शिक्षणातील दीपस्तंभ - बोराखेडीची जिल्हा परिषद शाळा

    

फ्लिपबुक समाविष्ट, शिक्षणातील दीपस्तंभ - बोराखेडीची जिल्हा परिषद शाळा

-------------------------------------------------------------------------- 

     बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बोराखेडी. साधन व्यक्ती म्हणून अनिल चव्हाण यांना तेथे जाण्याचा योग आला. आदिवासी वस्तीतील शाळा बघून येथेच मुख्याध्यापक म्हणून आपण काम करावे आणि या शाळेला "माझी शाळा,सुंदर शाळा" म्हणून नावलौकिक मिळवून द्यावा असे अनिल चव्हाण यांच्या मनात आले आणि क्षणाचाही विलंब न लावता विकासापासून कोसो दूर असलेल्या बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत सप्टेंबर 2011मध्ये अनिल चव्हाण मुख्याध्यापक म्हणून रूजू झाले. 

        'एकच ध्यास- शाळेचा विकास' हा एक नाविन्यपूर्ण बोराखेडी शाळेचा ध्येयवेडा प्रवास सुरू झाला.सरांनी भान ठेवून योजना आखल्या आणि बेभान होऊन त्या राबविल्या.यश येत गेले, शाळेचा विकास होत गेला.सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली.पालकांचा,विद्यार्थ्यांचा शाळेप्रती जिव्हाळा निर्माण झाला.

या ओसाड शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून पाण्याची व्यवस्था करण्यात आली. हळूहळू शाळा समिती,गावकरी व ग्रामपंचायत यांच्या मदतीने शाळेला कंपाऊंड केले. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, बोलका परिसर, बोलक्या भिंती,आदर्श परिपाठ, वृक्षारोपण,स्वच्छता, बोलका डेक्स, बालसभा, बोलक्या पट्ट्या, शैक्षणिक साहित्य,लेझीम पथक असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.यातून विद्यार्थ्यांचा गुणात्मक आणि संख्यात्मक विकास होत गेला.

      या शाळेची 2012 मध्ये असलेली 223 विद्यार्थी पटसंख्या हळूहळू वाढत जावून ती 2023 मध्ये 431पर्यंत पोहोचली. या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असून एक चांगली आकर्षक शाळेची इमारत आहे. शाळेच्या कालावधीमध्ये अध्यापन कार्य, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन आणि विविध क्रीडा स्पर्धा या बाबींकडे मुख्याध्यापक अनिल चव्हाण आणि सर्व शिक्षक लक्ष देतात.रंगरंगोटी केलेली‌ शाळा इमारत,स्वच्छता, नीटनेटकेपणा, पध्दतशीर वृक्षारोपण,शाळेच्या समोर असलेला परसबाग,बोलक्या भिंती,जलव्यवस्थापन,मुलांना पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था,स्वच्छ असलेलं प्रसाधन गृह, स्वयंपाकगृह आणि आखीवरेखीव सर्व खेळांसाठी क्रिडांगण ह्या सगळ्या सोयीसुविधा या बोराखेडी शाळेत पाहायला मिळतात.

    शासकीय निधीचा बाऊ न करता लोकवर्गणीतून शैक्षणिक उठाव केला आणि निधी मिळविला.विशेष म्हणजे वर्गणी मिळविताना साहित्य रूपात,नगदी रुपात अथवा जमिनीच्या रूपात दिली तरी चालेल असा आदर्श पायंडा पडला. 

 डॉ सुकेश झंवर,कैलास गावंडे,दिपक छाजेड, बंटी छाजेड,आनंद ज्वेलर्स नितीन तापडिया आणि प्रभाकर राणे या आणि इतर अनेक दानशूर व्यक्तींनी शाळेला वस्तू दिल्या आहेत.शिवाय शाळेला चांगले अधिक मैदान उपलब्ध व्हावे म्हणून शाळेजवळ असलेली 12 गुंठे जमीन देखील शाळेशी मिळवली.यामुळे सहाजिकच मैदान मोठे झाले. या मैदानावर सुसज्ज असे क्रिडांगण तयार करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून 7 लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीतून क्रिडांगण विकासाचे काम देखील प्रगती पथावर आहे.

        या शाळेत दरवर्षी वृक्षारोपण करून वृक्षदिंडी काढली जाते.पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याकडे कटाक्षाने लक्ष दिल्या जाते.शाळेतील ज्ञानरचनावादी उपक्रम बघून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक करून आयएसओ मिळण्यासाठी प्रयत्न करावे असे सूचित केले. बघता बघता सर्व टीम मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली कामाला लागली.अथक परिश्रमाने अखेर 

 एप्रिल 2017 साली बोराखेडी शाळेला जिल्ह्यातील पहिल्या ISO शाळेचे प्रमाणपत्र पालकमंत्री व आयुक्त यांच्या हस्ते देण्यात आले. या शाळेला "आयएसओ" दर्जा प्राप्त झाल्यामुळे काम करायला अधिक उत्साह आला.

      नागपूर,पुणे,हिंगोली,जळगाव,वर्धा, जालना ,बुलडाणा या जिल्ह्यांतील शिक्षकांनी शाळेला ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती बघण्यासाठी आवर्जून भेटी दिल्यात.या उपक्रमशील शाळेचे कौतुक केले. याच धर्तीवर आपण नक्की प्रयत्न करू या असा संकल्प अनेकांनी केला. सन 2019 मध्ये जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा बोराखेडी या शाळेने विकासाचा आणखी एक विकासाचा महत्वाचा मोठा पल्ला गाठला. या शाळेला " भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय स्कूल " चा दर्जा मिळाल्याने बोराखेडी शाळेचा,जिल्ह्याचा आणि एकूणच महाराष्ट्राचा नावलौकिक दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचला, ही खरोखर आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे, असे म्हटले मला वाटते. आज रोजी या शाळेची पटसंख्या 484 एवढी झालेली आहे.ही खरोखर आपल्या सर्वांसाठी भूषणावह बाब आहे.

        जिल्हाधिकारी यांचा ज्ञानरचनावादी शाळा पुरस्कार, स्वच्छ शाळा पुरस्कार, स्वच्छता मॉनिटर राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक (2023), " मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा " जिल्हा प्रथम क्रमांक (2024) आणि विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक आणि नँशनल इनोव्हेटिव्ह रिसर्च पुरस्कार(2024) या शाळेला प्राप्त झाले आहे. असून सदर पुरस्कारांमध्ये मुख्याध्यापक अनिल चव्हाण आणि सुनिता हुडेकर,वामिंद्रा गजभिये,सिमा गोरे, सुलोचना चव्हाण,संध्या नाईक,जया चव्हाण,अनिता राऊत,अश्विनी जेऊघाले,उमेश मोठे,गब्बरसिंग पावरा, सोपान मसुरे, सागर गोलाईत, मंगला मालठनकर, दिपाली गोलाईत आणि शितल झोळने या सर्व सहकारी शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. 

      शाळेच्या विशेष कार्यामुळे 2016 पासून तर आजपर्यंत 35 लाख रूपयांची साहित्य रूपात तथा लोकवर्गणी जमा करून शाळेचा यथोचित विकास घडवून आणला आहे असे सूतोवाच अनिल चव्हाण यांनी केले आहे. तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोराखडी या शाळेचा "शिक्षणातील दीपस्तंभ" या फ्लिपबुक मध्ये नुकताच समावेश करण्यात आला आहे.या शाळेची यशोगाथा इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरावी हा यामागील मुख्य हेतू आहे. 

        एकीकडे इंग्रजी शाळेचे पेव फुटले असताना देखील जिल्हा परिषद मराठी शाळेची बुडती नाव शिक्षकांनी कठोर परिश्रम घेतले तर अजूनही आपण वाचवू शकतो.विद्यार्थी विकासासाठी झटणारे मुख्याध्यापक अनिल चव्हाण आणि सर्व स्टाफचे बोराखेडी शाळा उपक्रमशील बनविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. या शाळेपासून इतर शाळांनी प्रेरणा घेऊन आपली शाळा सुंदर आणि उपक्रमशील बनविण्याचा प्रयत्न करावा असे मला वाटते.

# प्रा. डी.एम. कानडजे, मधुकोष 

सागवन-बुलडाणा.(8275231874) 

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत