एक समाजशील, संवेदनशील व्यक्तिमत्त्व - अरुण गरुड

      एक समाजशील, संवेदनशील व्यक्तिमत्त्व - अरुण गरुड

     बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सातगाव भुसारी येथील एका सामान्य कुटुंबात अरुण दगडूजी गरुड यांचा जन्म ३ मार्च १९६७ रोजी झाला. दगडूजी पुंडलिक गरुड आणि आई दुर्गाबाई या आईवडिलांच्या कडक शिस्तीत ते घडले. 

त्यांचे बाबा लष्करात भरती झाले होते. तर आई एक आदर्श गृहिणी होती. आई त्यांच्या वडिलांपेक्षा जास्त शिकलेल्या होत्या. त्यावेळी त्यांना शिक्षिकेची सहज नोकरी लागू शकत होती, परंतु त्यांच्या वडिलांनी त्यांना नोकरी करू दिली नाही. मी देशाचे संरक्षण करतो आणि तू कुटुंबाचे संरक्षण कर अशी त्यांनी आईला ताकिद दिली होती.आईने देखील पडत्या फळाची आज्ञा पाळून मुलांचे संगोपन करून शिक्षण दिले.वडिलांनी पाठविलेल्या पैसात काटकसरीने संसार करून जवळपास आईने 15 एकर शेती विकत घेतली.

      सरांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सातगाव भुसारी येथे झाले. त्याकाळी चौथी आणि सातवीच्या परीक्षा बोर्डाच्या होत असे त्या अत्यंत कडक शिस्तीत होत असे. सर चौथीत असताना केवळ 40 पैकी 10 विद्यार्थी पास झाले. सर अभ्यासू आणि होतकरू असल्याने मात्र पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.गावात गुळ वाटून आनंद साजरा करण्यात आला.

 सरांचे उच्च माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल चिखली येथे मामाकडे झाले तर अकरावी शासकीय वस्तीगृह चिखली येथे राहून पूर्ण केली.

    सरांनी डॉक्टर व्हावे अशी बाबांची इच्छा होती परंतु सरांना क्रिकेट खेळण्याचा खूप नाद होता. इकडे बोर्डाचा पेपर असताना देखील त्यांनी खेळणे सोडले नाही, पेपरला जायला खूप उशीर झाल्यामुळे पेपर देता आला नाही.बाबांचे स्वप्न सर पूर्ण होऊ शकले नाही ,याची खंत त्यांना आजही वेदना देते.1985 ला सर दहावीमध्ये असताना सरांकडे एकही गाईड नव्हती. त्याकाळी चिल्लर नाण्यांची खूप कमतरता होती. दुकानदार लोक चिल्लर ऐवजी कुपन देत होते.सरांना वीस रुपयाचे एक कुपन सापडले होते.त्यामधून एक परिक्षेची गाईड घेऊन सरांनी अभ्यास केला.

      वर्गमित्र गणेश सपकाळ यांच्याकडे सर अभ्यास करायला जायचे. तो श्रीमंत असल्यामुळे त्याला संपूर्ण विषयाचे पुस्तके आणि गाईड होत्या.सरांकडे फक्त एकच गाईड होती. तो अभ्यास करून झोपल्यानंतर सर उठायचे आणि त्याची पुस्तके घेऊन अभ्यास करायचे. सर दहावी पास झाले आणि तो मित्र मात्र नापास झाला. सरांनी बारावीनंतर रमेश आप्पा सोनाळकर, सुधाकर कुळकर्णी सुभाष पाटील यांच्या सल्ल्याने डीएड केले. बीएपर्यंतचे शिक्षण यशवंतराव मुक्त विद्यापीठातून केले.

     सतरा वर्ष देशाचे संरक्षण करून ते निवृत्त झाले. बऱ्याच वेळा मिलिटरीमन घरी येतात आणि बचत केलेली आणि शासनाकडून मिळालेली मायापुंजी दारू पाण्यात उधळून टाकतात अनेक वेळा गावातील मित्रमंडळी देखील माजी सैनिकांचा फायदा येतात आणि त्याच्याजवळ जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत मधमाशीप्रमाणे राहतात आणि पैसा संपल्यानंतर त्याला टाळतात. माजी सैनिकांचे उशिरा डोळे उघडते तेव्हा सर्व काही संपलेले असते. परंतु सरांचे वडील काटकसरी आणि व्यावहारिक होते. त्यांना गरिबीची जाण होती आणि म्हणून त्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर लगेच गावामध्ये एक किराणा दुकान चालू केले. व्यवहारात स्वतःला गुंतवून घेतले.आईने शेती सांभाळली.

गरुड सरांची प्रथम नियुक्ती प्राथमिक शिक्षक म्हणून जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील वाटूर या गावी 1991 मध्ये झाली. प्रथम नोकरी लागल्याबद्दल त्यांना जो आनंद झाला तो अतिशय सुखद आणि अविस्मरणीय होता. पुढे स्वतः च्या जिल्हात ते निवड मंडळामार्फत 28 जूलै1992 रोजी चिखली पंचायत समिती मध्ये बोराळा या गावी नियुक्त झाले. ते डोंगरशेवली वरून जंगलाच्या रस्त्याने डोंगरातून पाच किलोमीटर पायी जात होते. गावकरी सरांना नेहमी सांगायचे तुम्ही एकटे येऊ नका कारण जंगलामध्ये अस्वल इतर प्राणी असतात. परंतु सरांनी ऐकले नाही. विद्यादानाचे काम पवित्र मानून सरांनी शाळेला प्रथम प्राधान्य दिले होते.फक्त एकदाच अस्वल हा प्राणी दिसला इतर वेळेस कधीही काही अडचणी आल्या नाही असे सरांनी सांगितले.

  सोनेवाडी, केळवद ,येवता अशा ठिकाणी शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठेने आणि वेळेच्या आत जाऊन गावातील पालकांना विश्वासात घेऊन नोकरी केली. तेथील मुलांना स्वतःच्या मुलासारखं शिकवलं.शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, शिस्त आणि संस्कार या गोष्टीला त्यांनी प्रथम प्राधान्य दिले आणि विद्यार्थी हे दैवत म्हणून त्यांना घडविण्याचा अहर्निश प्रयत्न केला. सरांच्या हातून उत्तमोत्तम विद्यार्थी घडले. ते आजरोजी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहे.

  2005 ते 2007 या कालावधीत त्यांनी चिखली पंचायत समितीमध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत गटसमन्वयक आणि 2007 ते 2013 पर्यंत समूह साधन व्यक्ती म्हणून काम केले. 

    सन 2018 पासून पुन्हा विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम केले. संपूर्ण सेवेमध्ये त्यांनी वेळेला खूप महत्त्व दिले. वेळेवर शाळेत जाणे आणि पूर्ण वेळ काम करणे या बाबींना त्यांनी प्राधान्य दिले. प्रशासकीय काम म्हणून बोर्ड परीक्षा कस्टडीचे प्रामाणिकपणे काम पाहिले.साहेबांच्या विश्वासाला त्यांनी कधी तडा जाऊ दिला नाही.

 सरांनी एक अनुभव सांगितला. ते म्हणाले की,मी शिक्षक असताना सीमा नावाची मुलगी अजिबात शाळ येत नव्हती. चौकशी केली असता असे कळले की ती मुलगी तिच्या लहान भावाला सांभाळण्यासाठी घरी राहते. मुलाला सांभाळल्याशिवाय आम्ही मजुरीला जाऊ शकत नाही असे पालकांनी केविलवाणा चेहरा करून सांगितले. तेव्हा सर म्हणाले की काही काळजी करू नका,त्या मुलासह मुलीला शाळेत पाठवा. आम्ही सर्वकाही करुन घेतो. त्यांनी सरांची विनंती मान्य केली आणि सीमा नियमितपणे भावाला घेऊन शाळेत येऊ लागली. ती इयत्ता दुसरीमध्ये होती. शाळेत आल्यानंतर त्या मुलीला सर्व पुस्तके, कपडे, दप्तर घेऊन दिले. मुलाला सुद्धा कपडे घेऊन दिले. आणि त्या दिवसापासून सीमा नेहमी शाळेत येऊ लागली. आता ती एसटी महामंडळामध्ये वाहक या पदावर काम करते आहे.

    सरांचे लग्न पाच मे 1993 ला बुलढाणा येथील घाटे परिवारातील मीना नावाच्या मुलीशी झाले. ती बारावी शिकलेली होती. घरामध्ये माझ्याकडून आणि आई-वडिलांकडून तिला पूर्ण स्वतंत्र होते. फार मोठा परिवार संभाळून मिनाताईने आईबाबांची अगदी मुलीप्रमाणे सेवा केली,याचा सरांना सार्थ अभिमान आहे. 

सर जेव्हा नोकरीला लागले त्यावेळेस त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेम होती. सरांनी भावांना शिकविले.नोकरी लागत नसल्याने त्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली. जे जे शक्य होईल ते ते कुटुंबासाठी केले.

     त्याच वेळेस " लेक वाचवा" अभियानाची चळवळ जोम धरून होती. सरांनी स्वतः पासून सुरुवात केली. पहिले आपत्य कोणतेही असो, मुलगा किंवा मुलगी, त्यावरच थांबायचे, असा सरांनी पत्नीच्या सहकार्याने निर्णय घेतला होता. आज सरांना एकच मुलगी आहे.आज त्यांची मुलगी शितल ही बीएएमएस असून भावी जावई हे जळगाव जिल्हा परिषदेला कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत आहेत.

सरांनी आपल्या गावात सातगाव भुसारी येथे उमाकांत क्रिकेट क्लब, उमाकांत सार्वजनिक वाचनालय आणि चिखली येथे सहकारी पतसंस्था व मित्रमंडळींचा एक गुडमार्निंग ग्रुप देखील स्थापन केला आहे. सर्व जाती धर्मातील मित्रमंडळींच्या सहवास सरांना लाभला असून ते आनंदाने मित्रभाव जपतात.

 1996 मध्ये तत्कालीन सोनेवाडी चे सरपंच भाऊ तायडे यांच्या सहकार्याने सोनेवाडी येथील शाळेत जवळपास 40 झाडांची लागवड केली आणि त्यांचे संगोपन देखील केले. आजरोजी त्या झाडाकडे पाहिल्यावर मन अभिमानाने भरून येते.

  सरांचा स्वभाव संवेदनशील प्रामाणिक सहकार्यशील सेवाभावी आणि कुठल्याही प्रकारणात टोकाची भूमिका न घेता ते सामोपचाराने वागतात. 33 वर्षा़ची सेवा करून ते सेवानिवृत्त होत आहे, तेव्हा त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

# प्रा. दिगंबर कानडजे,मधुकोष 

सागवन, बुलडाणा (८२७५२३१८७४)

     

Popular posts from this blog

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

प्रा.जगदेवराव बाहेकर: एक सर्वस्पर्शी बहुआयामी व्यक्तिमत्त्व

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व