विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्थान : डॉ अतुल दामोधर पवार
विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्थान : डॉ अतुल दामोधर पवार
------------------------------------------------------------------------
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील आन्वी या गावचे डॉ अतुल दामोधर पवार..याचा जन्म दिवस १२ एप्रिल १९९०. आजरोजी तो ३५ वर्षांचा असून ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस; डीजीओ आणि डीएनबी झालेला डॉ अतुल दामोधर पवार आता रुग्णसेवेसाठी सज्ज झाला आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तो एक आदर्श आहे. आपण शिक्षण कोठे घेतो हे महत्त्वाचे नाही; तर तो किती जिद्दीने, चिकाटीने, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे अभ्यास करून शिकतो हे महत्त्वाचे आहे. तो फूल इंग्लीश मेडियम मध्ये महागडी फी भरून शिकला पाहिजे, अशातला भाग नाही. तो जिल्हा परिषदेच्या शाळेतला अथवा शासकीय शाळेत शिक्षण घेऊन जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास करणारा असला पाहिजे. असा विद्यार्थी त्याच्या कार्यकर्तृत्वाने उच्चशिक्षण घेऊ शकतो, मोठा होऊ शकतो हे विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे.
आता इंग्लिश माध्यमांच्या शाळेतून शिक्षण घेणे ही फॅशन झाली आहे, असे मला वाटते.ग्रामीण भागातील एक आजी एका हातात बकरीचे दावे आणि दुसऱ्या हातात नातवाची वजनदार स्कूलबॅग घेऊन इंग्लिश मेडियमच्या बसची आतुरतेने वाट पाहत उभी राहते. पालकाला आता मोफत शिक्षण घेणे जिवावर आले आहे. विकत शिक्षण घेण्याचे मोल अधिक असते अशी त्याची मनोभूमिका बनली आहे.फी घेणाऱ्या शाळेऐवजी जिल्हा परिषद किंवा शासकीय अथवा खाजगी अनुदानित शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश दिला आणि जर दरवर्षी फीचा हप्ता मुलांच्या नावे एफडीआर केला तर तो पदवीधर होईपर्यंत खूप काही पैसा जमा होऊ शकतो. नाही नोकरी मिळाली तरी तो छोटा मोठा व्यवसाय करून चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो. शिक्षणाने माणूस घडला पाहिजे असे मला वाटते.
अतुलचे वडील दामोधर जयराम पवार एमए बीएड असून उपमुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत झाले. आई नलिनी दामोधर पवार कमी शिक्षित असल्या त्यांनी प्रपंचात आणि मुलाच्या शिक्षणात विशेष लक्ष घातले.आईच्या निगराणित अतुलचे राजर्षी शाहू कॉलेज लातूर येथे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले. मुलाच्या शिक्षणाची हेळसांड होऊ नये म्हणून त्याच्या सोबत राहिली. त्याने वैद्यकीय प्रवेश परीक्षेची (सीईटी) उत्तम तयारी केली. तो नेहमी १०० विद्यार्थ्यांच्या बॅच मध्ये कधी पहिला कधी दुसरा असायचा. अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून त्याचा विद्यार्थी वर्गात लौकिक होता. बाहेरगावी शिक्षण घेण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागते. बाहेरगावी मुलांच्या शिक्षणासाठी जाणाऱ्या आयांना विचारून पहा म्हणजे चांगले समजेल. सांगायचे तात्पर्य म्हणजे मुलांच्या उच्च शिक्षणात वडिलांइतकाच आईचा देखील मोलाचा वाटा असतो हे नाकबूल करता येणार नाही.
अतुलचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळा मासरूळ येथे झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या कार्यकर्तृत्वाने किती मोठा होऊ शकतो, याची उदाहरणे अनेकांची देता येईल. डॉ एकनाथ डवले (मंत्रालयात सचिव),डॉ.सुभाष कराड (एमबीबीएस), मोतीराम कानडजे (सह विक्रीकर आयुक्त), प्रल्हाद ताठे (मुख्य वित्त व लेखाधिकारी), राजेंद्र जाधव,( एसडीओ) अशी अनेक उदाहरणे देता येतील. डॉ अतुल पवार हा सुद्धा त्यापैकी एक आहे, त्याने ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेतले.पुढे वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी सीईटी दिली.. या त्यात अतुलला २०० पैकी १८० गुण मिळाले. चांगल्या गुणांमुळे त्याला खुल्या प्रवर्गातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे एमबीबीएस साठी प्रवेश मिळाला. त्यावेळी कुटुंबाला जो आनंद झाला तो अतिशय अवर्णनीय होता. अतुलने जिद्दीला पेटून, सातत्यपूर्ण अभ्यास करून कोणाचाही आधार न घेता चांगल्या गुणाने एमबीबीएस केले. आन्वीसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी एमबीबीएस झाला हे ऐकून गावातील नागरिकांना आणि नातेवाईकांना जो काही आनंद झाला होता तो अवर्णनीय होता.
पदव्युत्तर पदवी परीक्षेसाठी (सीईटी) पिजीची परीक्षा देऊन एमएस अथवा एमडी करायचेच, हे स्वप्न उरी बाळगून त्यांने रात्रंदिवस अभ्यास केला.पहिल्या प्रयत्नात गुण कमी मिळाले.
हतबल झाला नाही की वैफल्यग्रस्त होऊन उदास झाला नाही.गुण कमी मिळाल्यामुळे वर्ष वाया जावू नये म्हणून त्याने आर. एन. कुपर हाॅस्पिटल मुंबई येथे 'डिजीओ' ला प्रवेश घेतला. डिजीओ पूर्ण झाल्यानंतर त्याला हिमाचल प्रदेशातील विलासपूर येथील व्यास हाॅस्पिटल मध्ये २०२२ साली वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली.
तेथे नोकरी करून फावल्या वेळेत अभ्यास केला. त्याने नोकरी आणि अभ्यास याचे योग्य नियोजन करून नीटची परीक्षा दिली.चांगले गुण मिळाल्याने मेरिट बेसिसवर त्याला होली फॅमिली हाॅस्पिटल नवी दिल्ली येथे 'डीएनबी' साठी प्रवेश मिळाला.जिद्द ,चिकाटी,अभ्यास आणि कठोर परिश्रम करून त्यांने डीएनबीची परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली. डीएनबी झाल्यावर त्यांनी त्याच हाॅस्पिटल मध्ये अनुभवासाठी ९- १० महिने नोकरी केली. बऱ्यापैकी चांगला अनुभव घेऊन डॉ अतुल पवार आपल्या गावी कर्मभूमीत दाखल झाला.
२९ डिसेंबर २०२२ रोजी डॉ अतुलचा विवाह बुलडाणा जिल्ह्यातील सुंदरखेड येथील आत्माराम राजपूत यांच्या पल्लवी नावाच्या मुलीशी झाला. पल्लवी ही एमबीबीएस असून डॉ अतुल सोबत वैद्यकीय व्यवसायात आता मदत करते आहे. आपल्या परिसरातील,ग्रामीण भागातील गोरगरीब रूग्णांची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून त्यांनी चिखली येथे 'पवार मॅटर्निटी आणि नर्सिंग होम' सुरू केले आहे.
ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेऊन त्यांनी अथक परिश्रमाने एमबीबीएस,डीजीओ आणि डीएनबी केले. ही त्यांच्यासाठी, आईवडिलांसाठी आणि एकूणच पंचक्रोशीतील नातेवाईकांसाठी भूषणावह बाब आहे असे मला वाटते. हा त्याचा शैक्षणिक प्रगतीचा आलेख आहे. खाजगी महाविद्यालयात शिक्षण घ्यायचे नाही. शिक्षण घेईल तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच ही त्याची ठाम भूमिका होती आणि ती त्याने पूर्ण करून दाखविली. त्यांची यशोगाथा ग्रामीण विद्यार्थी मित्रांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते.
# प्रा दिगंबर कानडजे, मधुकोष,
सागवन - बुलडाणा (८२७५२३१८७४)