समाजसेवेची आवड असणारे : गजानन जाधव
समाजसेवेची आवड असणारे : गजानन जाधव
-------------------------------------------------------------------------
बुलढाणा जिल्ह्यातील हातणी येथील रहिवासी असणारे गजानन जाधव सध्या औरंगाबाद विभागात वैजापूर येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहे. महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी हे तळागाळातील लोकांपर्यंत काम करणारं एक महत्त्वाचे पद आहे.याबाबतीत महसूल विभागातील लोकांच्या अनेक कथा आपण ऐकतो.लाच घेताना वरिष्ठ अधिकारी पकडले जात असताना एक गजानन जाधव, ग्राम महसूल अधिकारी मात्र पगारातील जवळपास पंचवीस-. टक्के हिस्सा स्वतःहून समाजातील गरीब लेकरांसाठी खर्च करतात.
इतर प्राणीमात्रांच्या तुलनेत माणसाचा जन्म सर्वश्रेष्ठ मानला जातो. माणूस परोपकार करू शकतो. लोकांची सेवा करू शकतो आणि सेवाभावी वृत्तीमुळे माणसाला समाधान मिळते. मानवता आणि मानवतेची सेवा हेच सर्वश्रेष्ठ धर्म आणि कर्म मानल्या गेले आहे. माणसात अनेक सद्गुण असतात, पण आजच्या काळात सद्गुणांपेक्षा दुर्गुणच जास्त बघायला मिळतात. सेवाभावी वृत्ती नष्ट होऊ लागली आहे. सेवाभावी वृत्तीचे अनेक रूपं आहेत. एकमेकांप्रती समर्पित भाव, इतरांना समजून घेणं, इतरांप्रती आदरभाव व्यक्त करणं आणि इतरांच्या समस्या सोडवण्यात पुढाकार घेणं ही सेवाभावी वृत्तीची लक्षणे आहेत. परमेश्वराला आणि साधूसंतांना देखील हेच अपेक्षित आहे.
भगवान महावीर म्हणतात की माझी सेवा करण्यापेक्षा वृद्ध, गरीब,रुग्ण,गरजूंची सेवा करणं जास्त गरजेचे आहे. गरजेला धावून जाणे हीच खरी समाज सेवा असते. आपल्या आयुष्यात आईबापाच देव असतात.आपल्या आईबापाला समजून घेण्याची आता वेळ आली आहे.आईबापाची मान लाजेने घाली जाईल असे दुष्कृत्य तुमच्या हातून घडू देऊ नका असे गजानन जाधव सांगतात.गजानन जाधवचे वडील अकाली मृत्यू पावले.सर्व प्रपंचाचा भार आईवर येऊन पडला. त्यांच्या आईने स्वतःला सावरलं.हतबल न होता नव्या दमाने लेकरांच्या भविष्यासाठी कंबर कसली.पुन्हा कामाला लागली. त्यांच्या आईने शेती व मजुरी करुन ३ मुलींना व एका लेकराला शिक्षण देऊन वाढविले. त्यांचेंवर संस्कार केले.प्रसंगी अर्धपोटी राहिली; पण मुलांना कमी पडू दिले नाही.
गजानन जाधव आपली परिस्थिती जाणून होते. शिक्षणच जीवनात कायापालट करू शकते याची जाणीव त्यांना होती.
गजाननाला शिक्षणाची ओढ असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स दुकानात पार्टटाईम काम करून त्यांनी डीएड व बीएड केले, पण घरी आईला पैशासाठी तगादा लावला नाही. त्यांना शिक्षक होण्याची इच्छा होती पण शिक्षकाच्या नोकरीसाठी डोनेशन भरणे शक्य नव्हते.त्यामुळे त्यांनी आपला मार्ग बदलला. पैसे न भरता छोटी मोठी नोकरी मिळाली पाहिजे या जिद्दीने ते पेटून उठले.
रात्रभर अभ्यासिकेत बसून स्पर्धा परीक्षेची तयारी केली.सन २०१६ मध्ये स्पर्धा परीक्षेतून तलाठी म्हणून गजानन जाधवला नोकरी मिळाली. आर्थिक अडचणींमुळे अनेक मुलांमुलींना शिक्षण घेता येत नाही याची त्यांना प्रकर्षाने जाणीव झाली.आपल्या पगारातून आपण गोरगरिबांच्या मुलांना मदत केली पाहिजे ही भावना त्यांनी आईजवळ बोलून दाखविली.आईने देखील क्षणाचाही विलंब न लागता त्याला दुजोरा दिला.
गरिबीतून आल्यामुळे गरजा कमी होत्या.चंगळवादाला मुठमाती देऊन आपण काटकसरीने अर्ध्या पगारात घरखर्च भागवावा , काही भविष्यासाठी बचत करावी आणि पगारातील काही रक्कम गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षेसाठी वापरली तर आपले जीवन सार्थकी लागेल अशी त्यांची मनोभूमिका ठरली.त्यांनी नुस्ता संकल्पच केला नाही तर तो प्रत्यक्षात अंमलात आणला..
२८ फेब्रुवारी २०२१ रोजी कोलारा येथे स्वतःचे लग्न कमी खर्चात अगदी साधेपणाने लावले.लग्नात थाटमाट न करता अनाठायी होणारा खर्च वाचवला. त्यातून चिखली तालुक्यातील काही गावात स्पर्धा परीक्षेची पुस्तके घेऊन दिवठाणा, बोरगाव वसू,सवणा, सोनेवाडी आणि शेलुद या गावी अभ्यासिका चालू केल्या. समाजऋणातून उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न त्यांनी केला आहे.
बहिणींच्या लग्नात एक लाख रुपयांची पुस्तके गोद्री व कोलारा गावातील अभ्यासिकेला भेट म्हणून दिली. या पुस्तकांचा वापर ग्रामीण भागातील गोरगरीब,हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी फायदा घेतील.स्पर्धा परीक्षेची तयारी करून स्वतः च्या पायांवर समर्थपणे उभा राहण्याचा प्रयत्न करतील हा शुद्ध हेतू त्यांचा स्पर्धा परीक्षेची पुस्तके देण्यामागे होता.तो बऱ्याच प्रमाणात यशस्वी देखील झाला.
आईचे कष्टमय जीवन होते.कष्ट करून करून आईची हाडं झिजली होती.नोकरी लागल्यानंतर आपली परिस्थिती बदलेल अशी आईला आशा होती.सुखाने दोन घास खाता येईल.परंतु या ध्येयवेड्या गजाननाने बंगला,गाडी,शेत,दागिने यांची आशा न बाळगता काही गावात अभ्यासिका उभारून समाजऋण फेडण्याचे काम सुरू केलं.सध्याही करतो आहे.समाजसेवा करण्यासाठी गर्भश्रीमंत असावे लागते असं काही नाही तर मनाची श्रीमंती व दानत्व वृत्ती असणं महत्वाचे असते.ते ध्येयवेड्या गजाननात आहे!
गजानन जाधव सध्या औरंगाबाद विभागात वैजापूर तालुक्यात एक आदर्श आहे.डिपार्टमेंट कोणतेही असो प्रत्येक विभागात काही भ्रष्टाचारी जसे असतात तसे काही मानवतेचे देखील पुजारी असतात हे नाकबूल करता येणार नाही. समाजसेवा हा गुण कोणत्याही समाजातील व्यक्तींमध्ये असू शकतो.केवळ नोकरदार वर्गच सेवाभावी वृत्तीचे असतात असे नव्हे! निश्चितच प्रत्येकाने प्रपंच करुन यथाशक्ती समाजकार्य करून सेवाभाव जपण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटते. नाही कोणाचे चांगले करता आले तरी कोणाचे वाईट चिंतू नये.स्वत: चांगले जगा आणि इतरांना चांगले जगू द्या म्हणजे झाले.यात देखील परमार्थ आहे.
गजानन जाधव हे कर्तव्यदक्ष, समाजशील, प्रामाणिक, संवेदनशील,कनवाळू आणि सेवाभावी वृत्तीचे असून समाधानी आहे.त्यांना दैनिक महाभूमीकडून भावी समाजकार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
# प्रा. दिगंबर कानडजे, मधुकोष,
सागवन-बुलडाणा.