डी एम कडाळे : एक कर्तव्यदक्ष कार्यकारी अभियंता -

     डी एम कडाळे : एक कर्तव्यदक्ष कार्यकारी अभियंता-

     ---------------------------------------------------------

     बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सरस्वती या गावचे कार्यकारी अभियंता. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये ३५ वर्षे नोकरी करून सेवानिवृत्त झालेले दगडू माणिकराव कडाळे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. सरस्वती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकलेले एक सामान्य व्यक्तिमत्व फार मोठ्या पदावर जाऊ शकते, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1957 रोजी एका सामान्य कुटुंबामध्ये झाला. माणिकराव जयराम कडाळे आणि राधाबाई या निरक्षर आईवडिलांच्या समवेत काम करुन या कुटुंबातील भावंडांनी शिक्षण घेऊन आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला.या कुटुंबाचे नाव पंचक्रोशीत उज्ज्वल केले.

 साहेबांना दोन भाऊ आणि एक बहीण असून फार मोठा कुटुंब विस्तार आहे. साहेबांचे मोठे भाऊ गुलाबराव कडाळे हे बी. ई. (इलेक्ट्रिकल) असून अधीक्षक अभियंता (महावितरण ) या पदावरून ते सेवानिवृत्त झाले असून आजरोजी ते सोलर एनर्जी आणि मराठा सेवा संघात चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. तर दुसरे भाऊ अशोकराव यांना शेतीची ते उत्तम प्रकारे शेती व्यवसाय सांभाळतात.

      कडाळे साहेब यांना विज्ञान विषयाची विशेष करून आवड होती. प्राथमिक शाळेमध्ये ते छोटे मोठे विज्ञानाचे प्रयोग करून पाहण्यात गढून जायचे. घरी दारी सुध्दा ते शांत बसायचे नाही. कोणतीही खेळणी असो, लहान सहान यंत्र असो ते खोलणे आणि जोडजाड करणे हा त्यांचा छंद असायचा. म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे ते पुढे बीई (मेकॅनिकल) ही पदवी घेऊन इंजिनिअर झाले आणि आपल्या नोकरीच्या क्षेत्रात अभिमानास्पद असे काम केले.

    साहेबांचे शालेय शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल लोणार येथे तर महाविद्यालयीन शिक्षण विदर्भ महाविद्यालय अमरावती आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती येथे पूर्ण केले. 

 त्यांनी अतिशय काटकसर करून जिद्दीने अभ्यास केला आणि बीई मेकॅनिकल ही विज्ञान शाखेची पदवी घेऊन ते 1980 मध्ये नोकरीच्या शोधात बाहेर पडले. अतिशय दर्जेदार पदवी संपादन करून आपला मुलगा इंजिनिअर होऊन घरी आला हे ऐकून त्यांच्या आईवडिलांना जो काही आनंद झाला होता, तो अतिशय अवर्णनीय आणि अविस्मरणीय होता.

      1 सप्टेंबर 1980 रोजी कडाळे साहेबांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी मिळाली. सर्वप्रथम ते नागपूर जिल्ह्यातील कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात 'प्रभारक श्रेणी एक' या पदावर रुजू झाले. कोराडी, नाशिक, चंद्रपूर, भुसावळ या ठिकाणच्या औष्णिक विद्युत केंद्रात साहेबांना कार्यकारी अभियंता म्हणून काम केले.त्यांना एकूण 35 वर्षे नोकरीच्या सेवेत अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

     नोकरी करत असताना आपल्या नोकरीच्या अनुषंगाने उपयुक्त शिक्षण मिळावे आणि त्याचा आपल्या विद्युत निर्मिती केंद्रात फायदा व्हावा म्हणून त्यांनी संगणकशास्त्रामधील स्थानकोत्तर पदविका (एडीसीएसएसए - 2004) आणि सर्टिफाईड एनर्जी ऑडिटर (2006) ह्या परीक्षा देऊन आपल्या नोकरी व्यवसायात नावलौकिक मिळविला. नोकरी करत असताना विद्युत केंद्राची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि कमीत कमी दरामध्ये वीज निर्मिती कशी करता येईल या बाबींकडे त्यांनी जातीने विशेष लक्ष घातले. ग्राहकसेवा हीच ईश्वरसेवा महत्त्वाची मानून ग्राहकांना वाजवी दरात वीज उपलब्ध कशी करून देता येईल याबाबतीत त्यांनी सातत्याने अभ्यास केला. 

     केंद्रीय विद्युत प्राधिकरण दिल्ली, ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी दिल्ली, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेरिटी कमिशन, सेंट्रल पावर रिसर्च इन्स्टिट्यूट बंगलोर या महानिर्मिती विद्युत केंद्रांशी समन्वय साधून त्यांचे मार्गदर्शन घेतले आणि प्रसंगी त्यांना देखील चार हिताच्या गोष्टी सांगितल्या. जो चांगलं काम करतो त्याच्याच मागे जास्तीची कामे लागतात हा अलिखित नियम आहे असे म्हटले तर वाव ठरू नये असे मला वाटते. त्याच न्यायाने कडाळे साहेबांना महावितरण कंपनींनी बरीच कामे करावी लागली आणि ती त्यांनी आनंदाने आणि जबाबदारीने पार पाडली. त्यांना काम करण्याची आवड होती. त्यांना कधीच आळस आला नाही. शिवाय त्यांनी त्यांच्या कामात कधी कुचराई देखील केली नाही. जी जबाबदारी त्यांच्यावर टाकली जायची ती मन लावून आणि एकाग्रतेने पूर्ण केली. त्यामुळे कडाळे साहेबांचा कर्मचारी वर्गात आणि एकूणच महावितरण कंपनीमध्ये चांगला गवगवा आणि नावलौकिक होता आणि तो आजही टिकून आहे.

बऱ्याच वेळा विद्युत केंद्रांतील काही अडचणी सोडवण्यासाठी आजही त्यांना कार्यालयात बोलावतात.कोणतेही आढेवेढे न घेता केंद्रातील समस्या सोडविण्यासाठी जातात. दुसऱ्यांचे समाधान हेच आपले समाधान मानून ते आनंदाने जीवन जगतात.

 विद्युत निर्मिती केंद्रामध्ये संगणकीय कार्यप्रणालीची सुरुवात त्यांनी केली. केवळ सुरुवातच केली नाही तर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्वतः वर घेतली. ती यशस्वीरित्या पार पाडली. त्यांना समस्या सोडण्यात आणि आव्हाने स्वीकारण्यात आनंद वाटतो. विद्युत केंद्रासाठी आवश्यक असणारे कंप्यूटर प्रोग्राम व सॉफ्टवेअर त्यांनी स्वतः तयार करून दिले. या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रत्येक विद्युत केंद्रामध्ये 2008 पासून 'माहिती तंत्रज्ञान' हा विशेष विभाग निर्माण करण्यात आला.याचे सर्व श्रेय कडाळे साहेबांना जाते. 

      17 मे 1981 रोजी वीरांगणाताईशी ते विवाहबद्ध झाले. त्या शिक्षित आणि सुशिक्षित असून त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि काटकसरीने संसार करून स्वतःचे कुटुंब चांगल्या पद्धतीने उभे केले. त्यांच्यावर चांगले संस्कार केले. साहेबांना घराकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता. तेव्हा एक आदर्श गृहिणी म्हणून त्यांनी होम मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने केले. खरोखर कडाळे साहेबांच्या यशस्वी जीवनात त्यांची मोलाचे योगदान आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये असे मला वाटते.

कडाळे साहेबांना धनंजय नावाचा मुलगा असून तो बी फॉर्म आणि एमबीए आहे. तो चांगल्या पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय सांभाळतो आहे. त्यांची पत्नी स्नेहल हया समाज कल्याण विभागात शिक्षिका म्हणून काम करतात. एकंदरीत साहेबांच्या प्रामाणिकपणे केलेल्या सेवेचा खरोखर माझ्या कुटुंबाला आणि एकूणच परिसराला खूपच फायदा मिळाला आहे.हिच माझी आयुष्याची उपलब्धी आहे,असे ते सांगतात.

      आनंदी परिवाराच्या निमित्ताने त्यांच्याकडे जाण्याचा आणि त्यांच्या बंगल्याचे निरीक्षण करण्याचा मला योग आला. खरोखर 

त्यांचे बुलडाणा येथील राहते घरी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला आणि फळे घेतली जातात. सौर शक्तीचा जास्तीत जास्त वापर करून ते दैनंदिन गरजा भागविण्याचा प्रयत्न करतात हे मी स्वतःहून अनुभवलेले आहे. त्यांचे छोटेसे घर फार्म हाऊस वाटते.

 कडाळे साहेबांचा स्वभाव मित्तभाषी, संयमी आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा आहे. ते कोणतीही टोकाची भूमिका न घेता समन्वयाने काम करतात. म्हणून ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे असे मला वाटते. 

# प्रा दिगंबर कानडजे,

  सागवन-बुलडाणा,(८२७५२३१८७४)

Popular posts from this blog

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

प्रा.जगदेवराव बाहेकर: एक सर्वस्पर्शी बहुआयामी व्यक्तिमत्त्व

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व