाळी जिथे मुलांना शिक्षणाची व्यवस्था नव्हती, तेव्हा मुली शाळेत कसे जाणार? कमलताईला शिकण्याची आवड असल्यामुळे पुढे घरातच तिला लिहिणे वाचणे शिकविल्या गेले.त्या चांगल्या साक्षर बनल्या. 

     बोलक्या जिवाचे दुःख व्यक्त करता येते,ते डॉक्टरला सांगून बरे करता येते पण जे मुके प्राणी आहेत,त्यांच्या वेदना ते व्यक्त करू शकत नाही.अशा प्राण्यांच्या वेदना आम्ही पशुवैद्यकीय अधिकारी सहज लिलया जाणतो आणि त्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे कसोशीने प्रयत्न करतो.या मुक्या प्राण्यांची सेवा करण्याची मला या नोकरीत चांगली संधी मिळाली.यात मी धन्यता मानतो. पुढे मला या मुक्या प्राण्यांच्या आशीर्वादाने सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांनी महाराष्ट्र शासनामार्फत गोरगरिबांना, आर्थिक दृष्ट्यादुर्बल घटकांना गाई, म्हैशी, कोंबड्या,बकऱ्या त्यांचा संसार उभा करण्यासाठी पुढाकार घेऊन विनासायास वाटल्या.मेहकर , बुलडाणा,दारव्हा, धुळे, यवतमाळ, नांदुरा, दिग्रस, वरणा, राजूर, येळगाव, पुणे,शेलगाव, अशा विविध ठिकाणी ३७ वर्षे ६ महिने अविरत सेवा करून सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. काम करत असताना त्या भागातील संस्कृती,रितीरिवाज,जीवनमान पद्धती,श्रद्धा अंधश्रद्धा जवळून अनुभवता आल्या.यातून मला साहित्य निर्मितीला चालना मिळाली, असे ते सांगतात. 

      सेवानिवृत्त झाल्यानंतर कामाचे स्वरूप जरी बदलले असले तरी माणूस शांत बसत नाही, तो काही ना काही तरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो. डॉक्टर दाभाडे यांनी आपल्या समाजात जाऊन शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला.जुन्या अनिष्ट परंपरा,रूढी,चालीरिती आणि अंधश्रद्धा याबाबतीत आजही ते मुकुंदराव पारवे यांचे सोबत खेडोपाडी जाऊन प्रबोधन करतात.परंतु सामाजिक परिवर्तन हे सावकाश होत असते, त्याला वेळ लागतो.समाजाला प्रबोधन करण्यासाठी डॉक्टर दाभाडे यांनी पहिला मेळावा 2009 मध्ये बुलढाणा येथे तर दुसरा मेळावा 2010 मध्ये मोताळा येथे अनेक मित्रांच्या सहकार्याने घेऊन आपली समाजकार्याची भूमिका स्पष्ट करून सांगितली.

    डॉक्टर दाभाडे यांनी स्वतःशिक्षण घेऊन पत्नीला शिक्षित केले आणि स्वतःच्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन उच्च शिक्षित केले.आज त्यांचा एक मुलगा एमए एलएलबी असून सध्या तो प्रॅक्टिस करतो आहे. 

अखिल भारतीय साहित्य ॲकाडमी वर्धा कडून " हेल्याचा नवस " या पुस्तकाला "राजीव गांधी पुरस्कार" मिळाला आहे. तसेच समाजसेवेबद्दल महाराष्ट्र शासनाचा "साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार" समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य माजी मंत्री नामदार राजकुमार बडोले आणि राज्य मंत्री मा.दिलीप कांबळे यांच्या हस्ते नांदेड येथे सन्मानपूर्वक देण्यात आला.

        "समाजसेवकाने फक्त समाजसेवकाचा पोशाख धारण करायचा नसतो तर समाजसेवेचे व्रत धारण करायचे असते आणि तेच मी स्वीकारलेले आहे. जी काही मी आज समाजसेवा करतो आहे ती केवळ सामाजिक बांधिलकीतून आणि जाणिवेतून." असे ते म्हणतात. धीटपणा,धाडसीपणा,संयमी, प्रामाणिकपणा आणि सेवाभावीवृत्ती ही डॉ भिवसनराव दाभाडे यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत.दैनिक महाभूमीच्या वतीने त्यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

# प्रा डी एम कानडजे, मधुकोष,

   सागवन-बुलडाणा 


     

    


Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत