हभप डॉ ज्ञानेश्वर मिरगे

 ज्ञानोपासक बहुआयामी व्यक्तिमत्व : हभप डॉ ज्ञानेश्वर मिरगे

        बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यातील माटरगाव बुll येथील भानुदासजी मिरगे आणि आई द्रोपदाबाई या सात्विक गरीब कुटुंबात डॉ.ज्ञानेश्वर मिरगे त्यांचा जन्म ३० जून १९५१ रोजी झाला.यांच्या जीवन वाटचालीचा प्रवास हा खूप संघर्षमय होता.पोट भरण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी ते पाहुण्यांच्या आसऱ्याने जवळा बुद्रुक येथे जवळपास दहा वर्षे राहिले. सरांनी सुट्टीच्या दिवशी आईवडिलांसोबत दुसऱ्याच्या शेतात काम केले. १९६८ मध्ये ते एसएससी उत्तीर्ण झाले.

       पुढे मोठ्या मुश्किलीने ज्ञानेश्वरांनी बुलढाणा येथील शासकीय डीएड कॉलेजात १९६८ मध्ये मिळविला. तेथे राहण्याची आणि जेवणाची कमी पैशात व्यवस्था होत होती.परंतु तरीही त्यांचेकडून भोजन खर्च मेसचे २८ रुपये भरण्याची ऐपत नव्हती. तीन महिन्यानंतर डीएड प्रशिक्षण सोडून गावी जावे असा विचार त्यांनी तत्कालीन प्राचार्य डॉ.मानकीकर साहेबांना बोलून दाखविला.प्राचार्य मानकीकर प्रेमळ,विद्यार्थीप्रिय,संवेदनशील आणि सहकार्यशील वृत्तीचे होते, त्यांनी मन लावून ज्ञानेश्वरांचे ऐकून घेतले.विचार करून म्हणाले की मेसमध्ये वेटर म्हणून काम करशील का? त्यातून तुझी मेसच्या फीची व्यवस्था होऊ शकते.तेव्हा सरांनी आनंदाने होकार दिला.डीएड प्रशिक्षणार्थींना तीन पंक्तिला वाढण्याचे काम केले आणि नंतर जेवण करून अभ्यास केला.आई-वडिलाच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञानेश्वरांनी हे केले. महाविद्यालयाच्या डीएड- बीएड संयुक्त स्नेहसंमेलनात वत्कृत्व स्पर्धेत भाग घेऊन माजी कुलगुरू वि.भि. कोलते यांच्या हस्ते बक्षिसे मिळविली. महाविद्यालयातच त्यांना वक्तृत्वाची आवड निर्माण झाली.

      एसएससी डीएड झाल्यावर १७ ऑगस्ट १९७३ रोजी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षक म्हणून बुलढाणा पंचायत समितीत तांदुळवाडी येथे त्यांची प्रथम नेमणूक झाली. त्यानंतर पुढे नागझरी, चिंचोली,लासुरा येथे पदवीधर शिक्षक आणि शेवटी केंद्रप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले.अमरावती विभागाचे आयुक्त सुमित मलिक जे महाराष्ट्र शासनाचे नंतर प्रधान सचिव होते. त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत शिक्षकांचे मार्गदर्शक म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. अमरावती विभागातील अनेक उपक्रमशील शिक्षकांशी अन् शाळांशी त्यांचा अगदी जवळून संपर्क आला. शैक्षणिक विचारांची आदानप्रदान करण्याची संधी मिळाली.

        शिक्षण आयुक्त आनंदकुमार यांच्या 'आनंददायी प्रकल्पात' मिरगे सरांची भूमिका महत्वपूर्ण राहिली होती. शैक्षणिक अध्यापन कार्य,शिष्यवृत्ती परीक्षा,नवोदय मार्गदर्शक,वर्गाचे उत्कृष्ट निकाल,विद्यार्थीप्रियता,समाजात असलेला लौकिक, शैक्षणिक संशोधन आणि वृत्तपत्रांतील शैक्षणिक आणि सामाजिक लेख, मूल्याधिष्ठित विचार प्रबोधन या सर्व बाबींची नोंद घेऊन,बुलढाणा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्यपुरस्कार, व्यसनमुक्ती सेवाकार्याचा महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि भारताचे कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांचे हस्ते मिळाला.

      डॉ.मिरगे सरांचे साहित्यलेखन,कथाकिर्तन आणि प्रवचन सतत सुरूच असते.संतसाहित्याचा अभ्यास करून त्यांनी 'चिंतन' हा ग्रंथ प्रकाशित केला.शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक कार्यात योगदान देत असतानाण,शैक्षणिक अध्यापनही त्यांनी अतिशय निष्ठेने केले. त्यांनी उत्तमोत्तम विद्यार्थी घडविले.

     शिक्षक हा सदैव विद्यार्थीच असला पाहिजे आणि म्हणून त्यांनी शिक्षकीपेशा आणि प्रपंच सांभाळून बहि:शाल विद्यार्थी म्हणून विद्यापीठाच्या परीक्षा दिल्यात. ते एमए,एमएड,पीएच.डी. पर्यंत जावून पोहोचले. बुलढाणा जिल्हा परिषद मध्ये शिक्षिका असतांनाच देवकाबाईचे सरांशी लग्न झाले.पुढे त्यांना 

आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला .देवकाबाई शेवटी त्या मुख्याध्यापिका पदावरून सेवानिवृत्त झाल्या.१९९५ साली नवी दिल्ली येथे लोकसभा सभापती पी.ए.संगमा आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीत त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप, शिक्षक गुणवंत रत्न पुरस्कार आणि राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (2001) प्रदान करण्यात आला. हा दिवस त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा अविस्मरणीया आनंदाचा दिवस होता असे ते सांगतात.  

     संतसाहित्य अभ्यासक प्रा.डॉ.राजेश मिरगे हे श्री शिवाजी महाविद्यालय अमरावती येथे प्राध्यापक तर दुसरा मुलगा दीपक नागपूर येथे फार्मसी क्षेत्रात उच्चस्थ पदावर कार्यरत आहे.तसेच दुसरी दोन मुले सुधीर आणि विनय फार्मसी पदवीधर असून ते वैद्यकीय क्षेत्रात काम करतात. सुसंस्कारित मुलांमुळेच जीवनाच्या ह्या वळणावर मी आत्मिक समाधान अनुभवतो आहे, असे ते आवर्जून सांगतात.

     डॉ ज्ञानेश्वर मिरगे हे हाडांचे शिक्षक,उत्कृष्ट वक्ता,किर्तनकार,प्रवचनकार आहे.चारित्र्यसंवर्धन आणि सद्गुण वाढीसाठी ते समाजमनाचे सातत्याने प्रबोधन करतात. महाराष्ट्राच्या शैक्षणिक समितीत मराठी भाषा समीक्षक, बालभारती पाठ्यपुस्तक लेखन निर्मितीत सहभाग, कर्नाटक राज्यामध्ये दुय्यम भाषा मराठी पाठ्यपुस्तक समितीत मराठी विषयाचे तज्ज्ञ, मूल्याधिष्ठित शिक्षण अभ्यासक्रमात समिक्षक आणि लेखक म्हणून त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे .

      १९७४ मध्ये आचार्य विनोबाजी भावे यांच्या उपस्थितीत पवनार आश्रमात गीताई विचार साधनेसाठी 10 दिवस विनोबाजी समोर बसण्याचे भाग्य त्यांना लाभले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी, स्वामी शुकदास महाराज, पुज्य हरिचैतन्य महाराज, गुरुवर्य श्री. शंकरजी महाराज, श्री.भास्करगिरी महाराज आणि श्री.शिवशंकर भाऊ पाटील यांच्या सहवास लाभला,असे सर सांगतात. डॉ ज्ञानेश्वर मिरगे हे संयमी,अभ्यासू, शांत, परोपकारी, संवेदनशील, प्रामाणिक, हरिभक्त परायण आणि मानवतेचे पुजारी आहे. शिक्षक,परीक्षक, समीक्षक, किर्तनकार, प्रवचनकार अशा वेगवेगळ्या भूमिकेतून त्यांनी समाजाला उत्तमोत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे, खरोखर ते बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे असे मला वाटते.

 # प्रा.दिगंबर कानडजे,मधुकोष

सागवन-बुलडाणा (भ्रमणध्वनी - ८२७५२३१८७४)



Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत