संस्थापक अध्यक्ष- पी.एस.कानडजे : एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व

  संस्थापक अध्यक्ष- पी.एस.कानडजे : एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व 

--------------------------------------------------------------

       पुंडलिक सांडू कानडजे उपाख्य पी.एस. हे व्यवसायाने शिक्षक होते.त्यांची संपूर्ण नोकरी मराठवाड्यात गेली.त्यामुळे त्यांना मराठवाड्याबद्दल लळा लागला.म्हणून ते जालना जिल्ह्यातील माहोरा या गावी सेवानिवृत्त झाल्यानंतर स्थायिक झाले.मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सिमेवर असलेले कुलमखेड हे त्यांचे मूळ गाव. येथे यांचा एका गरीब,निरक्षर कुटुंबात 5 एप्रील 1943 रोजी जन्म झाला.त्यांचे एकत्र कुटुंब फार मोठे होते. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी असलेली जमीन कमी पडायची.पावसाने अवकृपा केली तर अन्नधान्याची टंचाई निर्माण व्हायची.तेव्हा भूक भागविण्यासाठी उकडलेले कांदे खाण्याची वेळ यायची. परंतु कोंड्याचा मांडा करून जीवन जगवण्याची आई गुजाबाईंची धडपड असायची.त्यांचा चार भाऊ आणि पाच बहिणी एवढा कुटुंब विस्तार.आईवडील आणि आजोबांनी शिक्षणाची कास धरली. मुलांच्या हाती पाटी आणि लेखणी दिली.तर बहिणींच्या हाती मात्र खुरपे आले. लेखणीने त्यांच्या जीवनात क्रांती केली. 

      वयाच्या सातव्या वर्षी आजोबांनी त्यांचे नाव जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गात दाखल झाले.शिंदे मास्तरांचा वाचनावर विशेष भर असायचा. एके दिवशी रात्री सर्वांची जेवणं झाली. सरांच्या आजोबांनी 'केसरी' पेपर बाराबंदीच्या बाहेर काढला आणि पुंडलिकाला पेपर वाचायला दिला.बराच वेळ गेला.सर मनातच वाचत होते."अरे मोठ्या आवाजात वाच?" असे आजोबा म्हणाले. पण तिकडे सरांचे लक्षच नव्हते.आजोबाने बेताचे दोन-तीन रट्टे पाठीवर मारले. सरांचे,खाड खाड वाचन सुरू झाले आणि तेव्हा कुठे आजोबांच्या मनाचे समाधान झाले. आजोबांचा प्रेमळ हात रात्री झोपतांना पाठीवरून फिरू लागला.आजोबाला वाटलं, आपण चूक केली.एवढं मारायला नको होतं.आजोबा कर्तव्यकठोर होते,पण तितकेच प्रेमळही होते. 

       सरांचे चौथीपर्यंतचे शिक्षण कुलमखेड येथे झाले.वर्ग ५ ते ८ साठी मात्र म्हसला बुद्रुक येथे पायी जाणे भाग होते. याच काळात आयुष्याला कलाटणी देणारा प्रिय मित्र गुलाबसिंग सुखदेव पवार मिळाला. आठवी पास झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी गुलाबराव सोबत नववीदहावीसाठी भारत विद्यालय बुलडाणा येथे प्रवेश घेतला. दोघांनी चोखामेळा हॉस्टेलमध्ये प्रवेश केला. जेवणाची,राहायची आणि अभ्यास करण्याची चिंता मिटली.आपल्या हाताखालील प्रत्येक विद्यार्थी पूर्णपणे घडावा,तो स्वतः च्या पायांवर समर्थपणे उभा राहावा ही तळमळ शाळेची होती.मुख्याध्यापक आगाशे सरांनी हैद्राबाद येथून निलगिरीची रोपे आणली होती.पावसातच खड्डे खोदून विद्यार्थ्यांनी निलगिरीचे वृक्षारोपण केले.

     दर गुरुवारला विद्यार्थी मंत्रीमंडळाची 'आमसभा' घेतली जायची. त्यांच्यापुढे प्रश्न मांडून शाळेच्या समस्या सोडविल्या जायच्या. राज्याचा राज्यकारभार कसा चालतो? याचे जणू प्रात्यक्षिकच विद्यार्थ्यांना शाळेतच पाहावयास मिळत असे.या 

 शाळेतील शिक्षण घेणारे विद्यार्थी जीवनातील कोणत्याही आव्हानाला सामोरे जात होते. सर 1961 मध्ये दहावी झाले.घरी झालेला आनंद गल्लीत साजरा झाला.

       उच्च शिक्षण घेण्यासाठी जिजामाता महाविद्यालयात प्रवेश घेतला.कडक शिस्तीचे खर्चे सर प्राचार्य होते. प्रथम वर्ष बी.ए.ला असतानाच पी.एस.कानडजे यांना शिक्षकाची नोकरी मिळाली.आनंदाला उधाण आले.एनसीसीचा ड्रेस परत करतानाच श्री खर्चे सरांनी विचारले ? अरे,कपडे का परत करतोस? ''सर,मला शिक्षकाची नोकरी लागली.'' हे उत्तर ऐकून प्राचार्य आर एन खर्चे म्हणाले, ''अरे, झाड अजून लहान आहे. समाजाला अजून चांगली सावली देऊ शकणार नाही.पदवी पूर्ण केली पाहिजे.'' त्यांचा हेतू चांगला होता.पण परिस्थिती वाईट होती.मी नाईलाजाने काॅलेज सोडले.ते शब्द आजही जसेच्या तसे माझ्या स्मरणात आहेत,असे सर सांगतात.

     भोकरदन तालुक्यातील सोयगाव (देवी) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून सर रुजू झाले.सरकारी नोकरीनिमित्त त्यांना तीर्थपुरी, गुंज,तांडा,चिंचखेड,धनगरपिंप्री,अशा शाळांवर शिक्षकाची नोकरी करण्याची संधी मिळाली.सर अभ्यासू,जिज्ञासू आणि ज्ञानपिपासू होते.त्यांना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती.शिवाय प्राचार्य आर एन खर्चे साहेबांनी जो उपदेश केला होता तो जाणून होते.

कौटुंबिक जबाबदारी, नोकरी आणि घरप्रपंच सांभाळून सरांनी खाजगीरित्या एमए,बीएड केले.मराठी विषयाचे 'संदर्भ ग्रंथ' प्रा. एस.एम.कानडजे यांनी मिळवून दिले.

     "माझी कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात माझी पत्नी कलावती हिचा सिंहाचा वाटा आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये असे मला वाटते.तिने मला संसारात समर्थपणे साथ दिली. शिवाय अनेक नातेवाईकांना शिक्षण घेण्यासाठी राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था केली.आज ते सर्वजण शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत.मोठी मुलगी प्रतिभा एमए, एमएड होऊन शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.जावई श्री के.जी.दळवी एमए,एमएड असून ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत.सरांना दोन मुले प्रदीप व प्रवीण एमए,बीएड माध्यमिक शिक्षक आहेत तर एक मुलगा प्रशांत फार्मासिस्ट म्हणून स्वतःचे माहोरा येथे मेडिकल स्टोअर्स चालवितो," असे सर सांगतात.

    उत्कृष्ट अध्यापन सेवेबद्दल 1985 ला जालना जिल्हा परिषदेने 'आदर्श शिक्षक पुरस्कार' देऊन सन्मानित केले.अंबड तालुक्यात चिंचखेड येथे केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना सोनक पिंपळगाव, बनटाकळी व चिंचखेड येथे ''ग्राम गौरव'' समारंभ पार पाडले. गावातील निरक्षर लोकांचे रात्रीचे वर्ग घेऊन प्रौढ साक्षरतेस यथाशक्ती हातभार लावला. 

     जीवनभर कष्ट करीतच त्यांच्या वडिलांनी १९७८ मध्ये या जगाचा निरोप घेतला. 'तापता सूर्य' या कवितेतील ओळी आहेत ."माह्या बाप असाच राबराब राबला अन् मह्यासाठी ह्यो तुकडा सोडून गेला". कवितेत वर्णिलेली स्थिती व माझ्या वडिलांची स्थिती एकच होती,असे पी.एस.कानडजे सर सांगतात.

सरांनी ३८ वर्षे उत्कृष्ट अध्यापन कार्य करून नावलौकिक मिळविला.उत्तम विद्यार्थी घडविले.सर्वसामान्य माणसांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी माहोरा येथे सन 2001मध्ये 

 भास्कररावजी शिंगणे प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय स्थापन केले. ते एक संस्थापक अध्यक्ष असून या शाळेकडे जातीने लक्ष देतात. वेळप्रसंगी अध्यापनकार्य देखील केले आहे.

      आज रोजी ते वयाच्या 82 व्या वर्षीही कृतार्थतेचे जीवन जगत आहे.अजूनही त्यांची इच्छाशक्ती प्रबळ आहे.जग सुंदर आहे.या सुंदर जगात माझ्या परीने चांगले करण्याचा प्रयत्न मी करतो आहे, असे भावोद्गार त्यांनी काढले. त्यांचा स्वभाव संवेदनशील, प्रामाणिक,सहकार्यशील,संयमी आणि शांत आहे.

# प्रा. डी. एम. कानडजे, मधुकोष 

      सागवन-बुलडाणा (८२७५२३१८७४)

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत